कुंभगर्त : नदीच्या पात्रातील खडकात तयार झालेला रांजणाच्या आकाराचा खळगा. नदीप्रवाहाच्या, विशेषत: वरच्या टप्प्यात, पाण्याबरोबर वेगाने वाहत आलेले दगडगोटे पात्रातील खडकावर घासू लागतात. पाण्याच्या लहानमोठ्या भोवर्यांबरोबर या दगडगोट्यांनाही वाटोळी गती मिळते. त्यांच्या आणि पाण्याच्या घर्षणामुळे खडकावर वाटोळा खळगा तयार होऊ
लागतो. तो खोलखोल होऊ लागतो व पुष्कळदा त्याच्या तोंडापेक्षा आतील भाग जास्त घर्षणामुळे अधिक पोकळ होतो. कधी कधी शेजारशेजारचे दोन खळगे आतून जोडलेही जातात. उन्हाळ्यात जेव्हा हे खडक उघडे पडतात, तेव्हा त्यांवरील कुंभगर्त व त्यांमधील त्यांना खोदून काढणारी निसर्गाची हत्यारे, म्हणजे घर्षणाने स्वत:ही वाटोळे गुळगुळीत बनलेले दगडगोटे दिसून येतात. महाराष्ट्रात उन्हाळ्यात कोरड्या पडणार्या अनेक नद्याओढ्यांच्या पात्रात कुंभगर्त दिसून येतात. पूर्वी खेड्यापाड्यांतील रंगारी रंग तयार करण्यासाठी भांडे म्हणून अशा छोट्या खळग्यांचा उपयोग करीत असत. हिमानी क्रियेत बर्फातून खाली जाऊन खडकांवर घासणाऱ्या दगडांमुळेही कुंभगर्त तयार झालेले दिसून येतात.
कुमठेकर, ज. ब.
“