कुंदकुंदाचार्य : (इ. स. सु. पहिले शतक) दिगंबर जैनांचे एक श्रेष्ठ आचार्य आणि ग्रंथकार. तीर्थंकर महावीर व गौतम गणधर ह्यांच्या खालोखाल दिगंबर संप्रदायात कुंदकुंदाचार्यांना मान आहे. पद्मनंदी हे त्यांचे मूळ नाव. कोंडकुंड किंवा कोंडकुंद ह्या त्यांच्या गावावरून त्यांस ‘कुंदकुंद’ हे नाव प्राप्त झाले. बारस अणुवेक्खा (द्वादशानुप्रेक्षा) ह्या आपल्या ग्रंथाच्या अखेरीस कुंदकुंद हे आपले नाव असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. बोधपाहुड (बोधप्राभृत) ह्या आपल्या ग्रंथाच्या शेवटी त्यांनी आपण भद्रबाहुशिष्य असल्याचे म्हटले आहे. वस्तुतः भद्रबाहूचे ते परंपराशिष्यच होत. विंटरनिट्स ह्याच्या मते हा उल्लेख द्वितीय भद्रबाहूचाही असू शकेल. कुंदकुंदाचार्यांच्या काळासंबंधी वेगवेगळी मते आहेत. तथापि वर दिलेला काळ सर्वसाधारणपणे ग्राह्य धरला जातो.
इ. स. ८८ च्या सुमारास दिगंबर जैनांनी श्वेतांबर आगमाचे प्रामाण्य नाकारल्यामुळे दिगंबर समाजाला धर्मसाहित्याची आवश्यकता होती. कुंदकुंदांनी परंपरेने आलेले आगमज्ञान शौरसेनी प्राकृतात ⇨ पंचास्तिकाय, प्रवचनसार व समयसार हे ‘नाटकत्रयी’ किंवा ‘प्राभृतत्रयी’ म्हणून ओळखले जाणारे ग्रंथ तसेच णियमसार, रयणसार, अट्ठपाहुड आणि दसभत्ति अशी प्रकरणे यांतून मांडले. मूळ जैन आगम अशा प्रकारे ग्रथित झाल्यामुळे श्वेतांबर आगम आणि कुंदकुंदांचे ग्रंथ यात अनेक गाथा समान आहेत.
पंचास्तिकायात (१७३ गाथा) पाच अस्तिकायांचे वर्णन आहे. प्रवचनसारात (२७५ गाथा) ज्ञान, ज्ञेय व चारित्र ह्यांचे विवेचन आहे. समयसारात (४३७ गाथा) समय, नय, सम्यक्त्व, जीवअजीव, कर्म-कर्ता, पुण्य-पाप, आस्रव, संवर, निर्जरा, बंध व मोक्ष इत्यादींची चर्चा असून अखेरीस शुद्ध पूर्ण ज्ञानाचे प्रतिपादन आहे. जीव व अजीव नामक पात्रे असलेले हे संसारनाटक आहे, असे मानले जाते. म्हणूनच समयसाराला पूरक असलेले पंचास्तिकाय आणि प्रवचनसार हे दोन ग्रंथ व समयसार ह्यांना ‘नाटकत्रयी’ म्हटले जाते.
समयसारावर अमृतचंद्र (दहावे शतक) आणि जयसेन ह्यांच्या संस्कृत टीका आहेत. बारस अणुवेक्खामध्ये जैन धर्मातील बारा अनुप्रेक्षा किंवा भावना विवेचिल्या आहेत. दिगंबरांच्या चार मुनिसंघांपैकी तीन स्वतःला ‘कुंदकुंदान्वय’ म्हणजे कुंदकुंदांच्या परंपरेतील म्हणवतात.
तगारे, ग. वा.