ग्वेलो : ऱ्होडेशियाच्या मध्यभागातील शहर व मिडलँड्स प्रांताचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५५,४३३ (१९७३). त्यांपैकी आफ्रिकी ४५,००० यूरोपीय ९,३०० व इतर १,१३३ होते. हे ग्वेलो नदीवर मॅटाबीलीलँड प्रदेशात १,४३१ मी. उंचीवर बूलवायोच्या ईशान्येस १५३ किमी. असून महत्त्वाचे रेल्वे प्रस्थानक आहे. येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. याच्या परिसरात सोने, लोहधातुक, क्रोमाइट, ॲस्बेस्टॉस यांच्या खाणी आहेत. कातडी कमावणे, लाकूडकाम, पिठाच्या गिरण्या, दुग्धपदार्थ, ॲस्बेस्टॉसपासून तंतू तयार करणे इ. व्यवसाय चालतात. पादत्राणे व शुद्ध फेरोक्रोम ही येथील प्रमुख औद्योगिक उत्पादने होत. येथे माध्यमिक शाळा, दुग्धशाळा व विमानतळ आहेत.
कांबळे, य. रा.