ग्रीन, जॉर्ज : (१४ जुलै १७९३–३१ मार्च १८४१). इंग्लिश गणितीय भौतिकीविज्ञ, विद्यूत् व चुंबकत्व यांच्या संबंधीच्या गणितीय पद्धतींकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म नॉटिंगॅमजवळील स्नायन्टन येथे झाला. गणिताचा अभ्यास त्यांनी स्व-अध्यनानेच केला. १८२८ मध्ये त्यांनी ‘गणितीय विश्लेषणाचे विद्युत् व चुंबकत्व विषयक सिद्धांताकरिता उपयोग’ या विषयावर निबंध प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी प्वासाँ यांच्या विद्युत् व चुंबकत्वासंबंधीच्या संशोधनाचे व्यापकीकरण आणि विस्तारण केले. तसेच त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले प्रमेयही दिलेले आहे. ‘पोटेन्शल’ (वर्चस्) हा शब्द त्यांनीच प्रचारात आणला. विद्युत् व चुंबकत्वाच्या बाबतीत वर्चसाचे गुणधर्म पाहण्यासाठी त्यांनी आपल्या प्रमेयाचा उपयोग केला. त्यानंतर त्यांनी द्रायूंचे (वायू व द्रव यांचे) समतोलत्व, प-मितीय अवकाशातील आकर्षण प्रेरणा, धन विवृत्तपृष्ठाच्या (ज्याचे सर्व प्रतलीय छेद दीर्घवर्तुळे किंवा वर्तुळे असतात अशा पृष्ठाच्या) कंपनांमुळे द्रायूंमध्ये निर्माण होणारी गती या विषयांवर १८३२–३३ मध्ये निबंध लिहिले व ते त्यांच्या मृत्यूनंतर १८७१ साली प्रसिद्ध झाले. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी केंब्रिज येथे जाऊन १८३७ मध्ये रँग्लर पदवी मिळविली. १८३९ मध्ये केझ कॉलेजच्या फेलोपदावर त्यांची निवड झाली, परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना स्नायन्टन येथे परत जावे लागले व तेथेच ते मृत्यू पावले.
भदे, व. ग.