सेल्युलॉइड : हे कृत्रिम रीतीने तयार केलेले ( संश्लेषित केलेले) पहिले प्लॅस्टिक (द्रव्य) होते. १८५५–६५ दरम्यान इंग्रज शास्त्रज्ञ ⇨पार्क्स अलेक्झांडर यांनी कापसावर नायट्रिक अम्लाची विक्रिया करून सेल्युलोज नायट्रेट ( म्हणजे नायट्रोसेल्युलोज) हे संयुग तयार केले. ते ठिसूळ असल्याने त्याला आकार देता येत नाही. तथापि, त्यामध्ये कापूर हा उत्कृष्ट ⇨ प्लॅस्टिकीकारक पदार्थ मिसळल्यास ते आकार देता येण्याजोगे म्हणजे आकार्य (प्लॅस्टिक) होते आणि त्यापासून विविध वस्तू तयार करता येतात, असे त्यांना आढळले. या शोधासाठी त्यांना कांस्य पदक मिळाले होते. या नवीन द्रव्याला त्यांनी पार्क्साइन हे नाव दिले. त्यालाच नंतर सेल्युलॉइड हे व्यापारी नाव प्राप्त झाले. त्याच सुमारास ⇨ बिल्यर्ड्स खेळासाठी लागणारे चेंडू तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या हस्तिदंताचा तुटवडा जाणवू लागला होता. जॉन वेस्ली हायट या अमेरिकी रसायनशास्त्रज्ञांनी १८६८ मध्ये सेल्युलोज नायट्रेट व कापूर यांचे मिश्रण त्या चेंडूसाठी हस्तिदंताऐवजी वापरता येते, असे दाखविले. १८६९ मध्ये त्यांनी आपले बंधू आय्.एस्. हायट यांच्याबरोबर सेल्युलोज नायट्रेट व कापूर यांच्या समांग कलिलीय विसरणाद्वारे नवीन द्रव्य तयार केले व त्यांनी त्याचे एकस्व (पेटंट) घेतले, हेच सेल्युलॉइड होय. त्यालाच कृत्रिम हस्तिदंत किंवा झायलोनाइट असेही म्हणतात.
सेल्युलॉइड रंगहीन वा पिवळसर, पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी, चिवट व बळकट असून त्याला एक निश्चित वास (कापरासारखा) व चव असते. कापराच्या प्रमाणानुसार त्याचे वि. गु. १·३५–१·८ किंवा अधिकही असते. ते ऊष्मामृदू प्लॅस्टिक असून सु. ८०° से. तापमानाला मऊ होते. त्याला घन वा पोकळ असा आकार सहजपणे देता येतो. प्रत्यास्थ ( स्थितिस्थापक) असल्याने त्याच्या अतिशय पातळ चादरी तयार करता येतात. ते कापता येते, त्यावर कातण व यंत्रण क्रिया करता येतात व त्यात छिद्रही पाडता येते. त्याचे ताणबल उच्च आहे. पाणी, तेले, सौम्य अम्ले, काहीसे तीव्र अम्ल विद्राव, सौम्य व थंड क्षारक तसेच जवळजवळ सर्व लवण विद्राव यांना ते प्रतिरोधक आहे. शिवाय त्याचे विविध सुंदर रंगांचे प्रकार तयार करण्यासाठी उत्पादन खर्च कमी येतो. सूर्यप्रकाशात उघडे पडल्यावर त्याचे रंग काहीसे विटतात. ॲसिटोन, ॲमिल ॲसिटेट, कमी रेणुभाराची अल्कोहॉल मिसळलेली कार् बॉक्सिलिक अम्ल एस्टरे यांच्यामुळे सेल्युलॉइड मऊ होते. इतके वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्याने वैविध्यपूर्ण अशा ग्राहकोपयोगी व अन्य वस्तू तयार करण्यासाठी हे प्लॅस्टिक अनेक वर्षे लोकप्रिय होते. मात्र सेल्युलॉइड ज्वालाग्राही असल्याने त्याच्या वस्तू चटकन पेटतात व आगीचा धोका निर्माण होतो. शिवाय त्याच्या ज्वलनातून विषारी वायू निर्माण होतात. यामुळे जेव्हा बिनधोक अशी प्लॅस्टिके उपलब्ध झाली, तेव्हा त्यांनी सेल्युलॉइडाची जागा घेतली आणि १९३९ नंतर सेल्युलॉइडाचा उपयोग कमी होऊ लागला व ते मागे पडले. मात्र यूरोप, अमेरिका, जपान व इतरत्रही सेल्युलॉइडाचे उत्पादन होत असून त्याचा व्यापकपणे उपयोगही होतो.
सेल्युलॉइड तयार करण्यासाठी मुख्यत्वे सरकीवर राहून गेलेले कापसाचे अवशिष्ट आखूड तंतू ( सेल्युलोज) किंवा लोकरीचा शुध्द केलेला लगदा, नायट्रिक अम्ल, सल्फ्यूरिक अम्ल, कापूर व एथिल अल्कोहॉल तसेच अल्प प्रमाणात इतर विद्रावक, रंगद्रव्ये, रंजके, तेले, भरणद्रव्ये इ. कच्चा माल वापरतात. सेल्युलोजापासून प्रथम सेल्युलोज नायट्रेट तयार करतात. नंतर सेल्युलोज नायट्रेटाचे कापूर मिसळून प्लॅस्टिकीकरण करतात. यामध्ये एथिल अल्कोहॉल हा बाष्परूपात उडून जाणारा विद्रावकही मिसळतात. अल्कोहॉलामुळे प्लॅस्टिकाच्या प्रवाहाला प्रेरणा मिळते आणि पक्वन क्रियेत बाष्पीभवनाद्वारे अल्कोहॉल निघून जाते. कोणत्या प्रकारचे सेल्युलॉइड तयार करायचे आहे, त्यानुसार या टप्प्यावर मृदुकारक द्रव्ये ( उदा., तेले), रंग आणणारी भरणद्रव्ये आणि स्थिरकारी पदार्थ सेल्युलॉइडात घालतात. अशा तर्हेने कच्चे सेल्युलॉइड मिळते. नंतर त्याच्यावर विविध क्रिया व संस्करणे करून अंतिम स्वरूपाच्या वस्तू तयार करतात.
सेल्युलॉइड असंख्य गोष्टींसाठी वापरतात. चित्रपटासाठी लागणारी छायाचित्रण फिल्म, खेळणी, बाहुल्या, कंगवे, फण्या, बांगड्या तसेच सुऱ्या, वस्तरे, छत्र्या, काठ्या व हत्यारे यांच्या मुठी, चष्म्यांच्या चौकटी, केसांना लावावयाच्या पिना, बटने, घड्याळे व साबण यांसाठीच्या डब्या, नळ्या, नळ, रक्षा पात्रे, कंकण, कानात घालावयाची शोभिवंत कडी, कृत्रिम हस्तिदंती वस्तू, बिल्यर्ड्समधील चेंडू, तबकड्या, झडपा, दट्टे, पात्रे, संवादिनी व ऑर्गन या वाद्यांच्या नादपट्ट्या, फौंटन पेनांच्या नळ्या, कृत्रिम रबर, आवेष्टने जलरोधी कापड, खिडक्या, मोटारगाड्यांचे भाग, धातू गंजू नयेत म्हणून लावावयाची ऑक्सिडीभवनरोधक व्हार्निशे इ. अनेक दैनंदिन गरजेच्या शेकडो वस्तू बनविण्यासाठी सेल्युलॉइड वापरतात.
भारतात दुसऱ्या महायुद्धाच्या आधी सेल्युलॉइड तयार करण्याचे प्रयत्न झाले होते. कारण सरकीवरील अवशिष्ट आखूड तंतू, नायट्रिक अम्ल व सल्फ्यूरिक अम्ल हा कच्चा माल भारतात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो. मात्र कापूर आयात करावा लागे. सेल्युलॉइड तयार करण्याच्या चाचण्या कोलकात्याला घेण्यात आल्या. अरावनकडू येथील कॉडाईट कारखान्यात सेल्युलोज नायट्रेट तयार होत असे. पायरोक्सिलीन ( नायट्रोसेल्युलोज) फक्त संरक्षणविषयक गरजा भागविण्यासाठी सेनासामग्री किंवा दारूगोळा कारखान्यांत तयार केले जात होते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी आयात केलेल्या सेल्युलॉइडाच्या चादरी व सळया यांच्यापासून विविध वस्तू तयार करणारे चार कारखाने बंगालमध्ये होते. तेव्हा या वस्तूंची थोडी निर्यातही होत असे. महायुद्धामुळे ही आयात थांबल्याने हे उत्पादन बंद झाले. त्याआधीच्या काळात जपान व जर्मनी या देशांतून सेल्युलॉइडाच्या बाहुल्या, बांगड्या, खेळणी, कंगवे, चष्मा व आरशाच्या चौकटी, पटले, केसांना लावावयाच्या पिना, ब्रश डबे, विविध प्रकारच्या मुठी, नादपट्ट्या, कच्ची चलच्चित्रण फिल्म वगैरे वस्तू भारतात आयात होत असत.
पहा : प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके प्लॅस्टिकीकारक बहुवारिकीकरण.
ठाकूर, अ. ना.