स्नान आणि स्नानगृहे : पाणी, जलयुक्त अन्य पदार्थ, दूध, माती, वाफ  यांनी शरीर भिजविण्याची एक प्रक्रिया व त्यासाठी निर्मिलेल्या–बांधलेल्या वास्तू. स्नानाचा उद्देश शरीरस्वच्छता किंवा रोगनिवारण असतो. स्नानविधी हे धार्मिक वा गूढवादी किंवा अन्य अन्वयार्थानेही असतात. जसे ख्रिस्ती धर्मातील अभ्यंजन स्नान किंवा गंगादी नद्यांतील हिंदूंचे पवित्र धार्मिक स्नान होय. प्राचीन सार्वजनिक स्नानगृहे ईजिप्त, सिंधू संस्कृती, इंका, माया इ. अस्तित्वात असल्याचे उल्लेख आढळतात तथापि त्यांचे फार थोडे अवशेष पुरातत्त्वीय उत्खननांत उपलब्ध झाले आहेत. प्राचीन ग्रीक संस्कृतीत स्नानविधीला महत्त्व असल्याचे काही पुरावे मिळतात. नॉससच्या प्रासादातील (इ. स. पू. १७००) स्नानदालनांच्या अवशेषांवरून त्याची कल्पना येते. रोमन साम्राज्यात रोम व पाँपेई या शहरांत विशाल स्नानगृहे होती. ती केवळ स्नानगृहे नसून मनोरंजनाची सांस्कृतिक केंद्रे होती. त्यांना थर्मो म्हणत. त्यांची बांधणी उंच चौथर्‍यावर केली जाई व सभोवती तटभिंत असे. त्यात कोमट व उष्ण पाण्या-बरोबरच कपडे बदलण्याची स्वतंत्र खोली असे. तसेच तेल, उटणी, अत्तरे लावून मालीश करून घ्यावयाची खोली (अँक्च्युरिया) असे स्वतंत्र दालन असे. ही सर्व दालने काच, संगमरवर व आरसे यांनी सुशोभित केलेली असत. रोममध्ये ‘ थर्मी ऑफ कॅराकॅला ’ नामक भव्य स्नानगृह होते, त्याचे भग्न अवशेष अवशिष्ट आहेत. एके काळी त्यात १,६०० व्यक्तींच्या स्नानाची सोय होत असे. क्लीओपात्रा या रोमन साम्राज्या-तील राणीच्या शाही स्नानाच्या काही कथा, दंतकथा, वदंता प्रसिद्ध आहेत.बायझंटियममध्ये सुरुवातीच्या काळात स्नानगृहे असल्याचे दाखले मिळतात. पुढे तुर्कांनी तीच कल्पना आचरणात आणली. त्यांनी काही काळानंतर ती ‘ टर्किश बाथ ’ या बदललेल्या स्वरूपात पश्चिम यूरोपात पसरविली. सॉमरसेटच्या स्नानगृहावरून रोमन लोकांची स्नानगृहे कशी होती, याची कल्पना येते. ट्रोजन, टायट्स,डायोक्लेशियन या राजांची मोठी व शाही थाटाची स्नानगृहे होती. त्यांत ग्रंथालये, व्याख्यानकक्षा, बागा, व्यायामगृहे इ. असत.

`रोमन साम्राज्याच्या र्‍हासानंतर भव्य स्नानगृहांचे प्रमाण कमी झाले. प्रबोधन कालातील आणि सतराव्या व अठराव्या शतकांतील सार्वजनिक स्नानगृहांतून अनीती पसरते, अशी हाकाटी नीतिवादी मंडळींनी त्या वेळी केल्याने, तसेच साथीचे रोग पसरतात, असा समज वाढल्याने स्नानगृहे ही संकल्पना कमीच होत गेली. परिणामतः राजे-रजवाड्यांतही स्नानाची प्रथा कमी झाली होती. एलिझाबेथ राणी तर दर तीन महिन्यांनी स्नान करीत असे. फ्रान्सचा चौथा हेन्री स्नान धोकादायक आहे, असे मानीत असे. चौदावा लूई कधीकाळी सर्वांग धूत असे, तेव्हा वातावरण चांगले राहावे म्हणून सुगंधी द्रव्ये जाळीत असे. एकोणिसाव्या शतकात स्नान करण्याचे प्रमाण वाढले, तरी सार्वजनिक स्नानगृहे कमीच होती. औद्योगिक क्रांतीनंतर एकेका गावात हजारो माणसे एकत्र राहू लागली. तेथील वातावरण धुराने दूषित होई. हवा व उजेड कमी असलेल्या जागेत माणसांना दाटीवाटीने राहावे लागे. सांडपाण्याची व्यवस्था नसे आणि पाणी अपुरे असे. १८४२ मध्ये लिव्हरपूल येथे व्यक्तिशः स्नान करावयाची सोय असलेले स्नानगृह सुरू झाले, तेच पहिले आधुनिक स्नानगृह होय. त्याच वर्षी पोहण्याची सोय असलेले सार्वजनिक स्नानगृह उभारण्यात आले तथापि पौर्वात्य आणि उष्ण प्रदेशांत स्नानाची पद्धत फार पूर्वीपासून चालू असलेली आढळते. स्नानाचा धार्मिक रूढींशी संबंध लावलेला असल्याने प्रतिदिनी स्नानाचा प्रघात पडलेला दिसतो. प्रत्येक देशांत स्नानाच्या विविध पद्धती रूढ होत्या. मुसलमानी अंमलाखालील देशांत रोमन पद्धतीची सार्वजनिक स्नानगृहे होती. रशिया-तील स्नानांचे विविध प्रकार रूढ असून ते अनेक ठिकाणी थोड्याफार फरकाने प्रचलित आहेत.

स्नानाचे प्रकार : अंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने स्नान करणे याला अभ्यंगस्नान म्हणतात. याला मांगली स्नान असेही म्हणतात. ही पद्धत फार प्राचीन काळापासून भारतात (विशेषतः हिंदूं-मध्ये) व इतर देशांत प्रचलित आहे. सणासुदीला विशेषतः दिवाळीच्या सणानिमित्त अभ्यंगस्नान केले जाते. शरीराचे स्नायू बलवान व्हावे व बल, पुष्टी आणि कांती वाढावी, हा त्यामागे उद्देश असतो. आरोग्यवृद्धी हा त्या स्नानाचा पहिला उद्देश असून पुढे त्याला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. या कामी तीळ किंवा खोबर्‍याचे तेल आणि क्वचित तूपही वापरतात. त्यांत चंदन, गुलाब, मोगरा वगैरे फुलांची अत्तरे मिसळतात. तेलात हळदही टाकतात. तोही अभ्यंगाचाच प्रकार होय. मंगल कार्यापूर्वीड्ढविशेषतः विवाहविधीपूर्वीड्ढयजमान दंपतीने अभ्यंगस्नान करावे, असा संकेत आहे. हळदी समारंभ हाही अभ्यंगस्नानाचा एक प्रकार होय. राज्याभिषेक, राजसूय, अश्वमेध इ. प्रसंगी अभ्यंगस्नानाला विशेष प्राधान्य असून त्याला अठरा द्रव्यांची आवश्यकता असते. ज्यू लोकांत राजे आणि धर्माधिकारी यांना अधिकारासंबंधी अभिषेक करण्याच्या प्रसंगी तेल लावीत. ख्रिस्तांचे मसीहा असे जे नाव आहे, त्याचा अर्थ प्रलाभिषिक्त असाच आहे. रोमन कॅथलिकांच्या मंदिरांतून विशेष प्रसंगी अभ्यंगविधी होत असतो.

ज्वर, जड अंग, सांधेदुखी, अपचन, मलावरोध या व्याधींवर पाण्याच्या वाफेचे स्नान गुणकारी व चैतन्यमय ठरते. या पाण्यात निर्गुडी, आघाडा, तरवड ही वातनाशक पाने घालतात. रशियातील वाफेच्या स्नानाचा प्रकार टर्किश स्नानासारखाच असतो. फिनलंडमध्ये सावता नावाचा वाफेच्या स्नानाचा प्रकार आहे. लाल होईपर्यंत तापवलेल्या दगडावर पाणी ओतल्याने उत्पन्न होणारी वाफ अंगावर घेतात. त्या वेळी रुधिराभिसरण चांगले व्हावयासाठी सावनाच्या फांद्या अंगावर मारतात. बर्चच्या पाल्याने अंग चोळल्यानंतर गार पाण्याने स्नान करतात. या स्नानानंतर विश्रांती घेतल्यास अंगात नवचैतन्य निर्माण होते. स्कँडिनेव्हियन लोक स्नान पूर्ण करताना गार पाण्यात बुड्या मारतात किंवा बर्फात लोळत असतात.

सुगंधाच्या घमघमाटात अंगावर गरम पाण्याचे तुषार आले, तर श्रमपरिहार होऊन उल्हसित वाटते. अंग दुखण्यावर किंवा अंगाचा दाह होत असल्यास गरम पाण्याच्या तुषारस्नानाचा लाभ होतो. गार पाण्याच्या फवार्‍याचे स्नानही श्रमपरिहारक असते.

पाश्चिमात्य लोकांत सूर्यस्नान लोकप्रिय आहे. सर्वांग ओल्या फडक्याने पुसून, प्रथम पालथे पडून, सूर्यकिरणे अंगावर घेतल्यानंतर उताणे पडून आणि त्यानंतर दोन्ही बाजूंवर किरणे घेतात. सूर्यस्नान वीस मिनिटांपासून एक तासापर्यंत करतात. दर दहा मिनिटांनी ओल्या फडक्याने अंग पुसतात.गोर्‍या कातड्यावर थोडा राप चढतो म्हणून पाश्चिमात्य लोकांत सूर्यस्नान लोकप्रिय आहे. शिवाय ‘ ड ’ जीवनसत्त्व मिळून त्याने शरीराचे चापल्य व तजेला वाढतो. सूर्यप्रकाश घेताना प्रारंभी सर्वांग थोडावेळ उघडे ठेवतात. सवय झाल्यावर आणि अंग पुरेसे रापल्यावर जास्तवेळ सूर्य-प्रकाशात रहावयास हरकत नसते. प्रारंभीच जास्तवेळ सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यास दाह उत्पन्न होऊन मन कमकुवत होण्याचे भय असते.

अंगकांती तेजस्वी बनविण्यासाठी चंद्रस्नानाचे महत्त्व प्रतिपादिले आहे. गरम किंवा कोमट पाण्याने अंग पुसून चांदण्यात बसावे किंवा झोपावे. त्याने त्वचा उजळते आणि अस्वस्थता कमी होऊन मनःशांती लाभते तसेच निद्रानाशाचा विकार होत नाही. शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी हे स्नान जास्त आल्हादकारक असते.

समुद्राच्या आणि नदीच्या स्नानाला हिंदू लोक धार्मिक महत्त्व देतात. कुंभपर्व हा एक पुण्ययोग असून या दिवशी प्रयागतीर्थात स्नान केल्याने एक हजार अश्वमेध, शंभर वाजपेय व पृथ्वीभोवती एक लाख प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळते, अशी समजूत आहे. कृष्णा, गंगा, गोदावरी इत्यादी नद्यांतील स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पाश्चात्त्य देशांत तिसरा जॉर्ज या इंग्लंडच्या राजामुळे समुद्रस्नान लोकप्रिय झाले. समुद्राच्या थंड पाण्याने हृदयावर ताण पडण्याची भीती असल्याने असे स्नान सरसकट सर्वांनाच मानवत नाही.

टबबाथ हा मुख्यतः पाश्चात्त्य स्नानप्रकार आहे परंतु तो इंग्रजांच्या वसाहतीकरणानंतर पौर्वात्य देशांतही प्रसृत झाला असून श्रीमंतांच्या प्रशस्त हवेल्यांत तो हमखास आढळतो. यामध्ये पाय पसरून बसता येईल, रेलून बसता येईल किंवा व्यवस्थित बसता येईल अशा प्रशस्त भांड्यात स्नान करण्याची पद्धत असून त्यात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय व डोके  धुतले म्हणजे भांड्यातले पाणी खराब होत नाही. शरीराला सोसेल असे गरम पाणी त्यात सोडतात. पोटापर्यंत पाणी येऊ शकेल इतके पाणी या घंगाळेसदृश भांड्यात घेतात.

फ्रेंच बाथसाठी टबात थंड पाणी घेऊन त्यात अर्धा तास बसल्यानंतर कोमट पाणी घेतात. त्यानंतर अंगाला साबण लावून अंग स्वच्छ करतात. बाळंतपणानंतर टबातील स्नान लाभदायक ठरते. आधुनिक काळात स्नानाच्या वेळी वापरावयाचे साबणांचे अनेक सुगंधी प्रकार उपलब्ध आहेत. स्नानाच्या पाण्यात दोन चमचे अमोनिया घालून अमोनिया स्नान करतात. ह्यासारखाच असलेला ग्लिसरीन स्नानाचा प्रकार त्वचेसाठी उपयुक्त असून तो खर्चिक आहे. लव्हेंडर स्नान, सुगंधी क्षारांचे स्नान असे अनेक सुगंधी प्रकार स्नानाच्या संदर्भात लोकप्रिय आहेत. यांशिवाय वाळू , कुजलेला झाडपाला, किरणोत्सर्गी मातीही स्नानासाठी वापरतात. विशेषतः बालकांना कडुनिंबाचे डहाळे टाकून उन्हात तापविलेल्या पाण्याने स्नान घालतात. तसेच हळद आणि डाळीचे पीठ दुधात कालवून ते त्यांच्या अंगाला स्नान घालण्यापूर्वी चोळतात. भारतात ऋतुप्राप्तीनंतरच्या चौथ्या दिवशीच्या स्नानास विशेष महत्त्व आहे. तद्वतच बाळंतिणीचे स्नान शरीर बांधेसूद राहण्यासाठी आवश्यक मानले जाते. जपानी पद्धतीच्या स्नानात मालीश अंतर्भूत असते. जपानमधील मात्सुयामा, जर्मनीतील बेडन-बेडन,चेकोस्लोव्हाकियातील कॉर्लव्ही व्हारी, फ्रान्समधील विशी एक्स-ले-बान, इंग्लंडमधील बाथ व हेरोगेट तसेच बेल्जियममधील स्पा हे झरे औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

भारतात अनेक ठिकाणी औषधी गरम पाण्याचे झरे (उन्हाळे) असून युमनथांग (सिक्कीम), तप्तपाणी (ओडिशा), नग्गर, मनाली, मणिकरण (हिमाचल प्रदेश), बक्रेश्वर (प. बंगाल), वज्रेश्वरी, पाली, गणेशपुरी, धुळे जिल्ह्यात शहादे व शिरपूर, जळगाव जिल्ह्यात चोपडे (महाराष्ट्र) इत्यादी ठिकाणी खास स्नानासाठी लोक जातात. गंधकयुक्त गरम पाणी काही त्वचारोगांवर औषधी असते. या पाण्यात गंधक, फॉस्फरस, कॅल्शियम कॉर्बोनेट, मॅग्नेशियम, सिलिका व इतर लवणे असतात.

पहा : उन्हाळे खनिज जल रोमन स्नानगृहे.

 देशपांडे, सु. र. गोखले, श्री. पु.