खानसाहेब : (? –१८८३–९ मे १९५८). सरहद्द गांधी ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या खान अब्दुल गफारखान यांचे वडील बंधू व स्वातंत्र्यपूर्व वायव्य सरहद्द प्रांतातील काँग्रेसचे ख्यातनाम पुढारी. ह्यांचा जन्म पेशावरजवळील उत्मानझाई ह्या खेड्यात एका श्रीमंत घराण्यात झाला. पेशावर येथे मिशन शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यावर वैद्यकीय शिक्षणासाठी ते मुंबईंस आले व पुढे १९०९ मध्ये इंग्लंडला गेले आणि एम्. आर्. सी. एस्. ही पदवी मिळविली. लंडन मधील सेंट टॉमस हॉस्पिटलमधून शिक्षण पूर्ण झाल्यावर इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये त्यांनी नोकरी धरली. १९२० मध्ये ते स्वदेशी परत आले व सरकारी नोकरी सोडून आपल्या देशबांधवांची सेवा करण्याचे त्यांनी ठरविले. १९२० ते ३० पर्यंत आपल्या बंधूच्या सहकार्याने आपल्या प्रांतात त्यांनी अनेक राष्ट्रीय शाळा काढून लोकजागृतीचे कार्य केले. १९२९ मध्ये खुदाई खिदमतगार ह्या संघटनेतही ते सामील झाले.
महात्मा गांधी व नेहरू यांच्याशी त्यांचा संबंध १९३० मध्ये आला. त्यानंतर झालेल्या स्वातंत्र्याच्या प्रत्येक चळवळीत खानसाहेबांनी पुढाकार घेतला व अनेक वेळा कारावासही भोगला. काँग्रेसने कायदेमंडळावरील बहिष्कार उठविल्यानंतर १९३७ मध्ये वायव्य सरहद्द प्रांताचे ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी कार्यक्षम राज्यकारभार केला. परंतु काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे १९३९ मध्ये आपल्या मंत्रिमंडळाचा त्यांनी राजीनामा दिला. महायुद्धानंतर १९४५ मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.
ऑगस्ट १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर आठच दिवसांत पाकिस्तान सरकारने डॉ. खानसाहेबांचे मंत्रिमंडळ बडतर्फ केले व त्यांना तुरुंगात टाकले. १९५४ मध्ये त्यांची सशर्त सुटका झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय धोरणात फेरफार केला. आपल्या बंधूंनी पुरस्कारलेल्या स्वतंत्र पख्तुनिस्तानच्या ध्येयाचा त्याग करून पश्चिम पाकिस्तानच्या एकात्म घटकाचा पुरस्कार ते करू लागले. ऑक्टोबर १९५४ मध्ये ते पाकिस्तानच्या मध्यवर्ती मंत्रिमंडळात मंत्री झाले व १९५५ मध्ये पश्चिम पाकिस्तानचे मुख्यमंत्री झाले. तसेच त्यांनी रिपब्लिकन पार्टी ह्या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला. मार्च १९५७ पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. लाहोर येथे अट्टा मुहंमद याने त्यांचा खून केला.
देवगिरीकर, त्र्यं. र.