स्पर्शज्ञान : त्वचेशी किंवा श्लेष्मल ( बुळबुळीत ) पटलाशी प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे ज्या संवेदना होतात, त्यांपैकी स्पर्शाची संवेदना मानवप्राण्यामध्ये अतिशय विकसित अवस्थेमध्ये आढळते. शरीराच्या बर्याचशा भागांवरील केसांचे प्रमाण कमी झाल्यामुळे हे शक्य झाले आहे.त्यामुळेच गंधज्ञान, ध्वनिसंवेदन व दृष्टी यांसारख्या विशेष संवेदनांची कार्यक्षमता कितीही कमी झाली, तरी मनुष्य स्पर्शज्ञानाच्या साह्याने आपले बरेच दैनंदिन व्यवहार व्यवस्थित पार पाडू शकतो.
स्पर्शाचे संवेदन निर्माण होण्यासाठी संदेशवाहक तंत्रिका तंतूंच्या ( मज्जातंतूंच्या ) टोकांशी अनेक प्रकारची ग्रहणशील इंद्रिये म्हणजेच स्पर्शग्राही विकसित झालेली आढळतात. त्वचेच्या पृष्ठभागाखाली
(१) तंत्रिका तंतूंची मुक्त अनाच्छादित टोके उदा., डोळ्याच्या पारदर्शक स्वच्छ मंडलातील व त्वचेच्या काही भागांतील स्पर्शग्राही. हा प्रकार सर्वांत अविकसित म्हणता येईल.
(२) केसविरहित त्वचेवरील ( उदा., ओठ, तळहात, तळपाय, बोटे इ. ) लांबट कोषांमध्ये बंदिस्त तंतुसदृश तंत्रिका, माइसनर कणिका या नावाने ओळखली जाणारी कणिका अतिशय संवेदनशील असून पृष्ठभागावरील पदार्थाची हालचाल व ८० हर्ट्झपेक्षा कमी कंप्रतेची कंपने तसेच स्पर्श करणार्या वस्तूचे आकारमान ( त्रिमितीय वैशिष्ट्ये ) यांचे ज्ञान करून देण्यास मदत करते.
(३) केसाळ त्वचेमधील मर्केल चकती तंत्रिकांची पसरट टोके असलेले स्पर्शग्राही अनेकदा त्वचेच्या सूक्ष्म उंचवट्यांखाली एकवटलेले असतात. वस्तूचे स्थान निश्चित करण्यास आणि तिचा पोत जाणण्यास त्यांची मदत होते.
(४) केसांच्या मुळांभोवती विळखा घालून त्यांच्या किंचित हाल-चालींनी उत्तेजित होणारे केशसंलग्न स्पर्शग्राही. केसाळ त्वचेवरील वस्तूची हालचाल त्यामुळे जाणवते.
(५) त्वचेच्या खोलवरच्या स्तरातील आणि सांध्यांच्या कोषांभोवती असलेल्या ऊतकातील स्पर्शग्राही. रुफिनी यांच्या नावाने ज्ञात असलेल्या या ग्राहींची रचना तंत्रिका तंतूंच्या अनेक सूक्ष्म शाखांना कोषांमध्ये बंदिस्त केल्यासारखी असते. जोराचा दाब आणि जड व भारयुक्त स्पर्श यांमुळे हे ग्राही सतत स्पर्शाची जाणीव करून देत राहतात. कारण वर वर्णन केलेल्या सर्व स्पर्शग्राहींप्रमाणे त्यांच्या संवेदनेचे अनुकूलन ( सवय होणे ) त्वरित होऊ शकत नाही.
(६) पाचीनी कणिका या नावाने ओळखले जाणारे स्पर्शग्राही. एक मध्यवर्ती तंत्रिका तंतू आणि त्याभोवती एकावर एक असे अनेक पापुद्य्रां-सारखे पटलांचे थर अशी रचना असलेले हे ग्राही संयोजी ( जोडणार्या ) ऊतकांच्या त्वचेखालील आणि अधिक खोलवरच्या थरांत असतात. ऊतकांच्या हालचालींनी उत्तेजित होणारे हे ग्राही अतिजलद ( ८०० हर्ट्झपर्यंतच्या ) कंपनांची जाणीव करून देऊ शकतात. त्यांचे संवेदन विनाविलंब अनुकूलन दर्शविते.
स्पर्शग्राहींकडून ग्रहण केलेले स्पर्शाचे संवेदन तंत्रिकेमध्ये विद्युत् आवेगात रूपांतरित होते. संदेशवहनासाठी निरनिराळ्या प्रकारचे तंत्रिका तंतू उपलब्ध असतात [⟶ संवेदना तंत्र ]. ज्या स्पर्श संवेदनाचा प्रकार ढोबळ असतो, ठराविक स्थान फार चिकित्सक पातळीवर निश्चित होत नाही आणि स्पर्श झालेल्या वस्तूचे जाणिवेत त्याच्या गुणवत्तेबद्दल ( प्रकाराबद्दल ) विश्लेषण होण्याची आवश्यकता नसते असे संवेदन मायेलीनविरहित ‘ सी ’ प्रकारच्या तंतूंमधून जाते. अधिक चिकित्साक्षम संवेदन मायेलीन आवरण असलेल्या ‘ ए ’ प्रकारच्या तंतूंमधून अधिक वेगाने (६—६० मी. प्रती सेकंद ) प्रवास करते. मेरुरज्जूमध्ये प्रवेश केल्यावर हे दोन प्रकारचे तंतू भिन्न मार्गांनी मेंदूकडे जातात. मेरुरज्जूच्या आणि मस्तिष्काच्या विविध पातळ्यांवर स्पर्श संवेदनामुळे प्रतिक्षेपी क्रिया घडून येतात परंतु अशा क्रियांमध्ये वेदना व उष्णता संवेदन यांचाही फार मोठा सहभाग असतो. मानवी स्पर्श संवेदनाचे महत्त्वाचे विश्लेषण, अर्थनिर्णयन हे प्रमस्तिष्काच्या भागात होत असते. निरनिराळ्या प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यात, मानसिक प्रक्रियांमध्ये आणि भावनांच्या सक्रियनामध्ये हे संवेदन अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते. [⟶ तंत्रिका तंत्र मेंदू ].
शस्त्रक्रियेसाठी एखादा भाग बधिर केला जातो किंवा भूल दिली जाते, तेव्हा वेदना आणि तापमान यांचे संवेदन प्रथम जाते. त्यानंतर काही वेळ स्पर्शाची जाणीव होत राहते परंतु या जाणिवेचे अनुकूलन लवकर होत असल्याने रुग्णाला काही वेळानंतर आपल्या शरीराला हाताळले जात असल्याची जाणीवही होत नाही. याउलट उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्यास हेच संवेदन अधिक तीव्र होते. मादक पदार्थ आणि संभ्रमकारक द्रव्यांच्या सेवनानंतर स्पर्श संवेदनाचा अर्थ लावण्यात दोष निर्माण होऊन अपसंवेदनामुळे व्यक्ती अतिसंवेदनशील होते किंवा स्पर्शाने वेदना किंवा तापमानातील बदलासारखी जाणीव होऊ शकते. मनोविकारांमुळेही अपसंवेदन उद्भवू शकते.
पहा : त्वचा प्राण्यांमधील संदेशवहन संवेदना तंत्र ज्ञानेंद्रिये.
श्रोत्री, दि. शं.
“