सोलॅनेसी : (धोतरा कुल). फुलझाडांपैकी [ ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] या वनस्पतिकुलाचा अंतर्भाव सोलॅनेलीझ या गणात केला आहे. ⇨ कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी (हरिणपदी कुल) याचाही त्याच गणात समावेश आहे, कारण त्या दोन्हीतील आप्तभाव सर्वांनी मान्य केला आहे. ए. एंग्लर यांनी या कुलाचा समावेश ट्युबिफ्लोरी श्रेणीतील सोलॅनिनी या उपश्रेणीत केला आहे. जे. हचिन्सन यांनी त्यांच्या सोलॅनेलीझ गणात ⇨ बोरॅजिनेसी व कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी यांचाही समावेश केला आहे. सोलॅनेसी व कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी यांचे आप्तसंबंध निकट आहेत. रेंडल यांनीही ट्युबिफ्लोरीत सोलॅनेसीचा अंतर्भाव करून कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी कुलाला स्वतंत्र गणात घातले आहे. जे. एन. मित्रा यांच्या मते सोलॅनेलीझमध्ये सोलॅनेसीचाही समावेश करावा. सोलॅ-नेलीझचा उगम व विकास ⇨ जिरॅनिएलीझ (भांड गण) यापासून लोगॅनिएलीस (कुचला गण) याबरोबर परंतु स्वतंत्रपणे झाला असावा [ ⟶ लोगॅनिएसी].

सोलॅनेसी कुलात सु. ८५ प्रजातींचा व २,००० जातींचा अंतर्भाव आहे. त्यांचा प्रसार मुख्यतः मध्य व दक्षिण अमेरिकेत असला तरी आशिया, आफ्रिका व यूरोप येथेही अनेक जाती आढळतात काहींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते (उदा., मिरची, बटाटा, तंबाखू, टोमॅटो इ.). या कुलातील बहुतेक वनस्पती ओषधी किंवा ⇨ क्षुप (झुडपे) असून काही लहान ⇨ वृक्षही आहेत. पाने साधी फुले द्विलिंगी, नियमित, क्वचित एकसमान, पंचभागी, अवकिंज परंतु किंजदले बहुधा दोन, फुले कधी एकेकटी व अनेकदा फुलोरा वल्लरीय[ ⟶ पुष्पबंध] असतो. कधी संदले जुळलेली व फळाभोवती सतत राहणारी व वाढणारी, कधी सुटी, परिहित प्रदले (पाकळ्या) जुळलेली, बहुधा पुष्पमुकुट घंटाकृती, नलिकाकृती, क्वचित द्य्वोष्ठक केसरदले (पुं-केसर) अपिप्रदल लग्न (पाकळ्यास चिकटलेली) व प्रदलाशी एकांतरित (एकाआड एक) परागकोश उभे तडकणारे किंवा छिद्रांतून पराग बाहेर पडतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात २ किंवा ३–५ कप्पे मृदुफळ (वांगे, टोमॅटो) किंवा शुष्क बोंड (धोतरा) बीजके (अविकसित बीज) अनेक बी सपाट असते. सुगंधी रातराणी व पिटूनिया, पोटॅटो व्हाइन (सोलॅनम वेंडलँडी) व धोतरा वगैरे प्रकार बागेत लावतात. तर काही खाद्य (बटाटा, वांगे, टोमॅटो, मिरची इ.), काही मादक (तंबाखू), काही विषारी (नाइटशेड, धोतरा) व काही औषधी (पोपटी, अश्वगंधा, बेलाडोना) जाती आहेत. या कुलाला ‘वृंताकाद्य कुल’ किंवा ‘धत्तुरादि कुल’ असेही म्हणतात.

पहा : सेलॅस्ट्रेसी.

संदर्भ : Mitra, J. N. An Introduction to Systematic Botony &amp Ecology, Calcutta, 1964.

जोशी, रा. ना. परांडेकर, शं. आ.