स्तनशोथ : ( पशुवैद्यक ). पुष्कळ दूध देणार्‍या गायींना व म्हशींना होणारा हा एक सांसर्गिक रोग आहे. स्तनाची वा कासेची दाहयुक्त सूज हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. नैमित्तिक स्तनशोथ बहुधा आघातजन्य असून तो फारसा महत्त्वाचा नसतो. तीव्र, अल्प तीव्र व चिरकारी स्वरूपांत सांसर्गिक स्तनशोथ आढळतो. ई. आय्. ई. नोकार व मोल्नेरो यांनी १८८५ मध्ये या रोगावरील संशोधनास सुरुवात केली. त्या वेळी हा रोग संसर्गजन्य आहे, हे लक्षात आले. यानंतर अनेक देशांत तसेच भारतातही या रोगावरील संशोधनाला चालना मिळाली आणि हा रोग कसा पसरतो व रोगकारक जंतू कोणते याचा शोध लागला. सडांच्या छिद्रांमधून रोगजंतू स्तनात प्रवेश करतात. हा रोग झालेल्या गायीची व म्हशीची धार काढणार्‍या व्यक्तीच्या हातांवर सांडलेल्या दूषित दुधाच्या संसर्गामार्फत त्याचे रोगजंतू निरोगी गायी-म्हशींच्या स्तनात प्रवेश करतात व हा रोग पसरतो. याशिवाय कासेला झालेल्या जखमांतून रोगजंतू कासेत जातात. तसेच जनावर खाली बसल्यावर गोठ्यातील जमिनीवर असलेले तसेच अंगाखाली अंथरलेल्या गवताच्या पेंढ्यांतून रोगजंतू कासेत जाऊ शकतात. पुष्कळ अंबोण खायला दिल्यामुळे कासेवर ताण पडल्याने, अनियमितपणे धार काढल्याने अथवा धार काढण्याचे यंत्र बरोबर न वापरल्यास कासेला सूज येते. सडाच्या तोंडाशी ( टोकाशी ) दूध ठिबकत राहिल्याने रोगजंतूंच्या वाढीस चांगले माध्यम मिळते व सूक्ष्मजंतू कासेत प्रवेश कतात.

स्तनशोथकारक रोगजंतूंमध्ये मुख्यत: स्ट्रेप्टोकॉकस ॲगॅलॅक्टीई या सूक्ष्मजंतूंमुळे तीव्र स्वरूपाचा स्तनशोथ होतो. याशिवाय स्ट्रे. डीसगॅलॅक्टीई, स्ट्रे. उबेरिस आणि कॉरिनिबॅक्टिरियम पायोजेनीस आणि स्टॅफिलो-कॉकसच्या काही जाती यांमुळे सांसर्गिक स्तनशोथ होतो. स्टॅ. पायोजेनीसस्टॅ. ऑरियस या रोगजंतूंमुळे स्तनशोथ झालेल्या रोगी जनावराच्या दुधातून हे सूक्ष्मजंतू माणसाच्या शरीरात गेल्यास घशाला सूज येऊ शकते. स्तनशोथ रोगामुळे कासेच्या चारपैकी एका सडाला व इतर भागात सूज येते. अशा दूषित भागाकडील सडातून दुधाऐवजी पिवळट पाणी, रक्तमिश्रित दूध किंवा दुधाच्या गुठळ्या बाहेर येतात आणि निरोगी सडातून दूध येते. ही सूज हळूहळू घट्ट व टणक होत जाते. सूज जास्त वाढल्यास सडाच्या आतील भागात पसरून सडाचे तोंड बंद होते. नंतर सडाचा दुसरा भागही अशा तर्‍हेने दूषित होऊन सड बंद होतो व रोग चिरकारी स्वरूपात बरेच दिवस राहतो. पुढील वेताच्या वेळी कासेचा निरोगी भागही दूषित होऊन चारही सड निकामी होतात व आतमध्ये पू होतो. आशुकारी रोग झाल्यास कासेचे चारही सड भराभर दूषित होत जातात आणि गाय किंवा म्हैस आर्थिक दृष्टीने निकामी होते. दुधाची परीक्षा केल्यास कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजंतू रोगास कारणीभूत आहेत हे सहज कळते व त्यानुसार उपचाराची दिशा ठरवितात. वरवर दूध चांगले दिसले, तरीसुद्धा चाचणी केल्यास ते दूषित निघण्याची शक्यता असते आणि अगदी प्रथमावस्थेत असलेला रोग कळण्यास मदत होते. पेनिसिलीन व त्या गटातील इतर प्रतिजैव औषधांचा ( अँटिबायॉटिक्स ) स्ट्रे. ॲगॅलॅक्टीई या सूक्ष्मजंतूंवर चांगला उपयोग होतो. हे औषध सडातून टोचतात. स्टॅफिलोकॉकस सूक्ष्मजंतूंनी झालेला आजार प्रोकेन पेनिसिलीन या औषधाने बरा होतो. तसेच डाय-हायड्रो स्ट्रेप्टोमायसीन, सोडियम सल्फा मेझाथीन आणि कोबाल्ट सल्फेट ही औषधेही गुणकारी आहेत. पेनिसिलीन गटातील सिफोटॅक्झीम, सेफट्रायक्झोन, सेफ्टीयोफर सोडियम इ. अधिकाधिक उच्चतर प्रतिजैविके मानेतून अथवा शिरेतून दर बारा ते चोवीस तासांच्या अंतराने किमान ३ — ५ दिवस दिल्याने रोग आटोक्यात येण्यास मदत होते. वर उल्लेख केलेली प्रतिजैविके अधिकतर ग्रॅम-पॉझिटिव्ह जातीच्या जीवाणूंवर प्रभावी ठरतात. ग्रॅम-निगेटिव्ह जातीतील जीवाणूंमुळे स्तनशोथ झाला असल्यास त्यांसाठी ॲमिनोग्लायकोसाइड गटातील अमिकॅसीन व जेन्टामायसीन ही प्रतिजैव औषधे अत्यंत प्रभावी ठरतात. सदरच्या स्तनशोथाचे कारण बुरशी वा अवायुजीवी सूक्ष्मजंतू असल्यास फ्लुरोक्विनोलोन गटातील एन्रोफ्लोक्सासीन, सिप्रोफ्लोक्सासीन आदी प्रतिजैविके प्रभावी ठरतात.

जास्त दूध देणार्‍या जनावराचे दूध दिवसातून तीन वेळा काढतात. दूध काढणे बंद करताना काही दिवस दिवसभरातून एकदा दूध काढतात. पुढे दोन दिवसांतून एकदा असे करत दूध काढणे हळूहळू बंद करतात. आधी रोग होऊन गेलेल्या जनावराचे दूध वेत होण्याआधी तपासतात व ते दूषित आढळल्यास प्रसूत होण्याअगोदर तिच्यावर उपचार करतात. दूध काढणे बंद केल्यावर चारही सडांतून पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन यांसारखी प्रतिजैव औषधे टोचतात. यामुळे रोगाचे भय राहत नाही. गोठ्याची साफसफाई, दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर कास धुण्यासाठी जंतु-नाशकांचा उपयोग, दूध काढणाराने हात स्वच्छ धुऊन दूध काढणे इ. स्तनशोथ या रोगावरील प्रतिबंधक उपाय आहेत.

पहा : गाय म्हैस.

दीक्षित, श्री. गं.