कीट्स, जॉन : (३१ ऑक्टोबर १७९५ – २३ फेब्रुवारी १८२१). स्वच्छंदतावादी संप्रदायातील एक श्रेष्ठ इंग्रज कवी. जन्म लंडनमध्ये. वैद्यकशास्त्राचा काही काळ अभ्यास. पुढे स्वत:ला काव्यलेखनासच वाहून घेतले. एडमंड स्पेन्सर, जॉर्ज चॅपमन, चॉसर बोकाचीओ ह्यांचा त्याच्या संस्कारक्षम मनावर खोल परिणाम झाला. स्पेन्सर, चॉसर आणि बोकाचीओ ह्यांच्या साहित्यकृतींनी तो मध्ययुगाकडे आकर्षित झाला. जॉर्ज चॅपमनने अनुवादिलेली होमरची महाकाव्ये त्याने वाचली होती त्यामुळे अभिजात ग्रीक कला-संस्कृतीकडेही तो आकृष्ट झाला. ली हंट, शेली ह्यांसारख्या कवींची मैत्री त्याला लाभली होती. ‘ऑन लुकींग इंटू चॅपमन्स होमर’ हे त्याचे महत्त्वपूर्ण सुनीत प्रथम हंटच्या एक्झॅमिनरमध्ये प्रसिद्ध झाले (१८१६).

जॉन कीट्स

पोएम्स बाय जॉन कीट्स (१८१७) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह फारसा लक्षवेधी ठरला नाही. त्यानंतरचे एंडिमीयन (१८१८) हे एका ग्रीक आख्यायिकेवर आधारलेले दीर्घकाव्य त्यावर झालेल्या प्रखर टीकेमुळे गाजले. हे काव्य पूर्णतेचा ध्यास घेतलेल्या कवीवरील काहीसे दुर्बोध रूपक आहे. शब्दांचा आणि प्रतिमांचा अनावर हव्यास त्यातून दिसून येतो. ह्या काव्यातील उणिवांची जाणीव कीट्सने त्याला लिहिलेल्या प्रस्तावनेतच नमूद केलेली आहे. त्यातून प्रत्ययास येणारी आत्मचिकित्सक वृत्ती हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लक्षणीय विशेष होय. त्यामुळेच एंडिमीयननंतर त्याची प्रतिभा सतत परिपक्क होत गेली आणि त्याच्या काव्याचा विकास शीघ्रपणे घडून आला. ‘ऑन अ ग्रेशन अर्न’, ‘टू अ नाइटिंगल’, ‘टू ऑटम’, ‘ऑन मेलन् कली’, ‘ऑन इंडलन्स’ व ‘टू सायकी’ ह्या सहा श्रेष्ठ उद्देशिकांतून आणि ‘इझाबेला’, ‘ऑर द पॉट ऑफ बॅझिल’, ‘लॅमिआ’, ‘द ईव्ह ऑफ सेंट ॲग्नेस’  आणि  ‘हायपीरीअन’ ह्या दीर्घकाव्यातून कीट्सचा काव्यविकास स्पष्टपणे प्रतीत होतो. १८१८-१९ ही कीट्‌सच्या आयुष्यातील अत्यंत सर्जनशील वर्षे. ह्याच काळात फॅनी ब्राऊन ह्या तरुणीशी निर्माण झालेले त्याचे प्रेमसंबंध हेही त्याचे एक कारण असू शकेल. तथापि १८२० च्या फेब्रुवारीत त्याला क्षयाचा विकार जडल्याचे दिसून आले आणि परिणामत: त्याला आपल्या प्रेयसीपासून दूर व्हावे लागले. हवापालट करण्यासाठी तो इटलीत गेला. तथापि दुखणे बळावून रोम येथे त्याचे निधन झाले.

संपन्न प्रतिमांद्वारे घडवून आणलेली नाद, स्पर्श गंधादी इंद्रियसंवेदनांची उत्कट अभिव्यक्ती हा त्याच्या काव्याचा एक लक्षणीय विशेष. प्रतिमांचा मुक्त आणि काहीसा बेबंद वापर करण्याची आरंभीची प्रवृत्ती संयमित करण्यात तो यशस्वी ठरला. तथापि काव्यात विचारांपेक्षा विशुद्ध संवेदनांचे महत्त्व त्याने नेहमीच निर्णायक मानले. झाडाला  पालवी फुटावी, इतक्या सहजपणे कविता निर्माण व्हावयास हवी, ही त्याची भूमिका त्याने एका पत्रात व्यक्त केलेली दिसते. ही किमया घडवून आणणारी प्रतिभा तरल संवेदनशीलतेमुळेच परिपक्क होऊ शकते, अशी त्याची धारणा होती. कीट्सची सौंदर्यासक्ती त्याच्या कवितांतून प्रकर्षाने प्रत्ययास येते. ‘ओड ऑन अ ग्रेशन अर्न’ ह्या उद्देशिकेच्या अखेरीस तर सत्य आणि सौंदर्य ह्यांच्या एकात्मतेवरील आपली श्रद्धा त्याने व्यक्त केली आहे. ‘ब्यूटी इज ट्रूथ’, ‘ट्रूथ ब्यूटी’  किंवा ‘अ थिंग ऑफ ब्यूटी इज अ जॉय फॉर एव्हर’  ह्यांसारख्या त्याच्या ओळींना सुभाषितांचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

व्हिक्टोरियन युगातील टेनिसनसारख्या अनेक कवींवर कीट्सचा प्रभाव जाणवतो. पूर्व – रॅफेएलवाद्यांच्या कवितांतून आणि चित्रांतूनही कीट्सचे पडसाद आढळतात. कीट्स आणि शेक्सपिअर ह्यांच्या काव्यप्रकृतीतील साम्यस्थळे काही समीक्षकांनी दाखवून दिली आहेत.

संदर्भ : 1. Bate, W. J. The Stylistic Development of Keats, London, 1945. 

     2. Garrod , H. W. Keats, Oxford, 1926

     3. Garrod , H. W. The Poetical Works of John Keats, Oxford, 1939.

            4. Murry. J. M. Keats and Shakespeare, London, 1926.

            5. Thorpe, C.D. The Mind of John Keats, London, 1926.

 

कुलकर्णी, अ. र.