सोस्यूर, फेर्दिनां द : (२६ नोव्हेंबर १८५७-२२ फेब्रुवारी १९१३). फ्रेंच-भाषक स्विस भाषाविद्, आधुनिक भाषाविज्ञानाचा उद्गाता, आधुनिक चिन्हमीमांसेचा (सीमि-ऑटिक्स) सह-संस्थापक. अमेरिकन तत्त्वज्ञ ⇨ सी. एस्. पर्स (१८३९-१९१४) हा चिन्हमीमांसेचा दुसरा सह-संस्थापक होय.
सोस्यूर याचा जन्म जिनीव्हा येथे झाला. जिनीव्हा, पॅरिस, लाइप्सिक आणि बर्लिन येथे त्याचे उच्चशिक्षण १८७९ पर्यंत पुरे झाले. विद्यार्थिदशा त्याने आपल्या प्रबंधाने गाजवली. Memoire sur le systeme primitife des voyelles dans les langues indo-europeennes (१८७९) हा त्याच्या हयातीमधील एकमेव प्रकाशित ग्रंथ ठरला. ऐतिहासिक भाषाविज्ञानातील सिद्धांत असा, की भाषेतील परिवर्तने सुट्या ध्वनींची वा सुट्या शब्दरूपांची नसतात, तर एकूण वर्णव्यवस्थेची वा रूपव्यवस्थेची असतात. ह्याला अनुसरून त्याने आद्य इंडो-यूरोपियन भाषेतील स्वरादेशांच्या (ablaut) मागे काही अर्ध-व्यंजने असल्याचे अनुमानिले. (नंतरच्या उत्खननात सापडलेल्या अभिलेखांतील १९१५ त वर्णिलेल्या हिटाइट भाषेत ती उपस्थित असल्याचे १९२७ मध्ये आढळले आणि ऐतिहासिक भाषाविज्ञानाची वैज्ञानिकता सिद्ध झाली.) नंतर पॅरिस विद्यापीठात हा तरुण अध्यापक आपल्या प्रसन्न आणि चमकदार वाणीने प्रिय झाला (१८८०-९१). पुढे जिनीव्हा विद्यापीठात त्याची ‘प्राध्यापक’ म्हणून नेमणूक झाली (१९०१-१३ मध्ये इंडो-यूरोपियन व संस्कृत या विषयांचे आणि १९०७ -१३ या काळात सामान्य भाषाविज्ञानाचे अध्यापन). त्याच्या सैद्धांतिक व्याख्यानांतून त्याने त्या काळातल्या काही सुट्या नवप्रवर्तनांना कवेत घेऊन आधुनिक भाषाविज्ञानाची–विशेषतः विश्लेषक भाषाविज्ञानाची–पायाभरणी केली. १९१२-१३ हा काळ त्याच्या आजारपणात गेला आणि त्याच्या मृत्यूमुळे या मांडणीला ग्रंथरूप द्यायचे राहून गेले. ते काम त्याच्या विद्यार्थ्यांनी आपली टिपणे एकत्रित करून काही अंशी पुरे केले आणि त्याची कीर्ती यूरोप-अमेरिकेत पसरली. Cours de linguistique generale (१९१६) या त्याच्या ग्रंथाचे दोन इंग्लिश अनुवाद उपलब्ध आहेत (१९५९ नंतरचा पीटर ओवेन याने १९७४ मध्ये केलेला अनुवाद अधिक सरस). १९६० पासून त्याच्या विचारसरणीचा साहित्यमीमांसा, संस्कृतिमीमांसा आणि चिन्हमीमांसा या क्षेत्रांवरही प्रभाव दिसून येतो.
भाषापरिवर्तन तुकड्याने होत नाही, समग्रपणे आणि व्यवस्थितपणे होते या मान्य सिद्धांताकडून भाषाच तुकड्याने बनलेली नसते, ती एक समग्र व्यवस्था असते या निर्णयाप्रत सोस्यूर आला. १९०० सालाच्या आगेमागे होत असलेल्या यूरोपियन विचारविश्वातल्या रचना आणि कार्य, मानवी व्यवस्थांची स्वायत्तता, अवस्थांनी बनणारा इतिहास यांसारख्या कल्पनांशी सोस्यूरच्या विचारांचे जवळचे नाते होते. सोस्यूरचे प्रमुख भाषाविषयक विचार असे : भाषाव्यापार हा एक चिन्हव्यापार आहे. चिन्हित आणि चिन्हक यांचे नाते मुख्यतः संकेतांवर आधारलेले असते आणि या संकेतांची एक व्यवस्था असते. भाषाव्यवहार (पारोल्) हा भाषाव्यवस्थेवर (लांग्) आधारलेला असतो. ही भाषाव्यवस्था मनुष्यप्राण्याच्या भाषाक्षमतेवर (faculte de langage) आधारलेली असते. भाषाव्यवस्थेतील परिवर्तनाच्या इतिहासाशी संशोधकाला कर्तव्य असते. वक्ता-श्रोता यांना त्याच्याशी कर्तव्य नसते. त्यांच्या नजरेतून भाषाव्यवस्थेकडे पाहिले तर तिच्यातील अंतर्गत संगतीवर आधारलेल्या रचना आणि कार्ये आणि तिच्या साहाय्याने चाललेला आणि समाजात रुजलेला संज्ञापनव्यापार (कम्यूनिकेशन) आणि आकलनव्यापार (कॉग्निशन) आपल्या लक्षात येतात. ही अंतर्गत रचना आणि कार्य समजावून घ्यायची तर कशाशेजारी काय ठेवायचे (सिंटॅग्मॅटिक) आणि कशाच्या जागी काय ठेवायचे (असोसिएटिव्ह, नंतरच्या काळात पॅरडिग्मॅटिक) या दिशांनी भाषाव्यव-हाराचा शोध घ्यावा लागतो. भाषाव्यवस्थेमध्ये परिवर्तने कशी होतात आणि अमूर्त संगती व्यवहारात कशी मूर्त होते, याचा शोध घेताना भाषा-व्यवहाराचा सामाजिक संदर्भ नजरेसमोर ठेवावा लागतो. भाषाविश्लेषण आणि भाषेतिहास ही भाषाविज्ञानाची दोन कार्ये आहेत, ती पार पाडताना भाषावैज्ञानिकाला हा सामाजिक संदर्भ नजरेआड करून चालणार नाही.
सोस्यूरचे जिनीव्हा येथे निधन झाले.
पहा : भाषाशास्त्र (भाषाशास्त्राचा इतिहास).
संदर्भ : 1. Culler, Jonathan, Ferdinand de Saussure, London, 1977.
2. Mahulkar, Dinesh D. Methodology of Socio-historical Linguistics ( Chapters 4-6 ), Shimla, 1996.
3. Prem Singh, “Rethinking history of Linguistics : Saussure and the Indian connection.” In Srivastava, R. N. & Others, Ed. Language and Text : Studies in Honour of Ashok R. Kelkar, Delhi, 1992.
केळकर, अशोक रा.
“