ग्रेअम, मार्था : (११ मे १८९३– ). आधुनिक अमेरिकन नृत्यक्षेत्रातील एक श्रेष्ठ कलावंत. बॅले नृत्यशैलीशी तिचे नाव प्रामुख्याने निगडित आहे. जन्म पिट्सबर्ग येथे. तिने नृत्याचे शिक्षण ‘डेनिशॉन’ नृत्यविद्यालयात घेतले (१९१६–२३), परंतु तेथील नृत्यपरंपरेविषयी तिला समाधान नव्हते. पुढे तिने स्वतःची नृत्यशिक्षणसंस्था स्थापन केली आणि अमेरिकन नृत्यकलेला नवे वळण लावण्याचा प्रयत्न केला. बदलत्या सामाजिक प्रवाहांची दखल घेऊन त्यांवरील कलात्मक भाष्य ठरतील अशी द डान्स ऑफ डेथसारखी नृत्ये तिने दिग्दर्शित केली. तत्कालीन प्रतिभाशाली संगीतकारांचे साहाय्यही तिने मिळविले. सामाजिक संघर्ष, गूढरम्यता, मानसिक अलिप्तता इत्यादींचे संसूचन हे तिच्या बॅलेचे विशेष होत. उदा., फ्रेनेटिक ऱ्हिदम्स, थ्री डान्सेस ऑफ पझेशन इत्यादी. प्रभावी नाट्यगुण व आकर्षक तंत्र यांमुळे प्रिमिटिव्ह मिस्टरीज (१९३१) सारखी तिची नृत्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. नृत्यामध्ये कथानकाच्या परिपोषापेक्षा एकसूत्री व लयबद्ध हालचाली आणि शाश्वत मानवी भावना ह्यांचा सुरेख मिलाफ करून, त्यातून एक प्रकारची सुसंवादी रचना (सिंफनी) साधण्यावर तिचा विशेष भर होता. नृत्याची शैली व तंत्र ह्यांत सुधारणा करीत असतानाही तिने नृत्याचा मूळ गाभा कायम ठेवला. विमुक्त नृत्यशैलीची ती एक आद्य प्रणेती मानली जाते.
संदर्भ : Leatherman, Leroy, Martha Graham, New York, 1966.
वडगावकर, सुरेंद्र