खरे, गणेश हरि : (१० जानेवारी १९०१–  ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास-संशोधक. पनवेल येथे जन्म. शालेय शिक्षण पनवेल, बेळगाव, वाई येथे. १९२० मध्ये महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून असहकाराच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. बा.ज. शिंदे यांच्या स‌मवेत मद्यपाननिरोधन, कोर्ट बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण यांसारख्या चळवळींचा जावळी तालुक्यात त्यांनी प्रचार केला तसेच कोयना धरण योजनेविरुद्ध लोकजागृती केली. काही दिवस ते सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस होते. नंतर १९२४–२८ च्या दरम्यान त्यांनी सातारा येथे शिक्षक म्हणून काम केले. पुढे १९२९ मध्ये इतिहासाच्या अभ्यास-संशोधनासाठी ते पुण्यास‌ भारत इतिहास संशोधक मंडळात गेले व तेथेच स्थायिक झाले. निवृत्तीपूर्वी मंडळाचे (१९७३) ते चिटणीस व अभिरक्षक होते. १९७४ मध्ये त्यांची भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. पुणे विद्यापीठाने त्यांची डॉक्टरेटसाठी मार्गदर्शक व परीक्षक म्हणून नियुक्ती केली.

इतिहासाचा स‌र्वांगीण अभ्यास आणि संशोधन करता यावे, म्हणून त्यांनी हिंदी, उर्दू, फार्सी, कन्नड, संस्कृत, इंग्रजी वगैरे भाषांचा स‌खोल अभ्यास केला तसेच इतिहासाशी संबंधित अशा नाणकशास्त्र, पुरातत्त्वविद्या, मूर्तिविज्ञान, पुरालेखविद्या यांचा अभ्यास केला. स‌र्व भारतभर प्रवास करून त्यांनी शेकडो ऐतिहासिक स्थळे तर पाहिलीच पण नाणी, कागदपत्रे, पोथ्या व इतर ऐतिहासिक वस्तू जमा केल्या. सु. तीस इतिहासप्रसिद्ध घराण्यांचे कागद, २०,००० पोथ्या, ५,००० नाणी, ८० चित्रे, ३० ताम्रशासने व २०० इतर वस्तु एवढे प्रचंड साहित्य त्यांनी जमा केले. या स‌र्वांचा उपयोग सामान्य विद्यार्थ्याला तसेच चिकित्सक संशोधकाला व्हावा, म्हणून त्यांवर त्यांनी सु. ४०० लेख आणि काही पुस्तके लिहिली. त्यांची लहान-मोठी ५३ पुस्तके आतापर्यंत प्रसिद्ध झाली असून त्यांतील दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, (३ खंड-१९३०, ३४, ४९), मूर्तिविज्ञान (१९३९), संशोधकांचा मित्र (१९५१), महाराष्ट्राची चार दैवते (१९५८) ही मान्यवर व प्रसिद्ध पुस्तके उल्लेखनीय आहेत.

अखिल भारतीय नाणक-परिषदेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. (१९७४). तसेच त्यांचा एक गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे (१९७५). महाराष्ट्रात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी निष्ठावंत इतिहाससंशोधकांची जी परंपरा निर्माण केली, त्याच परंपरेत खरे मोडतात. इतिहाससंशोधनाला जीवनसर्वस्व वाहणाऱ्या खऱ्यांचे कार्य मौलिक आहे.

देशपांडे, सु. र.