स्पॅनिश भाषा : स्पेन देशाची अधिकृत बोली भाषा. ती मूलतः इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबाच्या ( भाषाकुलाच्या ) इटालिक ( इतालिक  ) या उपकुलातील आहे [⟶ इटालिक भाषासमूह ]. पाचव्या शतकात पश्चिम रोमन साम्राज्याचा र्‍हास झाल्यानंतरच्या काळात आयबेरिया द्वीपकल्पात सर्वसामान्य लोक लॅटिन भाषेच्या विविध बोली बोलत होते. त्या बोलींचा समूह आयबेरो रोमान्स या नावाने ओळखला जातो. लॅटिन भाषेच्या या सामान्य बोलीरूपांपासून ( व्हल्गर लॅटिन ) विकसित झालेली भाषा म्हणजे स्पॅनिश भाषा. 

 

स्पेनमधील जवळजवळ साडेचार कोटी लोक स्पॅनिश भाषा बोलतात. संपूर्ण जगभरात सु. ४७०— ५०० दशलक्ष स्पॅनिश भाषक असून रोमान्स भाषासमूहातील ही सर्वाधिक लोकप्रिय भाषा आहे. मँडेरिन व इंग्लिशनंतर इतक्या प्रचंड प्रमाणावर बोलली जाणारी ही तिसरी भाषा होय. सुमारे ६० दशलक्ष भाषक ही भाषा द्वितीय भाषा म्हणून बोलतात. तिचा परभाषा म्हणून अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लक्षणीय वाढ झाली आहे. स्पॅनिश ही भाषा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. म्हणजे एकूण स्पेन आणि स्पेनवर अवलंबून असणारी इतर राष्ट्रे, विषुववृत्तीय गिनी आणि मेक्सिकोपासून केपहॉर्नच्या सलग पट्ट्यात येणारी मध्य व दक्षिण म्हणजेच लॅटिन अमेरिकेतील १८ राष्ट्रे अशा सर्व राष्ट्रांची ही अधिकृत भाषा आहे मात्र ब्राझीलमध्ये पोर्तुगीजसदृश भाषा बोलली जाते. तसेच अमेरिका, प्वेर्त रीको, मोरोक्को, पश्चिम सहारा, फिलिपीन्स आणि ऑस्ट्रे-लियातही स्पॅनिश भाषक मोठ्या प्रमाणावर आढळतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडा व नैर्ऋत्येकडे स्पॅनिश भाषकांचे प्रमाण जास्त आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्लॉरिडा, नेव्हडा, लॉस अँजल्स हीनावे स्पॅनिश आहेत.  

 

स्पॅनिश भाषेचा उगम उत्तर मध्य स्पेनमधील जुन्या कॅस्टील प्रदेशात झाला असल्याकारणाने ती स्पेनमध्ये आणि आणखी काही स्पॅनिश भाषिक प्रदेशांत कॅस्टीलियन किंवा इस्पॅन्यॉल ( स्पॅनिश ) या नावांनीही ओळखली जाते. स्पॅनिश राज्यघटनेनुसार स्पेनच्या प्रत्येक नागरिकाला स्पॅनिश भाषा शिकणे बंधनकारक असून या भाषेचा वापर करायचा त्याला हक्क आहे. 

 

भाषेच्या विकासाचा इतिहास : उत्तर स्पेनमध्ये ( जुन्या कॅस्टील-मध्ये ) बोलल्या जाणार्‍या एका बोलीचा विकास होत जाऊन तिचे स्पॅनिश या एका प्रमुख जागतिक भाषेत रूपांतर व्हायला जवळजवळ हजार वर्षे लागली. इ. स. पू. तिसर्‍या शतकाच्या अखेरीस प्यूनिक युद्धाच्या दरम्यान रोमन लोक स्पेनमध्ये आले. जरी हे समाजगट बहुविध असले, तरी संपूर्ण आयबेरिया द्वीपकल्पामध्ये त्यांची एकच भाषा प्रचलित होती. आधुनिक प्रमाण स्पॅनिश बोली ज्या बोलीपासून निर्माण झाली, त्या कॅस्टीलियन बोलीचा नवव्या शतकात उत्तर मध्य स्पेनमधील म्हणजेच जुन्या कॅस्टीलमधील बुर्गोस शहराच्या आसपास उगम झाला.  

 

स्पॅनिश भाषेतील सर्वांत पहिला लिखित पुरावा दहाव्या शतकातील दोन लॅटिन ग्रंथांच्या शब्दार्थसूचींच्या स्वरूपात सापडतो. त्यांतील एक ग्रंथ कॅस्टीलियन बोलीत लिहिलेला आहे. या दोन्ही नोंदींमध्ये बोलीभेद आढळतो. त्याचप्रमाणे दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिल्या गेलेल्या  आणखी एका नोंदीची भाषा ही लिओनीज बोलीशी साम्य दाखवते. त्यानंतरचा बाराव्या शतकापूर्वीचा आणखी एक प्राचीन लिखित पुरावा हा मोझअरेबिक बोलीतल्या खर्जाहांच्या रूपात सापडतो. मोझअरेबिक बोली म्हणजे अरबांच्या अंमलाखाली असलेल्या व त्यामुळे द्वैभाषिक बनलेल्या स्पेनमध्ये बोलली जाणारी बोली. या बोलीत स्पॅनिश भाषेचे आर्ष रूप आणि त्याचबरोबर अरेबिक भाषेतून केलेली भरपूर शब्दांची उसनवारी आढळते. 

 

अकराव्या शतकात मूर लोकांनी जिंकलेले स्पेन ख्रिस्ती राज्यांनी पुन्हा जिंकून घेतले. तेव्हा कॅस्टीलियन ही बोली दक्षिणेकडे मध्य स्पेनच्या म्हणजेच नव्या कॅस्टीलमधील माद्रिद व टोलीडोच्या आसपास पसरू लागली. परंतु बाराव्या शतकाच्या मध्यात लिहिल्या गेलेल्या प्रसिद्ध महाकाव्याची भाषा मात्र कॅस्टीलियनच होती. तेराव्या शतकात वैचारिक गद्यही कॅस्टीलियन बोलीत लिहिले जाऊ लागले आणि लिखित भाषेचे प्रमाणरूप हे कॅस्टीलच्या बोलीवर आधारित असावे, असे त्या वेळच्या कॅस्टील राजवटीने ठरवले. त्यानंतर पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात कॅस्टीलियन ही बोली संपूर्ण स्पेनची अधिकृत भाषा झाली. याच काळात तिची सुरुवातीची व्याकरणेही लिहिली गेली. कॅस्टीलियन भाषेचे हे रूप थोडेसे प्राचीन कॅस्टीलच्या भाषेसारखे आर्ष आणि खेडवळ मानले जात होते परंतु सोळाव्या व सतराव्या शतकांत मात्र टोलीडोत व नंतरच्या काळात माद्रिदमध्ये या भाषेचे सुधारित प्रमाणरूप विकसित झाले व तिचे हेच दक्षिणेत फोफावलेले स्वरूप नव्या जगाला परिचित झाले. अठराव्या शतकात स्थापन झालेल्या स्पॅनिश अकादमीने कॅस्टीलियन भाषेचे प्रमाणरूप बहुतांशी निश्चित केले. 


स्पॅनिश भाषेच्या बोली : जवळजवळ सर्व स्पॅनिश भाषक कॅस्टीलियन ही स्पॅनिशची बोली बोलतात. ती लेओनीजच्या पश्चिम हद्दीपर्यंत व ॲरागॉनच्या पूर्व हद्दीपर्यंत बोलली जाते आणि हीच बोली प्रमाणबोली मानली जाते. अमेरिकेत आणि संपूर्ण स्पेनमध्ये वेगवेगळ्या प्रदेशांत जी स्पॅनिश भाषा बोलली जाते, तिच्यात ध्वनिव्यवस्था, वाक्य-व्यवस्था आणि पदव्यवस्था या पातळ्यांवर बरेच बोलीभेद आढळतात. 

 

या भाषेची अनुक्रमे माद्रिदमध्ये आणि लॅटिन अमेरिकेत बोलल्या जाणार्‍या दैनंदिन व्यवहाराच्या बोलींनुसार कॅस्टीलियन स्पॅनिश आणि अमेरिकन स्पॅनिश अशी दोन रूपे प्रमाण मानली जातात. लॅटिन अमेरिकेत बोलली जाणारी बोली जगभरातल्या स्पॅनिश भाषकांपैकी २०% भाषक बोलतात. मूलतः दोन्ही बोली भाषा सारख्याच असून उच्चार व शब्द-समुच्चयांत किरकोळ भेद आहेत. अमेरिकन बोलीच्या ध्वनिव्यवस्थेत थोडा फरक आहे. शिवाय शब्दसंग्रहातही इंग्रजीतून उसनवारी केलेले शब्द आढळतात. अर्थात या दोन्ही बोली बोलणार्‍या भाषकांना एकमेकांचे बोलणे समजण्यात अडचण येत नाही परंतु अमेरिकन स्पॅनिश ही कॅस्टीलियन स्पॅनिशपेक्षा अधिक कर्णमधुर आहे, असे म्हटले जाते.  

 

ज्युदेओ स्पॅनिश किंवा लॅडिनो या नावाने अस्तित्वात असलेली एक बोली ही कॅस्टीलियन बोलीचे मध्ययुगीन आर्ष रूप असली, तरी इतर भाषांपेक्षा ती आधुनिक स्पॅनिश बोलीला जवळची आहे. पंधराव्या शतकात आयबेरियन द्वीपकल्पातून हद्दपार केल्या गेलेल्या सेफार्डी ज्यूंची ही बोली असून ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

 

ध्वनिविन्यास : या भाषेत १९ व्यंजने आणि ५ स्वर ( अ, ए, इ, ओ, उ ) आहेत. व्यंजनांची संख्या वेगवेगळ्या बोलींनुसार १७ — १९ अशी वेगवेगळी सांगितली जाते. भाषेच्या ध्वनिव्यवस्थेत अर्धस्वर आहेत की नाहीत, याबद्दल वाद आहेत. या भाषेतील ध्वनींमधील अघोष स्पर्श-ध्वनी हे ताणलेले आणि अल्पप्राण ध्वनी आहेत. या भाषेत रोमान्समधून निर्माण झालेल्या इतर भाषांप्रमाणे जास्त घर्षक नाहीत. शिवाय अल्पसंख्येत असलेले हे घर्षक अघोष आहेत. मध्ययुगीन भाषेत बहुधा ६ तालघर्षक, घोष आणि अघोष अशा जोड्यांमध्ये असावेत. त्यांची संख्या कमी होण्याचे कारण शोधून काढले नसले, तरी ध्वनिव्यवस्था व पदव्यवस्था यांतील देवाणघेवाणीमुळे कदाचित असे झाले असावे. स्पॅनिश भाषेत शब्दावयवाचे विविध प्रकार आहेत. उदा., स्वर ( व्यंजन ), व्यंजनस्वर ( स्वर ), व्यंजन स्वर व्यंजन इ. बहुतांश अविकारी नामांचा शेवट स्वरान्त अवयवाने होतो आणि फक्त ल, न, र, स ही व्यंजने शब्दाच्या शेवटी येऊ शकतात.  

 

पदविन्यास : स्पॅनिश ही विश्लेषणशील भाषा नसून विकारप्रवण भाषा आहे पण तिची पदव्यवस्था बरीच संमिश्र स्वरूपाची आहे. या भाषेत २ लिंगे आहेत. नामांना लिंगवचन दर्शविणारे विकार होतात. पुल्लिंगी व स्त्रीलिंगी नामांना अनुक्रमे o ( ओ ) व a ( आ ) हे प्रत्यय लागतात आणि अनेकवचन दाखवण्यासाठी s ( स ) हा प्रत्यय लागतो. 

 

भाषेत उत्तरयोगी अव्यये नसून पूर्वयोगी अव्यये आहेत. नामांत विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी बदल होत नाहीत. शब्दांपासून साधित रूपे बहुधा उपसर्ग लागून होतात आणि त्या साधित रूपांचे व्याकरणिक कार्य आणि अर्थच्छटाही मूळ शब्दापासून वेगळी असते. लघुत्ववाचक आणि गुरुत्ववाचक प्रत्यय लागून शब्दसिद्धी होते, तेव्हा आकाराच्या निर्देशना-इतकेच गुणव्यंजनेलाही महत्त्व असते. उदा., illo हा प्रत्यय अपुरेपणाचा निदर्शक आहे. libro या शब्दाचा अर्थ पुस्तक असा आहे. या शब्दाला illo प्रत्यय लागून बनलेल्या शब्दाचा (librillo) अर्थ पुस्तिका असा होतो. सामासिक शब्द सामान्यतः दोन पदांचा बनलेला असतो. तो बहुधा नाम + गुणविशेष किंवा क्रियापद + वस्तू अशा दोन पदांचा मिळून बनतो. उदा., Peli-largo म्हणजे केस + लांब = लांब  केसांचा किंवा lave + platos म्हणजे धुणे + प्लेट्स ( डिशेस ) = डिशवॉशर. विशेषणे नामांच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतात. क्रियापदे कर्त्याच्या पुरुष आणि वचनाप्रमाणे बदलतात. प्रत्येक  क्रियापदाची अर्थ, व्याप्ती अशा अनेक बाबींमुळे जवळजवळ ५० प्रकारची रूपे होतात. क्रियापदे ही क्रिया-विशेषणांच्या आधी येतात.  

 

वाक्यविन्यास : स्पॅनिश ही भाषा कर्ता + क्रियापद + कर्म (SVO) असा क्रम असलेली भाषा आहे. वाक्यात कर्ता मूर्त स्वरूपात असणे अपरिहार्य नाही. उदा., Cmianos म्हणजे आम्ही खात होतो किंवा llueve म्हणजे पाऊस पडतो आहे. काही भाषावैज्ञानिकांच्या मते या वाक्यांमध्ये कर्ता अध्याहृत असतो. वाक्यात नाम आणि इतर पदबंधातील संबंध पूर्वयोगी अव्ययांनी दाखवले जातात. वाक्यात स्वामित्ववाचक संबंध ज्या दोन पदांमध्ये असतो, त्यात ज्या वस्तूंवर स्वामित्व असते त्या वस्तू आधी येतात व नंतर त्या वस्तूंवर स्वामित्व दाखवणारा येतो. नकारार्थी वाक्यांमध्ये नकारार्थी शब्द आधी येतो. नंतर जी वस्तू अथवा क्रिया नाकारली जाते ती येते. बहुतांश वेळा विशेषणे नामपदबंधाच्या नंतर येतात आणि त्यांचा अर्थ त्यांच्या स्थानांवरून समजू शकतो. काही सर्वसाधारण विशेषणे मात्र नामांच्या आधी येतात. उदा., mi Viejo amigo माझा फार काळापासूनचा मित्र आणि mi amigo Viejo म्हणजे माझा वडीलधारा मित्र. Viejo या विशेषणाच्या स्थानानुसार पदबंधाचा अर्थ बदलला. क्रियापदे व नामपदबंध यांचा क्रम ठरलेला असतो. सहसा जे ज्ञात आहे, ते अज्ञाताच्या आधी येते. उदा., Juan llego जॉन आला. या वाक्यात जर जॉनविषयी आधी सांगितले गेले असेल, तर ‘ जॉन ’ वाक्याच्या सुरुवातीला येतो परंतु llego Juan या वाक्यात ‘ जॉन ’ चे स्थान क्रियापदानंतर येते कारण त्याच्या येण्याविषयी आधी चर्चा झालेली नसते.  


वाक्यात कर्ता व नंतर क्रियापद हा क्रम असणे बंधनकारक आहे. परंतु प्रश्न विचारताना क्रियापद व नंतर कर्ता यांचा क्रम प्रश्नवाचके वापरून बदलणे मात्र बंधनकारक नसते. त्यामुळे विधान आणि प्रश्न यांतला फरक प्रश्नकर्त्याच्या सूरयोजनावरूनच समजू शकतो.  

 

शब्दसंग्रह : स्पॅनिश भाषेचा मूळ शब्दसंग्रह रोमान्समधून आलेला आहे. तसेच बास्क, अरेबिक, कॅटालन, फ्रेंच, इटालियन इ. भाषांमधून उसने शब्द घेऊनही ही भाषा समृद्ध झाली आहे. बाहेरच्या इतर देशांशी संपर्क येऊन काही विशिष्ट क्षेत्रांशी ओळख झाल्यामुळेही नवीन शब्दांची निर्मिती केली गेली. सेल्टिक भाषेतून भूभागाखालील जीव-विश्वाशी संलग्न शब्द घेतले गेले, तर जर्मानिक भाषेतून सैन्याशी संबंधित शब्द घेतले गेले. गेरा = युद्ध, येल्मो = हेल्मेट, ब्लँको = पांढरा, रिको = श्रीमंत, फाल्ड्डा = स्कर्ट इ. दैनंदिन व्यवहारातले शब्दही जर्मानिक भाषेतूनच आलेले आहेत. अरेबिक भाषेतून विशेषतः राज्य-सरकार, बांधकाम, सिंचन, फलोत्पादन अशा प्रमुख अर्थक्षेत्रांमधील जवळजवळ चार हजार शब्दांची या भाषेने उसनवारी केली आहे. उदा., ॲल्गोदोन = कापूस, सानाहोरिया = गाजर इत्यादी. अर्थ व्यक्त करण्या-साठी नवीन शब्द तयार करताना या भाषेने लॅटिनचाच आधार घेतला. रोजच्या वापरातल्या जुन्या शब्दांपासून नवे समानार्थी किंवा साधित शब्द तयार केले गेले. उदा., जुन्या abrir ( to open — उघडणे ) या शब्दापासून नवा apertura ( opening — उद्घाटन ) हा शब्द तयार केला गेला. लॅटिन अमेरिकन राष्ट्रांमध्ये अनेक वर्षांपासून द्वैभाषिकता होती. त्यामुळे तिथल्या बोलींमध्ये बरेच अमेरिंडियन शब्दही आहेत. त्यांतले काही शब्द आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरले जाणारे आहेत. उदा., cacao ( कोको ), chocolate ( चॉकलेट ), tomato ( टोमॅटो ), maiz ( कणीस ), potato ( बटाटा ), tobacco ( तंबाखू ). अलीकडे भाषेत नव्याने समाविष्ट झालेले शब्द इतर रोमान्स भाषांमधून आणि इंग्रजीतूनही घेतलेले आहेत. 

 

लिपी : स्पॅनिश भाषा ही रोमन वर्णमालेतील अक्षरे वापरून लिहिली जाते. तिच्या सध्याच्या लिपीत २८—३० अक्षरचिन्हे आहेत आणि त्यांपैकी k ( क ) आणि w ( व ) ही चिन्हे परभाषेतून आलेल्या शब्दांपुरती मर्यादित आहेत. ch, ll, n ° , rr ही स्वतंत्र अक्षरे गणली जातात आणि वर्णमालेत ती अनुक्रमे c, l, n व r यांनंतर येतात. अक्षरांवरील अनियमित आघात हा तीव्रतादर्शक स्वरचिन्हाने दर्शवला जातो. उदा., ( c ). कॅस्टीलियनची लेखनपद्धती स्वनिमिक आहे आणि स्पॅनिश भाषेची अलीकडची लेखनपद्धती ही तिला अनुसरून आहे कारण त्या लेखन-पद्धतीत व्युत्पत्तिशास्त्रानुसार असणारे पर्याय आणि विसंगती पण विचारात घेतलेल्या आहेत. 

 

संदर्भ : 1. Berlitz, Charles, Spanish Step-by-Step, Wynwood, 1990.

           2. Penny, Ralph J. A History of the Spanish Language, Cambridge, 2002.

           3. Zagona, Karen, The Syntax of Spanish, Cambridge, 2002.  

मेहता, कलिका