दशमान नाणे पद्धत : मूळ मुद्रा एककाच्या मूल्यास दहाने किंवा दहाच्या पटीने गुणून किंवा भागून येणाऱ्या मूल्याची नाणी (किंवा नोटा) पाडण्याची पद्धत. उदा., भारतीय रुपयाचे १०० पैशांत भाग पाडले आहेत व १ पैसा, १० पैसा, १ रुपया, १० रुपये अशा मूल्यांची नाणी पाडली आहेत. १९५७ मध्ये दशमान नाणे पद्धत स्वीकारण्यापूर्वी भारतात १ रुपयाचे १६ आणे, १ आण्याच्या ४ दिडक्या व एका दिडकीच्या तीन पया, अशी नाणी प्रचारात होती. दशमान पद्धत पैशांचे हिशेब करण्यास सोपी व व्यवहारांतील गणिते सोडविण्यास सोयीची असल्यामुळे भारतानेही तिचा स्वीकार केला आहे. ब्रिटिश राष्ट्रकुलाबाहेरील बहुतेक देशांनी ती अगोदरच स्वीकारली होती.

गणितशास्त्रात दशांश पद्धत फार जुनी आहे. आर्यांच्या अंकपद्धतीत शून्याचा शोध लागला व त्यानंतर दश, शत, सहस्त्र, दशसहस्त्र ह्या श्रेणीने अंक मोजण्याची पद्धत सोयीस्कर वाटली. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य ह्यांनी दशांशचिन्हांचा उदा., .१,  .०१ असा उपयोग केला. आशिया मायनरमार्गे ही पद्धत यूरोपात गेली व तिकडेही रूढ झाली.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये ही पद्धत सर्वात प्रथम म्हणजे १७९२ मध्ये सुरू झाली. यूरोपात प्रथम फ्रान्सने व नंतर १८६५ मध्ये बेल्जियम, इटली व स्वित्झर्लंड या राष्ट्रांनी आणि १८७१ साली जपानने दशमान नाणे पद्धत स्वीकारली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपमधील बहुतेक राष्ट्रांनी या पद्धतीचा अवलंब केला. दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या सर्व राष्ट्रांनी ही पद्धत स्वीकारली. शिवाय भारत आणि पाकिस्तान यांनी १९५७ मध्ये, ऑस्ट्रेलियाने १९६६ साली व न्यूझीलंडने १९६७ मध्ये जुन्या नाणे पद्धतीऐवजी ही पद्धत अंमलात आणली. सरतेशेवटी ब्रिटनमध्येदेखील ही पद्धत १९७१ पासून स्वीकारण्यात आली असून १ पौंडाचे १०० नवे पेन्स केले आहेत व /, १, २, ५. १० आणि ५० पेन्सची नाणी पाडण्यात आली आहेत. बहुतेक दशमान नाणे पद्धतींमध्ये दशमान नसणारी नाणीसुद्धा सोयीच्या दृष्टीने पाडण्यात येतात. उदा., भारतात २, ३, २०, २५ व ५० पैसे ही नाणीही प्रचारात आहेत. शिवाय २, ५, २०, ५० रुपयांच्या नोटाही काढण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १ डॉलरचे १०० सेंट केले असून /, ५, व ५० सेंटचीही नाणी प्रचारात आहेत.

धोंगडे, ए. रा.