सोंख : उत्तर प्रदेशातील मथुरेपासून आग्नेयीस सुमारे तीस किमी. अंतरावर असलेल्या या स्थळाचे उत्खनन १९६६ ते १९७४ असे सलगपणे बर्लिन म्यूझियम ऑफ इंडियन आर्ट या संस्थेचे संचालक डॉ. एच्. हार्टेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अत्यंत काळजीपूर्वक केल्या गेलेल्या या उत्खननात इ.स.पू. सु. ८००–इ.स. ४/५ वे शतक या कालखंडात झालेल्या विविध वस्त्यांचे अवशेष हाती आले. वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक वस्तुशिल्पे आणि वास्तू यामुळे हे उत्खनन महत्त्वाचे ठरले आहे. वस्त्यांचे एकूण पाच कालखंड करण्यात आले. यांतील पहिली वस्ती, इ.स.पू. सु. ८००–४०० या काळात झाली. या काळातील वास्तूंचे अवशेष कोणत्याही स्वरूपात मिळाले नसले, तरी मुख्य वस्तीच्या बाहेर कुडाच्या घरांचे अवशेष दिसून आले. या घरांच्या बांधणीत लाकडी वाश्यांचा आणि वेताच्या जाळ्यांचा उपयोग करण्यात आला होता. गंगा-यमुना दुआबात प्रचलित असलेली काळ्या रंगात चित्रकाम केलेली राखी रंगाची मडकी या काळात येथेही वापरात होती. प्रामुख्याने वाडगे आणि थाळ्यांचा वापर होता. याशिवाय लाल रंगाची, काळी आणि तांबडी मडकीसुद्धा प्रचलित होती.

दुसरी वस्ती, इ.स.पू. सु. ४०० ते २०० – मौर्यपूर्व आणि मौर्यकाल – या दरम्यान झाली. या कालखंडातील वस्त्यांचे दोन उपविभाग करण्यात आले आहेत. मौर्यपूर्व आणि मौर्यकालात वास्तूंच्या बांधणीत विटांचा वापर अजिबात नसून सर्व बांधकाम मातीचे होते. यातील पावणेचार मीटर व्यासाच्या वर्तुळाकृती वास्तू उल्लेखनीय आहेत. या वास्तूंच्या आत राख आणि जळलेल्या भिंतींचे अवशेष मिळाले. घराचे छप्पर लाकडांचे आणि बांबूचे असा अंदाज केला गेला आहे. मौर्यकालातही वास्तुप्रकारात व बांधणीतंत्रात बदल झाल्याचे दिसून आले नाही. मौर्यकलेशी संबद्ध अशा राखी रंगाच्या मृण्मय मूर्ती आहेत. चांदीची व तांब्याची नाणी, कांस्याचा त्रिशूळ, लेखविरहित व साच्यातून बनविलेली नाणी आणि मौर्यकालाचे निदर्शक व चकचकीत काळ्या वर्णाचे वाडगे, थाळ्या व झाकण्या या कालाच्या थरात उपलब्ध झाल्या.

तिसऱ्या वस्तीचा कालखंड इ.स.पू. २ रे / १ ले शतक (शुंग आणि शुंगोत्तर) असा निर्धारित करता आला. या काळात सोंखला मोठ्या प्रमाणावर वस्ती झाल्याचे दिसून आले. या वस्त्यांचे तीन उपविभाग करता आले. सुरुवातीच्या काळात घरे कुडाची असली, तरी या कालखंडाच्या उत्तरकालात कच्च्या आणि पक्क्या विटांचा वापर रूढ झाला मात्र भाजलेल्या पक्क्या विटांचा वापर भिंती आणि गटारांच्या बांधकामासाठी करण्यात येई. दोन किंवा तीन खोल्या आणि पुढे बंदिस्त अंगण अशा तज्हेची घरांची मांडणी होती. घरांची छपरे कौलांनी शाकारलेली होती. काही वास्तूंमधे मोठी दालनेही होती. घरांमध्ये स्नानगृह/मोरी आणि मातीच्या भाजलेल्या कड्यांनी बांधलेली विहीरसुद्धा बांधली होती. राहत्या घराव्यतिरिक्त या कालातील थरात सापडलेले एका मंदिराचे अवशेष वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकाच्या उत्तरकालात बांधलेले हे मंदिर कच्च्या आणि पक्क्या विटांचे असून त्याची मागची बाजू अर्धवर्तुळाकृती होती. कच्च्या विटांचा पाया, पक्क्या विटांचा प्रवेश भाग, देवळाभोवती तिन्ही बाजूंनी स्तंभ, विटांचा वापर करून बांधलेले प्रवेशद्वार आणि मंदिरातील जमिनीसाठी चोपून बनविलेली पक्की जमीन ही या मंदिराची वैशिष्ट्ये होत. ही संपूर्ण वास्तू विटांच्या चौथऱ्यावर बांधण्यात आलेली आढळून आली. दम्पती शिल्पे, मथुरेच्या स्थानिक अधिपतींची नाणी आणि आधीच्याच कालातील काही मृद्भांडी हे या कालातील इतर अवशेष होत. यानंतरची चौथी वस्ती, इ. स. पहिल्या ते तिसऱ्या शतकांत – कुषाण काल – झाली. या कालात पक्क्या विटांचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर झाले. अनेक खोल्या, मध्ये चौक, स्नानगृह इ. असलेली ही घरे मोठी विस्तृत होती. याशिवाय अर्धवर्तुळाकार मंदिरेही बांधली जात. क्षत्रप आणि कुषाण राजांची नाणी, मृण्मय मूर्ती, कुबेर व महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती असलेले मातीचे टाक हे इतर अवशेष या कालातील थरात सापडले. लाल रंगाच्या शिळापट्टिकेवर कोरलेले नागराजा, राणी, त्यांचे सेवक व शालभज्जिका यांची शिल्पे अप्रतिम असून ती कुषाणकालीन शिल्पांचा एक देखणा आविष्कार ठरलेली आहेत.

गुप्त आणि गुप्तोत्तर कालात (इ.स. ४ थे ते ६ वे शतक) पाचवी वस्ती झाली परंतु बहुतेक वास्तूंचे अवशेष पडझड झालेल्या आणि जळालेल्या अवस्थेत उपलब्ध झाले. यानंतर जवळजवळ हजार वर्षे येथे फारशी वस्ती झाली नाही. मध्ययुगीन वस्तीत उल्लेखनीय असे काही नाही.

देव, शां. भा.