खजूर : (खारीक हिं. खजुरी, खाजी क. कज्जूर गु. खजूरिओ सं. खर्जुर इं. डेट पाम लॅ. फिनिक्स डॅक्टिलिफेरा कुल-पामी). ही उपयुक्त वनस्पती इतिहासपूर्व काळापासून मानवास परिचित असून आशियातील ओसाड वाळवंटी प्रदेशात सेनेगालपासून सिंधू नदीपर्यंतच्या भागात वाढते. हिचे मूलस्थान उ. आफ्रिका किंवा अरबस्तान असावे पूर्वी खजुराची झाडे असणाऱ्या प्रदेशास त्यांच्या लॅटिन नावातील वंशवाचक शब्दावरून (फिनिक्स ) ‘फिनिशिया’ हे नाव दिले असावे. सिंधमध्ये व जवळपासच्या वाळवंटी प्रदेशांत आणि मुलतान वगैरे भागांत हिची लागवड होते. ही झाडे अलेक्झांडर यांच्या स्वारीबरोबरच सिंधमध्ये आली असावी, असेही मत प्रचलित आहे.
हे झाड ⇨शिंदीसारखेच असते. रानटी शिंदीपासून खजुराची झाडे उत्क्रांत झाली असावीत किंवा खजुरापासून शिंदी आली असावी, अशी दोन्ही मते नमूद आहेत. तथापि दोन्ही जाती स्वतंत्र मानल्या आहेत. याची उंची ३०–४० मी. पर्यंत जाते खोड जाड, शाखाहीन, टणक, देठांच्या (पर्णवृंतांच्या) अवशेषांमुळे शिंदीसारखेच खडबडीत असते. पाने शिंदीपेक्षा लांब आणि त्यांवर २०–४० सेंमी. लांब, टोकदार दले असतात त्यांचा पानांच्या मध्यशिरेशी लहान कोन असतो त्यामुळे व शिंदीपेक्षा आखूड पर्णवृंतांच्या अवशेषांमुळे शिंदीपासून ही झाडे, वेगळी ओळखू येतात. देठ लांब, साधारण राखी रंगाचा व तळास चपटा असतो. नर व मादी झाडे भिन्न असतात. फुलांची सर्वसाधारण संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨पामी कुलात वर्णिल्याप्रमाणे व शिंदीप्रमाणे असतात. पुं-पुष्पाचे स्थूलकणिश आखूड आणि महाच्छद नौकाकृती असतो [→ पुष्पबंध]. फुले सुवासिक व लहान स्त्री-पुष्पांचे स्थूलकणिश अधिक लांब असते. मृदुफळ २–७ सेंमी. लांब व लालसर पिंगट असते. बी लांबट व त्याच्या एका बाजूवर उभी खाच असते.
खजुराची लागवड मुख्यत: फळासाठी केली जाते. खारीक म्हणजे खजुराची कडक उन्हात सुकविलेली अथवा कमी प्रतीच्या खजुराची दुधात शिजवलेली फळे ही दोन्ही स्वादिष्ट व पौष्टिक असल्याने यांना सर्व देशांतून मोठी मागणी आहे. भारतात ही झाडे क्वचितच दिसतात. उ. गुजरातच्या काही भागात लागवडीचे प्रयत्न केले आहेत. यांना अतिउष्ण व कोरडी हवा लागते पाऊस कमी लागतो. मोरोक्को, स्पेन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, त्रिनिदाद इ. प्रदेशांत हल्ली लागवड केली जाते. याला कोणतीही जमीन चालते तथापि रेताड, वाळवंटी जमिनीत हे झाड चांगले येते. बियांपासून रोपे बनवून लागवड करणे शक्य असले, तरी त्यामध्ये कालापव्यय होतो. आलेली झाडे बरीचशी नर निघाल्यास उत्पन्न कमी येते. नर कमी व मादी झाडे जास्त आवश्यक म्हणून विद्यमान मादी झाडाला येणाऱ्या फुटव्यांपासून नवीन लागवड करणे अधिक पसंत केले जाते. त्यापासून मादी झाडे वाढून उत्पन्न चांगले येते. झाडे लावल्यावर ८–१० वर्षांनी फुलोरे येतात. वाढ चांगली होण्याच्या दृष्टीने काही फुलोरे सुरुवातीस काढून टाकतात त्यानंतर ते झाड स्थलकालपरत्वे सु. १०० वर्षांपर्यंत फळे देत राहते. खजुराच्या झाडांच्या आणि उंटांच्या संख्येवरून वाळवंटी प्रदेशांत (अरबस्तान, सिरिया, इराण इ.) व्यक्तीचा दर्जा ठरविला जातो.
या झाडांचे परागण (परागसिंचन) वाऱ्यामुळे होते. नर झाडे माद्यांच्या संख्येच्या मानाने कमी असतात. कृत्रिम रीत्या पुं-पुष्पाची स्थूलकणिशे स्त्री-पुष्पांवर बांधून परागण घडवितात. सिरीयन लोकांना ही पद्धत फार पूर्वीपासून माहीत असावी, या मताला त्यांच्या काही भित्तिचित्रांनी पुष्टी मिळते. या चित्रात एक अर्धवट मानवी देवी एका हातात परागांची पिशवी घेऊन दुसऱ्या हाताने खजुराच्या फुलोऱ्यावर ती पूड टाकत आहे, असे दाखविले आहे म्हणजे त्या लोकांना इतिहासपूर्व काळापासून या झाडांचे गुणधर्म माहीत असावेत असे दिसते. हे परागकण गोळा करून कागदाच्या पुडीत काळजीपूर्वक ठेवल्यास त्याचा उपयोग निदान एक वर्षभर करता येतो. हंगामाव्यतिरिक्त फुलणाऱ्या झाडांच्या परागणास त्यांचा उपयोग होतो. सिंध प्रांतात साधारणत: २० फेब्रुवारी ते ३० मार्चपर्यंत कृत्रिमपणे असे परागण करतात.
एकेका मादी झाडावर साधारणपणे १०–१५ फुलोरे येतात त्यांपैकी काही लहान तुरे तोडून टाकतात त्यामुळे राहिलेल्या तुऱ्यांवर चांगली फळे येतात. फुले येण्याच्या वेळी झाडांना पाणी देत नाहीत फळे लागल्यापासून ती पिकेपर्यंत नियमित पाणी देतात. दोन तीन वर्षांनी एकदा शेणखत देतात. प्रत्येक झाडापासून वर्षाला साधारणत: ८–१० चांगले घड मिळून त्यांपासून २०–२५ किग्रॅ. खजूर मिळतो. घडातील सर्व फळे एकदमच पिकतात असे नाही त्यासाठी बागाईतदार फळे पिकतील तशी तोडून त्यांची वर्गवारी करतो. साधारण प्रतीच्या खजुरामध्ये घड एकदमच उतरवला जाऊन त्यामध्ये काही पक्व व काही अर्धवट पिकलेली फळे असतात.
खजुराच्या झाडापासून खजूर व खारीक यांशिवाय इतर उपयुक्त पदार्थही मिळतात. सिंधमध्ये ‘ताडी’ काढतात. पानांचा उपयोग छपरासाठी व खजूर फळे बांधण्याच्या बोऱ्या (चटया) बनविण्यास करतात. या झाडांपासून मिळणारा एक प्रकारचा गोंद औषधाकरिता पंजाब वगैरे प्रदेशांत वापरतात. झाडांपासून मिळणाऱ्या काथ्याचा दोऱ्याकरिता व फळे काढून घेतल्यावर उरलेल्या स्थूलकणिशाचा केरसुणी, ब्रश वगैरेंकरिता उपयोग करतात. कोवळ्या महाच्छदापासून ‘तारा’ नावाचे सुगंधी द्रव्य काढतात व ते पाण्यात वगैरे मिसळून अरबस्तानादी देशांतून सरबतासारखे वापरतात. खजुराचे कोंब व पाने भाजीसाठीही उपयोगात आणतात. झाडाचा ताजा रस थंड व सारक असतो. गोंद अतिसारावर व मूत्ररोगावर घेतात. फळे (खजूर किंवा खारीक) शामक, कफोत्सारक, पौष्टिक, सारक व कामोत्तेजक असून दमा, धातुविकार, श्वसनविकार, ज्वर, प्रमेह (परमा), बद्धकोष्ठता, स्मरणदोष इत्यादींवर गुणकारी असतात. त्यांत अ, ब आणि ड ही जीवनसत्त्वे असतात.
खजुरात ८६% खाद्य भाग, तर खारकेत तो ८०% असतो तसेच खारकेत सुक्रोजाचे प्रमाण जास्त, परंतु खजुरात पर्यस्त शर्करा (विशिष्ट प्रकाराच्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोज शर्करांचे मिश्रण) अधिक असते. दोन्ही स्वरूपांतील फळ उत्तम खाद्य असून अरब देशांत मिठाई, दूध, लोणी, मांस इत्यादींत त्याचा बराच मोठा वापर करतात. त्यापासून मध व एक प्रकारचे मद्य (अर्राक) बनवितात मुरंबे करतात. गुरे, मेंढ्या व बकऱ्या यांनाही चारतात. बियाही फार उपयुक्त असतात. त्या वाळवून पीठ करून किंवा भिजवून नरम करून उंट, बकऱ्या, मेंढ्या व घोडे यांना खाऊ घालतात. त्या कोंबड्यांच्या खाद्यातही वापरतात. भाजलेल्या पुडीची कॉफीत व सुपारीत भेसळ करतात. बियांचे तेल इराकमध्ये साबणाकरिता उपयोगात आहे. बी उगाळून लहान मुलांस बाळघुटीत देतात. कपाळ दुखत असल्यास उगाळून लेप लावतात. इराक, इराण, मस्कत व सौदी अरेबिया या देशांतून खजूर व खारीक यांची भारतात मोठ्या प्रमाणात आयात होते. १९६५-६६ या वर्षात खजूर ४२,४१९ टन (किंमत रु. १,६६,३२,४६२) व खारीक १०,८७७ टन (किंमत रु. १,०९,४४,९६३) आयात केली गेली.
संदर्भ : 1. Mahabale, T.S. Parthasarathy, M.V. The Genus Phoenix in India, Journal of
Bombay, Natural History Society, Bombay, 1963
2. McCurrach, J.C., Palms of the World, New York, 1960.
पाटील, शा. दा.
“