खबारफ्स्क : रशियन सोव्हिएट फेडरल सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या खबारफ्स्क टेरिटरीची राजधानी. लोकसंख्या ४,३७,००० (१९७०). अमुर नदीच्या उजव्या तीरावर उसुरी-अमुर संगमावर वसलेले हे शहर ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गावर मॉस्कोपासून पूर्वेकडे ६,११९ किमी. आहे. येथे फरचा व्यापार चालतो आणि तेलशुद्धीकरण, मोटारींचे भाग जुळविणे, जहाजे बांधणे, विमाने बांधणे, लाकूड कापणे, यंत्रे व त्यांचे सुटे भाग तयार करणे, मांससंवेष्टन, धान्य दळणे वगैरे अनेक कारखाने आहेत. तसेच वैद्यकी, शिक्षकी, लोहमार्ग वाहतूक ह्यांकरिता खास विद्यालये आहेत. सुप्रसिद्ध रशियन समन्वेषक खबारफ्स्क ह्याचे नाव याला १८८३ मध्ये देण्यात आले. त्याने १६५२ मध्ये येथे किल्ला बांधला होता. ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गामुळे ह्या शहराचे महत्त्व वाढले.
लिमये, दि. ह.