कुझनेट्स,सायमन: (३० एप्रिल १९०१– ).अमेरिकेचे नामवंत अर्थशास्त्रज्ञ व संख्याशास्त्रज्ञ. १९७१ चे अर्थशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक विजेते. त्यांचा जन्म रशियातील युक्रेन राज्याच्या खारकोव्ह शहरी झाला. पहिले महायुद्ध व रशियन क्रांती यांच्या उत्क्षोभांमुळे १९२२ साली अमेरिकेस स्थलांतर. कोलंबिया विद्यापीठातून एम्.ए. होऊन पुढे डॉक्टरेटची पदवी मिळविली. १९२७ साली न्यूयॉर्क येथे ‘नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च’ मध्ये नोकरी. त्यानंतर पेनसिल्व्हेनिया (१९३६–५४), जॉन्स हॉपकिन्स (१९५४–६०) आणि हार्व्हर्ड (१९६०) या विद्यापीठांत अर्थशास्त्राचे अध्यापन. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धसामग्री निर्मिती मंडळाच्या ‘नियोजन व सांख्यिकी कार्यालया ’चे सहयोगी संचालक (१९४२–४४). १९४६ मध्ये ते एक वर्ष चीन सरकारच्या राष्ट्रीय साधन संपत्ती समितीचे आर्थिक सल्लागार होते. १९५०-५१ मध्ये त्यांनी भारताच्या ‘राष्ट्रीय उत्पन्न समिती ’चे सल्लागार म्हणूनही काम केले.
कुझनेट्सनी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचे मूलग्राही विश्लेषण केले आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अमेरिकेतील राष्ट्रीय उत्पन्नाच्या लेख्यांना संकल्पनात्मक अधिष्ठान देण्याचे कार्य प्रथम कुझनेट्स यांनी केले त्यानंतर जगातील इतर देशांमधील राष्ट्रीय उत्पन्न लेखांकन पद्धती निर्माण करण्यात त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली. परिणामी विविध देशांच्या तौलनिक आर्थिक विकासाचे परिमाणात्मक अभ्यास तयार करणे शक्य झाले. त्यांनी विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाचे स्पष्टीकरण केवळ सैद्धांतिक तत्त्वांनुसार न करता, अनुभवजन्य ज्ञानाचा आधार घेऊन केले. त्यामुळे विकासाची आर्थिक व सामाजिक संरचना आणि प्रक्रिया यांसंबंधीचा एक नवाच महत्त्वाचा दृष्टिकोन निर्माण झाला. या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना १९७१ चे अर्थशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
अमेरिकेची सांख्यिकीय संस्था, ब्रिटिश अकादमी ह्यांचे ते अधिछात्र आहेत अमेरिकेची तत्त्वज्ञान संस्था, अर्थमिती संस्था, आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय संस्था, स्वीडनची रॉयल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस इ. नामवंत संस्थांचे ते सदस्य आहेत. जेरूसलेमचे हिब्रू विद्यापीठ, अमेरिकेची राष्ट्रीय विज्ञान अकादमी तसेच प्रिन्स्टन, पेनसिल्व्हेनिया व हार्व्हर्ड ह्या विद्यापीठांनी त्यांना मानसेवी डॉक्टरेटच्या पदव्या बहाल केल्या आहेत.
कमॉडिटी फ्लो अँड कॅपिटल फॉर्मेशन (१९३८), नॅशनल इन्कम अँड इट्स कॉम्पोझिशन (१९४१), इकॉनॉमिक चेंज (१९५४), सिक्स लेक्चर्स ऑन इकॉनॉमिक ग्रोथ (१९५९),मॉडर्न इकॉनॉमिक ग्रोथ (१९६६), इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ नेशन्स (१९७१)हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ होत. सध्या ते हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापन करतात.
भेण्डे, सुभाष