सोमनाथपूर : कर्नाटकातील होयसळ वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध असलेले स्थळ. ते म्हैसूर जिल्ह्याच्या आग्नेयीस सु. ४० किमी.वर काटोरी नदीकाठी वसले आहे. ते तळकाडच्या वायव्येस सु. १६ किमी.वर वसले असून त्या शहराचेच एक उपनगर झाले आहे. येथील प्रख्यात केशव मंदिर होयसळ राजा तिसरा नरसिंह (कार. १२५४-९२) याच्या सोमनाथनामक सेनापतीने १२६८ मध्ये बांधले, म्हणून या स्थळास सोमनाथपूर हे नाव प्राप्त झाले. हे मंदिर उत्तर होयसळ स्थापत्यशैलीचे नमुनेदार उदाहरण असून याचे विधान सप्तकोनी तारकाकृती आहे. त्यात तीन स्वतंत्र गर्भगृहे (त्रिकूटक) आहेत. त्यांच्या मधोमध त्यांना जोडणारा स्तंभमंडप आहे. मंदिराचे बांधकाम मृदू संगजिरानामक (सोपस्टोन) पाषाणात केलेले असून सु. एक मीटर उंचीच्या चौथऱ्यावर ते बांधले आहे. ते होयसळेश्वर व चेन्नकेशव या होयसळ मंदिरांच्या तुलनेत लहान आहे. येथील प्रत्येक गर्भगृहावर सारख्या आकाराची विमाने आहेत मात्र तीनही गर्भगृहांपुढे एकच सभामंडप आहे. पूर्वेच्या बाजूस बंदिस्त नवरंग मंडप असून त्यातील कक्षासनाच्या उंचीवर जाळीदार खिडक्या आहेत. तीनही गर्भगृहांत विष्णूच्याच भिन्न रूपातील मूर्ती आहेत. यांतील वेणुगोपाळाची प्रतिमा लहान असूनही ती देखणी व सुबक आहे. अधिष्ठानावरील शिल्पपट्टांत लढवय्ये सैनिक, गज, अश्व, हंस व मकर आदी स्तरांचे अलंकरण असून वरच्या स्तरात रामायण-भागवतातील कथानक दृश्ये कोरली आहेत. मंडोवरावरील कोनाड्यांतून उत्थित शिल्पात देवदेवता, त्यांचे गण आणि मदनिकांच्या भिन्न ढंगातील वैविध्यपूर्ण मूर्ती आहेत. मंडपातील कातीव व झिलईदार स्तंभांवर नाजूक नक्षीकाम आहे. या मंदिरातील उपड्या टोपलीप्रमाणे दिसणारी विताने (छते) कलात्मक असून त्यांच्या बाजूंवर अत्यंत कौशल्याने खोदलेले भौमितिक रचनाबंध, पुष्पलता यांचे आकृतिबंध व अष्टदिक्पाल यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. कोणत्याही दोन छतांत साम्य नाही. मंदिराभोवती प्राकार असून त्याच्या आतील बाजूस कोनाडासदृश जागेत चौसष्ट लहान मंदिरे आहेत.

चालुक्य-होयसळ वास्तुशिल्पशैलीचे हे एक प्रातिनिधिक मंदिर असून मंदिरावर सर्वत्र विपुल शिल्पांकन आहे. होयसळ मूर्तींचा स्वतंत्ररीत्या विचार केला असता, काही मदनिकांच्या मूर्ती मोहक व सुंदर असून वर्तुलन, स्थूलता आणि बुटकेपणा हे गुणविशेष त्यातून दृग्गोचर होतात. तांत्रिकता, कल्पनाशक्ती व रूपण कलेतील उधळण (अपध्यय) यांचा साकल्याने विचार केला असता, होयसळ मूर्तिकार हे उत्तम कारागीर होते पण कलाकार नव्हते.

पहा : कर्नाटक होयसळ घराणे.

 

संदर्भ : 1. Settar, Shadakshari S. Hoysala Temples, Two Vol., Dharwad, 1992.

           2. Settar, Shadakshari S. Somnathpur, Dharwad, 2008.  

           ३. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव : प्राचीन-मध्ययुगीन, पुणे, २००५.

           ४. माटे, म. श्री. प्राचीन भारतीय कला, पुणे, २००२.

 

देशपांडे, सु. र.