क्वेकर पंथ : प्रॉटेस्टंट पंथाच्या धर्मसुधारणा – चळवळीच्या उत्तरकाळात इंग्लंडमध्ये निर्माण झालेला एक ख्रिस्ती धर्मपंथ. जॉर्ज फॉक्स (१६२४–९१) हा या पंथाचा संस्थापक होय. बेनेट नावाच्या एका न्यायाधीशास उद्देशून जॉर्ज फॉक्स त्वेषाने म्हणाला होता, की ‘ट्रेंबल बिफोर द वर्ड ऑफ द लॉर्ड’ (परमेश्वराचे वचन ऐकून कंपित व्हा) त्यावर बेनेट उपहासाने फॉक्सला ‘क्वेकर’ म्हणाला (१६५०). त्यावरून ह्या पंथाला ‘क्वेकर’ हे नाव पडले आणि ते रूढही झाले. सध्या ह्या पंथांचे अधिकृत नाव ‘द रिलीजिअस सोसायटी ऑफ फ्रेंड्स’ असे आहे.
या पंथाच्या मते धर्माची खरी अधिसत्ता बायबलमध्ये नसून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आहे आणि असे मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीला लाभू शकते. अशा प्रकारे ⇨रोमन कॅथिलिक पंथ आणि ⇨जॉन कॅल्व्हिन (१५०९–६४) यांची विचारप्रणाली डावलून जॉर्ज फॉक्सने आपला प्रॉटेस्टंट परंपरेत मोडणारा स्वतंत्र पंथ स्थापन केला. त्याने ⇨प्यूरिटन पंथाची आणि ‘चर्च ऑफ इंग्लंड’ ची उपासनापद्धती व मते यांनाही विरोध केला. त्यामुळे १६४९ मध्ये त्याला शिक्षा होऊन तुरूंगवास भोगावा लागला. त्याच्या अनुयायांचाही छळ होऊन इंग्लंडमध्ये त्यांना सरकारी नोकऱ्या नाकारण्यात आल्या व काहींना तुरूंगातही डांबण्यात आले. क्वेकर पंथाचे मिशनरी अमेरिकेला गेले तेथेही त्यांचा छळ होऊन त्यांच्यातील चौघांना बॉस्टन येथे चौकात फाशी देण्यात आले. दहा वर्षांनंतर जॉर्ज फॉक्सने स्वत: अमेरिकेत जाऊन, तेथील क्वेकर पंथीयांच्या जीवनात स्थैर्य आणले. आज क्वेकर पंथाचे अनुयायी मुख्यत्वे लाँग बेटे, ऱ्होड आयलंड, न्यू जर्सी, मेरिलंड इ. ठिकाणी आहेत. त्यांची एकूण संख्या सु. २,०३,००० (१९६१) आहे. इंग्लंडच्या इतिहासात सतराव्या शतकात जे थोर विचारवंत होऊन गेले, त्यांत जॉर्ज फॉक्सची गणना केली जाते.
क्वेकर अनुयायांची राहणी साधी असून ते आदर्श सामाजिक जीवनाचे पुरस्कर्ते आहेत. गुलामगिरी आणि युद्ध यांना त्यांचा कसून विरोध असून रंजल्या-गांजलेल्यांना सक्रिय मदत करण्याचे त्यांचे आंतरराष्ट्रीय कार्य विशेष महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ते अल्पसंख्य असूनही ख्रिस्ती लोकांत त्यांची प्रतिष्ठा फार मोठी समजली जाते.
संदर्भ: 1. Friends World Committee For Consultation Ed. Hand book of the Religious Society
of Friends, Philadelphia, 1952.
2. Jones, R. M. Faith and Practice of the Quakers, New York, 1952.
3. Lucas, Sidney, The Quaker Story, New York, 1949.
आयरन, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला