स्त्री-पुंरूप : (अर्धनारी-अर्धनर रूप). नर व मादी या दोन्हींची गुणवैशिष्ट्ये असलेल्या जीवाला स्त्री-पुंरूप (गायनॅण्ड्रोमॉर्फ) म्हणतात. गायने म्हणजे मादी व ॲण्ड्रो म्हणजे नर या ग्रीक शब्दांवरून ही मूळ संज्ञा तयार झाली आहे. स्त्री-पुंरूप ही संज्ञा मुख्यत्वे शल्किपक्ष गण (लेपिडॉप्टेरा उदा., फुलपाखरे, पतंग, भुंगेरे इ.) व कीटकविज्ञान (सर्व कीटक) या क्षेत्रांत वापरतात.
जीवाच्या ( भ्रूणाच्या ) वाढीच्या आधीच्या टप्प्यात कोशिकेच्या केंद्रकाच्या समविभाजनातील अपसामान्य घटना हे स्त्री-पुंरूपतेचे नमुनेदार कारण असते परंतु नेहमी हेच कारण असेल असे नाही. या टप्प्यातील जीव अगदी थोड्याच कोशिकांचा असताना विभाजित होणार्या अशा पहिल्या एका कोशिकेत तिच्यातील लिंग गुणसूत्रांची अचूकपणे विभागणी होत नाही. गुणसूत्रांच्या अशा सदोष वाटणीमुळे एका कोशिकेतील लिंग गुण-सूत्रांमुळे नररूप, तर दुसर्या कोशिकेतील लिंग गुणसूत्रांमुळे मादीरूप विकसित होते. समविभाजन होत असलेल्या XY कोशिकेतील गुणसूत्रांचे द्विगुणन होऊन XXYY गुणसूत्रे तयार होतात. नेहमीच्या स्वाभाविक रीतीने विभाजन झाल्यास या कोशिकेच्या दोन कोशिका तयार होतील. मात्र क्वचित प्रसंगी या कोशिकेच्या विभाजनातून X कोशिका व XYY कोशिका अशा दोन कोशिका तयार होऊ शकतील. ही घटना भ्रूण-विकासात आधीच्या काळात घडल्यास कोशिकांचा एक मोठा भाग X व एक मोठा भाग XYY असे दोन भाग असतील. X व XYY भागांची स्वाभाविकपणे भिन्न लिंगे होत असल्याने त्या जीवात ऊतकांचा एक पिंड मादीरूप व दुसरा पिंड नररूप असेल.
स्त्री-पुंरूपामध्ये द्विपार्श्व असमरूपता ( दोन बाजूंमधील विषमप्रमाणता ) असू शकते. त्यात एक बाजू मादीरूप व एक बाजू नररूप अथवा दोन लिंगे अगदी स्पष्टपणे वेगळी नसलेल्या दोन बाजू म्हणजे मोझॅइक रूप असू शकतात. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास जननिक दृष्ट्या भिन्न असलेल्या दोन किंवा अधिक ऊतकांच्या बनलेल्या जीवाला किंवा त्याच्या भागाला मोझॅइक रूप म्हणतात. द्विपार्श्व स्त्री-पुंरूपता ही स्थिती भ्रूणविका-साच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे भ्रूण ८ ते ६४ कोशिकांचा असतो तेव्हा निर्माण होते. नंतर स्त्री-पुंरूप मोझॅइक रूप असते.
फुलपाखरांमध्ये लैंगिक द्विरूपतेमुळे ( दोन भिन्न रूपांत असण्या-मुळे ) नर व मादी ही दोन्ही गुणवैशिष्ट्ये स्वाभाविकपणे दिसू शकतात. व्ह्लादिमिर नाबोकोव्ह या शल्किपक्ष गणाच्या अभ्यासकाने आपल्या स्पीक मेमरी या आत्मचरित्रात एका सुंदर स्त्री-पुंरूप फुलपाखराचे वर्णन केले आहे. त्याची एक बाजू मादीरूप व दुसरी नररूप होती. पॅपिलिओ ॲण्ड्रोगेअस जातीच्या फुलपाखराचे मोझॅइक रूप आढळले आहे. स्त्री--पुंरूपाचे सर्वांत स्पष्टपणे दिसणारे उदाहरण बर्ड विंग्ज ( पक्ष्यांसारखे पंख असलेल्या ) फुलपाखरांमध्ये दिसून येते. बर्ड विंग्ज जगातील सर्वांत मोठी फुलपाखरे आहेत. त्यांच्या पंखांची लांबी सु. ३१ सेंमी.पर्यंत असते. ऑर्निथॉप्टेरा प्रजातीतील ऑ. गोलिएथ प्रोकस या इंडोनेशियात आढळणार्याजातीत स्पष्टपणे नर व मादी रूप दिसून येते. स्त्री-पुंरूप विषयातील तज्ञांच्या मते स्त्री-पुंरूप मोझॅइक १०० किंवा २०० वर्षांत पुनःपुन्हा होते. सूर्याच्या स्थानानुसार व भ्रमणानुसार हे घडत असावे. स्त्री-पुंरूप अवस्था दर्शविणार्या फुलपाखरांमध्ये प्रत्येक जातीत द्विपार्श्व प्रकारचे स्त्री-पुंरूप दर ५ —१० वर्षांत घडलेले आढळते.
कीटकांतील सर्वांत सामान्य स्त्री-पुंरूप माश्यांमध्ये आढळते. अशा माशीमधील एक बाजू नररूप, तर दुसरी मादीरूप असून या दोन्ही रूपांमध्ये सुस्पष्ट भेददर्शक सीमारेषा आढळते. इतरांच्या बाबतीत शरीराचा एक--चतुर्थांश हिस्सा नररूप, तर तीन-चतुर्थांश हिस्सा मादीरूप असू शकतो अथवा शीर्ष मादीरूप असून उरलेले शरीर नररूप असू शकते.
डिप्टेरा गणाच्या ड्रॉसोफेलिडी कुलातील ⇨ ड्रॉसोफिला प्रजाती-मधील ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या जातीच्या स्त्री-पुंरूपात गर्द रंगाचा डोळा, खाचयुक्त पंख व उदराचा आकार या गुणवैशिष्ट्यांमुळे एकबाजू मादीरूप दिसते आणि रुंद पंख, डोळ्याचा रंग व लक्षण आणि पिळवटलेले राठ केस या गुणवैशिष्ट्यांमुळे दुसरी बाजू नररूप दिसते. ड्रॉसोफिलामध्ये (XX / XO) XX युग्मनजातून एका गुणसूत्राचा निरास ( लोप ) झाल्याने मादी / नर लिंग मोझॅइक स्त्री-पुंरूपे विकसित होतात. ( येथे ० नसलेल्या लिंग गुणसूत्राचे निदर्शक आहे ).
गांधील माशी (हॅब्रोब्राकॉन जुगलँडिस) यासारख्या हायमेनॉप्टेरा गणातील अनेक जीवांची लिंगनिश्चितीची एक पद्धत आहे. त्या पद्धतीत अनिषेचित ( अफलित ) अंड्यांपासून एकगुणित नर, तर निषेचित ( फलित ) अंड्यांपासून द्विगुणित माद्या निर्माण होतात. या जीवजातींमधील स्त्री-पुंरूपे द्विगुणित / एकगुणित मोझॅइक प्रकारची असतात व त्यांतील मादी भाग द्विगुणित आणि नर भाग एकगुणित असतो.
ड्रॅसोडेस सॅक्कॅटस या कोळ्याच्या पूर्णरूप मादीच्या डाव्या बाजूस नर पादमृश असतो व हे मोझॅइक स्त्री-पुंरूपाचे उदाहरण आहे. हेटेरोप्टेरिक्स डायलॅटाटा या जातीचेही स्त्री-पुंरूप आढळते. कवचधारी प्राण्यांमध्ये विशेषतः शेवंड्यात, कधीकधी खेकड्यांत आणि अगदी पक्ष्यांमध्येही स्त्री-पुंरूपतेची उदाहरणे आढळल्याचे उल्लेख आहेेत. स्त्री-पुंरूप झीब्रा फिंच हे पक्ष्यांमधील ठळक उदाहरण आहे. कोंबडीचे पिलू ( चिकन ) देखील स्त्री-पुंरूप असू शकते. तथापि, उच्चतर प्राण्यांमध्ये स्त्री-पुंरूपता आढळत नाही.
या नोंदीतील आनुवंशिकीय परिभाषेच्या अधिक स्पष्टीकरणासाठी मराठी विश्वकोशा तील ‘आनुवंशिकी’ ही नोंद पहावी.
ठाकूर, अ. ना.
“