स्थिरवस्तुचित्रण : ( स्टिल लाइफ ). पश्चिमी कलेतिहासातील एक प्रमुख चित्रप्रकार. यात निर्जीव वस्तू हाच प्रमुख विषय असून त्यांची सुसंगत यथादर्शक मांडणी केलेली असते. तज्ज्ञांच्या मते बरोक कलेशी या चित्रप्रकाराचे साधर्म्य आढळते. यातील कलावंतांची विचारसरणी स्वतंत्र असून रचना, रंगसंगती आणि तंत्र यांचा विविध प्रकारे वापर करून त्यांनी कलाक्षेत्रात नवनवीन प्रयोग यशस्वी करून दाखविले आहेत. ‘ स्टिलेव्हन ’ या डच शब्दावरून ‘ स्टिल लाइफ ’ ही संज्ञा प्रचारात आली असावी. या शब्दाचा अर्थ ‘ स्थिर ’ वा ‘ निर्जीव ’ असा आहे. याचा प्रसार मुख्यतः नेदर्लंड्स, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली इ. देशांत झाला होता. भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर याचा प्रसार झाला.
स्थिरवस्तुचित्रण हा एक स्वतंत्र कलाप्रकार म्हणून यूरोपात प्रबोधन-काळाच्या उत्तरार्धात स्थिरावला असला, तरी त्याची सुरुवात इ. स. दुसर्या-तिसर्या शतकापासून झाली. त्या वेळी एखाद्या चित्रात एखाद्या वस्तूचे चित्रण असणे असे त्याचे मर्यादित स्वरूप होते. ग्रीक संस्कृतीत भांड्यांवर दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या वस्तूंचे चित्रण होते. रोमन भित्तिचित्रांवर वस्तूची काचचित्रे होती. जमिनीवर लावलेल्या मोझाइक-मध्येदेखील फळे, परडी अशा वस्तूंचे चित्रण आढळते. तेराव्या शतकात इटालियन चित्रकार ⇨ जॉत्तो दी बोंदोने व त्याच्या काही विद्यार्थ्यांनी चित्रात कोनाडे दाखवून त्यांत वस्तूंची चित्रे काढली होती. इ. स. १४७५ च्या दरम्यान व्यक्तिचित्रांच्या पार्श्वभूमीला काही वस्तूंचे चित्रण आढळते परंतु अशा प्रकारच्या वस्तुचित्रांना स्थिरवस्तुचित्रण म्हणून स्वतंत्र कला-प्रकार म्हणता येणार नाही.
चित्रणात दोन किंवा अधिक वस्तूंचे चित्र असते. उदा., फुलांचे गुच्छ, फुलदाणीसह फुले, शंख-शिंपले, केरसुणी, टोपल्या इत्यादी. काही वेळा त्यात खाद्यपदार्थ, भुसा भरलेले पक्षी, दुकानात ठेवलेले किंवा लटकवलेले मांस हे चित्रविषय आढळतात.
कलेतिहासात चित्रनिर्मितीच्या प्रेरणा व हेतू वेगवेगळ्या काळांत निरनिराळे होते. स्थिरवस्तुचित्रणनिर्मितीमागेही धार्मिक हेतू होते. नैतिक- तेचे संदेश त्यांद्वारे दिले गेले. काही वेळा त्यातून रूपकात्मकतेने जीवना-तील नश्वरता, क्षणभंगुरता, त्याग, ज्ञान यांसारख्या गोष्टींकडे लक्ष वेधले गेले. भोजन कक्षात स्थिरवस्तुचित्र असणे, हे उच्च राहणीमानाचे निर्देशक व प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते. आधुनिक कलांच्या झंझावातात बंडखोर चित्रकारांनीही या विषयात रस घेतलेला आढळतो. त्यात प्रायोगिकताही होती.
मध्ययुग व प्रबोधनकाळ : या काळातील स्थिरवस्तुचित्रे धार्मिकतेशी संबद्ध होती. त्यांतून ख्रिस्ती धर्मातील शिकवणूक, तत्त्वे रूपकात्मक पद्धतीने सांगितली गेली. विशेषतः उत्तर यूरोपातील चित्र-कारांनी वास्तववादी चित्ररेखाटन केले. फ्लेमिश चित्रकार ⇨ यान व्हान आयिक हा या प्रकारे काम करणारा महत्त्वाचा चित्रकार होता. पुढे तैलरंग माध्यमाचे एकमेकांवर थर चढविणे, त्यांचे मिश्रण, चित्र वाळण्याची प्रक्रिया यांबाबत चित्रकारांचे तांत्रिक प्रभुत्व वाढले. चित्रांतून धार्मिक आशय व्यक्त करण्याच्या परंपरेला इटालियन कलावंत ⇨ लिओनार्दो दा व्हींची व जर्मन चित्रकार ⇨ आल्ब्रेक्त ड्यूरर यांनी प्राधान्य दिले. आल्ब्रेक्तने फुलांची व प्राण्यांची तसेच काही कौटुंबिक व धार्मिक अशी दोन्ही प्रकारची चित्रे काढली. Trompe-1 ‘ oeil ’ Still life प्रकारात धार्मिक आशयाबरोबरच काही सुखवस्तू कौटुंबिक व्यक्तिचित्रण आढळते. पुढे व्यक्तिरेखा लोप पावून वस्तू मुख्य विषय म्हणून चित्राच्या केंद्रस्थानी येऊ लागल्या. अशा प्रकारे स्थिरवस्तुचित्रण हा एक स्वतंत्र कलाप्रकार अस्तित्वात येण्यास प्रारंभ झाला.
सोळाव्या शतकात सुरुवातीला अत्यंत कौशल्यपूर्वक फुले, गुच्छ काढण्यावर भर होता. तसेच निसर्गाबद्दलही शास्त्रीय दृष्टिकोण, विश्लेषक वृत्ती वाढीला लागली होती. हे शतक नैसर्गिक सृष्टीचा वेध घेणारे होते. त्याचा परिणाम या चित्रकलेवर झाला. श्रीमंत लोक विविध दगड, शंख–शिंपले तसेच चित्रासाठी रसरशीत फळे, टवटवीत फुले चित्रकारांना पुरवीत होते. त्या वेळी यूरोपमध्ये उद्यानविज्ञानाचे आकर्षण वाढून चित्रकारांनी फुले, फळे, वेली यांची हजारो चित्रे काढली. काही राजघराण्यांना विशिष्ट प्रकारच्या विषयातच रस असे. उदा., इटलीतील फ्लॉरेन्समधील मेदिची राजघराण्याला सायट्रस वनस्पती आवडत असे. त्यामुळे त्यांच्या चित्रात या वनस्पतीला प्राधान्य असे. एकंदरीत फुले, फळे, वनस्पती इ. नैसर्गिक घटक असणारे चित्र प्रतिष्ठेचे प्रतीक झाले होते. थोरला यान द ब्रगेल ( सु. १५६८—१६२५) हा फ्लेमिश चित्रकार फुलांच्या चित्रांकरिता प्रसिद्ध होता. त्याच्या चित्रांत सौंदर्य व धार्मिकतेच्या काही कल्पना निगडित होत्या. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात धार्मिकता मागे पडून नैतिक संदेशाकडे चित्रकार झुकले आणि स्थिरवस्तुचित्रप्रकाराला मान्यता प्राप्त झाली.
सतराव्या शतकात यूरोपमध्ये स्थिरवस्तुचित्रणाची आवड वाढली. इटली, नेदर्लंड्स ( हॉलंड ), जर्मनी, फ्रेंच इ. देशपरत्वे स्थिरवस्तु-चित्रणशैली उत्क्रांत झाल्या. काही चित्रांत माणसाची कवटी वफुलेफळे यांची एकत्रित रचना आढळते. अशा चित्रांतून जीवन-मृत्यू प्रतीकात्मकतेने सूचित केला आहे. अशी चित्रे ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक कथांच्या चित्रांच्या मानाने मर्यादित होती. त्यांना दुय्यम स्थान होते. काही चित्रकारांना यात तथ्य नसल्याचे जाणवले. लॉरा बेर्नास्कोनी ( रोमन ), मारिया व्हान ऑस्टरवाहक ( डच ), जोव्हान्नी गार्झोनी ( इटालियन ) आदी स्त्री-चित्रकर्त्रींनी स्थिरवस्तुचित्रे काढली पण ती मोजकीच होती. जोव्हान्नी हिने मेदिची राजघराण्यासाठी चित्रे काढली. इटलीमध्ये तिच्या चित्रांचा प्रभाव होता. एव्हरिस्तो बॅस्केनिसने संपूर्ण जीवन स्थिरवस्तुचित्रणाच्या निर्मितीत व्यतीत केले.
स्पॅनिश चित्रकार मायकेलअँजेलो मेरीझी उर्फ काराव्हाद्जो (१५७३—१६१०) याचे बास्केट ऑफ फ्रूट हे स्थिरवस्तुचित्र प्रारंभीच्या चित्रांपैकी एक आहे. त्याच्या चित्रात नाट्यमयता होती. डच चित्रकार विल्हेम काल्फ (१६१९—९३) हा स्थिरवस्तुचित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होता. स्पॅनिश स्थिरवस्तुचित्रणामध्ये बर्याचदा ओटा किंवा ओट्यासारखी एक आडवी दगडी लादी (स्लॅब) आढळते. साठवणीची भांडी, पेये, क्वचित आकृत्याही असतात पण एकंदरीत रंगरचनेत वस्तूंना महत्त्व असते. स्पेनमध्ये टेबलावर ठेवलेली वस्तू , फुले, खाद्यपदार्थ अशा चित्रांची मागणी जास्त होती. मारलेल्या प्राण्यांची कातडी व मांस अलग करण्यासाठी ठेवले आहेत, असे विचित्र विषयही काही चित्रांत आढळतात. फ्रान्सिस्को दे थूर्बारां (१५९८—१६६४) हा स्पॅनिश चित्रकारदेखील स्थिरवस्तु-चित्रांकरिता प्रसिद्ध होता.
डच स्थिरवस्तुचित्रणाचे विषय स्वयंपाकघर, न्याहरी व फुड टेबल या प्रकारचे असत. त्याशिवाय फळे-फुले, पुस्तके, नाणी, दागिने, वाद्ये, वैज्ञानिक उपकरणे, चांदीच्या वस्तू , काचपात्रे इत्यादींचाही त्यांत समावेश असे. ‘ बे्रकफास्ट पेंटिंग ’ ही एक विशेष वर्गवारीच होती. उच्चभू्र लोकांना अशा चित्रांची आवड होती. चित्रात जळणारी मेणबत्ती, उलटलेली पाने यांसारख्या वस्तूंतून जीवनातील अशाश्वतता व्यक्त केली जाई. एकंदरीत चित्रांतील काचपात्रे, कपडे अशा वस्तू वैभवाची साक्ष देत. बर्याच चित्रांची पार्श्वभूमी गडद असे. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत कलेचे रूप बदलले. रूपकात्मक अर्थ संपुष्टात आला.
स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थ किंवा वस्तू यांद्वारे चित्रातील आकार, रंग, रचना यांवर भर दिला गेला. झां-बात्तीस्त शार्दां (१६९९—१७७९) या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराने वेगवेगळ्या तंत्रांद्वारे स्थिरवस्तुचित्रे काढली. त्याच्या चित्रांवर डच व फ्लेमिश कलेचा प्रभाव होता. वेगवेगळ्या वस्तूं-बरोबर असणारी जवळीक ही त्याच्या चित्रांची विशेषता होय. वस्तूंचा पोत (टेक्स्चर) व त्यांवरील प्रकाश यांत त्याला रस होता.
पुढे कलानिर्मितीच्या प्रेरणा बदलल्या, प्रायोगिकता आली आणि चित्रकार आपल्या आविष्कारात स्वातंत्र्य घेऊ लागले. चित्रकार निसर्गा-तील प्रकाश, वारा, आकार आदी घटकांचे अस्तित्व चित्रांद्वारे दाखवू लागले. त्यांच्या स्व-अभिव्यक्तीला महत्त्व आले. या सर्वांचा परिणाम म्हणजे पाश्चात्त्य कलाक्षेत्रात ⇨ अभिव्यक्तिवाद, ⇨ दृक्प्रत्ययवाद, ⇨ घनवाद इ. कलावाद निर्माण झाले. यांमधील चित्रकार म्हणजे ⇨ क्लोद मॉने, ⇨ एद्वार माने, ⇨ पॉल गोगँ, ⇨ आंरी मातीस, झॉर्झ ब्राक (१८८२ — १९६३), ह्वान ग्रीस उर्फ होसे व्हिक्तोरिआनो ग्वांथालेथ (१८८७ — १९२७) हे होत. यांनी मूळ संकल्पनेला फाटा देऊन काही उद्देशांनी वेगळी कलानिर्मिती केली. विशेष म्हणजे त्यातही स्थिर- वस्तुचित्रण हा विषय सातत्याने हाताळला गेला पण छाया-प्रकाशाचे नाट्य, रंगलेपनाचे फटकारे यांत पूर्वीपेक्षा बदल झाला. प्रत्येकाची व्यक्तिगत शैली, इतर काही वैशिष्ट्ये त्यात दिसतात. अभिव्यक्तिवादी चित्रात हालचाल व गती दाखविण्याचे प्रयत्न झाले. क्लोद मॉने याने ॲपल अँड गे्रप्स या चित्रात डिशबाहेरील (उजवीकडची) सफरचंदे घरंगळून खाली पडतील, या प्रकारचा परिणाम साधला असून. ⇨ पॉल सेझान याने भौमितिक आकारांचा प्रयोग स्थिरवस्तुचित्रांत केला आहे.
घनवादी ⇨ पाब्लो पिकासो, झॉर्झ ब्राक, ह्वान ग्रीस, फेर्नां लेझे, आंरी मातीस यांनी स्थिरवस्तुचित्राच्या पारंपरिक कल्पनेला धक्के देत वेगळ्या प्रकारे अनेक स्थिरवस्तुचित्रे काढली. त्यांनी चित्रशीर्षकात स्थिर- वस्तुचित्रण असा उल्लेख केला आहे. या सर्वांनी रचनेचे स्वातंत्र्य घेतले. पोत, यथादर्शन अशा घटकांशी ते बांधील नव्हते. या संदर्भात पिकासोच्या बॉटल ऑफ ब्लॅक रम, फू्रट बाउल विथ फू्रट, स्टिल लाइफ विथ चेअर केनिंग (१९१२) या चित्रांचा निर्देश करता येईल. पिकासोने स्थिर- वस्तुचित्राकरिता चारकोल, मिश्रमाध्यम, तैलरंग, ⇨ चिक्कणितचित्रण ( कोलाज ) अशी वेगवेगळी माध्यमे वापरली. ब्राकने भौमितिक आकारांचा वापर केला. त्यासाठी त्याने चिक्कणितचित्रण हे तंत्र वापरले. या संदर्भात द फ्रूट डिश (१९१२) हे त्याचे चित्र निर्देशनीय आहे. फेर्नां लेझेच्या चित्रांतही रचनेला महत्त्व आहे. साधी सपाट रंगभरणी आहे. वस्तूच्या मूलभूत भौमितिक आकाराला महत्त्व देऊन सर्व आकारांची रचना करणे, हे त्याचे वैशिष्ट्य. स्टिल लाइफ विथ बिअर मग, थ्री बॉटल्स या प्रकारची चित्रे त्याची वैचारिक वैशिष्ट्ये दाखवितात ( पहा : मराठी विश्वकोश : खंड ५, चित्रपत्र ६३ ). आंरी मातीसच्या चित्रात पार्श्वभूमी व वस्तू यांचे स्थान असले, तरी त्यात यथादर्शनाला फाटा दिला आहे. तेजस्वी रंग, आकार, आकृतिबंधाद्वारे केलेली वेगळीच स्थिरवस्तुचित्रे त्याने केली. आंद्रे दराँ यानेही या विषयात रचनेचे स्वातंत्र्य घेतले. ⇨ दादावाद, ⇨ अतिवास्तववाद इ. चळवळींतही सर्व काळात स्थिरवस्तुचित्रण हा विषय चित्रकारांनी आवडीने हाताळला.
अमूर्त दृक्प्रत्ययवादाची सुरुवात १९३० मध्ये झाली आणि त्याचा पुरस्कार करणार्या चित्रकारांनी वेगळीच कलानिर्मिती केली. या सुमारास स्थिरवस्तुचित्रण हा प्रकार मागे पडू लागला तथापि कलेतिहासात हा स्वतंत्र विषय विकसित झाला आणि तो लोकप्रियही झाला. प्रयोगशील प्रतिभावंत चित्रकारांनी त्यात नावीन्य आणले. चित्रकारांना विषयात रचनेचे स्वातंत्र्य घेता आले मात्र कलावंताच्या प्रतिभेची भरारी, कलेचे विभ्रम एका मर्यादेतच व्यक्त झाले आणि नव-संकल्पनांच्या कलाविष्कारात स्थिरवस्तुचित्रण कालौघात जवळजवळ नष्टप्राय झाले. मध्ययुगातील पाश्चात्त्य व पौर्वात्य कलांमधील कला-संकल्पना आणि आविष्कार यांतील दृष्टिकोणाचा फरक मुख्यत्वे चिनी व जपानी स्थिरवस्तुचित्रणात जाणवतो. उदा., चिनी-जपानी स्थिरवस्तुचित्रांतील बांबू व त्यांच्या पानांचे अस्तित्व हे याचेच उदाहरण होय. यूरोपियनांच्या वसाहतीकरणानंतर (अठरावे—विसावे शतक ) पौर्वात्य जगतात पाश्चात्त्य चित्रशैली व नव--संकल्पना प्रविष्ट झाल्या. त्यांचा प्रभाव साहजिकच स्थिरवस्तुचित्रण प्रकारावरही पडला.
बहुळकर, साधना
भारतीय स्थिरवस्तुचित्रण : पाश्चात्त्य चित्रकलेतून भारतात उद्भूत झालेल्या या चित्रप्रकाराचे काही नमुने भारतीय शिल्पकला आणि भित्ति-चित्रे यांतून आढळतात परंतु तो विशिष्ट प्रकार वा शैली म्हणून स्वतंत्र-पणे त्या वेळी अस्तित्वात नव्हता. स्थिरवस्तुचित्राचे नमुने मराठाकालीन — विशेषतः पेशवेकालीन (अठरावे-एकोणिसावे शतक) — भित्तिचित्रांतून आढळतात. या चित्रांत गेरूच्या रंगावर पांढर्या रंगाने काढलेले गुलदस्ते, तसेच फुले, पाने, फळे व विविध प्रकारची पात्रे यांची अलंकरणात्मक रचना आढळते मात्र या कलाकृती पाश्चात्त्य कलेतील यथादर्शन नाहीत. भारतामध्ये ब्रिटिशांनी स्थिरवस्तुचित्रण हा चित्रप्रकार चित्रकला शिक्षण-पद्धतीत अंतर्भूत केला. ब्रिटिशांच्या आभासात्मक वास्तववादी चित्र-कलेमध्ये वस्तूवरील छायाप्रकाशाचे परिणाम वस्तू ज्यापासून बनविली आहे — उदा., काच, धातू , लाकूड, चिनी माती इत्यादींचा नेमका पोत मिळविणे आणि फुले, फळे आदी वस्तूंच्या मांडणीतून एक सुसंवादी चित्रनिर्मिती करणे हा उद्देश होता. या तीनही गोष्टी जाणून घेऊन स्वतःची स्वतंत्र चित्रनिर्मिती करणे हे चित्रकारापुढील खरे आव्हान असते.
स्थिरवस्तुचित्रणासाठी चित्रकार कलामंदिरात ( स्टुडिओ ) वस्तूंची नेमकी रचना करून त्यांवर ठरावीक पद्धतीने प्रकाशझोत टाकतो वचित्र काढतो, ही एक पद्धत तर खोलीमध्ये सहजपणे पडलेल्या वस्तूंमधून एखादी चित्ररचना चित्रकारास जाणवते परंतु त्यासाठी तो मुद्दामहून रचना करत नाही, ही दुसरी पद्धत. स्थिरवस्तुचित्रणात चित्र-अवकाशाची खोली जास्त नसते. त्यामुळे वस्तूंच्या आकारांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि चित्रअवकाश यांतील संवादी संबंध यांच्याकडेही चित्रकारास विशेषत्वाने लक्ष द्यावे लागते.
वस्तूंचे यथार्थ रेखांकन, आकारांच्या रचनेचे महत्त्व, रंगलेपनातून पोतनिर्मिती या वैशिष्ट्यांमुळे चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमपासूनच हा चित्रप्रकार अभ्यास म्हणून खूप महत्त्वाचा ठरतो. ब्रिटिश चित्रकला-परंपरेतही यावर भर होता. साहजिकच भारतात चित्रकलाशिक्षणात या चित्रप्रकाराला महत्त्वाचे स्थान होते. अचूक रेखांकन व छायाप्रकाशाच्या परिणामांचा अभ्यास यांसाठी केवळ चारकोल किंवा पेन्सिलच्या साहाय्याने चित्रण करणे, यावर अभ्यासक्रमात भर असे. त्यासाठी वेगवेगळ्या घाटांची आणि पोतांची भांडी ठेवून त्यांचा सूक्ष्म छायाप्रकाशभेदासह अभ्यास करणे, हे कलाविद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आव्हान असते. पुढील प्रगत अभ्यासक्रमात त्या जोडीला जलरंग किंवा तैलरंग माध्यमात चित्रण करणे, ही पायरी असते. त्यातूनच विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढीस लागते. तसेच चित्रकला शिक्षकांसाठी असणार्या ‘ आर्ट टीचर्स डिप्लोमा ’, ‘ आर्ट मास्टर ’ या अभ्यासक्रमांतही स्थिरवस्तुचित्रणाला महत्त्वाचे स्थान आहे. याखेरीज शालेय जीवनात दिल्या जाणार्या प्राथमिक ( एलिमेंटरी ) आणि माध्यमिक ( इंटरमिजिएट ) या चित्रपरीक्षांमध्येही स्थिरवस्तुचित्रणाला महत्त्व आहे.
पाश्चात्त्य स्थिरवस्तुचित्रणातील वैविध्यता भारतीय चित्रणामध्ये काही प्रमाणात दृग्गोचर होते. भारतामध्ये स्थिरवस्तुचित्रण हा विषय स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून कमी हाताळला गेला असला, तरीही काही चित्रकारांनी त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे. ब्रिटिश चित्रकला शिक्षण-पद्धतीच्या प्रभावकाळात चित्रकार आबालाल रहिमान यांची जलरंग व तैलरंगातील काही स्थिरवस्तुचित्रे अभ्यासनीय आहेत. चित्रकार ⇨ सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांची जलरंग व तैलरंगातील स्थिर-वस्तुचित्रे पहावयास मिळतात. यांत छायाप्रकाश-परिणाम, रेखांकन, पोतनिर्मिती परिणामकारक रीत्या साधलेली दिसते. त्यांत माध्यमाची निर्दोष हाताळणी हा गुणविशेष जाणवतो. ⇨ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेच्या संग्रहात स्थिरवस्तुचित्रणाचे चारकोल व तैलरंग माध्यमांतील अनेक नमुने पहावयास मिळतात, ज्यांत भारतीय चित्रकारांनी या चित्र-प्रकारात मिळविलेले प्रावीण्य आपल्याला स्पष्ट जाणवते.
चित्रकार ए. एक्स. त्रिंदाद यांच्या द हिंदू गर्ल या व्यक्तिचित्रातील रंगवलेले पितळेचे भांडे त्यांची स्थिरवस्तुचित्रणावरील हुकूमत दर्शविते. विख्यात चित्रकर्त्री ⇨ अमृता शेर-गिल यांचीही पॉल गोगँ, सेझॉन पॉल यांचा प्रभाव असलेली काही स्थिरवस्तुचित्रे उल्लेखनीय आहेत. यांत रंगलेपन व रचनेचे काही वेगळे प्रयोग केलेले आढळतात. या- नंतरच्या काळात चित्रकार हजरनीस यांची स्थिरवस्तुचित्रे ⇨ बाँबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनातून प्रदर्शित होत होती. प्रसिद्ध चित्रकार ⇨ माधव श्रीपाद सातवळेकर आणि ⇨ जहांगीर अर्देशिर साबावाला यांनी आपल्या चित्रप्रदर्शनांतून स्थिरवस्तुचित्रणाचे नवीन आविष्कार प्रदर्शित केले. सातवळेकर यांच्या चित्रांत निळी बाह्यरेषा, उजळ रंग, पारदर्शक तसेच जाड रंगलेपनातून केलेली पोतनिर्मिती आणि चित्ररचनेचे वेगळेपण हे महत्त्वाचे गुण दिसतात तर साबावालांच्या चित्रांत जाड रंगलेपन, द्विमितीय आकारात अवकाशविभाजन दिसून येते. ( पहा : मराठी विश्वकोश : खंड १८, चित्रपत्र १२ ). ⇨ ना. श्री. बेंद्रे या विख्यात महाराष्ट्रीय चित्रकारांची द्विमितीय व रंगलेपनातील प्रयोग असलेली स्थिरवस्तुचित्रे आधुनिक कलेचा प्रभाव दर्शवितात.
१९३४ मध्ये मेरी अँडरसन या चित्रकर्त्रीच्या वास्तववादी स्थिर-वस्तुचित्रास ‘ बाँबे आर्ट सोसायटी ’ चे सुवर्णपदक मिळाले तर १९५१-५२ च्या प्रदर्शनात कृष्णाजी आरा यांच्या स्थिरवस्तुचित्रास सुवर्णपदक मिळाले. आरा यांनी अनेक स्थिरवस्तुचित्रे काढली. यांत काळ्या रंगाचे ड्रायब्रश पद्धतीचे रंगलेपन व काही उजळ रंगच्छटांचा वापर केलेला आढळतो.
चित्रकार रवि परांजपे यांची खूप वेगळ्या पद्धतीची स्थिरवस्तुचित्रे १९८० आणि नंतरच्या कालखंडात प्रदर्शित झाली. जोरकस फटकार्यांनी केलेले रेखांकन, सपाट रंगलेपन, उजळ रंगांचा वापर आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्ररचना हे या चित्रांचे काही गुणविशेष होत. गुणवत्तापूर्ण रेखांकन आणि आधुनिक कलेतील कलाविचार यांचा संगम त्यांच्या चित्रांत दिसतो. त्यांच्या पुढील चित्रप्रदर्शनात ॲक्रेलिक माध्यमाचा वापर करताना त्यांनी रंगतुषारांचा उपयोग पोतनिर्मितीसाठी केला. याशिवाय भारतीय पारंपरिक चित्रकला आणि लोककलांशी जवळीक साधणारी काही स्थिर-वस्तुचित्रे खूप निराळी वाटतात. यांत आकारांच्या आच्छादनातून केलेली वेगळी चित्ररचना, उजळ रंगांचा वापर, वस्तुसमूहाच्या बाजूंनी कलात्मक रीत्या सोडलेली जागा, रेखाखंड आणि बिंदू यांच्या नेमक्या वापरातून मिळणारा पोत व अलंकरण यांमुळे चित्रास वेगळाच दृष्यपरिणाम मिळतो. जलरंग व तैलरंग माध्यमांतील त्यांची चित्रेही माध्यमहाताळणी व रचना या दृष्टीने खूप वेगळी आहेत. स्थिरवस्तुचित्रण या चित्रप्रकारात सातत्याने वेगळे प्रयोग करत आपली चित्रे स्वतंत्र कलाविष्कार म्हणून प्रदर्शित करणारे हे एक महत्त्वाचे चित्रकार होत.
चित्रकार जॉन फर्नांडिस यांनीही १९८६-८७ पासून आपल्या चित्र-प्रदर्शनांतून स्थिरवस्तुचित्रे प्रदर्शित केली. त्यांच्या चित्रांत यथादर्शन, छायाप्रकाशाचे चित्रण नेमकेपणाने ब्रशच्या जोरकस व मुक्त फटकार्यांनी केलेले आढळते. वस्तुसमूहातील वस्तूंचा पोत, परावर्तित प्रकाशाचा परिणाम, निर्दोष चित्ररचना आणि अस्सल भारतीय वस्तूंचा समावेश ही फर्नांडिस यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये होत. कलात्मक मांडणी आणि रंगलेपनावरील हुकमत यांमुळे ही चित्रे वेगळी उंची गाठतात.
चित्रकार संजय शेलार यांनीही आपल्या प्रदर्शनांतून २००५ पासून स्थिरवस्तुचित्रे प्रदर्शित केली. या चित्रांत वास्तवदर्शी चित्रणातून प्रकाशाचा परिणाम व वस्तूंचा पोत नेमकेपणाने मिळविलेला आढळतो. ब्रशचे फटकारे जोरकस व वस्तूचा घाट दर्शविणारे असतात. शेलार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तैलरंग, जलरंग, रंगशलाका ( पॅस्टल ), ॲक्रेलिक अशा विविध माध्यमांतून स्थिरवस्तुचित्रे साकारली. त्यांचे स्थिरवस्तुचित्रण या विषयावरील पुस्तकही प्रसिद्ध आहे.
भारतात प्रामुख्याने स्थिरवस्तुचित्रकला ही अभ्यासाच्या निमित्ताने कला शिक्षणात अंतर्भूत झाली. पुढे स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून स्थिर-वस्तुचित्रे करणार्या आणि चित्रप्रदर्शनांतून ती रसिकांपर्यंत पोहचवणार्या सर्वच चित्रकारांनी आपल्या चित्रांतून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. पाश्चिमात्य व भारतीय कलेत अनेक परिवर्तने झाली. कलेचे स्वरूप बदलत गेले. तरीही आजमितीस या विषयाचे आकर्षण कलाकारांना वाटत आहे.
पहा : आधुनिक चित्रकला चिक्कणितचित्रण जलरंग तैलरंग निसर्गचित्रण भित्तिचित्रण.
संदर्भ : 1. Cavendish, Chardin M. The Great Artist-70, London, 1986.
2. Delhi Art Gallery, Comp. Still Life Adaptations in 20th Century, New Delhi, 2007.
3. Gwynne-Jones, A. Introduction to Still-Life, New York, 1954.
4. Paviere, S. H. A Dictionary of Flower, Fruit and Still Life Painters, 3 Vols., Leigh, 1962-64.
5. Walter, W. S. Still Life Painting, London, 1960.
देशपांडे, राहुल म.
“