खंडौष्ठ : ओठांच्या ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) योग्य अशी वाढ न झाल्यामुळे जे जन्मजात व्यंग दिसते त्याला ‘खंडौष्ठ’ किंवा ‘शशौष्ठ’ (सशाच्या ओठासारखे ओठ) असे म्हणतात. हे व्यंग बहुधा वरच्या ओठावर एका अथवा दोन्ही बाजूंस दिसते. खालच्या ओठावर ते क्वचितच दिसते. जन्माला आलेल्या १,००० मुलांत ते एखाद्याच मुलात दिसते. खंडौष्ठ असलेल्या २५ टक्के मुलांत आनुवंशिकता असते.

या व्यंगाचे मूळ कारण अजून अज्ञात आहे. भ्रूणाच्या (दोन महिन्यांपर्यंतच्या गर्भाच्या) चौथ्या ते सातव्या आठवड्यात ओठांची वाढ होत असते. ही वाढ योग्य पद्धतीने न झाली, तर ओठामध्ये खिंडार पडल्यासारखे दिसते. कित्येक वेळा खंडौष्ठाबरोबरच ⇨खंडतालूही असते.

आ. १. खंडौष्ठ : (डावीकडे) शस्त्रक्रियेपूर्वी, (उजवीकडे) शस्त्रक्रियेने केलेली दुरुस्ती.

हे व्यंग असणाऱ्याचा चेहरा विद्रूप दिसतो, दात वाकडे येतात, नाकपुडी पसरट आणि बसकट असून नाकाचा शेंडा वाकडा व बसलेला असून नाकाचे भोक मोठे झालेले दिसते.

मूल जन्मल्यापासून ४८ तासांत किंवा २ महिन्यांच्या आत शस्त्रक्रिया करून हे व्यंग जवळजवळ नाहीसे करता येते. नाकात थोडा वाकडेपणा शिल्लक राहिल्यास वयाच्या ८-९ वर्षांच्या सुमारास पुन्हा शस्त्रक्रिया करून तो दुरुस्त करता येतो. या शस्त्रक्रियेसाठी विशिष्ट पद्धतीचे शुद्धिहरणतंत्र ( भूल देण्याचे तंत्र) वापरावे लागते. शस्त्रक्रियेच्या वेळी मुलाचे वजन आणि रक्त यांत दोष नाही याची खात्री करून घ्यावी लागते.

आ. २. खंडौष्ठावरील शस्त्रक्रियेचा एक प्रकार

खंडौष्ठाकरिता करावयाच्या शस्त्रक्रियेच्या अनेक पद्धती आहेत. खंडौष्ठात खंडित ओठाची एक बाजू लांब तर दुसरी आखूड असते, म्हणून त्या दोन्ही बाजूंची लांबी सारखी करून घ्यावी लागते. त्यासाठी एका बाजूला त्रिकोणाकृती खाच तयार करून दुसऱ्या बाजूला तयार केलेला त्रिकोण त्यात बरोबर बसेल अशा तऱ्हेने दोन्ही बाजू कापून त्या सारख्या लांबीच्या केल्यास ओठाची उंची सारखी आणि समांतर होते. त्याच वेळी नाकाचा तळ सारखा झाला की नाही हे पाहणे अवश्य असते. जखम स्नायूच्या तातेने किंवा नायलॉनच्या धाग्याने जवळजवळ टाके घेऊन शिवावी लागते. (आ.२.) व्यंग दोन्ही बाजूंना असल्यास एकाच वेळी शस्त्रक्रिया केल्यास ओठात सारखेपणा आणता येतो. अशा वेळी वरच्या ओठाचा मधला भाग पुढे आल्यासारखा दिसला, तरी तो काही वर्षांत मागे जातो. प्रौढावस्थेत शस्त्रक्रिया केली, तर मात्र हा मधला पुढे आलेला भाग कापावा लागतो.

सुलाखे, पं. भ.

आयुर्वेदीय चिकित्सा : खंडतालूपेक्षा खंडौष्ठाची चिकित्सा फारच सोपी आहे. खंडौष्ठाच्या दोन्ही अर्धांच्या समोरच्या त्वचेवर छेद घेऊन त्वचा आणि मांस एकमेकांना शिवून बाकीची खंडतालूप्रमाणे चिकित्सा करावी.

जोशी, वेणीमाधवशास्त्री

संदर्भ : Holdsworth, W. G. Cleft Lip and Palate, London, 1963.