ग्ऱ्युफिउस, आंड्रेआस : (११ ऑक्टोबर १६१६–१६ जुलै १६६४). जर्मन कवी व नाटककार. जन्म ग्लोगाऊ येथे. बालपणीच पोरका झाला. मुख्यतः जर्मनीत लढल्या गेलेल्या यूरोपीय त्रिदशवार्षिक युद्धाचे (१६१८–४८) दुःखद अनुभव त्याने घेतले. एक निर्वासित म्हणून ग्लोगाऊमधून बाहेर पडून डॅन्झिग, लायडन इ. यूरोपातील अनेक ठिकाणी राहून शिक्षण घेतले. हॉलंड, फ्रान्स, इटली ह्यांसारख्या देशांत प्रवास केला. हॉलंडमध्ये असताना डच नाटककार होफ्ट आणि व्हाँडेल ह्यांच्या नाट्यकृतींचा परिचय करून घेतला. १६५० मध्ये स्वदेशी परतल्यावर ग्लोगाऊ येथे एका महत्त्वाच्या प्रशासकीय पदावर काम केले. Herodis Furiae et Rachelis lacrymae (१६३४) हे वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षीच लिहिलेले महाकाव्य, तसेच काही भावगीते, सुनीते ही त्याची काव्यरचना. उत्कट धर्मश्रद्धा आणि जीवनाच्या क्षणभंगुरपणाच्या जाणिवेतून आलेली विरक्ती त्याच्या काव्यातून लक्षणीयपणे प्रत्ययास येते. Leo Armenius (१६५०), Ermordete Majestaet oder Carolus Stuardus Koenig von Gross Brittanien (१६५७ , इं. शी. द मर्डर्ड किंग ऑर चार्ल्स स्ट्यूअर्ट, द किंग ऑफ ग्रेट ब्रिटन), Cardenio und Celinde (१६५७, इं. शी. कार्डेनिओ अँड सेलिंड), Papinianus (१६५९) ह्या शोकात्मिका आणि Die geliebte Dornrose (१६६०, इं. शी. बिलव्ह्ड डोर्नरोज), Horribilicribrifax (१६६३) आणि Peter Squentz (१६६३) ह्या सुखात्मिका म्हणजे त्याच्या प्रमुख नाट्यकृती. शब्दांची कौशल्यपूर्ण आणि परिणामकारक मांडणी ही बरोक साहित्यशैलीची वैशिष्ट्ये त्याच्या नाट्यलेखनात दिसून येतात. व्यक्तिरेखन आणि विनोदही त्याला उत्तम साधत. जर्मन नाटकाचा तो जनक मानला जातो. ग्लोगाऊ येथे तो निधन पावला.
घारपुरे, न. का.