कुमारवाल्मीकि : (सु. १५६०–१६१०). या प्रसिद्धकन्नड कवीचे व्यवहारातले नाव नरहरी कविनाम कुमारवाल्मीकी.  याशिवाय ‘कविराजहंस’ असेही याचे नाव आढळते. महाकवी वाल्मीकीचे रामायण कन्नड भाषेत संक्षेपित स्वरूपात लिहिताना ‘कुमारवाल्मीकि’, असे त्याने स्वत:स संबोधून घेतले. विजापूरच्या पश्चिमेस सहा किमी. वर असलेल्या तोरवे येथील तो रहिवासी. तेथील नरसिंह देवाच्या कृपाप्रसादाने त्याने आपली काव्यरचना केली. त्याने लिहिलेल्या रामायणास कवीच्या गावाच्या नावावरून तोरवे रामायण  हे नाव रूढ झाले आहे. १५९० च्या सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला असावा, असे संशोधकांचे मत आहे. या कवीच्या जीवनाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.

तोरवे रामायण  हे काव्य भामिनीषट्‌पदी या मात्रावृत्तात लिहिले असून त्यात एकंदर ११२ संधी व ५,०७९ कडवी आहेत. यांपैकी सु. ३,९०० कडवी केवळ युद्धकांडावरच आहेत. बाल, अयोध्या, अरण्य, किष्किंधा आणि सुंदर या कांडातील कथाभाग त्यामुळे अत्यंत संक्षिप्तस्वरूपात यात आला असून, युद्धकांडातील युद्धाच्या प्रसंगांवरच कवीने अधिक भर दिल्याचे दिसून येते. कवीचे खरे सामर्थ्य त्याच्या शैलीतील मृदुता, लालित्य व माधुर्य या गुणांत, तसेच पात्रांचे किंवा प्रसंगांचे कमीत कमी शब्दांत हुबेहूब व भावानुकूल वर्णन करण्याच्या त्याच्या हातोटीत दिसून येते.

कवीने आपल्या काव्यासाठी मुख्यत: वाल्मीकिरामायणाचा आधार घेतला असला, तरी बऱ्याच ठिकाणी त्याने स्वातंत्र्य घेऊन आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविल्याचे आढळते. मंथरा येथे मायेचा अवतार बनते. वाली आणि रावण प्राण सोडताना रामाला विष्णूचा अवतार मानतात. लंकेला पोहोचलेला मारुती कुंभकर्णाच्या नाकपुडीत अडकतो युद्धापूर्वी रावण विश्वकर्म्याकडून लंकेच्या किल्ल्याची डागडुजी करून घेतो, युद्धाला जाण्यापूर्वी आपल्या भांडारातील सारे द्रव्य दान करतो, कोटी यज्ञ करतो व बिभीषणाला आपला वारस नेमतो. कवीने असे थोडे फार फरक केले असले, तरी वाल्मीकीच्या काव्याचा कन्नड भाषेत सुबोध परिचय करून दिल्याचे श्रेय या कवीस जाते.  

वर्टी, आनंद