सोल्झेनित्सीन, आलेक्सांद्र : (११ डिसेंबर १९१८-४ ऑगस्ट २००८). श्रेष्ठ रशियन कादंबरीकार. जन्म रशियातील (यू.एस्.एस्.आर्.) किसल्व्हॉट्स्क येथे. त्याच्या जन्मापूर्वी त्याचे वडील एका अपघातात मरण पावल्यामुळे त्याच्या आईनेच त्याला वाढवले. रस्तोव-ना-दोनू ह्या विद्यापीठातून त्याने भौतिकी आणि गणित ह्या विषयांत पदवी मिळवली (१९४१). गणिताचा अभ्यास करीत असतानाच ‘मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी ‘तून त्याने पत्राद्वारे साहित्याचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. दुसऱ्या महायुद्धात तो लढला तोफखान्याचा अधिकारीही झाला तथापि १९४५ च्या फेब्रुवारीमध्ये आपल्या खाजगी पत्रव्यवहारात त्याने स्टालिनवर टीका केल्याच्या आरोपावरून त्याला अटक करून आठ वर्षे तु रुं गा त टाकण्यात आले. तुरुंगातला बराच कालावधी त्याने श्रमछावणीत काढला. १९५३ मध्ये तुरुंगातून त्याची सुटका झाली परंतु रशियाच्या यूरोपीय प्रदेशातून त्याची हकालपट्टी करण्यात आली. १९५६ मध्ये त्याचे पुनर्वसन करण्यात आले. मध्य रशियातील रीअझॅन येथे वास्तव्य करण्याची परवानगी त्याला देण्यात आली. तेथे तो एका शाळेत भौतिकीचे आणि गणिताचे अध्यापन करू लागला लेखनही करू लागला. त्याच्या तुरुंगवासाच्या काळात त्याच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेऊन पुढे दुसऱ्या एका व्यक्तीशी लग्न केले होते तथापि तो रीअझॅन येथे आल्यानंतर आपल्या दुसऱ्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन ती पुन्हा त्याच्याकडे आली असे म्हटले जाते.
स्टालिनच्या मृत्यूनंतर रशियातील सांस्कृतिक जीवनावरचे निर्बंध सैल झाले होते. नि:स्टालिनीकरणाचे (डिस्टालिनाय्झेशन) धोरण रशियन राज्यकर्त्यांनी स्वीकारले होते. त्या पार्श्वभूमीवर सोल्झेनित्सीनने अदीन देन इवाना दिनीसोविचा (१९६२, इं. भा. वन डे इन द लाइफ ऑफ इव्हान दिनीसोविच, १९६३) ह्या आपल्या पहिल्या कादंबरीचा खर्डा नॉव्ही मीर (इं. शी. ‘न्यू वर्ल्ड ‘) ह्या एका प्रमुख सोव्हिएट वाङ्मयीन नियतकालिकाकडे पाठविला. स्टालिनच्या कारकीर्दीत श्रमछावणीत कोंडलेल्या एका कैद्याच्या जीवनातला एक दिवस ह्या कादंबरीत वर्णिलेला आहे. ही कादंबरी प्रसिद्ध होताच अतिशय लोकप्रिय झाली. कादंबरीची साधी आणि थेट भाषाशैली, तिच्या आशयामागे असलेला लेखकाचा स्वत:चा अनुभव आणि नि:स्टालिनीकरणाचे वातावरण ह्यांमुळे ह्या कादंबरीचा वाचकांवर मोठा प्रभाव पडला. सोव्हिएट रशियाप्रमाणे अन्य देशांतही ह्या कादंबरीने राजकीय खळबळ निर्माण केली. ह्या कादंबरीमुळे स्टालिनच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या अन्य लेखकांनाही स्वतःचे अनुभव शब्दांकित करण्याची प्रेरणा मिळाली. सोल्झेनित्सीनला सोव्हिएट लेखकांच्या संघटनेचे सदस्यत्वही देण्यात आले.
१९६३ मध्ये नॉव्ही मीर या नियतकालिकाने सोल्झेनित्सीनच्या तीन कथा प्रसिद्ध केल्या (‘इन्सिडंट ॲट क्रेचेटोव्ह्का स्टेशन’, ‘मात्रिओनाज् हाउस’ आणि ‘फॉर द गुड ऑफ द कॉज ‘-सर्व इं. शी.). त्यांतल्या पहिल्या दोन स्टालिनच्या राजवटीवर टीका करणाऱ्या होत्या, तर तिसरी खुद्द सोव्हिएट पंतप्रधान ख्रुश्चॉव्हच्या नोकरशाहीत स्टालिनच्या वृत्तीने वागणाऱ्या अधिकाऱ्यावर रोखलेली होती. १९६४ मध्ये साहित्यासाठी देण्यात येणाऱ्या लेनिन पुरस्कारासाठी त्याचे नामांकन झाले होते पण त्याच वर्षी ख्रुश्चॉव्हची सत्ता संपुष्टात आली आणि सोव्हिएट लेखक कलावंतांवरील निर्बंध पुन्हा कडक झाले. तो पुरस्कार त्याला मिळाला नाही. सोल्झेनित्सीनचे लेखन वादग्रस्त ठरले. त्याच्या प्रकाशनावर बंदी घातली गेली परंतु १९६८ मध्ये राकवी कोर्पुस (इं. भा. कॅन्सर वॉर्ड) आणि व्ही क्रुगे पेरवम (इं. भा. द फर्स्ट सर्कल) ह्या दोन कादंबऱ्या सोव्हिएट रशियाबाहेर पश्चिमी देशांत प्रसिद्ध झाल्या. कॅन्सर वॉर्डमध्ये सोव्हिएट रशियातील एका रुग्णालयात गंभीर आजारपणासाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या दैनंदिन जीवनांतील घटनांचे भावस्पर्शी चित्रण करण्यात आलेले आहे. स्वतः सोल्झेनित्सीन १९४५ मधल्या अटकेनंतर तुरुंगवासात कॅन्सरने आजारी होता आणि अशाच एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. पण ही कादंबरी कॅन्सर वॉर्डच्या चित्रणातून एकूण सोव्हिएट युनियनचेच प्रातिनिधक चित्र उभे करते. द फर्स्ट सर्कल ह्या कादंबरीत सोव्हिएट राजवटीत केवळ वैज्ञानिकांसाठी असलेल्या खास तुरुंगाचे दर्शन घडविलेले आहे. भौतिकी आणि गणित ह्या विषयांचा पदवीधर असल्यामुळे सोल्झेनित्सीनने स्वतःही ह्या तुरुंगात काम केले होते. अत्यंत अवघड परिस्थितीतही टिकून राहण्याची माणसांची मानसिक ताकद असते, हे दाखवून देण्यात ह्या कादंबरीत सोल्झेनित्सीन यशस्वी झाला आहे. १९६९ मध्ये रीअझॅन लेखक संघटनेतून त्याची हकालपट्टी झाली परंतु पुढच्याच वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान त्याला दिला जात असल्याचे जाहीर झाले. मात्र ते स्वीकारण्यासाठी सोल्झेनित्सिन स्टॉकहोमला जाऊ शकला नाही. आपण तेथे गेल्यास आपल्या देशात आपल्याला परत जाता येणार नाही, हे भय त्याला वाटत होते.
१९७१ च्या जूनमध्ये आव्हगुस्त 1914 (इं. भा. ऑगस्ट 1914) ही त्याची ऐतिहासिक कादंबरी सोव्हिएट रशियाबाहेर प्रसिद्ध झाली. आपल्या शालेय जीवनातील दिवसांपासून त्याला पहिल्या महायुद्धाच्या इतिहासात स्वारस्य निर्माण झाले होते. ह्या कादंबरीत त्याने पहिल्या महायुद्धातील घटनांचा स्वतः लावलेला अन्वयार्थ प्रकट केला आहे. १९७३ मध्ये आर्खिपलाग गुलाग (इं. भा. द गुलाग आर्चिपलागो) ह्या त्याच्या कादंबरीचे हस्तलिखित सोव्हिएट रशियातील पोलिसांच्या हातात पडले, तेव्हा त्याने ही कादंबरी पॅरिसमध्ये प्रसिद्ध होऊ दिली. बोल्शेव्हिकांनी १९१७ मध्ये रशियाची सत्ता काबीज केल्यानंतर तेथे तुरुंगांची आणि श्रमछावण्यांची जी व्यवस्था अस्तित्वात आली, तिचा स्टालिनच्या कारकीर्दीत फार मोठा विस्तार झाला. गुलाग हे ह्या व्यवस्थेचे नाव होय. गुलागच्या तावडीत सापडलेल्यांना होणारी अटक, त्यांची चौकशी, त्यांना दोषी ठरविणे आणि त्यांची तुरुंगात रवानगी करणे, ह्या गुलागने दीर्घकाळ राबवलेल्या कार्यपद्धतीचे प्रत्ययकारी दर्शन ह्या कादंबरीत घडवलेले आहे. सोल्झेनित्सीनचे काही आत्मचरित्रात्मक तपशीलही तीत आहेतच. तसेच त्याच्याबरोबर तुरुंगवास भोगणाऱ्याचे वृत्तांतही ह्या कादंबरीत आलेले आहेत. ह्या कादंबरीविरुद्ध सोव्हिएट रशियात प्रतिक्रिया उमटणे अपरिहार्य होते. १२ फेब्रुवारी १९७४ रोजी त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून दुसऱ्याच दिवशी त्याला सोव्हिएट रशियातून हद्दपार करण्यात आले. त्यानंतरच्या डिसेंबरात त्याने त्याला जाहीर झालेल्या नोबेल पारितोषिकाचा स्वीकार केला.
सोल्झेनित्सीनने अमेरिकेत प्रवास केला आणि यथावकाश त्या देशात तो स्थायिकही झाला. त्यानंतर प्रसिद्ध झालेली त्याची द ओक अँड द काफ आणि द मॉर्टल डेंजर (दोन्ही इं. भा. १९८०) ही दोन पुस्तके निर्देशनीय आहेत. द ओक… मध्ये सोव्हिएट युनियनमधील वाङ्मयीन जीवनाचे चित्र उभे केलेले आहे, तर द मॉर्टल… मध्ये अमेरिकेत रशियाबद्दलच्या, त्याला जाणवणाऱ्या गैरसमजुतींचे घातक परिणाम त्याने विश्लेषिले आहेत.
ग्लासनोस्तच्या बदलत्या वातावरणात रशियन राज्यकर्त्यांचा सोल्झेनित्सीनच्या साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. १९८९ मध्ये नॉव्ही मीर या नियतकालिकाने द गुलाग आर्चिपलागोचे काही भाग प्रसिद्ध केले. त्याचे अन्य ग्रंथही रशियात प्रकाशित झाले आणि १९९० मध्ये रशियाचे नागरिकत्वही त्याला पुन्हा देण्यात आले.
मॉस्को शहरी तो निधन पावला.
संदर्भ : 1. Ericson, Edward E. Jr. Solzhenitsyn : The Moral Vision, 1982.
2. Lebedz, Leopold, Ed. Solzhenitsyn : A Documentary Record, 1973.
3. Scammell, Michael, Solzhenitsyn : A Biography, 1984.
पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)
“