कुंटे, महादेव मोरेश्वर: (१ ऑगस्ट १८३५ – ८ ऑक्टोबर १८८८). एक मराठी कवी आणि विद्वान. जन्म सांगली जिल्ह्यातील माहुली ह्या गावी. शिक्षण कोल्हापूर आणि मुंबई येथे. मुंबई विद्यापीठाचे पदवीधर (१८६४). पुढे मुख्याध्यापक म्हणून कराची, कोल्हापूर, पुणे येथे नोकरी. काही काळ मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक.
अहमदाबाद येथील एका महाविद्यालयाचे काही काळ प्राचार्य. राजा शिवाजी (१८६९) ह्या काव्याने त्यांचे नाव विशेष गाजले. इंग्रजी साहित्यातील हिरोइक एपिक म्हणजे वीररसप्रधान महाकाव्य मराठीत आणण्याचा हा पहिला प्रयत्न होता. त्यांच्या ह्या काव्याच्या इंग्रजी प्रस्तावनेमधील काव्यविषयक विचारसरणी महत्त्वाची आहे. आपल्या काव्यात त्यांनी नित्याच्या व्यवहारातील भाषा आवर्जून वापरली आहे. आधुनिक मराठी काव्याच्या द्दष्टीने हा प्रयोग क्रांतिकारक होता. राजाराम महाराज छत्रपति (१८७०), मन नावाची कविता (१८७२) ही त्यांची इतर काव्यरचना. त्यांनी इंग्रजी काव्यरचनाही केली, उदा., ऋषि (१८७८) आणि फॅमिश्ड व्हिलेज. इटलीच्या विद्वत्परिषदेने घेतलेल्या स्पर्धेसाठी व्हिसिसिट्यूड्स ऑफ आर्यन सिव्हिलिझेशन इन इंडिया हा प्रबंध पाठवून त्यांनी पारितोषिक मिळविले. कवित्वापेक्षा त्यांचे विद्वत्व श्रेष्ठ दर्जाचे होते, ह्याची साक्ष ह्या ग्रंथावरून पटते. षड्दर्शनचिंतनिका हे मासिक काढून (१८७७) इंग्रजी-मराठीतून त्यांनी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला. पुणे येथे ते निवर्तले.
संदर्भ: घारपुरे, न. का. कुंटे स्मृतिप्रबंध, पुणे, १९६५.
जोग, रा. श्री.
“