कुझनेट्स्क : कुझबास. रशियातील डॉनबास खालोखाल महत्त्वाचे कोळसाक्षेत्र. क्षेत्रफळ सु. ७०,००० चौ. किमी. पश्चिम सायबीरियामधील केमेरोव्हो ओब्लास्टमध्ये, डॉनची उपनदी टोम हिच्या खोऱ्यात, कुझबासचे सु. ४४० किमी. लांब व १५० किमी. रुंद क्षेत्र पसरले आहे. सु. १,३७५ मी. जाडीच्या या पट्ट्यात ४००–४५० अब्ज टन कोळशाचा साठा असून तेथील कोळसा उत्तम प्रतीचा समजला जातो. १७२१ मध्ये या साठ्याचा शोध लागला असला, तरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन दुसऱ्या महायुद्धानंतरच सुरू झाले. १९७० मध्ये या परिसरात लहानमोठी ऐंशीवर खाणकेंद्र चालू होती. कुझबासच्या दक्षिणेस लोहधातुकाचा व इतर काही खनिजांचा साठा मिळाल्याने ह्या परिसरात मोठी औद्योगिक वाढ झाली. केमेरोव्हो, लेनिन्स्क, प्रकाप्येफ्स्क, किसेलेव्स्क इ. मोठी शहरे या परिसरात असून नोव्होकुझनेट्स्क हे अवजड उद्योगधंद्यांसाठी, बेलोव्हा हे जस्त उद्योगासाठी व केमेरोव्हो हे रासायनिक उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. उरलमधील मॅग्निटोगॉर्स्क व कुझबासमधील नोव्होकुझनेट्स्क ही औद्योगिक केंद्रे २,४०० किमी. लांबीच्या लोहमार्गांनी जोडलेली आहेत.
शाह, र. रू.