कुकरी साप : या सापांचा कोल्युब्रिडी सर्पकुलात समावेश होतो. यांच्या एकूण ४० जातींपैकी सु. १३ भारतातील आहेत. यांतील काही जाती भारतात सर्वत्र सापडतात आणि बाकीच्या निरनिराळ्या भागांतच दिसून येतात.

कुकरी साप

हे बिनविषारी साप लहान असून त्यांची लांबी ३०–६० सेंमी. असते. इतर सापांच्या मानाने यांना थोडे दात असतात. वरच्या जबड्यातील मागचे काही दात गुरख्यांच्या कुकरीच्या आकाराचे असल्यामुळे यांना ‘कुकरी’ साप म्हणतात. हे चपळ असून भित्रे नसतात. सरडे, पाली व त्यांची अंडी यांवर ते उदरनिर्वाह करतात.

भारतात सगळीकडे आढळणारी सामान्य जात ऑलिगोडॉन आर्नेन्सिस  ही आहे. ही महाराष्ट्रात पुष्कळ सापडते. शरीर तपकिरी असून त्यावर २०–६० काळे आडवे पट्टे असतात त्यांपैकी ६–१२ शेपटीवर असतात. पोट पांढरे असते. डोक्यावर ^ च्या (उलट्या रोमन व्ही अक्षराच्या) आकाराच्या लागोपाठ तीन खुणा असतात म्हणून या सापाला ‘त्रिशर’ म्हणतात.

हा नेहमी आढळणारा साप असला तरी पावसाळ्यात वारंवार दिसतो. घरांच्या आसपास तो आढळतो व दिवसा हिंडतो. तो सपाट प्रदेशात असतो पण सु. १, ६७५ मी. उंचीवरही आढळलेला आहे. याला डिवचल्यावर चिडून तो आपले सगळे शरीर खूप फुगवतो. मादी अंडी घालते. ऑलिगोडॉन  वंशातील आणखी एकदोन जाती महाराष्ट्रात आढळतात.

कर्वे, ज. नी.