सोझा, एम्. एफ्. आंतोनियु जुआंव द (मारीदास) : (१९२२-२००५). कोकणी कवी व संपादक. मंगळूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्यांचे औपचारिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धर्मोपदेशक बनण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी त्यासाठी आवश्यक ते धार्मिक प्रशिक्षण घेतले. पुढे ते धर्मोपेशक बनले आणि धर्मप्रचार व लोककल्याणकार्यार्थ त्यांनी आयुष्य वेचले. त्यांची वाङ्मयीन कारकीर्द समांतरपणे चालू राहिली. ‘मारीदास’ या टोपणनावाने त्यांनी कोकणी भाषेत अनेक कविता लिहिल्या, वेळोवेळी कोकणी नियतकालिकांतून त्या प्रसिद्धही होत गेल्या मात्र त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध होऊ शकला नाही. साप्ताहिक राकणो, मंगळूर साप्ताहिक मित्र साप्ताहिक दिवी व आमची माय हे मासिक या कोकणी नियतकालिकांतून त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या. आमची माय या मासिकाचे ते संपादक होते. त्यांच्या कविता उच्च दर्जाच्या असून त्यांत रसाळपणा व गोडवा जाणवतो. मंगळूर येथील विविध कोकणी संस्था व संघटना यांच्यामार्फत त्यांना गौरविण्यात आले. प्रसिद्ध कोकणी कवी व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९९८) साहित्यिक म जॉन बातिस्त सिक्वेरा हे त्यांचे शिष्य होत.

इनामदार, श्री. दे.