कुररी : लॅरिडी पक्षि-कुलातला हा पक्षी आहे. याच्या अनेक जाती आहेत. त्यांपैकी नदी-कुररी ही जात भारतात सर्वत्र आढळणारी आहे. सगळ्या नद्यांच्या काठावर यांचे थवे आढळतात. हिचे शास्त्रीय नाव स्टर्नाऑरॅन्शिया असे आहे.
नदी-कुररी हा साधारणपणे कबूतराएवढा पण त्यापेक्षा सडपातळ असतो. शरीराची वरची बाजू करड्या रंगाची आणि खालची करड्या पांढऱ्या रंगाची शेपटी दुभागलेली आणि लांब चोच लांब, पिवळी पाय आखूड, तांबडे पुढची बोटे पातळ त्वचेने जोडलेली पंख लांब असतात. उन्हाळ्यात डोक्याचा माथा व बाजू हिरवी झळक असलेल्या काळ्या रंगाच्या होतात, नर व मादी सारखीच असतात.
मासे हे यांचे मुख्य भक्ष्य होय. पण त्यांशिवाय झिंगे, बेडकांची पिल्ले आणि पाणकिडेही हे खातात. पाण्याच्या पृष्ठापासून ६–९ मी. उंचीवर हे घिरट्या घालीत असतात व मासा दिसताक्षणीच पाण्यात धाडकन बुडी मारून मासा पकडून बाहेर येतात. मासा गिळताना आधी त्याचे डोके व मग बाकीचा भाग गिळतात.
यांचा प्रजोत्पादनाचा काळ मार्च ते मेपर्यंत असतो. अंडी नदीच्या काठावरील वाळूवर घातलेली असतात. बऱ्याच माद्या शेजारीशेजारीच अंडी घालीत असल्यामुळे एक छोटीशी वसाहतच तयार होते. मादी दर खेपेस तीन अंडी घालते ती हिरवट करड्या किंवा पिवळसर दगडी रंगाची असून त्यांच्यावर तपकिरी अथवा जांभळ्या रेषा किंवा डाग असतात.
कर्वे, ज. नी.
“