स्टिकलबॅक मासा : गॅस्टरोस्टेइडी मत्स्यकुलातील गॅस्टरोस्टेइफॉर्मीस गणाच्या पाच प्रजातींमधील आठ माशांच्या जातींना वरील नावाने संबोधितात. त्यांचे शरीर चापट व टॉर्पेडोच्या आकाराचे असून त्यांची लांबी जास्तीत जास्त १८ सेंमी.पर्यंत असते. या कुलातील माशांची ओळख त्यांच्या पाठीवरील पराच्या ( पृष्ठपक्षाच्या ) पुढच्या बाजूस असलेल्या २–१६ काट्यांनी होते. तोंड मध्यम मोठे, तिरकस व दात लहान असतात. डोक्याचे कठीण हाडाने व शरीराचे दोन्ही बाजूंनी अस्थिमय तकटांनी संरक्षण होते. हे लहान मासे गोडे, मचूळ व खार्या पाण्यात, उत्तर गोलार्धातील थंड व समशीतोष्ण समुद्रांत सुदूर आर्क्टिक समुद्रापर्यंत आढळतात. ते आपली उपजीविका मुख्यतः डासांच्या अळ्यांवर करीत असल्यामुळे त्यांच्या सर्व जाती आर्थिक व आरोग्य दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत.
स्टिकलबॅक त्याच्या प्रजोत्पादनविषयक वर्तणुकीमुळे ओळखला जातो. प्रजनन साधारणपणे वसंत ऋतूत होते. या वेळेस नराचे शरीर रंगांनी माखले जाते. प्रजातीनुसार नराचा रंग लाल ते पिवळा-नारिंगी ते काळा असू शकतो.
स्पिनॅकिया स्पिनॅकिया ( पंधरा काट्यांचा स्टिकलबॅक ) व अपेल्टस क्वाड्रॅकस ( चार काट्यांचा स्टिकलबॅक ) हे सागरी मासे असून किनार्यालगत आढळतात. स्पि. स्पिनॅकिया ही जाती नॉर्वे ते बिस्के उपसागर या टापूत आढळते. प्रौढ मासा सु. १७ सेंमी. लांब असून तो एक वर्ष जगतो. ह्या जातीचा नर बुळबुळीत द्रव्याच्या साहाय्याने शैवले एकत्र करून घरटे तयार करतो. त्यात मादी १५०–२०० अंडी घालते. नंतर नर त्यांचे निषेचन ( फलन ) करतो. पांढरा स्टिकलबॅक मासा वगळता सर्व प्रजातींतील नर घरट्यांचे व अंड्यांचे संरक्षण करतात. आपल्या वक्षीय परांनी ते अंड्यांची उबवणी करीत असतात. ते आक्रमकपणे अंड्यांचे व नवीन पिलांचे शत्रूंपासून संरक्षण करतात. नर एकापेक्षा अधिक माद्यांची निवड करतात.
गॅस्टेरोस्टिअस ॲक्युलिएटस ( तीन काट्यांचा स्टिकलबॅक ) या माशाच्या पाठीचा रंग हिरवा ते तपकिरी व पोटाचा रंग रुपेरी असतो. नर वाळूमध्ये खळगा तयार करतो. तेथे तो मूत्रपिंडातून निघणार्या बुळबुळीत द्रव्याच्या साहाय्याने पाणवनस्पतींपासून घरटे तयार करतो. समागमाच्या काळात त्याचे मूत्रपिंड मोठे होते व पोटाचा रंग लाल होतो. इतर नरांना तो आपल्या घरट्याच्या आसपास फिरकू देत नाही; परंतु माद्यांना आकर्षित करतो. मादी घरट्यात आल्यावर नर आपले नाक मादीच्या शेपटीच्या तळाशी घासून तिला अंडी घालण्यास प्रवृत्त करतो. अंडी फुटून पिले बाहेर पडेपर्यंत ( सु.१० दिवस ) व पुढे काही दिवस नर पिलांचे संरक्षण करतो.
पंजिटिअस पंजिटिअस ( नऊ काट्यांचा स्टिकलबॅक ) ही जाती सु. ७ सेंमी. लांब असून उत्तर अमेरिका व यूरोप येथे गोड्या आणि खार्या पाण्यांत आढळते. त्यांच्या काट्यांची संख्या नऊ किंवा दहा आणि क्वचित तेरा असते. घरटे तयार करण्याचे काम नर करतो. अंडी फुटून पिले बाहेर पडेपर्यंत ( सु. एक आठवडा ) अंड्यांचे व पिलांचे तो संरक्षण करतो.
जमदाडे, ज. वि.