आ. १. घड्यांचे घटक : (अ) विमुखनती (उद्वली),अबड -उभे अक्षीय प्रतल, कक’ – अक्ष. कक ‘मम’ आणि ‘कक’ ‘नन’ – घडीचे बाहू; (आ) अबड – तिरपे अक्षीय प्रतल.

घड्या, खडकांतील : पृथ्वीच्या कवचातील अनेक खडक थरांचे बनलेले असतात. अशांपैकी कित्येक थर सपाट आडवे किंवा तिरपे असतात, पण कित्येक थरांना घड्या पडलेल्या असतात. खडकांच्या खाली-वर वेडेवाकडे हेलकावे असलेल्या आणि सामान्यपणे लहरींच्या आकाराच्या वक्रतेला घड्या किंवा वल्या असे म्हणतात. गाळांच्या व ज्वालामुखींच्या थरांच्या रूपात असणाऱ्या खडकांत किंवा त्यांच्या रूपांतरित (बदललेल्या) खडकांत घड्या विशेषेकरून व स्पष्टपणे दिसून येतात. या व्यतिरिक्त कुठल्याही थर असलेल्या किंवा पर्णित खडकात (उदा., पट्टित गॅब्रो व ग्रॅनाइट पट्टिताश्म यांच्यात) घड्या आढळतात. काही घड्या अगदी लहान म्हणजे सेंमी.पेक्षाही कमी तर काही कित्येक किमी. लांबीच्या असतात. काही घड्या तर संपूर्ण खंडाइतकी जागा व्यापणाऱ्या व शेकडो किमी. पर्यंत पसरलेल्या असतात.

आ. २. घडीचे शिखर अथवा कळस : (अ) अक्ष व शिखर एकच; (आ) अक्ष व शिखर वेगवेगळे, शिखर अक्षापेक्षा अधिक उंचीवर. कक’ – अक्ष आणि शश’ – शिखर.

घड्यांचे घटक : अक्षीय प्रतल : खडकाच्या दोन सममित (अगदी एकसारखे) भाग करणाऱ्या पृष्ठास (पातळीस) घडीचे ‘अक्षीय प्रतल’ असे म्हणतात. कित्येकदा घडीचे अगदी सारखे असे दोन भाग होऊ शकत नाहीत, तेव्हा घडीचे शक्य असतील तितके असे दोन सममित भाग करणाऱ्या पृष्ठास अक्षीय प्रतल असे म्हणतात. साध्या प्रकारच्या घड्यांमध्ये अक्षीय प्रतल सामान्यतः उभे असते, पण काहींत ते तिरपे तर इतर काहींत अगदी क्षैतिज (आडवे) असते. बऱ्याचशा घड्यांतील अक्षीय प्रतल साधे सरळ असते, पण कित्येकदा ते थोडे वाकलेले किंवा कधीकधी अगदी वेडेवाकडे असते. अक्षीय प्रतलाच्या स्थितीचे वर्णन त्याच्या नतीची (तिरकेपणाची) व नतिलंबाची (काटकोनात असलेल्या दिशेची) माहिती देऊन करतात. जर अक्षीय प्रतल वेडेवाकडे असेल, तर त्याची नती किंवा नतिलंब ही जागोजागी वेगवेगळी असतात. कधीकधी तर नती व नतिलंब ही दोन्हीही वेगवेगळी असतात.

घडीचा अक्ष : ज्या ठिकाणी अक्षीय प्रतल खडकातील कुठल्याही एका स्तराला छेदते त्या रेषेला घडीचा अक्ष असे म्हणतात. प्रत्यक्षात घडी पडलेल्या स्तरांच्या खडकांत प्रत्येक स्तराचा वेगळा अक्ष असतो, परंतु सामान्यपणे हे सर्व अक्ष समांतर असतात. म्हणून एकाच अक्षाच्या स्थितीचे वर्णन हे घडीची माहिती सांगण्यास पुरेसे असते. घड्यांचे अक्ष क्षैतिज, उभे किंवा तिरपे असतात (आ. १).

बाहू : अक्षीय प्रतलाच्या दोन्ही बाजूंस पसरत जाण्याऱ्या घडीच्या भागांना बाहू असे म्हणतात. सामान्यतः एका घडीतील बाहू त्या घडीच्या अक्षीय प्रतलापासून दुसऱ्या घडीतील अक्षीय प्रतलापर्यंत जातात म्हणजे एक बाहू हा दोन घड्यांमध्ये समाईक असतो अथवा एकच बाहू दोन घड्यांचा घटक असतो.

शिखर अथवा कळस : घडीतील अत्युच्च बिंदू जोडणाऱ्या रेषेला ‘शिखर’ अथवा ‘कळस’ म्हणतात. बऱ्याच घड्यांचा अक्ष हा त्यांच्यातील सर्वांत उच्च ठिकाणी असतो म्हणजे अक्ष हा शिखर असतो. कित्येकदा शिखर अक्षांहून वेगळे असते आणि अशा वेळी ते अक्षापेक्षा अधिक उंचीवर असते (आ. २ आ).

शिखर प्रतल : खडकांतील प्रत्येक स्तराचे शिखर वेगळे असते. खडकातील सर्व स्तरांची शिखरे ज्याच्यात असतील अशा प्रतलाला शिखर प्रतल म्हणतात. बऱ्याच अन्वेषणात (संशोधनात) अक्षीय प्रतल व शिखर प्रतल यांच्यातला भेद विचारात घेत नाहीत. नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) व खनिज तेल अडविण्याच्या व साठवणूक करण्याच्या कामी शिखर आणि शिखर प्रतल यांचे नियंत्रण असते. अर्थातच तेलाचे साठे शोधण्याच्या कामात त्यांचा विचार करणे आवश्यक असते.

द्रोणी रेषा व द्रोणी प्रतल : घडीतील अगदी खालच्या पातळीवरील बिंदू जोडणाऱ्या रेषेला द्रोणी रेषा असे म्हणतात. घडी पडलेल्या स्तरित खडकांतील प्रत्येक स्तराची एक द्रोणी रेषा असते. सर्व स्तरांच्या द्रोणी रेषा ज्याच्यात आहेत त्या प्रतलाला द्रोणी प्रतल असे म्हणतात.

आ. ३ विमुखनती व संमुखनती : व – विमुखनती आणि स – संमुखनती : (१) शेल, (२) दगडी कोळसा, (३) मृत्तिका, (४) अक्ष.

घड्यांचे प्रकार : अनुप्रस्थ (आडव्या) छेदात घड्यांचे जे दृश्य दिसते त्यावरून घडीचा प्रकार ठरवितात. घडीचा अक्ष व बाहू यांच्या स्थितींवरून तिचा प्रकार ठरविला जातो.

विमुखनती : उत्तल म्हणजे कमानीसारखा आकार असणाऱ्या घडीस विमुखनती किंवा उद्वली म्हणतात.

आ. ४. उद्वली : (१) अक्ष, (२) सर्वांत नवा व (३) सर्वांत जुना थर. ब, क, ड हे इतर थर

उद्वलीच्या दोन बाहूंच्या नतींची दिशा परस्पर विरुद्ध व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या दिशेस असते. क्षरणाने उद्वलींच्या माथ्याचा भाग झिजून नाहीसा झाला म्हणजे अधिक खोल भागातले व अधिक जुने थर उघडे पडतात. घडीच्या अक्षाकडे उत्तरोत्तर अधिक जुने थर आढळू लागले म्हणजे ती घडी उद्वली आहे हे ओळखू येते (आ. ४.)

आ. ५. सममित व असममित घड्या : (अ) सममित घडी, अक्षीय प्रतल उभे; (आ) असममित घडी, अक्षीय प्रतल तिरपे. (१) अक्ष.

संमुखनती : अवतल म्हणजे पन्हाळासारखा आकार असणाऱ्या घडीला संमुखनती किंवा अधोवली म्हणतात (आ. ३). अधोवलीच्या दोन बाहूंची नती परस्पर विरुद्ध पण एकाच सामान्य दिशेकडे म्हणजे अधोवलीच्या अक्षाकडे असते. अधोवली असलेल्या प्रदेशात प्रवास करीत असताना तिच्या अक्षाकडे जाऊ लागले म्हणजे उत्तरोत्तर अधिक नवे थर दिसतात.

सममित घडी : ज्या घडीतील अक्षीय प्रतल उभे असते व दोन बाहू दोन विरुद्ध दिशांत परंतु सारख्या प्रमाणात नत असतात, तिला सममित घडी म्हणतात (आ. ५ आ). असममित घडीचे दोन बाहू विरुद्ध दिशांस व भिन्न प्रमाणात नत असतात आणि तिचे अक्षीय प्रतल तिरपे असते (आ. ५ आ).

उपरिवली : ज्या घडीचे अक्षीय प्रतल तिरपे असते व बाहू एकाच दिशेकडे पण वेगळ्या प्रमाणात नत असतात तिला उपरिवली म्हणतात (आ. ६ अ). यात मूळच्या स्थितीपासून नव्वद अंशांपेक्षा जास्त फिरविला गेलेला बाहू व अर्थात त्याच्यातील थर उघडे, पर्यस्त अथवा व्युत्क्रमी (उलटे) होतात.

आ.६. उपरिवली व शायी घडी : (अ) उपरिवली : अक्षीय प्रतल तिरपी : (१) अक्ष, दोन्ही बाजू डावीकडे नत; (आ) शायी घडी : (१) १ – अक्ष, (२) कमानी बाक, (३) पर्यस्त बाजू, (४) वालुकाश्म, (५) शेल, (६) स्फटिकमय गाभा, (७) दुय्यम लहान घड्या.

शायी घडी : अक्षीय प्रतल क्षैतिज झाले असलेल्या घड्यांनाच शायी घड्या म्हणतात (आ. ६ आ). या घडीतील एक बाजू पर्यस्त अथवा उलटी असते. पर्यस्त बाहूतील स्तर हे दुसऱ्या साध्या बाहूतील स्तरांपेक्षा कमी जाडीचे असतात. साधा बाहू आणि पर्यस्त बाहू यांच्यामधील घडी पडलेल्या भागाला कमानी बाक किंवा चाप बाक असे म्हणतात. शायी घड्यांतील आतल्या भागांना गाभा आणि बाहेरच्या भागांना कवच असे म्हणतात. आल्प्स पर्वतामधील शायी घड्यांच्या गाभ्यांत अतिप्राचीन स्फटिकमय खडक आहेत व बाहेरच्या भागात म्हणजे कवचात सापेक्षतः अधिकाधिक नवे गाळाचे खडक आहेत. पुष्कळ शायी घड्यांच्या बाहूंना लहान आणि दुय्यम स्वरूपाच्या विमुखनती घड्या पडलेल्या असतात (आ. ६ आ).

आ. ७. समनत घडी : (अ) समनत घडी : (१) अक्ष; (आ) उभी समनत घडी.

समनत घडी : ज्या घडीचे दोन्ही बाहू एकाच दिशेस व सारख्या अंशांनी नत असतात तिला समनत घडी म्हणतात (आ. ७ अ). सामान्यतः समनत घड्यांची अक्षीय प्रतले तिरपी असतात. उभ्या किंवा सममित समनत घडीत अक्षीय प्रतल उभे असते (आ. ७ आ). तिरप्या किंवा पर्यस्त समनत घडीत अक्षीय प्रतल तिरपे असते असते व शायी समनत घडीमध्ये ते क्षैतिज असते.

एकनत : पठारी प्रदेशात खडकाचे थर सामान्यपणे आडवे असतात पण काही मर्यादित क्षेत्रात ते बरेच वाकलेले असतात अशा थरांना एकनत असे म्हणतात. एकनतीमधील नत स्तर हे काही थोड्या अंशांपासून ते नव्वद अंशांपर्यंत नत असू शकतात.

बंद घडी : ज्या घडीत विरूपण (रूप बदलण्याची क्रिया) जास्त प्रमाणात झाल्यामुळे प्रवहण होऊन (ताणले जाऊन) काही स्तर पातळ व काही जाड होतात, तिला बंद अथवा घट्ट घडी असे म्हणतात. जिच्यामध्ये प्रवहण होत नाही ती उघडी घडी होय.

कर्ष घडी : सामान्यतः स्तरित खडकांतील सर्व स्तर सारखेच बलवान नसतात काही बलवान तर काही दुर्बल असतात. घडी पडत असताना जेव्हा एक बलवान स्तर दुर्बल स्तरावरून घसरून जातो, तेव्हा दुर्बल स्तरामध्ये कर्ष घड्या निर्माण होतात. अशा प्रकारच्या दुय्यम व लहान घड्या मोठ्या घड्यांच्या बाहूंवरही निर्माण होतात. कर्ष घड्यांची अक्षीय प्रतले बलवान स्तरांच्या स्तरतलांना लंबरूप नसून तिरपी असतात.

आ.८. समधोवल्या व समुद्वल्या : (१) समधोवल्या, (२) समुद्वली, (३) पाटन.

सामान्यतः घड्या या एकेकट्या नसतात किंवा अगदी मर्यादित क्षेत्रातील खडकांना पडलेल्या नसतात. उद्वल्या व अधोवल्या या किंवा इतर घड्या पुष्कळदा शेजारी शेजारी असलेल्या आढळतात. कित्येक जार चौ.किमी. क्षेत्रातील खडकांच्या थरांना घड्या पडून वर उल्लेख केल्यासारख्या अनेक प्रकारच्या घड्या पडतात. अशा प्रकारच्या घड्यांचे एकूण स्वरूप लक्षात घेतले, तर त्या उद्वलीसारख्या किंवा अधोवलीसारख्या असतात, पण त्यांच्या बाहूंत घड्या पडून अनेक उद्वल्या व अधोवल्या निर्माण झालेल्या असतात. अशा जटिल रचना असलेल्या घड्यांना अनुक्रमे समुद्वल्या व समधोवल्या असे म्हणतात. सारांश, अतिविस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या उद्वलींच्या किंवा अधोवलींच्या बाहूंवर अधिक लहान घड्या पडून अनेक उद्वल्या व अधोवल्या तयार होतात. गिरिजननाने (पर्वत निर्माण होण्याच्या क्रियेने) तयार झालेल्या पर्वतरांगांच्या प्रदेशात अशा प्रकारच्या समुद्वल्या आणि समधोवल्या आढळतात (आ. ८). अशा प्रकारच्या खडकांतील ⇨पाटन  पंख्यासारखे सभोवर सर्व दिशांना असते.

खडकांना घड्या पडण्याची कारणे : पृथ्वीच्या कवचाच्या हालचालींत निर्माण होणारे संपीडक (दाबल्याने निर्माण होणारा) दाब हे खडकांना घड्या पडण्याचे मुख्य कारण होय. क्वचित प्रसंगी इतर कारणांनी घड्या पडतात. उदा., शिलारसाचे किंवा सैंधवाचे अंतर्वेशन झाल्यामुळे (घुसल्यामुळे) किंवा कवचाचे भाग खचण्यामुळे, पर्वतकड्याच्या बाजूचे खडक गुरुत्वाकर्षणाने घसरून लहान व कमी वक्रतेच्या घड्या निर्माण होतात. संपीडक दाब हे सौम्य किंवा तीव्र असू शकतात व मुख्यतः पृथ्वीच्या कवचाला स्पर्शरेषेच्या दिशेने, म्हणजे स्थूलमानाने क्षितिज दिशेने पडत असतात. या दाबांमुळे खडक त्यांच्या बाजूंकडून दाबले जातात. क्वचित प्रसंगी दाब खडकाच्या थरांच्या दोन्ही बाजूंकडून पडत असतात, पण सामान्यतः त्याच्या एका बाजूवर दाब पडत नाही व ती बाजू स्थिर राहत असते आणि दाब दुसऱ्या बाजूकडून पडत असतो. स्थिर राहणाऱ्या भागाने होणाऱ्या विरोधामुळे त्याच्या बाजूच्या खडकांकडून प्रतिबंध करणारा दाब निर्माण होतो. फरशीवर सपाट पसरलेली चटई एका बाजूकडून आत दाबल्यावर तिला जशा सुरकुत्या किंवा घड्या पडतात, त्याप्रमाणे काही अंशी खडकांना घड्या पडतात. दाबाची तीव्रता, थरांची जाडी आणि त्यांचे बल ही निरनिराळ्या ठिकाणी भिन्न असल्यामुळे घड्यांचे आकार व आकारमान ही निरनिराळी असतात. काही घड्या कमी वक्रतेच्या असतात, तर काहींची वक्रता जास्त असते काही सममित तर इतर असममित असतात, अधिक तीव्र दाब पडल्यामुळे काहींचे बाहू अधिक जवळ आलेले व त्यांची अक्षीय प्रतले वळविली गेलेली असतात. अशाच कारणांमुळे कित्येक खडकांना घड्या पडून शायी घड्याही निर्माण झालेल्या असतात. दाब अतिशय तीव्र व खडकाच्या सहनक्षमतेच्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास संपीडित थर भंग पावून त्यांच्यात विपरीत विभंग निर्माण होतात आणि प्रणोद प्रतले तयार होतात [ ⟶ विभंग, खडकांतील].

कधीकधी भूकवचाच्या खालील भागातून नळासारख्या निर्गम द्वारातून कवचाच्या खोल भागातील शिलारस वर ढकलला गेला, तर त्याच्या माथ्यावरील खडक वर ढकलले जाऊन त्यांना घुमटासारखा आकार येतो. काही प्रदेशात सैंधवाच्या गोल किंवा वरवंट्याच्या आकाराच्या राशी अशाच खालून वर ढकलल्या जातात व त्यांच्या माथ्यावरील खडकांना घुमटाकार घड्या पडतात. परंतु या दोन्ही प्रकारांनी तयार होणाऱ्या घुमटासारख्या घड्या अगदी लहान असून त्या विरळाच आढळतात. घुमटांचा आकार समान्यतः अनियमित असतो. त्याच्या सर्व खडकांची नती त्याच्या माथ्यापासून सभोवार सर्व दिशांकडे असते. कधीकधी थरास घड्या पडून खळग्यासारखी खोलगट घडी निर्माण होते तिला द्रोणीवली (बेसीन) म्हणतात. तिचा आकार सामान्यतः अनियमित असतो, क्वचित घमेल्यासारखा असतो. द्रोणी घडीतील सर्व खडकांची नती सर्व दिशांकडून तिच्या मध्यभागाकडे असते.

संदर्भ :

1.  Badgley, P. C. Structural and Tectonic Principles, New York, 1965.

2. Billings, M. P. Structural Geology, Bombay, 1961.

3. Molmes, A. Principles of Physical Geology, London, 1965.

आगस्ते, र. पां.