सैंधवी पर्वतरांगेतील शैलसमूह : (मिठाच्या डोंगरातील शैलसमूह). भौतिकीय आणि स्तरवैज्ञानिक भूविज्ञानाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने सैंधवाची पर्वतरांग हे भारतातील सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र आहे. कारण या क्षेत्रात भारतातील व भारतीय उपखंडातील जीवाश्मयुक्त स्तरित खडकांचे विविध भूवैज्ञानिक काळांतील निक्षेप ( खडकांचे गट ) मोठ्या प्रमाणात आढळतात. शिवाय या निक्षेपांपर्यंत सहज पोहचता येते. तसेच तेथील टेकड्यांवर कँब्रियन-पूर्व ते इओसीन या दरम्यानच्या काळांतील आणि विविध प्रकारचे निक्षेप स्पष्टपणे दिसतील असे उघडे पडले आहेत. या सर्व वैशिष्ट्यांमुळे या क्षेत्राविषयी विशेषतः स्तरवैज्ञानिक आणि पुराजीववैज्ञानिक तज्ञांना मोठी उत्सुकता व जिज्ञासा आहे. याशिवाय तेथील तुटलेले कडे व घळी यांवर वनस्पतींचे आच्छादन पसरलेले नाही. त्यामुळे भूगतिकी व भूसांरचनिकी [→ भूपट्ट सांरचनिकी ] यांच्याशी निगडित असलेल्या विविध भूवैज्ञानिक संरचनांची सुस्पष्ट उदाहरणे येथे सहजपणे प्रत्यक्ष पाहता येतात. म्हणून या प्रदेशाला ‘भूविज्ञानाचे प्रत्यक्ष क्षेत्रातील संग्रहालय’ असे म्हटले जाते.
सैंधवांची पर्वतरांग ही कमी उंचीच्या सपाट माथा असलेल्या व अनियमित आकारांच्या डोंगरांची व टेकड्यांची सलग पर्वतरांग आहे. या डोंगरांची सरासरी उंची ८०० ते ९५० मी. असून साकेसर (१,५२२ मी. ) हे पश्चिम भागातील आणि चेल (१,१२८ मी. ) हे पूर्व भागातील सर्वांत उंच शिखर आहे. या पर्वतरांगेची पूर्व-पश्चिम लांबी सु. ३०० किमी. असून मध्यभागी व पूर्व भागात ही पर्वतरांग ८ ते ३१ किमी. रुंद आहे. तिच्या माथ्यावरील खडकांचे थर अपक्षरण ( झीज ) होऊन निघून गेले आहेत. ही पर्वतरांग पंजाबमध्ये अकस्मात वर आलेली असून ती ७१ ते ७४ पूर्व रेखांशांदरम्यान पसरलेली आहे. तिचा नतिलंब ( उताराच्या काटकोनात असलेली दिशा ) अंदाजे पूर्व-पश्चिम असा आहे. पूर्वेकडे ती झेलम नदीपासून सुरु होऊन पश्चिमेकडे ती सिंधू नदीच्या पलीकडे गेलेली आहे. चंबल, तिली, रोहतास, पाब्बी, साकेसर, चेल इ. तिच्यातील महत्त्वाचे डोंगर आहेत. या पर्वतरांगेतील शिखरे उतार असलेल्या टेकड्यांसारखी व पठारासारखी आहेत. तिच्या दोन समांतर रांगा असून त्या अनुदैर्घ्य ( लंब ) दिशेतील खोऱ्याने विभागलेल्या आहेत. हिमालय व सैंधवाची पर्वतरांग यांच्यामध्ये संरचनेच्या दृष्टीने चांगलाच विरोधाभास आहे. कारण या दोन अगदी भिन्न प्रकारच्या पर्वतप्रणाल्या आहेत. जवळजवळ समतल पठारमाथा हे सैंधवाच्या पर्वतरांगेचे संरचनात्मक वैशिष्ट्ये आहे. ही पर्वतरांग एका बाजूला ( दक्षिणेला ) अचानक एका प्रपाती ( तीव्र उताराच्या ) उपरि-प्रणोदाच्या ( तुटलेल्या कड्यांसारख्या ) रेषेने संपलेली दिसते. असे तुटलेले कडे पंजाबच्या बाजूला आहेत. दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूला तिचा उतार मंद असून ती तशीच पुढे जाऊन उंच असलेल्या पोतवार मैदानात मिसळून गेलेली दिसते. पोतवार मैदान ही सैंधवाची पर्वतरांग व रावळपिंडीलगतच्या पायथा टेकड्या यांच्या दरम्यान संमुखनतीमधील ( दोन्ही बाजूंनी उतरत्या खोलगट भागातील ) द्रोणी आहे व तिच्यात तृतीय कल्पातील निक्षेप साचले आहेत. या भागात पृष्ठभागावर थोड्याच वनस्पती असून विघटित खडकांचे किंवा मृदेचे आच्छादन पसरलेले नाही. त्यामुळे नैसर्गिक छेदांवरच्या प्रदेशाचा तपशील प्रत्यक्ष उघडा पडलेला आहे. दक्षिणेकडे पर्वतरांगेच्या पायथ्याशी पायथा डबर साचलेली आढळते. (या नोंदीत आलेल्या विविध भूवैज्ञानिक काळांच्या कालावधींसाठी मराठी विश्वकोशातील ‘भूविज्ञान’ ही नोंद पहावी ).
सैंधवाच्या पर्वतरांगेच्या सर्व लांबीभर अनेक अनुप्रस्थ नतिविभंग (नतीला समांतर आडवे तडे) वैशिष्ट्यपूर्ण रीतीने निर्माण झालेले आहेत. त्यांच्यामुळे खडकांचे मोठमोठे चांगले ठोकळे तयार झाले असून ते दूरुनही स्पष्टपणे दिसतात. अनेक ठिकाणी व्युत्क्रमी ( याच्या उलट) विभंग असल्याने तेथील खडकांची संरचना व स्तरविज्ञान ( स्तररचनेची वैशिष्ट्ये ) यांमध्ये अधिक गुंतागुंत निर्माण झालेली आहे. या पर्वतरांगेच्या उत्तेरकडील उतारावर खेल घळींची प्रणाली किंवा उत्खातभूमी विकसित झालेली आढळते आणि वरील विभंगपट्ट्यातही घळी आढळल्या आहेत. [→ विभंग, खडकांतील ].
सैंधवाच्या पर्वतरांगेच्या सर्वांत खालच्या उघड्या पडलेल्या खडकांत सैंधवाचे मोठे थर व भिंगाकार साठे सर्वत्र आढळतात. हा जगातील सैंधवाचा सर्वांत संपन्न असा एक साठा आहे. हे निक्षेप कँब्रियन-पूर्व म्हणजे ६० कोटी वर्षांहूनही आधीच्या काळातील असून त्यांची जाडी सु. ४९० मी. किंवा त्याहूनही अधिक आहे. या साठ्यातून खाणकामाद्वारे सैंधव काढता येते. प्राचीन काळापासून तेथील सैंधव काढण्यात येत आहे. या खनिजावरुनच या पर्वतरांगेला सैंधवाची पर्वतरांग हे उचित नाव पडले आहे. सैंधवाशिवाय या शैलसमूहांत जिप्सम, दगडी कोळसा व इतर खनिज संपत्तीही आढळते.
सैंधवाच्या पर्वतरांगेमधील तीव्र उताराच्या तुटलेल्या कड्यांवर सर्वांत जुने म्हणजे पुराजीव (कँब्रियन) व त्यापूर्वीच्या काळांतील शैलसमूह उघडे पडलेले आढळतात. तसेच त्या प्रदेशात पमार्ेकार्बॉनिफेरस ते इओसीन काळापर्यंतचे खडकही उघडे पडलेले आहेत.
सैंधवाच्या पर्वतरांगेतील शैलसमूहांची सुरुवात सलाइन ( लवणमय ) माला या खडकांच्या गटापासून होते. या मालेत खाली व वरती जिप्सम-डोलामाइटाचे थर असून त्यांच्या मध्यभागी मार्ल व सैंधव यांचे थर आहेत. या मालेत जिप्सम व सैंधव विपुल आहे. यानंतर कँब्रियन काळातील थर आढळतात. या काळातील सागरी जीवाश्मयुक्त थरांच्या जाड मालिका तीन ठिकाणी आढळल्या आहेत. वायव्य पंजाबमधील सैंधवाचे डोंगर हे यांपैकी जेथे सहजपणे पोचता येते असे पहिले क्षेत्र आहे. यांमध्ये चांगल्या प्रकारे टिकून राहिलेले जीवाश्म (शिळारुप प्राप्त झालेले जीवावशेष ) आढळत असल्याने त्यांच्या वयाविषयी वाद नाही.
सैंधवाच्या पर्वतरांगेच्या पूर्व टोकाशी सुसंगत रीतीने बनलेली स्तरित खडकांची जाड मालिका आहे. या मालिकेत घटत्या वयानुसार पुढील चार थर आढळतात. (१) तांबडा ते जांभळट किरमिजी रंगाचा वालुकाश्म आणि सहजपणे फरश्या निघू शकणारा फ्लॅगस्टोन असलेला थर सर्वांत खाली आहे. (२) त्याच्यावर निओबोलस थर असून त्याच्यात ब्रॅकिओपॉड, ट्रायलोबाइट व शंखवासी प्राणी (गॅस्ट्रोपॉड) यांचे जीवाश्म असलेले करडे वा गडद रंगाचे शेल आणि जांभाळट वालुकाश्म हे खडक आहेत. तेथे कोठे कोठे डोलोमाइटयुक्त खडक आढळतात. (३) त्यांच्यावर डोलोमाइटी वालुकाश्म व गौण शेल खडक यांचे थर आहेत. (४) त्यांच्यावर सैंधवी छद्मरुपी शेल खडकांचा थर असून त्यांत भडक तांबडे वा हिरवे मृण्मय थर आहेत.
सैंधवी छद्मरुप शेल खडकांनंतर उत्तर कार्बॉनिफेरस व पर्मियन काळापासून ते इओसीन काळापर्यंतचे खडक या पर्वतरांगेच्या पश्चिम भागात आढळतात. पूर्व भागात इओसीन कालीन न्युम्युलिटिक चुनखडक कँब्रियन कालीन थरांवर आढळतो.
पर्मोकार्बॉनिफेरस कालीन खडकांची जाड व स्तरित मालिका असून तिच्यात विपुल जीवाश्म आढळतात. या मालिकेत ठिपकेदार वालुकाश्मांचा व त्यावरील प्रॉडक्टस चुनखडकांचा असे दोन थर आहेत. प्रॉडक्टस चुनखडक हा मुख्यतः चुनखडक असून त्यात प्रॉडक्टस या ब्रॅकिओपॉडाचे जीवाश्म आढळतात, म्हणून त्याचे हे नाव पडले आहे. जगात इतरत्र आढळणारे पर्मियन कालीन खडक शोधण्यासाठी प्रॉडक्टस चुनखडकाचा संदर्भ म्हणून उपयोग करतात. प्रॉडक्टस चुनखडकांचे पूर्व, मध्य व उत्तर असे तीन गट आहेत. याच्या खाली असलेल्या ठिपकेदार वालुकाश्म थराचे ठिपकेदार वालुकाश्म, कोनुलारिया थर आणि गोलाश्म संस्तर ( ताल्चेर टप्पा ) असे तीन गट आहेत. गोलाश्म संस्तरात हिमानी क्रियेने बनलेले गोलाश्म सूक्ष्मकणी आधार द्रव्यात रुतलेले आढळतात आणि ते भारतातील उत्तर कार्बॉनिफेरस काळातील हिमयुगाचे निदर्शक आहेत.
प्रॉडक्टस चुनखडकांवर ट्रायासिक संघाचे खडक आहेत. सैंधवाच्या पर्वतरांगेतील या ट्रायासिक कालीन संघात पूर्व ट्रायासिक आणि मध्य ट्रायासिकाचा खालील भाग येतो व हे खडक पश्चिम भागात आढळतात. यात सेराइट प्रजातीमधील ॲमोनाइट प्राण्यांचे विपुल जीवाश्म आढळत असल्याने त्याला सेराइट थर म्हणतात.
सैंधवाच्या पर्वतरांगेतील खडकांत यानंतरच्या काळातील मध्य व उत्तर जुरासिक कालीन थर आढळतात. त्यांच्यात रंगीबेरंगी वालुकाश्म, मृत्तिका आणि त्यांच्यामध्ये लिग्नाइट व दगडी कोळशाचे तसेच हेमॅटाइटाचे व अंदुकाश्मी चुनखडकाचे थोडे थर आहेत. सैंधवाच्या पर्वतरांगेच्या शैलसमूहात पूर्व क्रिटेशस काळातील थर अल्प प्रमाणात असून त्यात वालुकाश्म व शेल खडक आहेत.
सैंधवाच्या पर्वतरांगेतील तृतीय कल्पातील खडक पुढीलप्रमाणे आहेत. सर्वांत खाली शेल न्युम्युटिक चुनखडक असलेली राणीकोट माला आहे. या इओसीन कालीन मालिकेत पिसोलाइट व हेमॅटाइट ही खनिजे असलेली लोहयुक्त मृत्तिका आणि हेमॅटाइट वालुकाश्म आहेत. राणीकोट मालिकेच्या वर मार्ल व चुनखडक असलेली लाकी माला, नंतर मग वालुकाश्म व शेल यांची मुरी माला आणि अखेरीस शिवालिक संघाचे वालुकाश्म, शेल, वाळू व मृत्तिका हे निक्षेप आढळतात. या निक्षेपांत दगडी कोळशाचे थरही आढळतात. हिमाचल प्रदेशातील मंडी भागातील सैंधवाचे महत्त्वाचे निक्षेप वालुकाश्म, शेल व चुनखडक यांच्या पट्ट्यात आहेत. सैंधवाचे हे थर जाड असून ते स्फटिक रुपातही आढळते. सैंधवाच्या पर्वतरांगेच्या दक्षिण उतारावर पाकिस्तानातील सैंधवाचे सर्वांत मोठे निक्षेप खेवरा, वार्छा व कालाबाग येथे आढळतात. तसेच दांदोत, पिध व मकरवाल खेजी येथे दगडी कोळशाचे निक्षेप आहेत. या पर्वतरांगेच्या पश्चिम भागातील चुनखडक व वालुकाश्म यांच्या निक्षेपाबरोबर खनिज तेलाचे अल्प अंश आहेत. या पर्वतरांगेच्या पूर्व भागातील सैंधवयुक्त मालेत बिट्युमिनी शेल व डोलोमाइट यांचे मोठे निक्षेप व महत्त्वाची कॅल्शियम खनिजे आढळतात. तेथील सैंधव व दगडी कोळशाच्या खाणी आणि चुनखडकाच्या उघड्या खाणी आर्थिक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
पहा : शैलसमूह, भारतातील सॉल्ट रेंज सैंधव.
ठाकूर, अ. ना.