कुमाऊँ : उत्तर प्रदेश राज्यातील एका भागाचे नाव. नैनिताल, अलमोडा, टेहरी गढवाल व गढवाल या जिल्ह्यांनी व्याप्त प्रदेशाला कुमाऊँ विभाग म्हणतात, तर हिमाचल प्रदेश राज्यातील सतलज नदीपासून नेपाळ सरहद्दीपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या शिवालिक, हिमाचल व हिमाद्री या तिन्ही शाखांना कुमाऊँ हिमालय म्हणतात. ५,५०० मी. पेक्षा जास्त उंचीची ३० शिखरे या भागात आहेत. काश्मीरशिवाय भारतातील सर्वोच्च शिखर नंदादेवी (७,८१७ मी.) तसेच त्रिशूल (७,१२० मी.), दूनगिरी (७,०६६ मी.) बद्रिनाथ (७,१३८ मी.), केदारनाथ (६,९४० मी.), कामेट (७,७५६ मी.) ही महत्त्वाची शिखरे आणि मान, लिपू ला इ. खिंडी येथे आहेत. हा प्रदेश गंगा, यमुना व त्यांच्या उपनद्यांचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. भागीरथी, अलकनंदा, रामगंगा, काली, पिंडारी इ. नद्या येथे आढळतात. तिबेटमधून आलेल्या नद्यांनी येथे खोल दऱ्या बनविल्या आहेत. अतिथंड हवामान, घनदाट जंगल, अवघड दऱ्याखोरी, वन्य पशू इत्यादींमुळे हा भाग मागासलेलाच राहिला. मंगोल वंशाचे मिश्रण कुमाऊँ लोकांत विशेषत्वाने आढळते. मेंढपाळ, फिरती शेती, व्यापारासाठी भ्रमंती ही कुमाऊँ लोकांची वैशिष्ट्ये होत. बद्रिनाथ, केदारनाथ, हरद्वार, हृषिकेश इ. धार्मिक क्षेत्रे व मसूरी, डेहराडून, रानीखेत, अलमोडा, नैनिताल इ. थंड हवेची ठिकाणे यांमुळे कुमाऊँ भाग प्रसिद्ध आहे. कुमाऊँच्या उत्तरेला चीन व पूर्वेला नेपाळ ह्यांमुळे १९६२ च्या भारत–चीन संघर्षानंतर कुमाऊँला आणखी महत्त्व आले आहे.
शाह, र. रू.