घंटाघर: सामान्यतः चर्चच्या परिसरात एका उंच मनोऱ्यावर घंटा बसविलेली असते. या मनोऱ्यास ‘घंटाघर’ (बेल टॉवर) म्हणतात. त्यास ‘कँपनीली’ही इटालियन संज्ञा असून, ती ‘Campana’ (घंटा) या मूळ शब्दावरून आली आहे. सु. सहाव्या शतकापासून चर्चच्या परिसरात अशी घंटाघरे बांधण्यात आली. साधारणपणे ती चर्चलगतच थोड्या अंतरावर असून पडवीवजा मार्गाने चर्चला जोडलेली असत. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या देशांत अशी घंटाघरे दिसून येतात. उत्तर इटलीमध्ये घंटाघरे स्मारक म्हणूनही बांधली जात. सम्राटाच्या सत्तेचे प्रतीक म्हणून ती असत. त्याचप्रमाणे टेहळणी करण्यासाठीही त्यांचा उपयोग केला जात असे. पीसा येथील कलता मनोरा (११७४–१३५०) हे घंटाघराचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. व्हेनिस येथील सेंट मार्कचे घंटाघर सौंदर्यदृष्ट्या विशेष प्रसिद्ध आहे. इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत चर्चवास्तूंमध्ये उत्तुंग घंटाघरे बांधण्यात आली.
गटणे, कृ. ब.