स्त्रीवादी साहित्यसमीक्षा : पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही मताधिकार असावा यासाठी स्त्रियांची झालेली चळवळ पाश्चात्त्य जगात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. स्त्रियांचे स्वातंत्र्य, त्यांचे शिक्षण, त्यांचे स्वतःचे खास प्रश्न, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेपासून त्यांना हवी असणारी मुक्ती, त्यांचा सामाजिक-सांस्कृतिक प्रक्रियेमधील सहभाग यांविषयीचे विचारमंथन त्यानंतर सुरू झाले. त्यातूनच विसाव्या शतकातील स्त्रीवादी विचारसरणीचा जन्म झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर या विचार-मंथनाला गती मिळाली आणि साहित्याच्या व समीक्षेच्या क्षेत्रांमध्ये स्त्रीवादी विचारसरणी विशेष फोफावली. अमेरिकेमध्ये १९७० च्या सुमाराला स्त्रीविषयक अभ्यासाला व संशोधनाला शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. इंग्लंडमध्येही ‘ व्हिरेगो ’ आणि ‘ द विमेन्स प्रेस ’ यांसारख्या स्त्रीवादी प्रकाशनसंस्था १९७०—८० च्या दरम्यान उदयाला आल्या. आज जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये खास स्त्रीविषयक अभ्यासक्रमांना मोठी मागणी आहे. स्त्रीवादी भूमिकेच्या नेमक्या स्वरूपाविषयी अनेक मतप्रवाह असले, तरी त्यांतले काही धागे मूलभूत स्वरूपाचे मानून या भूमिकेमागच्या काही निवडक महत्त्वाच्या प्रमेयांची व तत्त्वांची मांडणी स्त्रीवादी समीक्षेच्या संदर्भामध्ये करता येते.

स्त्रीवादी समीक्षेचे पहिले तात्त्विक प्रमेय म्हणजे अर्थातच ‘ स्त्री ’ या संकल्पनेविषयीचे सिद्धांतन होय. त्यामध्ये स्त्री या संकल्पनेच्या तीन मूलभूत पातळ्या मानलेल्या आहेत : पहिली पातळी शारीर वा जैविक भेदाची आहे. नर आणि मादी यांची शरीररचना निसर्गानेच भिन्न ठेवलेली  आहे परंतु बर्‍याचदा या शारीर वा जैविक भेदाची गल्लत सामाजिक-सांस्कृतिक भेदाशी केली जाते. स्त्री ही निसर्गतःच नाजूक, गोड, लाजरी, मर्यादाशील, विनयशील वगैरे असते, असे आपण म्हणतो. तेव्हा खरे पाहता शरीर वा जैविक गुणांशी त्याचा काही संबंध नसतो, तर समाजाच्या व संस्कृतीच्या स्त्रीविषयीच्या अपेक्षा, स्वप्ने व हितसंबंध स्त्रीवर आरोपित केले जात असतात. स्त्रीत्वाची संकल्पना ( नाजूक, गोड, लाजरी, मर्यादाशील, विनयशील इ. ) हा समाज व संस्कृतीने घडविलेला एक साचा आहे परंतु या साच्याचे खरे स्वरूप लपवून त्याला शारीर वा जैविक पातळी-वरील संकल्पना म्हणून मांडण्याची, स्त्रीचे सत्त्व ( इसेन्स ) किंवा स्वभाव म्हणून मानण्याची चाल किंवा खेळी समाजातील प्रबळ घटक — म्हणजे अर्थातच पुरुष — खेळत असतो. स्त्रीत्वाच्या संकल्पनेचे असे ‘ एकसत्त्वीकरण ’ ( इसेन्शियलायझेशन ) आणि ‘ स्वाभाविकीकरण ( नॅचरलायझेशन ) करण्यामध्ये पुरुषाचे हितसंबंध कसे गुंतलेले असतात हे दाखवून देणे व त्यात बदल घडवून आणणे, हे राजकीय पातळीवरील कार्य स्त्रीवादी तत्त्वज्ञान करते. तेव्हा जैविक पातळीवर ‘ मादीपणा , सामाजिक-सांस्कृतिक पातळीवर ‘ स्त्रीत्व ’ आणि राजकीय पातळीवर ‘ स्त्रीवाद ’ या तीन पातळ्या एकमेकींपेक्षा वेगळ्या आहेत आणि तरीही एकमेकींशी संबंधित आहेत, हे स्त्रीवादी विचारसरणीमागचे एक मूलभूत तत्त्व आहे.

स्त्रीत्वाविषयीच्या सामाजिक-सांस्कृतिक अपेक्षांना मूर्त स्वरूप मिळते, ते मिथ्यकथांमध्ये व साहित्यकृतींमध्ये. मिथ्यकथांमध्ये व साहित्यामध्ये स्त्रियांच्या ज्या प्रतिमा मूर्त झालेल्या असतात, त्यांच्यावरून समाजाने स्त्रीविषयी कोणता साचा ( स्टीरिओटाइप ) तयार केला आहे, त्याचा अभ्यास करता येतो. स्त्रीवादी विचारप्रक्रियेमध्ये साहित्याला व साहित्य-समीक्षेला जे मूलभूत स्थान आहे, त्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. वरील तीन पातळ्यांपैकी सामाजिक-सांस्कृतिक पातळीवरील स्त्रीत्वाची संकल्पना ऐतिहासिक दृष्ट्या कशी अस्तित्वात आली व तिचे नेमके स्वरूप काय, याचे विश्लेषण स्त्रीवादी समीक्षेने मिथ्यकथांचे व साहित्यकृतींचे विशिष्ट प्रकारे वाचन करून केलेले आहे.

स्त्रीवादी समीक्षेचे दुसरे सैद्धांतिक प्रमेय असे, की स्त्रीत्वाची प्रचलित सामाजिक-सांस्कृतिक संकल्पना पुरुषप्रधान विचारचौकटीमधून व त्यावर आधारित सौंदर्यशास्त्रीय सिद्धांतांमधून निर्माण झालेली आहे. पुरुषाशी तुलना करता स्त्रीमध्ये काही गुणधर्मांचा ‘ अभाव ’ असतो हे पुरुषप्रधान विचारचौकटीचे एक लाडके प्रमेय आहे, हे सिद्ध करण्यासाठी स्त्रीवादी समीक्षकांनी भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत. स्त्रियांची व्याख्याच मुळी अनेकदा न्यूनाच्या वा अभावाच्या आधारे केलेली आढळते. उदा., पुरुषाशी तुलना करता स्त्रीमध्ये जे न्यून असते त्यातच तिचे स्त्रीत्व असते, अशी भूमिका ॲरिस्टॉटल ने घेतलेली होती. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रज कलासमीक्षक वॉल्टर पेटर ने ‘ कलेतील मर्दानीपणा ’ ( मॅनलिनेस ) विषयी  विवेचन करताना असे म्हटले, की या सौंदर्यशास्त्रीय मर्दानीपणामुळे विस्कळितपणा वा विघटनाची प्रवृत्ती रोखली जाते. ‘ उन्माद ’ ( हिस्टेरिया ) हा खरा ‘ गर्भाशयोन्माद ’ असतो, अशी समजूत त्या काळी प्रचलित होती. स्त्रियांना होणार्‍या या उन्मादाला व त्यातून निर्माण होणार्‍या असंबद्ध बरळण्याला कलेत स्थान असू नये, अशी पेटरची इच्छा होती व या असंबद्धतेवर उतारा म्हणून कलेतील मर्दानीपणाचा पुरस्कार पेटर करीत होता. स्त्रीपाशी सुसंबद्धता वा सुसंगतता या गुणाचा अभाव असतो, हे या विवेचनामागील गृहीततत्त्व म्हणायला हवे. स्त्रीच्या कामजाणिवेचा आधार म्हणजे तिला पुरुषाविषयी वाटणारे ‘ लिंग-वैषम्य ( पेनिस-एन्व्ही ) होय, असे प्रतिपादन विसाव्या शतकात फ्रॉइडने केले. या भूमिकेमागेही अर्थातच ‘ अभाववादी ’ तत्त्वच असलेले आढळते.

भाषिक वापरामध्ये पुरुषप्रधान दृष्टिकोण जागोजाग आढळतो. ‘लिंग’ याचा अर्थ पुरुषाचे जननेंद्रिय असा होत असला, तरी त्यापासून सिद्ध झालेला ‘ लैंगिकता ’ हा शब्द मात्र स्त्री व पुरुष या दोहोंच्या कामजाणिवेला उद्देशून आपण मराठीमध्ये वापरतो. इंग्लिशमध्ये ‘ मॅन ’ हा शब्द जसा ‘ ह्यूमन बीइंग ’ या अर्थाने वापरला जातो, तसेच काहीसे येथेही दिसते. सर्व मानवांमध्ये ‘ बंधुभाव ’ किंवा ‘ ब्रदरहुड ’ असायला हवा, असे आपण म्हणतो आणि ‘ भगिनीभाव ’ या संकल्पनेची टिंगलही करतो. पुरुषप्रधानता सुचविणारे या प्रकारचे भाषिक प्रयोग स्त्रीवाद्यांना आक्षेपार्ह वाटणे स्वाभाविक आहे. स्त्रियांमध्ये काही न्यून वा अभाव आहे आणि त्यातच तिचे स्त्रीत्व किंवा स्त्री म्हणून सत्त्व आहे, या दृष्टिकोणाची उदाहरणे कलेच्या संदर्भातही सापडतात. विशिष्ट कलाप्रकारांवर स्त्रियांना अधिकार नाकारणे हे भारतीय संगीतात आढळते. धृपद-गायकी ही मर्दानी मानली जाते व स्त्रियांना ती गाऊ देणे अयोग्य ठरविण्यात आलेले आहे. राग आणि रागिणी यांत फरक करताना पारंपरिक संगीतशास्त्रामध्ये रागाचा संबंध संथ लयीशी आणि गांभीर्याशी जोडलेला आहे, तर रागिणी ही द्रुत लयीमध्ये असते आणि स्वभावाने चंचल असते, असे सांगितलेले आहे. ‘ गंभीर ’ आणि ‘ चंचल ’ या संज्ञा अर्थातच मूल्यमापनात्मक आहेत.

प्रख्यात फ्रेंच स्त्रीवादी लेखिका सीमॉन द बोव्हारने प्रथम या प्रश्नाला तोंड फोडले. ल दझिॲम सॅक्स (१९४९ इं. भा. द सेकंड सेक्स १९५३ म. भा. २०१२ अनु. करुणा गोखले ) या आपल्या ग्रंथाच्या शीर्षकातून सीमॉन द बोव्हारने आपले विषयसूत्रच मांडलेले आहे : पुरुष हा प्रथम, महत्त्वाचा किंवा प्रधान तर स्त्री ही दुय्यम किंवा गौण धर्म, कायदा, शिक्षण, विज्ञान, तत्त्वज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषप्रधान व पुरुष-केंद्री विचारचौकटीने स्त्रीकडे अभाववादी वा न्यूनतावादी दृष्टिकोणातून पाहिलेले आहे. या चौकटीत मानवाचे केवळ सत्त्व किंवा त्याचा ‘ स्व ( द वन ) हा पुरुषच असतो व स्त्री ही नेहमी ‘ पर ’ ( द  अदर ) असते किंवा मानवी सत्त्वाचा केंद्रबिंदू पुरुष असतो, तर स्त्री ही नेहमी परिघावर असते. स्त्रीत्व म्हणून जे काही  नैसर्गिक गुणधर्म मानले जातात, ते खरे पाहता पुरुषप्रधान समाजाने स्त्रीच्या माथी मारलेले असतात. स्त्रीची भूमिका ही वस्तुतः समाजाने निश्चित केलेली असते व तीच ‘ नैसर्गिक ’ म्हणून स्त्रियांच्याही गळी उतरविली जाते. ही विचारचौकट सामाजिक जाणिवेत इतकी खोलवर रुजलेली आहे, की स्वतः स्त्रियांनीही  ती आपलीशी केलेली आहे व त्यांनाही ती नैसर्गिक वाटलेली आहे, असे बोव्हारचे म्हणणे आहे. जन्मतःच कोणी स्त्री असत नाही ‘ स्त्रीत्व ’ हे समाजाने, संस्कृतीने घडविलेले असते, असे तिचे प्रतिपादन आहे.

सँड्रा गिल्बर्ट व सूसान ग्यूबर यांनी एकोणिसाव्या शतकातील स्त्री-लेखिकांचा अभ्यास करताना ‘ स्त्रीवादी काव्यशास्त्रा ’ ची ( फेमिनिस्ट  पोएटिक्स ) उभारणी करण्याविषयी विवेचन केले ( द मॅडवुमन इन द ॲटिक : द वुमन रायटर अँड द नाइन्टीन्थ सेंचरी लिटररी इमॅ-जिनेशन, १९७९). एकोणिसाव्या शतकातील लेखिकांच्या लेखनामध्ये आढळणार्‍या समान विषयसूत्रांच्या आणि प्रतिमांच्या आधारे एक ‘ ऐतिहासिकतेवर आधारलेले स्त्रीवादी काव्यशास्त्र ’ विकसित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पुरुषांनी साहित्यशास्त्राच्या क्षेत्रामध्ये दडपशाही करून स्त्रियांची मुस्कटदाबी केलेली आहे या पुरुषी अत्याचाराला स्त्रियांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. स्त्रियांच्या या प्रतिक्रिया समजण्यासाठी, त्या प्रतिक्रियांमागच्या मानसिक प्रक्रिया समजण्यासाठी मॉडेल वा तार्किक अनुबंध तयार करणे, हे स्त्रीवादी काव्यशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे, अशी भूमिका या लेखिकांनी घेतली. या काव्यशास्त्रामधील एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ‘ लेखकत्व-चिंता ’ ( अँग्झायटी ऑफ ऑथरशिप ) होय. प्रचलित पुरुषप्रधान तत्त्वव्यूहाने सर्जनशीलतेचा मक्ता पुरुषालाच देऊन टाकलेला आढळतो, असा गिल्बर्ट व ग्यूबर यांचा दावा आहे. ‘ ऑथर , ‘ क्रिएटर ’ या संकल्पना पाश्चात्त्य मनामध्ये पुरुषी प्रतिमाच उभ्या करतात. ख्रिस्ती धर्मशास्त्रानुसार देव किंवा विधाता हा पुरुषच मानला जातो. विश्वाची निर्मिती करणारा देव जसा पुरुष, तसा भाषिक विश्वाची — म्हणजेच संहितेची वा साहित्यकृतीची — निर्मिती करणारा हाही पुरुषच असतो. गिल्बर्ट व ग्यूबर यांचे म्हणणे असे, की पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला दोन प्रकारच्या प्रतिमांशी जखडून टाकले आणि लेखकत्वाचा अधिकार नाकारून तिला सृजनाच्या सीमारेषेबाहेर ठेवले. यांतली पहिली  प्रतिमा म्हणजे ‘ गृहदेवता ’ किंवा कुटुंबाची काळजीवाहू देवता ( एंजल इन द हाउस ) हिचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती अत्यंत ‘ निःस्वार्थी ’ असते, तिच्या ‘ स्व ’ ला कोणतीही किंमत नसते. परंतु या काळजीवाहू देवतेच्या प्रतिमेमागे खरे पाहता पुरुषांची एक भीतीच दडलेली आहे. कारण पुरुषाला स्त्रीत्वाची भीती वाटत असते. तेव्हा पुरुषप्रधान तत्त्वप्रणालीने निर्माण केलेली स्त्रीची दुसरी प्रतिमा म्हणजे मायावी राक्षसिणीची ( मॉन्स्टर ) प्रतिमा होय. उदा., ‘ स्फिंक्स , ‘ मेडूसा , ‘ सर्सी ’ यांसारख्या मिथ्यक स्त्री-प्रतिमा किंवा विल्यम  शेक्सपिअरच्या किंग लीअरमधील गॉनरिल आणि रेगन विल्यम थॅकरी च्या व्हॅनिटी फेअर (१८४७-४८) या कादंबरीतील बेकी शार्प. या ‘ चेटकीणदेवतां ’ पाशी ( सॉर्स रेस गॉ डेसिस ) पुरुषी घाटाची सृजनशक्ती असते परंतु त्याचबरोबर ती मायावी शक्तीही असते.


पुरुषसत्ताक विचारव्यूहाने निर्माण केलेली सृजनशक्तीविषयीची मिथ्य-कथा ही अर्थातच पुरुषकेंद्री (फेलोसेंट्रिक) आहे. स्त्रियांना कवडीमोल ठरविणार्‍या, लेखणीचा हक्क त्यांना न देऊन बंधनात अडकविणार्‍या पुरुष- प्रधान विचारव्यूहाला आव्हान दिल्याखेरीज स्त्रीवादी काव्यशास्त्र उभे राहू शकणार नाही, असे गिल्बर्ट व ग्यूबर यांचे प्रतिपादन आहे. एकोणिसाव्या शतकातील लेखिकांनाही ‘ लेखकत्व हिरावून घेतले जाण्याची चिंता ’ भेडसावत होती ( अँग्झायटी ऑफ ऑथरशिप ). या चिंतेवर मात करायची तर ‘ सिबिल ’ विषयक ग्रीक मिथ्यकथांमधील आदिलेखिकेच्या प्रतिमेशी संबंध जोडावा लागतो. सिबिलविषयीच्या मिथ्यकथा ह्या ख्रिस्तपूर्व काळातील आहेत. सिबिल ही खरे पाहता एक स्त्री नसून त्या अनेक स्त्रीप्रतिमा आहेत, असे म्हटले पाहिजे. या स्त्रियांना सर्जनाची खास दैवी शक्ती लाभलेली असे, तसेच त्या भविष्यवेत्त्याही असत असेही मानले जाई. एकोणिसाव्या शतकातील लेखिकांनी याच प्रकारची मायावी शक्ती वा आवाज वापरून निर्मिती केली. वरवर पाहता त्यांच्या लेखनामध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेला विरोध केलेला नसतो परंतु पुरुषप्रधान सौंदर्य-शास्त्राला अमान्य ठरेल अशा प्रकारच्या आशयाच्या सखोल पातळ्या त्यांनी त्यांच्या साहित्यात आविष्कारासाठी वापरल्या, असा युक्तिवाद गिल्बर्ट व ग्यूबर यांनी केला. स्त्रीवादी समीक्षेने पुरुषप्रधान साहित्याचे एक प्रकारे ‘ विपरीत वाचन ’ (मिस्र्डिंग ) केल्याशिवाय स्त्रीवादी सौंदर्यशास्त्र उभेच राहू शकणार नाही, अशी जहाल स्त्रीवादी समीक्षेची धारणा आहे. साध्या भाषेत सांगायचे तर जहाल स्त्रीवादी समीक्षा एक प्रकारची ‘ राजकीय ’ खेळी खेळते आहे, असे म्हणता येईल. जहाल साम्यवादी विचारवंतांनी किंवा सामाजिक बांधिलकीच्या समर्थकांनी आपल्या चळवळीला सोयीचे ठरेल अशा तर्‍हेने इतिहासाचे पुनर्वाचन केलेले आहे. तोच प्रकार स्त्रीवादाच्या बाबतीतही झालेला आहे. स्त्रीवादाच्या या राजकीय रूपाचा थोडासा विचार करू.

स्त्रीवादी समीक्षा ही नेहमीच राजकीय स्वरूपाची राहिलेली आहे, असे काही स्त्रीवादी मानतात. आधुनिक समाजामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक शोषणाविरुद्ध चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत. यांतली सर्वांत महत्त्वाची चळवळ म्हणजे अर्थातच मार्क्सवाद होय. आर्थिक सत्तेच्या आधारे होणार्‍या शोषणाविरुद्ध झालेल्या मार्क्सवादासारख्या चळवळी आणि स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध स्त्रीवादाने उभी केलेली चळवळ यांच्या भूमिकांमध्ये खूपसे साम्य आढळते. मात्र स्त्रीचे पुरुषाने केलेले शोषण हे  व्यापक सामाजिक व आर्थिक शोषणाचा भाग असते की नाही, याविषयी स्त्रीवादी विचारवंतांमध्ये एकमत नाही. सीमॉन द बोव्हार या फ्रेंच स्त्रीवादी  लेखिकेची बदललेली भूमिका या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. आधी उल्लेखिलेला द सेकंड सेक्स हा ग्रंथ फ्रेंचमध्ये १९४९ मध्ये प्रकाशित झाला. वर्गलढा हा स्त्रियांच्या लढ्यापेक्षा अधिक मूलभूत स्वरूपाचा असतो आणि मानवी समतेवर आधारलेली समाजवादी राज्यपद्धती एकदा दृढमूल झाली, की स्त्रियांच्या समस्या आपोआपच सुटतील आणि स्त्रीवादी भूमिकेची गरज राहणार नाही, असा विश्वास त्या वेळी बोव्हारला वाटत होता. त्यामुळेच तिने स्वतःला स्त्रीवादी न म्हणविता समाजवादी म्हणविले परंतु १ ९७२  मध्ये तिने स्त्रीमुक्ती संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून स्वतःला स्त्रीवादी म्हणून घोषित केले. समाजवादाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याआधीच स्त्रियांच्या मुक्तीची चळवळ स्वतंत्रपणे उभी केली पाहिजे, अशी जाणीव या मतपरिवर्तनामागे होती.

इतर राजकीय विचारसरणींप्रमाणेच स्त्रीवादी भूमिकांमध्ये मवाळ व जहाल असे दोन्ही पंथ आढळतात. त्यांच्यामधील मुख्य फरक पुढीलप्रमाणे सांगता येईल : पुरुषसत्ताक व पुरुषकेंद्री विचारचौकटीने स्त्रियांचे जे शोषण चालवले आहे त्याला विरोध करून समाजामध्ये पुरुषाच्या बरोबरीने स्त्रीला समान हक्क व समान संधी मिळवून देणे, हे मवाळ स्त्रीवादाचे मुख्य उद्दिष्ट असते. जहाल स्त्रीवादी मात्र असे मानतात, की प्रस्थापित सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक व्यवस्थांच्या चौकटीमध्येच राहून समान हक्क वगैरे मागण्यापलीकडे स्त्रीवादाने जायला हवे. स्त्रीवादाने प्रस्थापित व्यवस्थेलाच नकार द्यायला हवा. स्त्रीत्व या संकल्पनेला एकच एक सत्त्व असते असे मानणे, ही प्रचलित पुरुषकेंद्री व्यवस्थेची मुख्य खेळी आहे. जहाल स्त्रीवादाने स्त्रीत्वाला कोणत्याही एका सत्त्वाला जखडून ठेवायला नकार दिलेला आहे.

केट मिलेट या लेखिकेने सेक्शुअल पॉलिटिक्स (१९७७) या ग्रंथामध्ये अशी भूमिका मांडली आहे, की पितृसत्ताक (  पेट्रिआर्कल  ) समाजव्यवस्था हे स्त्रियांच्या शोषणाचे आदिकारण आहे आणि आर्थिक व्यवस्था भांडवलशाहीवादी असो वा साम्यवादी असो, स्त्रियांचे शोषण दोहोंमध्ये होतच राहते. समाज कोणत्याही प्रकारचा असला, तरी स्त्रियांविषयीचे विशिष्ट प्रकारचे पूर्वग्रह सार्वत्रिक स्वरूपात आढळतात, याचे प्रत्यंतर आपल्याला वर उल्लेखिलेल्या ॲरिस्टॉटल, पेटर इत्यादींच्या भूमिकांवरून आलेलेच आहे. लोकशाहीवर आधारलेल्या समाजव्यवस्थांमध्येसुद्धा स्त्रीविषयक कल्पनांचे रूढिबद्ध घट्ट साचे वापरले जातात आणि त्यांद्वारे पितृसत्ताक व्यवस्थेला स्त्रियांचे शोषण करता येते, त्यांना अबला बनविता येते, विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारांपासून त्यांना दूर ठेवता येते. डी. एच्. लॉ रेन्स, हेन्री मिलर आणि नॉर्मन मेलर या पुरुष कादंबरी-कारांच्या कादंबर्‍यांचे — विशेषतः त्या कादंबर्‍यांतील लैंगिकतेचे — वाचन एक स्त्री-वाचक म्हणून केले तर त्यातील पुरुषकेंद्री दृष्टिकोण सहज ओळखता येतो, असे प्रतिपादन मिलेने केलेले आहे.

स्त्रीवादी समीक्षेपुढे दोन महत्त्वाच्या समस्या उभ्या आहेत. एक म्हणजे, साहित्याच्या मूल्यमापनाचे नेमके कोणते निकष या समीक्षेला अभिप्रेत आहेत, त्याचा उलगडा व्हायला हवा. साहित्य हे स्त्रीवादी असायला हवे, पुरुषसत्ताक जीवनपद्धतीविरुद्ध विद्रोह करणारे असायला हवे, या निकषां-पलीकडे आणखीही काही निकष स्त्रीवादी समीक्षेला अभिप्रेत आहेत का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. दुसरी समस्या अधिक मूलभूत स्वरूपाची आहे. स्त्री-वाचक म्हणजे नक्की कोण ? या प्रश्नाचे उत्तर स्त्रीवादी समीक्षेला देता यायला हवे. स्त्रिया साहित्याचे लेखन व वाचन कसे करतात हे दाखविणे, एवढ्यापुरतेच स्त्रीवादी समीक्षेचे कार्य मर्यादित राहत नाही. स्त्रीने स्त्री म्हणून कसे लेखन आणि वाचन केले पाहिजे, याचे काही आदेश (  प्रिस्क्रिप्शन ) स्त्रीवादी समीक्षेला द्यावेच लागतात. आता हे आदेश द्यायचे तर स्त्रीचे स्त्री म्हणून सत्त्व काय, हे स्त्रीवादाला सांगता यायला हवे परंतु तसे केले तर पुन्हा पुरुषकेंद्री एकसत्त्ववादी भूमिकाच मान्य केल्यासारखे होते. स्त्रीवादी समीक्षेपुढील हा मूलभूत पेच आहे आणि अजून तरी तो सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे, असे वाटत नाही.

पहा : स्त्रीमुक्ति आंदोलन स्त्रीवाद स्त्रीवादी साहित्य.

संदर्भ : 1. Beauvoir, Simone De Trans., Parshley, H. M. The Second Sex, 1953 1972.

           2. Beauvoir, Simone De, Today : Conversations With Alica Schweitzer, 1972 1982.

           3. Gilbert, Sandra M. Gubar, Susan, The Madwoman in The Attic : The Woman Writer and The Ninteenth-Century Literary Imagination, 1979.

           4. Millet, Kate, Sexual Politics, 1977.

           5. Moi, Toril, Feminist Literary Criticism, in Modern Literary Theory : A Comparative Introducation ( Ed. Jefferson, A. Robey, D. ), 1986.

           6. Moi, Toril, Sexual / Textual Politics : Feminist Literary Theory, 1985. 

           ७. गणोरकर, प्रभा, “ इरावती कर्वे यांचे स्त्रीजीवनविषयक विचार : एक प्रश्नचिन्ह ङ्घ, समाजप्रबोधन पत्रिका, १९९२

             ८. धोंगडे, अश्विनी, स्त्रीवादी समीक्षा, १९९३.

           ९. भागवत, विद्युत रेगे, शर्मिला, “ भारतीय समाजशास्त्र व स्त्रीपुरुष विषमता , समाजप्रबोधन पत्रिका, १९९३.

           १०. मालशे, मिलिंद, “ स्त्रीवादी समीक्षा : सैद्धांतिक चौकट , श्रीवाणी, वर्ष १ , अंक २ , ऑक्टोबर, १९९३ पुनर्मुद्रण नवभारत, जून-जुलै, १९९५.

मालशे, मिलिंद स.