ग्रहचिकित्सा : (आयुर्वेद). ग्रहपीडेचे सामान्य स्वरूप पुढीलप्रमाणे असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञान, विज्ञान, भाषण, हालचाल, शक्ती व पराक्रम यांचा अभूतपूर्व आविर्भाव होऊन तिला गुप्त व भावी गोष्टी कळू लागतात, चित्ताची अस्वस्थता वाढते, सहनशक्ती कमी होऊन क्रोध उत्पन्न होतो आणि सामान्य मनुष्याला करणे अशक्य अशा क्रिया ती व्यक्ती सहज करू शकते तेव्हा त्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणत्या तरी ग्रहाचा आवेश झाला आहे, असे समजता येते. आयुर्वेदीय परिभाषेत यालाच भूतग्रह असेही नाव आहे.

ह्या भूतग्रहांचे स्वरूप, स्वभाव, भाषापद्धती आणि हालचाल वेगवेगळी असते. यावरून व्यक्तीच्या ठिकाणी कोणत्या ग्रहाचा आवेश झाला आहे हे ओळखता येते व तदनुसार उपचारही करता येतात. ह्या ग्रहांचे आक्रमण अथवा जो आवेश त्यालाच शास्त्रीय परिभाषेत अभिषंग असेही नाव आहे. अकस्मात हसणे, रडणे, थरथर कापणे इ. लक्षणांनी युक्त विषमज्वराच्या प्रकाराला याच दृष्टीने दिलेले नाव भूताभिषंग ज्वर असे आहे.

देवग्रह, दैत्यग्रह इ. भेदाने भूतग्रहांचे अठरा प्रकार संभवतात. अशा ग्रहपीडित रोग्यांची अवस्था उन्मत्तवत असते म्हणून आगंतुउन्माद नावाखाली सर्वही ग्रहांच्या नावाने त्या त्या उन्माद रोगाला नावे दिली गेली आहेत. जसे देवग्रहजुष्ट, दैत्यग्रहजुष्ट उन्माद इत्यादी.

राक्षस-भूत-पिशाच हे जंतूच होत : आपली नखे, केस, वस्त्रे व हस्तपादादी अवयव स्वच्छ आणि पवित्र ठेवावी शांती, मंगल देवता, ब्राह्मण, गुरू यांच्या विषयी निष्ठावान असावे याची कारणे सांगताना शास्त्रकार म्हणतात पशुपती, कुबेर आणि काही देवतांचे अनुचर असे हे राक्षस वा भूते मांस व रक्ताला चटावलेली असल्यामुळे व्रण झाल्यास किंवा अमंगल-अपवित्र आचरण घडल्यास त्यांचे तेथे आक्रमण होते आणि सुगंधी व जंतुनाशक धूप, बळी आणि उपहार, भक्ष्यपदार्थ अर्पण केल्याने त्यांची शांती होते. नित्य सावधान, आप्तेष्टांच्या सहवासात, दिव्याच्या व सूर्याच्या प्रकाशात, शस्त्र, सुगंधी द्रव्ये व पुष्पमालादि धारण, भरपूर स्वच्छ पाणी अशा गोष्टींनी संपन्न असलेले घर आणि पवित्र मनाला रमविणाऱ्या, धैर्यदायक गोष्टी ऐकण्यात मग्न व्यक्ती मोहरी, कडूनिंब, सैंधव, तूप यांसारख्या जंतुनाशक द्रव्यांचा धूप दिलेल्या जागा, धुपविलेली वस्त्रे आणि धूप देऊन संरक्षित व्रण असलेले रोगी यांच्यावर ह्या रक्षोभूत पिशाचांचे आक्रमण होत नाही. छत्रा, अतिछत्रा इ. प्रभावी वनस्पतींचे शरीरावर धारण करण्यानेही हे टळते. सिंहाच्या भीतीने इतर पशूंनी पळून जावे तसे हे ग्रह वरील व्यक्ती, स्थान आणि घरापासून पळून जातात किंबहुना जवळ येत नाहीत असे रूपक शास्त्रकारांनी योजून हे वर्णन केले आहे.

ग्रहांची पीडा कुणाला होते ? : या जन्मी किंवा पूर्वजन्मी केलेल्या बुद्धिपूर्वक दोषांमुळे, कामक्रोधादींच्या आहारी जाऊन धर्म, व्रते, आचार यांचा लोप झाला, देव, गुरू, आई, वडील इत्यादींचा अनादर घडला, सन्मार्गापासून दुरावला, आत्मघातकी व पापीवृत्ती वाढली की, ग्रहांची पीडा होते म्हणजेच अपवित्र आचार व आरोग्य व धर्मशास्त्राच्या आज्ञांचे उल्लंघन करणारांवर ग्रहांचे आक्रमण होते.

पापकर्म, अनाचार यांमुळे देह आणि मन यांत छिद्र म्हणजे व्यंग उत्पन्न होते. व्यंगाच्या मार्गानेच ग्रहांचा प्रवेश मिळतो. उदा., निर्जन अथवा ओसाड जागेत जाणे, रात्री स्मशानात राहणे, नग्नावस्थेत वावरणे, गुरूंची निंदा, शास्त्राने निषिद्व मानलेल्या व वेड्यावाकड्या प्रकारे विषयसेवन करणे, अपवित्र आणि मलिन देह मनःस्थितीत देवादिकांची पूजा करणे, आप्तांचे शास्त्रविहित जननाशौच किंवा मृताशौच न पाळणे, होमहवन, मंत्रे, जप बलिदानादि कार्ये यथाविधी न करणे आणि एकूण स्वास्थ्य संरक्षणासाठी दिनचर्या, ऋतुचर्या इ. दृष्टीने जो आहार आणि आचार त्याचप्रमाणे सद्‌वृत म्हणून जे नियम शास्त्राने सांगितले आहेत [→ स्वस्थवृत्त] त्यांचे परिपालन न करणे ह्या सर्वांनाच पाप, छिद्र किंवा व्यंग म्हणावे.

ग्रहांची नावे : देव, गुरू, पितर, गंधर्व, यक्ष, रक्ष, राक्षस, ब्रह्मराक्षस, प्रेत, उरग, पिशाच, कुष्मांड, निषाद, औकिरण, भूत, वेताळ अशी ही ग्रहांची नावे स्वरूप, कार्य, त्याचप्रमाणे व्यंग उत्पन्न झालेल्या व्यक्तींची शारीर व मानसिक स्थिती यांवरून जाणावयाची आहेत.

बालग्रह : देव, दैत्य, पितरादि ग्रह प्रौढ वयाच्या मानवाला पीडा करतात परंतु आईच्या अथवा दाईच्या पूर्वकृत दोषांमुळे अथवा अपवित्र आचारामुळे बालकांनाच काही ग्रह त्रास देतात. निरनिराळे विकार उत्पन्न करतात किंवा बालकांचा प्राणनाशही करतात. (१) स्कंदग्रह, (२) स्कंदापस्मार, (३) शकुनी, (४) रेवती, (५) पूतना, (६) अंधपूतना, (७) शीतपूतना, (८) मुखमंडिका आणि (९) नैगमेष अशी त्या ग्रहांची नावे आहेत.

बालकावर आक्रमण करणारे हे ग्रह काही स्त्री-देहधारी तसे काही पुरुष-देहधारी आहेत. अत्यंत विरल म्हणजे सूक्ष्म देहाचे हे ग्रह डोळ्यांना दिसत नाहीत.

ग्रहांच्या आवेशाचा उद्देश व साध्यासाध्यत्व : (१) हिंसा करण्याच्या उद्देशाने ग्रह ज्या व्यक्तीत प्रवेश करतो ती व्यक्ती अग्नीत प्रवेश करते, पाण्यात बुडी मारते, खोल खड्ड्यात उडी घेते, शस्त्र, काष्ठ, दगड इ. जे हाती येईल त्याने किंवा मुष्टिप्रहाराने स्वतःचा किंवा परक्याचा प्राणघात करण्यास प्रवृत्त होते ही त्या ग्रहाची आवेशसूचक स्थिती होय. या अवस्थेत नाक गळणे, कण्हणे व शरीराला दुर्गंध ही लक्षणे असतात.

(२) केवळ खेळ म्हणून स्वतःचे रंजन करून घेण्यासाठी काही ग्रह प्रविष्ट होतात, दुसरे काही ग्रह स्वतःची पूजा व सन्मान करवून घेण्याच्या उद्देशाने प्रविष्ट होतात हे दोन्ही प्रकार साध्य होत असतात. अतिसूक्ष्म देहामुळे हे कोठेही प्रवेश करू शकतात. आरशात जसे प्रतिबिंब शिरताना दिसत नाही तसा ह्या ग्रहांचा प्रवेश दिसत नाही.

अशा ग्रहांना रतिकाम असेही नाव आहे. रती शब्दाचा जसा क्रीडा अर्थ, तसाच विषयसेवन असाही अर्थ आहे. त्या दृष्टीने हे ग्रह जेव्हा बालकाच्या शरीरात प्रविष्ट होतात तेव्हा त्या बालकाला स्त्रियांत बसणे, बोलणे आवडते त्यांनी आपणास उचलून जवळ घ्यावे, लाड करावे असे वाटते.

प्रौढ व्यक्ती जेव्हा ह्या ग्रहांनी आविष्ट होतात तेव्हा त्यांनाही स्त्रियांनी एकांतात रममाण होणे व त्याच्यांशी गप्पागोष्टी करण्याने संतोष वाटतो. अशा व्यक्ती स्वभावाने शांत, आनंदी असतात व अलंकार, पुष्पमाला इ. धारण करण्याची त्यांना आवड असते.

(३) पूजा इच्छुक व समानेच्छुक ग्रहपीडा लक्षणे : दीनवाणा, तोंडावरून वारंवार हात फिरवणारा, असा मनुष्य ह्या ग्रहपीडेने होतो. त्याचा गळा व टाळू सुकणे, शंकित मुद्रेने पाहण्याची वृत्ती, रडणे, चिंतामग्न असणे, गयावया करणे, खाण्याची इच्छा असून विशेष न खाणे ह्या चिन्हांनी ओळखता येते. ही अवस्था सुखसाध्य असते.

बालकाची सूचक लक्षणे : मूल एकसारखे रडते, ताप भरतो, त्रासिक बनते, जांभया येणे, भुवया उडणे, ग्लानी, तोंडाला फेस, दृष्टी वर लागणे, दातांनी ओठ चावणे, निद्रानाश, तोंडातल्या तोंडात पुटपुटणे, स्तनपानाचा तिटकारा, आवाज बिघडणे, कारण नसताच आईच्या, दाईच्या किंवा स्वतःच्याच अंगाला ओरबडणे ह्या सूचक चिन्हांवरूनही बालक कोणत्या तरी ग्रहाच्या आवेशाने पीडीत आहे असे समजावे.

बालकांना पीडाकर पुरुषाकृती ग्रहावेशाची लक्षणे : (१) स्कंदग्रह : एका डोळ्यातून स्राव होणे, डोके वारंवार हलवीत असणे, शरीराची एक बाजू लुळी होणे, अंग ताठरणे, घाम येणे, मान खाली वळणे, दात  खाणे, स्तनपानाचा तिटकारा, त्रस्तवृत्ती, रडणे, आवाज बिघडणे, तोंड वाकडे होणे, लाळयुक्त वांती, ऊर्ध्व दृष्टी, चरबी किंवा रक्तासारखा गंध अंगाला येणे, चेहरा खिन्न, मलप्रवृत्तीच्या वेळी मुठी वळलेल्या असणे, एकाच डोळ्याचे, गालाचे, भुवईचे स्मरण आणि दोन्ही डोळे लाल असणे ही स्कंद ग्रहपीडेची लक्षणे होत.


ह्या लक्षणांपैकी हाताच्या मुठी घट्ट वळलेल्या असून मलप्रवृत्तीसुद्धा जर अतिघट्ट असेल, तर अशा लक्षणांचा बालक व्यंग होऊन जगत राहतो किंवा त्वरित मरतो.

(२) विशाखाग्रह : स्कंद ग्रहाचेच हे एक नाव आहे. स्कंदापस्मार अशाही नावाने ग्रंथातून उल्लेख आहे. संज्ञानाश, वरचेवर स्वतःचेच केस उपटणे, मान खाली वळलेली, जांभई देताना खाली वाकणे व तेव्हा मलमूत्रप्रवृत्ती होणे, फेसाळ वांती, सारखे वर पाहत असणे, हातपाय, भुवया वरचेवर नाचवणे, स्तनपान करताना चावणे, जीभ चावणे, रागावणे, ज्वर, जागरण आणि अंगाला पू वा रक्तासारखा दुर्गंध येणे ही लक्षणे होतात.

(३) मेषग्रह : यालाच नैगमेष नाव आहे. ह्याची पीडा झाली असता पोट फुगणे, वारंवार हातपाय हालवणे, तोंडातून फेस, तहान, हाताच्या मुठी वळलेल्या, अतिसार, आवाज खोल, मूळचा वर्ण बदलणे, तोंडातल्या तोंडात पुटपुटणे, कुंथणे, वांती, खोकला, उचकी, जागरण, ओठ चावणे, अंग आखडणे, ताठणे, बोकडाच्या अंगासारखा गंध, वर पाहून हसणे, माध्यान्ह समयी शरीर वाकणे, ताप, मूर्च्छा आणि एका डोळ्यावर सूज ही लक्षणे होतात.

(४) श्व ग्रह : या ग्रहाने पीडित बालकाला कंप, अंगावर रोमांच, घाम येणे, डोळे मिटून घेणे, शरीर पाठीच्या बाजूकडे वाकणे, जीभ चावणे, गळ्यामध्ये आतल्या आत घुरघुर, धावत सुटणे, मलासारखा दुर्गंध आणि ओरडणे ह्या उपद्रवांनी त्रास होत असतो.

(५) पितृग्रह : अंगावर रोमांच, वारंवार त्रस्त होणे, एकाएकीच रडणे, ताप, खोकला, अतिसार, वांती, जांभई, तहान, अंगाला प्रेतासारखा दुर्गंध, झटके येणे, ताठणे, अवयव वाळणे, रंग बदलणे, मुठी बांधलेल्या असणे, डोळ्यातून स्राव ह्या लक्षणांनी हा ग्रह बालकांना पीडा देतो व थोरांनाही देतो.

स्त्री-देहधारी ग्रहपीडा : (१) शकुनी ग्रह : अवयव गळल्यासारखे होणे, अतिसार, जीभ, टाळूत व गळ्यात व्रण, अंगावर फोड व त्यात दाह, पीडा होऊन ते पिकणे, विशेषतः हे फोड सांध्यावर होणे व रात्री उमटून दिवसा मावळणे असे वारंवार घडत राहणे, तोंड व गुरुद्वाराच्या ठिकाणी पुरळ वा पिकणे, भीती वाटणे, पक्षांच्या शरीरासारखा गंध आणि ज्वर ह्या लक्षणांनी पीडाकार असतो.

(२) पूतना ग्रह : वांती, कंप, डोळ्यांवर झापड, रात्री जागरण, उचकी, पोट फुगणे, मल पातळ होणे, तहान, लघवी अडणे, अंग गळणे व रोमांच येणे आणि शरीराला कावळ्याच्या देहासारखा दुर्गंध येणे हे उपद्रव संभवतात.

(३) शीतपूतना ग्रह : कंप, रडणे, तिरक्या दृष्टिने पाहणे, तहान, आतड्यात गुरगुर, अतिसार, शरीराला चरबीसारखा दुर्गंध, शरीराची एक बाजू थंड व दुसरी उष्ण असणे अशा लक्षणांचा त्रास होतो.

(४) अंधपूतना ग्रह : वांती, ताप, खोकला, झोप कमी, मलप्रवृत्ती पातळ स्वरूपाची, विवर्णता, शरीराला दुर्गंध व कोणते तरी एक अंग वाळणे, दृष्टी क्षीण होणे, वेदना फार, खाजही फार, डोळ्यात रांजवाड्या व सूज असणे, उचकी, उद्वेग, स्तनपानाचा तिटकारा, आवाजात तीक्ष्णता, कंप, शरीराला माशासारखा किंवा आंबट वास येणे, अशी पीडा होते.

(५) मुखमंडिता ग्रह : हात, पाय व तोंडावर एका विशिष्ट प्रकारची सुंदरता निर्माण होणे, संपूर्ण पोटावर काळ्या शिरा उमटणे, ताप, अरुची, सर्व अंग गळल्यासारखे होणे, अंगाला गोमूत्रासारखा वास येणे ही लक्षणे होतात.

(६) रेवती ग्रह : शरीर काळसर निळसर पडणे बालकाने नाक, कान चोळणे, खोकला, उचकी, डोळे फडफडणे, तोंड वाकडे होणे, शरीराची लाली नष्ट होणे व बोकडासारखा दुर्गंध शरीराला येणे, ताप, शरीर सुकणे व हिरवट पातळ अशी मलप्रवृत्ती होणे ह्या लक्षणांवरून रेवती ग्रहपीडा ओळखावी.

(७) शुष्क रेवती ग्रह : क्रमश: सर्व अंग शुष्क होत जाणे हेच ह्या ग्रहाचे विशेष लक्षण होय. शिवाय ह्या शुष्क रेवती ग्रहांची पीडा झालेले बालक सतत खा-खा करीत असूनही वाळतच जाते, तहानही खूप लागते व सगळी इंद्रिये ग्लान होतात. अशा वेळी ह्या ग्रहपीडेने बालकाचा मृत्यूच ओढवतो.

असाध्य लक्षणे : केस गळणे, अन्नाचा तिटकारा, आवाज खोल जाणे, शरीराचा वर्ण बदलणे, रडणे, गिधाड पक्षांच्या अंगासारखा शरीराला दुर्गंध, पोटात वाटोळ्या गाठी होणे, निरनिराळ्या रंगाची मलप्रवृत्ती, जीभ मध्यभागी खोल खोल झाल्यासारखी आणि टाळू काळी पडणे ह्या लक्षणांनी युक्त रोगी सहसा जगत नाही.

ग्रहांच्या पीडेवरील सर्वसामान्य उपचार : उपचारकाने स्वतः स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी, नंतर घरातील स्वच्छ जागेत पवित्र विचारपूर्वक बालकाला जुन्या तुपाचे अभ्यंग करून स्नान घालावे, सरसूच्या तेलाचा दीप तेवत ठेवावा. त्या जागेतही सरसू पसरावेत. बालकाच्या त्या खोलीत अग्नीला आहुती देऊन तो नित्य प्रज्वलित ठेवावा. हवनात सर्व सुगंधी द्रव्ये, बीजे, सुगंधी पदार्थ असावेत. बालकाच्याही अंगावर सुगंधीद्रव्ये व पुष्पमाला घालून ‘अग्नये कृत्तिकाम्यश्च स्वाहा’ असा मंत्र म्हणून हवन करावे व मंत्रोक्त ग्रहप्रार्थना करावी.

(अ) स्कंद ग्रहाच्या पीडेवर उपचार : (१) तीन दिवसांपर्यंत रात्री चव्हाट्यावर बालकाला स्नान घालावे , (२) गायत्री मंत्राने पाणी अभिमंत्रित करून ते नवे शालिधान्य व नव्या यवावर शिंपावे, (३) वातनाशक अशा एरंड, निर्गुडीसारख्या पानांनी युक्त पाणी उकळून ते पाणी बालकाच्या स्नानासाठी वापरावे, (४) ह्याच वातनाशक वनस्पतींच्या मुळांनी सिद्ध केलेले व त्यात सर्व सुगंधीद्रव्ये, मद्याची निवळ, बकाणा निंबाचा रस मिश्र केलेले तेल अभ्यंगासाठी वापरावे, (५) तांबड्या फुलांच्या माळा, तांबड्या पताका, तांबडे गंध, निरनिराळे भक्ष्य पदार्थ, घंटा अर्पण करून कोंबडे बळी देणे, (६) देवदार, रास्ना किंवा इतर मधुर रसाच्या औषधांनी सिद्ध केलेले तूप बालकाला पाजावे, (७) शिरस, सापाची कात, वेखंड, बांडगूळ यांनी सिद्ध केलेले तूप व उंट, शेळी आणि गाईचे केस यांचा धूप द्यावा, (८) कुत्र्याचे मूत्र, मल व केस मोराची पिसे, वेखंड, शिरस आणि तूप यांचा धूप सर्वग्रहपीडानाशक आहे, (९) शिरस, निंबाची पाने व मूळ, गोकर्ण मूळ, वेखंड, भूर्जपत्र आणि तूप यांचाही धूप सर्वग्रहपीडानाशक आहे, (१०) घाणेऱ्या करंजाचे मूळ पाने, साल, नार, फुले, फळे, कोवळे अंकुर, स्वरस आणि काढे यांनी सिद्ध केलेले दूध, मोहरी, वेखंड, बिब्बा, ओवा, कोष्ठ आणि तूप यांचाही धूप सर्वग्रहनाशक आहे. या धूपात हत्ती, वाघ, सिंह, साप व अस्वलाचे कातडेही वापरावे. (११) उपळसरी, सालई, ब्राही, साखवेल, कोष्ठ, मोहरी, वेखंड, आस्कंद, तुळस यांनी तूप सिद्ध करून ते बालकाला पिण्यासाठी व अभ्यंगासाठी वापरावे. सर्व आपत्तींचा नाश होतो. (१२) गाईचे वा कोणत्याही पशूचे शिंग, चामडे, केस, सापाची कात, मांजराची विष्ठा, निंबाची पाने, शेळीचे तूप, कुटकी, गेळफळ, रिंगणी, डोरली, कापसाच्या बिया (सरकी), जव, बोकडाचे केस, देवदार, मोराची पिसे, कमळ, कोंडा, केस आणि हिंग ही सर्व बारीक करून बोकडाच्या मूत्राची भावना देऊन धूप द्यावा, (१३) याशिवाय बालकाला हे उपचार करण्यासाठी निवांत, सारवून, शिंपून स्वच्छ केलेल्या घरात ठेवावे. जागेत सर्वत्र ओवा, फुले, पाने, बीजे, अन्नकण, शिरस पसरावेत, रक्षोघ्न तेलाचा दिवा प्रज्वलित ठेवावा. शुद्धाचरणी, विषयसेवनापासून अलिप्त व मद्यमांस न खाणारी परिचारिका शुश्रूषेस असावी.


(आ) स्कंदापस्मार पीडा निवारण : (१) अभ्यंग : सर्व सुगंधी पदार्थांनी युक्त औषधींनी सिद्ध केलेल्या तेलाचे अभ्यंग करावे. (२) स्नान : चार रस्ते मिळतात तेथे बेलमूळ, शिरस आणि दूर्वा व सुरसादि गणातील औषधी उकळून केलेल्या पाण्याचे स्नान. (३) उटणे : वेखंड आणि हिंग ह्या औषधींचा उटणे लावण्यासाठी उपयोग. (४) धूप : गिधाड व घुबड ह्या पक्ष्यांची विष्ठा व केस, हत्तीची नखे आणि बैलाचे केस ह्यांचा तुपातून कालवलेला धूप जाळावा. (५) गळ्यात किंवा हातात बांधणे : अनंतमूळ, तोंडलीचे मूळ किंवा कुहिलीचे मूळ. (६) नैवेद्य : कच्चे व शिजवलेले मांस, मद्य, रक्त, दूध यांचा नैवेद्य आडरस्त्यावर ठेवावा. (७) घृतपान : वड, पिंपळ, उंबर इ. क्षीरीवृक्षांच्या साली त्याचप्रमाणे काकोल्यादि गणातील औषधींनी सिद्ध केलेले तूप दूध घालून पिण्यास देणे.

(इ) शकुनी ग्रहपीडा-निवारण : (१) अभ्यंग : तुरट व मधुरसाच्या औषधींनी सिद्ध केलेले तेल. (२) वेत, आंबा, कवठ या झाडांची पाने उकळवलेल्या पाण्याने बागेत स्नान घालावे. (३) धूप : व्रण विकृतीत सांगितलेल्या औषधांचा धूप. (४) गळ्यात अथवा कमरेला बांधणे : शतावरी, इंद्रायण, दाती, निर्गुडी, लक्ष्मणा, सहदेवी आणि रिंगणी यांतून मिळतील त्या औषधांच्या मुळांचे धारण. (५) तीळ व तांदूळ हे पदार्थ नैवेद्य म्हणून व हरताळ, मनशीळ ह्या द्रव्यांचे मुकाट्याने बागेत ठेवून समर्पण. (६) घृतपान : स्कंद ग्रहासाठी सांगितलेले तूप व दूध घालून पिण्यास द्यावे.

(ई) रेवती ग्रहपीडा निवारण : (१) अभ्यंग : कोष्ठ, राळ, धूप, देवनळ (जटामांसी) यांनी सिद्ध केलेले तेल. (२) स्नान : संगमावर आई किंवा दाईसह जाऊन आस्कंद, मेंढशिंगी, उपळसरी, पुनर्नवा, कोरांटी व भुईकोहळा यांच्या काढ्याने स्नान. (३) उटणे : कुळीथ, शंखचूर्ण आणि सुगंधी द्रव्ये. (४) धूप : गिधाड व घुबडाची विष्ठा आणि बांबूचे जव तुपात मिश्र करून दोन्ही वेळ धूप. (५) अंगावर धारण : वायवर्णा, रिठा, निर्गुडी, पुत्रजीववृक्ष यांची फुले. (६) नैवेद्य : गोतीर्थावर लाह्या, दूध, भात ह्यांचा नैवेद्य ठेवून पांढरी फुले अर्पण. (७) घृतपान : धावडा, राळेचा वृक्ष, अर्जुन वृक्ष, धायटी आणि काकोल्यादि गणातील औषधींनी सिद्ध घृत दूध घालून पिणे.

(उ) पूतना ग्रहपीडा निवारण : (१) अभ्यंग : वेखंड, ब्राह्मी, दूर्वा, हरताळ, मनशीळ, कोष्ठ व राळ यांनी सिद्ध तेल, (२) स्नान : ब्राह्मी, टेटू, वायवर्णा, निंब, उपळसरी यांनी सिद्ध पाणी शिळे वापरावे. (३) धूप : कोष्ठ, तालीसपात्र, खैर, चंदन, तिवस, देवदार, वेखंड, हिंग, वेलची, रेणुकबीज, मुंगुसवेल, कुंभी, बोराच्या आठळीतील मगज, खेकड्याचे हाड व मोहरी यांचा तूपातून धूप. (४) धारण : तांबडी गुंज, इंद्रायण, तोंडली व पांढऱ्या गुंजा. (५) नैवेद्य : भात, मासे, खिचडी, मांस यांचा नैवेद्य ओसाड घरात, शराव संपुटात ठेवावा.

(ऊ) अंधपूतना ग्रहपीडा निवारण : (१) अभ्यंग : मद्य, कांजी, कोष्ठ, हरताळ, मनशीळ व राळ सिद्ध तेल. (२) स्नान : निंबासारख्या कडू रसाच्या द्रव्याचे उकळलेले पाणी चव्हाट्यावर आणि बालकाच्या खोलीत घालावे. (३) उटणे : सर्व सुगंधी व शीत द्रव्यांचे उटणे अंगाला व डोळ्यांनाही लावणे. (४) धूप : कोंबड्याची विष्ठा, केस व चामडे, सापाची त्वचा व बौद्ध भिक्षूच्या अंगावरची जुनी छाटी यांचा धूप. (५) धारण : सावरी, कुहिलीची शेंग व उपळसरी. (६) नैवेद्य : कच्चे किंवा शिजलेले मांस, रक्त यांचा नैवेद्य चव्हाट्यावर आणि  बालकाच्या खोलीतही ठेवावा. (७) घृतपान : पिंपळी, पिंपळमूळ, सालवण, रिंगणी, डोरली व मधुर गणातील औषधे यांनी सिद्ध केलेले घृत.

 

(ए) शीतपूतना ग्रहपीडा निवारण : (१) अभ्यंग : बोकडाचे मूत्र, गोमूत्र, नागरमोथा, देवदार, कोष्ठ आणि एलादि गणातील सर्व सुगंधी द्रव्ये यांनी सिद्ध केलेले तेल. (२) स्नान : जलाशयाच्या जवळ कवठ रास्ना, तोंडली, बेल, प्रचीबल वनस्पती नांदूरली व बिब्बा यांनी सिद्ध केलेले पाणी. (३) धूप : गिधाड, घुबडाची विष्ठा, रानतुळस, सर्पाची कात, निंबाची पाने व ज्येष्ठमध. (४) धारण : भोपळी, गुंज, मंजिष्ठ यांचे मूळ, साल इत्यादी. (५) बळी : नदीच्या काठी मूगयुक्त खिचडी, मध व रक्त. (६) घृतपान : कुटकी, राळ, खैर, पळस व अर्जुनसाल यांच्या काढ्यात दूध घालून सिद्ध केलेले तूप.

(ऐ) मुखमंडिका ग्रहपीडा निवारण : (१) अभ्यंग : माका, रानतुळस, आस्कंद यांनी सिद्ध केलेले तेल. (२) स्नान : कवठ, बेल, टहाकळ, वंशलोचन, एरंड व सागरगोटा यांनी उकळलेले पाणी स्नानासारखे झाल्यावर गोठ्यात स्नान घालावे. (३) धारण : चाष व घार पक्षी यांची किंवा सर्पाची जीभ. (४) धूप : वेखंड, राळ, कोष्ठ व तूप. (५) बली : गोरोचन, भाजक्या तांदळाचे पीठ, पुष्पमाला, सुरमा, पारा, मनशीळ ही द्रव्ये व तांदळाची खीर खापरात घालून गोठ्यात बली ठेवावा. (६) घृतपान : मोरवेल आणि गाईचे दूध यांत सिद्ध केलेले किंवा वंशलोचन व दूध यांत सिद्ध केलेले अथवा मधुर द्रव्यांचा गण आणि पंचमूल द्रव्यांचा गण यांनी सिद्ध केलेले तूप.

 

(ओ) नैगमेष ग्रहपीडा निवारण : (१) अभ्यंग : गहूला, देवदार, अनंतमूळ , बडीशेप, तगर यांत गोमूत्र, दह्याची निवळ व आंबट कांजी घालून सिद्ध केलेले तेल. (२) स्नान : बैल, टहाकळ, करंज यांनी सिद्ध केलेले जल किंवा मद्य,कांजी व धान्याम्ल यांनीही वडाच्या झाडाखाली स्नान घालावे. (३) धारण : वेखंड, गुळवेल, दूर्वा व जटामांसी. (४) उटणे : ह्याच वस्तूंचे. (५) धूप : मोहरी, वेखंड, हिंग, कोष्ठ, यव, बिब्बा आणि अजगोदा किंवा माकड, घुबड, गिधाड यांच्या पुरीषाचा धूप रात्री सर्व झोपले असता द्यावा. (६) नैवेद्य किंवा बली : तीळ, तांदूळ, निरनिराळे मोदक, लाडू इ. भक्ष्य पदार्थ षष्ठी तिथीला वडाच्या झाडाखाली देणे. (७) घृतपान : दशमूळ काढा, दूध, मधुर गणातील औषधे व खजूर सिद्ध घृत.

सर्वग्रहनाशन धूप : (१) तूप गुग्गुळ, (२) तूप व देवदार, (३) काळा अगर आणि तूप, (४) मोहऱ्या व तूप, (५) गवताचे मूळ, पाने, सार, फुले, फळे आणि साल. हे सर्व धूप तूपाबरोबर द्यावयाचे असतात.

ग्रहावेशाची पूर्वलक्षणे : हे सर्वही ग्रह आपल्या कोट्यावधी, अब्जावधी अनुचरांच्या द्वारे पीडा देतात. यातील काही रक्त खाणारे, काही चरबी खाणारे, काही मांसभोजी असतात. हे वृत्तीने महाभयंकर असून रात्री संचार करतात व मानव देहात प्रविष्ट होतात.

देव, गाय, ब्राह्मण व तपस्वी यांची हिंसा करण्याकडे प्रवृत्ती, क्रोध लवकर येणे, निंद्य कर्मे करण्याकडे मनाचा ओढा, निरुत्साह, ओज, वर्ण, बल, छाया आणि शरीर यांचा ऱ्हास, स्वप्नात देवादिकांकडून निंदा इ. सूचक लक्षणे नंतर उन्माद रोगासारखी सर्व चिन्हे होतात.

अंतकाळी ग्रहांची उपस्थिती : प्रेत, भूत, पिशाच आणि नानाविध रक्षस् हे मानवांच्या मृत्युसमयी नेहमी उपस्थित असतात. भूत हे यमदूतांना म्हटले असून मांसभोजी (पिशिताशन) जीवांना पिशाच म्हटले आहे. रक्षस्‌चा अर्थ सूक्ष्म जंतू असा पूर्वी सांगितला आहेच.

मृत्यूनंतर होणारा पुनर्जन्म कृतकर्माच्या शुभाशुभ फलभोगासाठीच होत असतो. भूत पिशाचादि योनी प्राप्त होणे हे त्यावर अवलंबून असते. हिंसा, विहार करण्यासाठी त्यांना देवभाव म्हणजे सूक्ष्मदेहरूपाने प्रवेश करण्याची शक्ती प्राप्त होते, त्यांना शास्त्रात भूत म्हटले आहे.


निरनिराळ्या ग्रहांच्या आवेशाची लक्षणे : (१) देवग्रहावेश : विकसित कमलासारखा प्रसन्न चेहरा, सौम्य दृष्टी, न रागावणे, अल्प भाषण, घाम व मलमूत्रप्रवृत्ती अल्प, जेवणाची इच्छा नसणे, देव, ब्राह्मणांवर श्रद्धा, पवित्र राहणी, भाषण संस्कारयुक्त आणि अपशब्दरहित, बऱ्याच वेळाने डोळ्याची उघडझाप, अंगाला सुगंध, सुगंधी पदार्थ आणि पुष्पमालांची आवड, वर द्यावा अशी वृत्ती, पांढऱ्या शुभ्र फुलांच्या माळा आणि तशाच वस्त्रांची आवड, झोप नसणे, भीती न वाटणे व नित्य संतुष्टता.

(२) दैत्यग्रहावेश : वाकडी नजर, दुष्ट स्वभाव, देव, ब्राह्मण, गुरूद्वेष, निर्भय, आपल्या रूप गुणांचा अभिमान, शूर, रागीट, उलाढाली स्वभाव, ‘मी रुद्र, स्कंद, कार्तिकेय आहे’. असे बोलणे, मद्यमांसाची आवड. घाम फार आणि खानपानाची नित्य संतुष्टता.

(३) गंधर्वग्रहावेश : सभ्यतेची वागणूक, सुगंध, प्रीती, आनंदी वृत्ती, गाणे, नाचणे, स्नान, उद्यान विहार, तांबडी वस्त्रे, माळा, उटी, गंध इ. सर्व तांबड्या रंगाचे आवडणे, नित्य साज शृंगार व क्रीडा मग्न असणे आणि वाळवंटात भटकण्याचा स्वभाव.

(४) नागग्रहावेश : डोळे तांबडे लाल, रागीट स्वभाव, निश्चल दृष्टी, वाकडी व सरपटत चालण्याची प्रवृत्ती, चंचल स्वभाव, श्वासोच्छ्‌वास क्रिया रात्रंदिवस जोरात चालू असणे, वारंवार जीभ बाहेर काढून ओठ चावण्याची प्रवृत्ती, तूप, मध, गूळ, खीर यांची आवड, स्नान प्रियता, तोंड खाली घालून झोपण्याची प्रवृत्ती, छत्रीला भिणे.

(५) यक्ष (कौबेर) ग्रहावेश : चंचल आणि त्रासिक व तांबडे डोळे, अंगाला सुवास, चेहरा तेजस्वी, नृत्य, गायन, स्नान, माळा, उटणे यांची आवड. मासे आणि मांसाची अभिरुची, आनंदी व संतुष्ट वृत्ती, बल चांगले, कोणतीही पीडा नसणे, हाताचे पंजे थरथरत असणे, ‘कुणाला काय देऊ?’ अशी भाषा, गुप्त गोष्टी सांगणे, वैद्य, ब्राह्मण यांच्याविषयी तिरस्कार, किंचित रागीट स्वभाव, चालण्याची गती जलद, झिरझिरीत व तांबडी वस्त्रे वापरण्याची आवड, मित भाषण आणि सहिष्णू वृत्ती.

(६) ब्रह्मराक्षसावेश : हसणे व नाचण्याची आवड, भयंकर कामे करणे, व्यंग दिसेल तेथे हल्ला करण्याची प्रवृत्ती, मोठ्याने ओरडणे, जलद चाल, देव, ब्राम्हण, वैद्य यांचा द्वेष, स्वतःलाच काष्ठशस्त्रादींनी मारणे, ‘भोः’ अशा शब्दाने बोलण्यास प्रारंभ करणे, शास्त्रे आणि वेदाचे पठन करीत असणे.

(७) राक्षसग्रह (रक्षस्) आवेश : रागीट नजर, भुवया उडविण्याची सवय, कुणालाही मारीत सुटणे, धावत सुटणे, आरडाओरडा करणे, तोंडाचा आकार भयंकर, अन्न न खाताही बळ कायम असणे, झोप नाही, रात्री हिंडण्याची प्रवृत्ती निर्लज्जता, अपवित्र राहणी, शूर, क्रूर, कठोर बोलण्याची प्रवृत्ती, रागावणे, तांबड्या माळा घालणे, स्त्री, मद्य आणि मांस यांविषयीची आसक्ती. रक्त व मांस पाहूनच जिभल्या चाटू लागणे, अन्न खाण्याच्या वेळी हसणे.

(८) पिशाच ग्रहावेश : अस्वस्थ चित्त, एकाच ठिकाणी न बसता धावत सुटण्याची प्रवृत्ती, उष्टे अन्न, मांस, मद्य, नाच, गाणे, हसणे यांची आवड. निंदास्पद किंवा तिरस्कारयुक्त भाषण ऐकून दीनवदन होणे, विनाकारण रडणे, नखांनी स्वतःलाच ओरबडणे, शरीर रुक्ष, आवाज पडलेला, दुःखे निवेदन करण्याची प्रवृत्ती, विसंगत तुटक भाषण, स्मरण नसणे, निर्जन अथवा ओसाड जागेत राहण्याची प्रवृत्ती, चपलता, नग्न शरीर, ओंगळ राहणी , रस्त्यात पडलेली फाटकी वस्त्रे वापरणे, गवताच्या काड्यांची माळ घालणे, काठीचा घोडा करून त्यावर बसणे, उकिरड्यावर बसणे आणि खादाड वृत्ती .

(९) प्रेत ग्रहावेश : चेहरा प्रेतासारखा, पडून राहणे हाच आचार, शरीराला अगदी प्रेतासारखा गंध, भीरू वृत्ती, आहाराचा तिटकारा, गवत दर्भाप्रमाणे मोडण्याची खोड.

(१०) कूष्मांडावेश : अत्यंत बडबड, तोंड काळे, अती सावकाश गमन, अंडकोश सुजलेले व खूप लांबलेले असणे.

(११) निषाद ग्रहावेश : हातात लाकूड वा दगड घेऊन हिंडणे, फाटकी वस्त्रे वापरणे, नग्न राहणे, धावणे, नजर त्रासिक, गवताचे अंलकार घालणे, स्मशान, ओसाड जागा, वापरण्यात नसलेला रस्ता किंवा झाडावर राहणे, तिळाचे पदार्थ, मद्य, मांस यांवर दृष्टी व कठोर भाषण.

(१२) औकिरण ग्रहावेश : पाणी आणि अन्न मागत असणे, नजर त्रासिक, डोळे लाल आणि कठोर बोलण्याची वृत्ती.

(१३) वेताळ ग्रहावेश : सुगंधी पदार्थ आणि माळांची आवड, सत्यभाषणाची प्रवृत्ती, देह थरथर कापत असणे व अती निद्रा.

(१४) पितृग्रहावेश : अप्रसन्न दृष्टी, दीनवदन, तालुशुष्कता, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप लवकर होणे, झोप फार, पचनक्रिया मंद, उजव्या खांद्यावरून वस्त्र परिधान, तीळ, मांस आणि गूळ ह्या पदार्थांची अती आवड, अडखळत बोलण्याची प्रवृत्ती, जेवू नये असे वाटत असते, अरुची आणि अपचन होते.

(१५, १६, १७, १८) गुरू, वृद्ध, ऋषी व सिद्धपुरुषांचा आवेश : ह्या सर्वांना जे अभिशाप असतील, त्यांच्या ज्या चिंतीत इच्छा, अपेक्षा असतील, तदनुसार त्यांचे आहार, उच्चार आणि वागणे होत असते.

ग्रहांच्या आवेशाचे काळ : (१) देवग्रह शुद्ध प्रतिपदा, त्रयोदशी किंवा पौर्णिमा ह्या दिवशी पवित्र आचार विचार आणि स्वाध्याय निरंताच्या ठिकाणी आवेश येतो.

(२) दैत्यग्रह : शुद्ध त्रयोदशी, वद्य त्रयोदशी किंवा संधिकाल म्हणजे पौर्णिमा, अमावास्या, व्यतीपात, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण, संक्रांत इ. पर्वकाळ, सूर्योदय, मध्यान्ह, सायंकाळ अथवा मध्यरात्र.

(३) गंधर्वग्रह : शुद्ध किंवा वद्य द्वादशी वा चतुर्दशीच्या तिथींना स्तुती, गीत, वादन व सुगंधप्रिय व्यक्तींना.

(४) नागग्रह : पंचमी तिथी.

(५) यक्ष (कुबेर) ग्रह : शुद्ध सप्तमी किंवा एकादशी तिथीला सत्य, बल, रूप, शौर्य आणि आचारनिष्ठ व्यक्तींना

(६) ब्रह्मराक्षस ग्रह : शुद्ध अष्टमी, पंचमी वा पौर्णिमा ह्या तिथींना स्वाध्याय, तप, उपवासनिष्ठ लोकांच्या ठिकाणी आवेश होतो.

(७) रक्षस् व पिशाच इ. ग्रह : वद्य नवमी द्वादशी अथवा पर्वकाळ ह्या दिवशी हीनसत्त्व, स्रैण व लुब्ध व्यक्तीच्या ठिकाणी आवेश होतो.

(८) पितृग्रह इत्यादी : अष्टमी, नवमी, अमावास्या, विशेषतः दर्श अमावास्या ह्या तिथींना माता, पिता, गुरू यांचे भक्त आणि एकांतवासी लोकांच्या ठिकाणी

(९) गुरू, वृद्ध, ऋषी, सिद्धपुरुष इत्यादींचा आवेशकाळ निरनिराळ्या पर्वकाळांच्या दिवशी पवित्र आचार आणि एकांतवासप्रिय व्यक्तींच्या ठिकाणी.

कुमारांसह आविष्ट होणारा ग्रह : (१) लहान लहान कुमारांसह आविष्ट होऊन पीडा करणारा ग्रह असाध्य असतो. ह्या ग्रहाने आविष्टव्यक्ती आपले केस मोकळे सोडणारी, अस्वस्थ मनाची आणि दीर्घकालावधीपर्यंत पीडा भोगून मरते. त्यासाठी गिधाड, घुबड, तरस यांची विष्ठा, चित्रक, बोकडाचे केस व कडुनिंबाची पाने यांचा धूप देणे हितावह होते.


भूतग्रहनाशक सर्वंकश योग : (१) हिंग, सुंठ, मिरे, पिंपळी, मनशीळ, लसूण, रुईचे मूळ, जटामांसी, कुहिली, दूर्वा, भूतकेशी, वेखंड, बडीशेप, देवडांगरी, सर्पगंधा, तीळ, काकोली, क्षीरकाकोली, निवडुंग, गुळवेल, मेढशिंगी, ब्राह्मी, सुरमा व मोहरी आणि इतर रक्षोघ्न औषधे शिवाय गाढव, घोडा, साळई पक्षी, उंट, अस्वल, सरड, मुंगूस, साळईच्याच जातीचा शल्यक पक्षी, हत्ती, मांजर, गाय किंवा बैल, सिंह, वाघ, समुद्रातले मासे, मगर इ. प्राणी यांचे चामडे, पित्त, दात आणि नखे यांच्या साहाय्याने सिद्ध केलेले तेल व जुने तूप.

(२) गजपिंपळी, पिंपळामूळ, सुंठ, मिरे, पिंपळी, आवळे, मोहरी, सरड, मुंगूस, मांजर, माशाचे पित्त वाटून नस्य अभ्यंग इ. प्रयोगात उपयोग.

(३) मोहरी, वेखंड, हिंग, गहूला, हळद, दारू हळद, मंजिष्ठ, पांढरी गुंज, त्रिफळा, पांढरी गोकर्णी, कडुनिंबाची पाने, करंज व शिरीष वृक्षांच्या बिया, देवदार, सुंठ, मिरे, पिंपळ यांत चौपट गोमूत्र घालून तूप सिद्ध करावे. हे सिद्धार्थक घृतपान, नस्य इ. कामी योजावे.

थोड्या फार फरकाने असे बरेच योग पान, नस्य, अभ्यंग, धूप, अंजन इ. दृष्टीने शास्त्रात वर्णिले आहेत.

ग्रहांचे बली : (१) देवग्रह : पवित्र आणि पांढऱ्या फुलांच्या माळा, सुगंधी द्रव्ये, दुधात केलेले खिरीसारखे पदार्थ, भात, दही आणि पांढरे छत्र.

(२) दैत्यग्रह : पिंपरी, वड, भोकर इ. बहुफल वृक्षांची फळे, वाळा, तांबडी व निळी कमळे.

(३) नागग्रह : फुले, लाह्या, गूळ, अनारसे, भात, खीर, मध, दूध, काळी माती, नागकेशर, वेखंड, कमळ, वाळा, तांबड्या कमळाची पाने.

(४) यक्ष ग्रह : दूध, दही, तूप, खिचडी, गुग्गुळ, देवदार, निळे कमळ, तांबडे कमळ, वाळा, वस्त्र, सुवर्ण.

(५) ब्रह्मराक्षस : जव भरलेली घागर, पाणी भरलेली कुंभ, मांस, छत्र, वस्त्र, चंदन.

(६) रक्षोग्रह : मांस, पांढरी फुले, खिचडी, कच्चे व शिजवलेले मांस आणि रक्तात भिजवलेले पावटे.

(७) पिशाच ग्रह : मद्य, पेंड, मांस, दही, मुळा, मीठ, तूप, आणि मांसयुक्त भात.

विशेष सूचना : (१) देव, ऋषी, पितृ आणि गंधर्व ग्रहांना तीक्ष्ण नस्ये वापरू नयेत, घृतपानादि सौम्यच उपचार व्हावेत.

(२) पिशाच ग्रहाशिवाय इतर कोणत्याही ग्रहाला प्रतिकूल उपचार करू नयेत. कारण देवदानवादि इतर सर्व ग्रह प्रतिकूल उपचारांनी क्रुद्ध होऊन आपल्या महत् सामर्थ्याने रोगी आणि उपचार करणारा वैद्य ह्या दोघांनाही ठार करतात.

(३) उन्माद आणि अपस्मार ह्या रोगांवरील उपचार ग्रहाविष्ट रोग्यांसाठीही उपयुक्त ठरतात.

जळूकर, दत्तात्रेयशास्त्री