खाजकुइली : (कवच, खाजकुइरी हिं. गोंचा गु. किंवच क. कडवरे, हसगुणी सं. तीक्ष्णा, वनारी,

खाजकुइली : (१) संयुक्त पान, (२) फुलोरा, (३) शिंबा

आत्मगुप्ता इं. कौहेज, कोविच, हॉर्सआय बीन लॅ. म्युक्यूना  प्रूरिएन्स कुल लेग्युमिनोजी). जंगलात व शेताकडेने कुंपणावर पसरणारी ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल पाकिस्तानात व भारतात स‌र्वत्र सामान्यपणे आढळते. उष्ण कटिबंधातील इतर प्रदेशांतही तिचा प्रसार असून क्वचित कोठे लागवडीत आहे. शारीरिक लक्षणे स‌र्वसाधारणत: ⇨ लेग्युमिनोजी  कुलात (व त्यातील पॅपिलिऑनेटी या उपकुलात) वर्णिल्याप्रमाणे. पाने संयुक्त, त्रिदली दलांची खालची बाजू लवदार नोव्हेंबरात लोंबत्या मंजऱ्यांवर पतंगरूप [→ अगस्ता], गडद जांभळी, मध्यम आकाराची फुले येतात. शिंबा (शेंग) दोन्ही टोकांस वाकलेली (५–७·५ X १·२ सेंमी.), गोलसर असून तीवर फिकट पिंगे किंवा करडे, राठ, कंडूत्पादक (खाज आणणारे) केस असतात बिया ५ -६ व लहान. नावाप्रमाणे भयंकर खाज उठविणारे केस हेच या वेलीचे वैशिष्ट्ये आहे. मुळाचा काढा जलोदरात मूत्रल (लघवी साफ करणारा) म्हणून देतात व मुळाचा लेप बाहेरून लावतात हस्तिपाद रोगावर त्याचे मलम उपयुक्त दाहक केस कृमिनाशक बियांची पूड पांढरी धुपणी (श्वेतप्रदर) व शीघ्र वीर्यस्खलन यांवर गुणकारी असते.                                                         

परांडेकर, शं. आ.