कीव्ह :कीएफ. रशियन संघराज्यापैकी युक्रेन राज्याची राजधानी आणि रशियातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या १८,२७,००० (१९७३). कीव्ह मास्कोच्या ७३६ किमी. नैर्ऋत्येस नीपर नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. नदीचा भाग ९० मी. उंच असल्याने कीव्हला नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावरील सखल भागात कीव्हचे दार्नित्सा हे औद्योगिक उपनगर आहे. रशियातील सर्वांत जुन्या शहरांपैकी कीव्ह होय. ८६२च्या सुमारास स्लाव्ह लोकांच्या एका टोळीने कीव्हची स्थापना केली. स्कँडिनेव्हीया ते ग्रीस यांच्या अंर्तगत जलमार्गावर असल्याने अकराव्या शतकापर्यंत यांची खूपच भरभराट झाली. त्यावेळेस तेथे सु. चारशे चर्च असल्याची नोंद आहे. मोगल, लिथुएनियन आणि पोलीश अंमलांनंतर १६६७ साली ते रशियाकडे आले. १९३४ साली युक्रेन राज्याची राजधानी खारकॉव्हहून कीव्हला हलविण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात कीव्हची अतोनात हानी झाली. नीपरवरील हे महत्त्वाचे नदीबंदर असून दळणवळणाचे मोठे केंद्र आहे. याशिवाय हे सांस्कृतिक औद्योगिक आणि व्यापारी शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. लेथ, विद्युत् चलित्रे, अग्निप्रतिबंधक साधने,  शेतीची अवजारे, जहाजे, मोटारी, मोटारसायकली, रेडिओ, टेलिफोन, केबल, छायाचित्रणाचे साहित्य, रंग, रसायने, औषधे, रेशमी व सुती कापड, कपडे, पादत्राणे, आटा, अन्नपदार्थ इ. उद्योगधंदे युक्रेनची शास्त्र अकादमी, विद्यापीठ,  तंत्रशाळा, उद्योगशाळा व विविध महाविद्यालये, कलावीथी बॅले व ऑपेरा यांसाठी आधुनिक प्रेक्षागृहे, विविध संग्रहालये, दहा लाख पुस्तके असलेले ग्रंथालय रबर व कोळसा  यांच्या संशोधन शाळा या सर्वांमुळे कीव्हची रशियातल्या महत्त्वाच्या शहरांत गणना होते. जुन्या वास्तूंपैकी सेंट सोफिया कॅथीड्रल (अकरावे शतक), सेट व्लादिमीर कॅथीड्रल (एकोणिसावे शतक), बरोक शैलीतील सेंट अँड्रू चर्च, सेंट मायकेल मठ (अकरावे शतक), जुना लाव्रा मठ व त्यामधील अठराव्या शतकातील १०० मी. उंचीची घंटा प्रसिध्द आहे.

शाह, र. रू.