ग्रीष्मनिष्क्रियता : अतिशय उष्ण किंवा कोरड्या हवामानात राहणारे कित्येक प्राणी ग्रीष्म ऋतूत जी एक प्रकारची झोप घेतात किंवा सुप्तावस्थेत जातात तिला ग्रीष्मनिष्क्रियता म्हणतात. या अवस्थेत त्यांची क्रियाशीलता व दैहिक व्यापार अतिशय मंदावतात. उष्ण कटिबंधातील प्रदेशात ऋतुमानानुसार तापमानात आणि हवेच्या शुष्कतेतही (कोरडेपणात) बदल होतात. या बदलांमुळे या भागात वसती करून राहणाऱ्या प्राण्यांवर परिणाम होतो विशेषतः त्यांच्या स्वाभाविक शरीर-क्रियांवर तर गंभीर परिणाम होतात. ग्रीष्म ऋतूतील तीव्र हवामानापासून आपले संरक्षण करण्याकरिता या प्राण्यांपुढे दोनच मार्ग असतात : स्थानांतर करून दुसरीकडे जाणे हा एक किंवा निष्क्रियतेचा अवलंब करणे हा दुसरा. बरेच प्राणी हा दुसरा मार्ग अनुसरतात. ग्रीष्मनिष्क्रियता उत्पन्न करण्याच्या कामी उष्णता हा जरी एक महत्त्वाचा उद्दीपक असला, तरी इतर परिस्थितिक कारणांचाही त्यात भाग असतो.
अतिशय थंडीमुळे ज्याप्रमाणे ⇨शीतनिष्क्रियता (हिवाळ्यात काही प्राण्यांना येणारी अर्धवट अथवा पूर्ण गुंगीची स्थिती) उद्भवते त्याचप्रमाणे अतिशय उष्णतेमुळे ग्रीष्मनिष्क्रियता उत्पन्न होते. हवामानाच्या अशा परिस्थितीत प्राणी आपले क्रियाशील जीवन ज्या ठिकाणी घालवीत असतो, ते ठिकाण सोडून, ज्या ठिकाणी तापमान कमी आणि ओलावा जास्त असेल अशा जागी जातो. प्राण्यांच्या शरीरात सक्रिय चयापचय (प्राण्यांच्या शरीरात घडणारे रचनात्मक आणि विघटनात्मक रासायनिक बदल) अव्याहत चालू असतो व त्याकरिता अन्न आणि पाणी यांच्या पुरवठ्याची आवश्यकता असते प्राण्यांच्या क्रियाशीलतेसाठी आवश्यक असणारी ऊर्जा यांच्यापासूनच उत्पन्न होते. परंतु या दोहोंपैकी एकाचा किंवा दोहोंचाही पुरवठा झाला नाही, तर त्याची परिणती आचरणात अथवा स्वाभाविक निवासस्थानात बदल होण्यात होते. ग्रीष्मनिष्क्रियतेने शरीराचे तापमान पुष्कळ घटते.
रोटिफर आणि नेमॅटोड यांच्यासारखे प्राणी शुष्कतेचा प्रतिकार करू शकतात, पण इतर प्राण्यांना अनुकूलनाखेरीज गत्यंतर नसते. पुष्कळ सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणारे प्राणी) आणि मासे ग्रीष्मनिद्रा घेतात उष्णतेपेक्षा शुष्कताच या निद्रेला जास्त कारणीभूत असते. मगर, कूर्म इ. प्राणी तलावाचे किंवा नदीचे पाणी आटल्यावर तळाच्या चिखलात पुरून घेतात आणि तलावात व नदीत पुन्हा पाणी साठल्यावर बाहेर येतात. बेडूक व भेक अशाच प्रकारे आपल्याला चिखलात पुरून घेतात. आफ्रिकेतील फुप्फुसमीन (फुप्फुसाचे कार्य करणारी व घशात उघडणारी वायूची पिशवी असलेला मासा) प्रोटॉप्टेरस चिखलात खोल बीळ करून त्यात आपल्याला बंद करून घेतो या अवस्थेत तो वाताशयाने श्वातोच्छ्वास करतो.
पुष्कळ आदिजीव विपरीत परिस्थितीत (उन्हाळ्यामुळे पाणी आटणे वगैरे) पुटी (शरीराला वेढून ते आत बंद करणारे पातळ पटल) तयार करून त्यात राहतात. या पुटी उच्च तापमान वा शुष्कता यांतही तग धरू शकतात. उन्हाळ्यातील किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीतून पार पडण्याकरिता पुष्कळ अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी पुटीभवनाच्या मार्गाचे अवलंबन करतात. जमिनीवर राहणाऱ्या गोगलगाई उन्हाळ्यात आपल्या शंखाचे द्वार प्रच्छदाने (झाकणासारख्या संरचनेने) बंद करून घेऊन आत राहतात. पिकळ्या जमिनीत बिळे करून त्यांत राहतात आणि शरीराभोवती श्लेष्मावरण (चिकट, गिळगिळीत पदार्थांचे आवरण) तयार करून आपले रक्षण करतात. रखरखीत वाळवंटातील गोगलगाई ग्रीष्मसुप्तीच्या अवस्थेत अन्नपाण्यावाचून कित्येक वर्षे जिवंत राहू शकतात.
जोगळेकर, व. र.
“