कुचबिहार संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या बंगालमधील एक संस्थान. क्षेत्रफळ ३,४१३ चौ.किमी. लोकसंख्या ६,३९,८९८ (१९४१). उत्पन्न सु. ४० लाख रुपये. उत्तरेस सध्याच्या पश्चिम बंगालचा जलपैगुरी जिल्हा, पूर्वेस आसामचा गोआलपाडा जिल्हा, दक्षिणेस बांगला देशाचा रंगपूर आणि पश्चिमेस रंगपूर व जलपैगुरी जिल्ह्यांचा काही प्रदेश यांनी ते सीमित झाले होते. तिस्ता, कालजानी, रईदाक, संकोश, तोरसा वगैरे नद्यांनी संस्थानचा बराच भाग सुपीक झाला.कारभाराच्या सोयीसाठी संस्थानचे कुचबिहार, दीनहाट, माताभांग, मेरवलीगंज व तुफानगंज असे पाच स्वतंत्र विभाग केलेले होते आणि कुचबिहार हे राजधानीचे ठिकाण होते. कोच (कुच) जातीच्या वास्तव्यामुळे कुचबिहार हे नाव पडले,अशी परंपरा आहे.
कुचबिहारचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही. याचा समावेश पूर्वी कामरूप राज्यात होत असे. पंधराव्या शतकात येथे खेन घराण्याचे राज्य होते. या घराण्यातील अखेरचा राजा नीलांबर यास गौरचा नबाब अलाउद्दीन हुसैन याने १४९८ मध्ये पदच्युत करून आपल्या मुलास राज्यपाल म्हणून गादीवर बसविले. पण तोही फार दिवस टिकला नाही. त्यानंतर काही वर्षे अंदाधुंदी माजली. पुढे १५१० मध्ये कोच जातीतील चंदन नावाच्या पुरुषाने येथे राज्य स्थापन केले. चंदननंतर त्याचा चुलत भाऊ बिश्वसिंग गादीवर आला. याने करतोयापासून बर्नादीपर्यंतचा सर्व मुलूख काबीज केला. त्यानंतर १५४० मध्ये नरनारायण गादीवर आला. हा तेव्हाचा पूर्वेकडील सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो. याने सिलराय नावाच्या आपल्या भावाच्या मदतीने पूर्व व दक्षिण बाजूंचे सर्व प्रदेश जिंकून मुसलमानांवर स्वारी केली. सिलरायच्या मृत्यूनंतर नरनारायणाने आपल्या राज्याचे दोन भाग केले. एक भाग सिलरायचा मुलगा रघुनाथ यास दिला. नरनारायण १५८४ मध्ये मरण पावला आणि लक्ष्मीनारायण हा त्याचा मुलगा गादीवर आला. याने रघुनाथाचा मुलगा परीक्षित याविरुद्ध लढाई पुकारून मोगलांची मदत मागितली. त्यामुळे कुचबिहार थोड्याच अवधीत दिल्लीचे अंकित राज्य बनले. पुढे कोच (कुच) घराण्यास उतरती कळा लागली. संस्थानचा काही भाग आहोमांनी, तर उरलेला मोगल व भूतानमधील भुटिया लोकांनी काबीज केला. या सुमारास राजघराण्यातील नाझिरदेव,दिवाणदेव व वैकुंठपूरचा राइकत यांमध्ये अधिकाराबद्दल तंटे उत्पन्न झाले. १७७२ मध्ये नाझिरदेवाचे महत्त्व कमी झाले, तेव्हा त्याने इंग्रजांची मदत घेतली. इंग्रजांनी त्यास कुचबिहारच्या गादीवर बसवून १७७३ मध्ये तह केला. या तहान्वये कुचबिहारचे निम्मे उत्पन्न खंडणीदाखल इंग्रजांना द्यावे, असे ठरले आणि इंग्रजांचे मांडलिकत्व त्याने पतकरले. पुढे १७८८ मध्ये कंपनी सरकारने संस्थानाची चौकशी करण्याकरिता एक आयोग नेमला आणि लवकरच रेसिडेंटची नेमणूक झाली. मध्यंतरीच्या काळात या संस्थानमधील कोणीही पुरुष विशेष प्रसिद्धीस आला नाही. नृपेंद्र नारायण भूप बहादुर यास दहा महिन्यांचा असताना १८६३ मध्ये गादीवर बसविण्यात आले. तो मोठा होईपर्यंत ब्रिटिशांकरवी राज्यकारभार चाले. १८८३ मध्ये त्याने राज्याची सूत्रे हाती घेतली. १९२२ मध्ये तो मरण पावल्यावर त्याचा अज्ञान मुलगा जगद्दीपेंद्र गादीवर आला. १९३६ पासून त्याने कारभार हातात घेतला. त्यास १३ तोफांच्या सलामीचा मान होता. दि. १२ सप्टेंबर १९४९ रोजी संस्थान विलीन झाले. पुढे १९५० मध्ये ते पश्चिम बंगाल राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आले.
देशपांडे, सु. र.