व्हेब्लेन, ऑझ्वाल्ड : (२४ जून १८८०–१० ऑगस्ट १९६०). अमेरिकन गणितज्ञ. त्यांनी यूक्लिडीय भूमिती, संस्थितिविज्ञान आणि अवकल भूमिती यांचे काटेकोर विश्लेषण केले. त्यांचे संशोधन आण्वीय भौतिकी आणि सापेक्षता सिद्धान्त यांकरिता उपयोगी पडले. अमेरिकेतील भूमितितज्ञांनी त्यांच्या कल्पना विकसित केल्या.

व्हेब्लेन यांचा जन्म अमेरिकेतील आयोवा राज्यामधील डिकॉर येथे झाला. शिक्षण आयोवा, हार्व्हर्ड आणि शिकागो या विद्यापीठांत. शिकागो विद्यापीठाची पीएच. डी. पदवी (१९०३). ते प्रिन्स्टन विद्यापीठात (१९०५-३२) आणि प्रिन्स्टन येथील द इन्स्टिअडव्हान्स्ड स्टडी या संस्थेत (१९३२-५०) प्राध्यापक होते. १९५० मध्ये ते गुणश्री प्राध्यापक झाले.

व्हेब्लेन यांनी यूक्लिडीय भूमितीची स्वयंसिद्धकानुसारी केलेली मांडणी ‘बिंदू’ आणि ‘क्रम’ या दोन मूलभूत संकल्पनांवर आधारलेली होती. त्यांनी गणितीय विश्लेषणाचा तात्त्विक पाया या विषयावर लेखन केले. तसेच प्रक्षेप भूमितीची [→भूमिति]  नव्याने मांडणी केली. जे. डब्ल्यू. यंग यांच्या समवेत लिहिलेला त्यांचा प्रोजेक्टिव्ह जिऑमेट्री  [खंड १ (१९१०) व २ (१९१८) ] हा ग्रंथ  गणितज्ञांना प्रभावित करणारा ठरला.

व्हेब्लेन यांनी ⇨ संस्थितिविज्ञानात मोलाची भर घातली. त्यांनी गुंफलेली एक व्याखानमाला (१९१६) पुढे ॲनॅलिसिस सायटस या नावाने ग्रंथरूपात प्रसिद्ध झाली (१९२२). संस्थितिविज्ञानाच्या मूलभूत कल्पना पद्धतशीरपणे मांडणारा हा पहिला ग्रंथ होय. या ग्रंथाच्या प्रभावातूनच जागतिक कीर्तीचे संस्थितिविज्ञानाचे अमेरिकन पीठच (अमेरिकन स्कूल ऑफ टोपॉलॉजी) निर्माण झाले.

व्हेब्लेन यांनी व्यापक सापेक्षता सिद्धान्ताचा शोध लागल्यानंतर लगेच आपले लक्ष अवकल भूमितीकडे वळविले. त्यांनी स्थानिक अवकल भूमितीकडून सर्वव्यापी अवकल भूमितीकडे होणाऱ्या स्थित्यंतरात महत्त्वाचे कार्य केले. या विषयावर त्यांनी आपले हुशार विद्यार्थी जे. एच. सी. व्हाइटहेड यांच्या समवेत द फाउंडेशन्स ऑफ डिफरन्शियल जिऑमेट्री हा ग्रंथ १९३२मध्ये प्रसिद्ध केला. यामुळे अवकलनीय समुच्चयाची स्पष्ट व्याखा उपलब्ध झाली व ती अधिक काटेकोर करण्याची प्रेरणा इतरांना मिळाली.

व्हेब्लेन यांनी लिहिलेले इतर ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : इन्फिनाइटसिमिअल ॲनॅलिसिस  (एन. जे. लेनेस यांच्या समवेत, १९०७), रीमानीय भूमितीच्या गुणधर्मांचे अचूक व पद्धतशीर विवरण करणारे इनव्हेरिअंट्‌स ऑफ क्वाड्रॅटिक डिफरन्शिअल फॉर्म्स (१९२७) आणि जिऑमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स डोमेन्स (डब्ल्यू. गिव्हेन्स यांच्या समवेत, १९३६).

द इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी या प्रिन्स्टन येथील संस्थेत गणितज्ञांचा एक वेगळा संप्रदाय (गट) निर्माण होण्यासाठी व्हेब्लेन यांचे कार्य मोलाचे ठरले.

अमेरिकेतील ब्रुकलिन (मेन) येथे  व्हेब्लेन यांचे निधन झाले. 

ओक, स. ज.