द म्वाव्हर, आब्राआम : (२६ मे १६६७ — २७ नोव्हेंबर १७५४). फ्रेंच गणितज्ञ. साख्यिकीमधील प्रसामान्य वंटन व संभाव्य त्रुटी [→ वंटन सिद्धांत] यांच्या संकल्पना, (कोज्या + i ज्या )= कोज्या न थ + i ज्या न थ हे त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारे ⇨ त्रिकोणमिती मधील महत्त्वाचे प्रमेय व जेम्स स्टर्लिंग यांनी नंतर न! (= १·२·३··· ) संबंधी प्रस्थापित केलेल्या सूत्रांसंबंधीचे (! ≈ √ π. e–न·) मूलभूत महत्त्वाचे कार्य यांकरिता द म्वाव्हर हे सुप्रसिद्ध आहेत.

त्यांचा जन्म फ्रान्समधील व्हीत्री–ला–फ्रांस्वा येथे झाला. त्यांनी प्रारंभी सोम्यूर येथे शिक्षण घेतले व नंतर १६८४ मध्ये पॅरिसला जाऊन गणिताचे अध्ययन केले. प्रॉटेस्टंट पंथावरील निष्ठेमुळे त्यांना १६८५–८८ या काळात तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगातून सुटल्यावर ते लंडनला गेले व तेथेच त्यांनी गणिताच्या शिकवण्या, लेखन तसेच संभाव्यता सिद्धांताचे जुगार व विमा यांसारख्या व्यावहारिक प्रश्नांतील उपयोग हाच चरितार्थाचा व्यवसाय म्हणून आयुष्याच्या अखेरीपर्यंत केला.

न्यूटन यांच्या प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका  या ग्रंथामुळे द म्वाव्हर यांचे गणिताकडे लक्ष वेधले. त्यांच्या काळातील एक नामवंत गणितज्ञ म्हणून न्यूटन यांची ख्याती होती. ज्योतिषशास्त्रज्ञ एडमंड हॅली व न्यूटन हे द म्वाव्हर यांचे मित्र होते, तसेच झाॅ बेर्नुली या प्रसिद्ध गणितज्ञांशीही त्यांचा मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार होता. रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून १६९७ मध्ये त्यांची निवड झाली. भूमिती, ⇨ कलन, गतिकी (गती व ती ज्या प्रेरणांमुळे निर्माण होते त्या प्रेरणा यांच्यातील संबंधाविषयीची गणितीय शाखा) व जुगारातील संभाव्यता या विषयांतील त्यांचे प्रारंभाची संशोधन रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन  या नियतकालिकात १६९५–१७१५ या काळात प्रसिद्ध झाले. संभाव्यता सिद्धांताविषयीचे त्यांचे डॉक्ट्रिन ऑफ चान्सेस  (१७१७) व न्यूइटीज ऑन लाइव्ह्‌ज (१७२४) हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. Miscellsnea Analytica de Seriebus et Quadraturis (१७३०) या ग्रंथांत त्यांचे कलन व त्रिकोणमिती (यात त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारे प्रमेयही आहे) या विषयांतील संशोधन संग्रहित करण्यात आले. स्टर्लिंग सूत्र व प्रसामान्य वंटनाचा वक्र यांसंबंधीचे त्यांचे संशोधन पत्रकरूपातने अनुक्रमे १७३० व १७३३ मध्ये प्रसिद्ध झाले. कलनाच्या शोधासंबंधीच्या न्यूटन व जी. डब्ल्यू. फोन लायप्‍निट्‌स यांच्यातील वादाचा निर्णय करण्यासाठी रॉयल सोसायटीने नेमलेल्या समितीवर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. ते पॅरिस व बर्लिन येथील ॲकॅडेमींचेही सदस्य होते. ते लंडन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.