कुरव: गल या पक्ष्याला महाराष्ट्रात कुरव म्हणतात. कुरवाच्या दोन जाती भारतात आढळतात. दोन्हीही भारतात कायम राहणाऱ्या नाहीत. हिवाळी पाहुणे म्हणून हे पक्षी बाहेरून भारतात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येतात आणि मार्च-एप्रिलमध्ये परत जातात.
कुरवाचा समावेश लॅरिडी पक्षि-कुलात केलेला आहे. भारतात येणाऱ्या दोन जातींपैकी एका जातीचे डोके तपकिरी पांढरे असते याला तपकिरी डोक्याचा कुरव म्हणतात याचे शास्त्रीय नाव लॅरस ब्रुनिसेफॅलसआहे. दुसऱ्या जातीचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असते याला काळ्या डोक्याचा कुरव म्हणतात याचे शास्त्रीय नाव लॅरस रिडिबंडस आहे. या दोन्ही जातींच्या कुरवांचे स्वभाव, सवयी वगैरे सारख्याच असल्यामुळे या ठिकाणी तपकिरी डोक्याच्या कुरवाचेच वर्णन दिले आहे.
तपकिरी डोक्याचा कुरव डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो. त्याच्या पाठीचा रंग करडा आणि खालच्या बाजूचा पांढरा असतो. उन्हाळ्यात डोके कॉफीच्या रंगासारखे तपकिरी असते, पण हिवाळ्यात ते करडे पांढरे होते.
समुद्रकिनाऱ्यावर यांचे थवे आढळतात. भारतात पूर्व व पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर ते मोठ्या प्रमाणात आणि देशाच्या आतल्या भागात नद्या, तलाव वगैरेंच्या काठी थोड्या प्रमाणात असतात. पाकिस्तान, श्रीलंका आणि ब्रह्मदेशातही ते आढळतात. बंदरे व किनाऱ्यावरील मासेमारीची ठिकाणे या जागी ते हटकून असतात. बंदरात नांगरलेल्या, बाहेर पडणाऱ्या किंवा आत येणाऱ्या जहाजांच्या आणि मच्छीमार पडावांच्या भोवती अन्नाच्या आशेने घिरट्या घालीत असलेले ते नेहमी दिसतात. जहाजांवरून खाद्यपदार्थाचे तुकडे समुद्रात फेकलेले दिसताच ते समुद्राच्या पृष्ठभागावरून उचलून ते खाऊन टाकतात. नद्या, तलाव वगैरे ठिकाणी असणारे कुरव गोगलगाई, किडे किंवा रोपांचे कोंब खातात.
यांची वीण लडाख व तिबटमध्ये मानस सरोवर, राक्षसताल आणि इतर सरोवरांच्या काठच्या दलदलीत जून-जुलै महिन्यात होते.
काळ्या डोक्याचा कुरव तपकिरी डोक्याच्या कुरवापेक्षा थोडा लहान असतो. हिवाळ्यात त्याचे डोके, मान, शेपटी व सगळा खालचा भाग पांढरा असतो पाठ आणि पंख करडे असतात. उन्हाळ्यात याचे सगळे डोके आणि मानेचा वरचा भाग गर्द तपकिरी रंगाचा होतो.
कर्वे, ज. नी.
“