ग्रसिका : (इसोफेगस गलेट). ग्रसनीपासून (घशापासून) जठरापर्यंत अन्न वाहून नेणाऱ्या मांसल नलिकेस ग्रसिका म्हणतात. ग्रसिकेची लांबी, रचना व कार्य निरनिराळ्या प्राण्यांत निरनिराळे असते. काही प्राण्यांत ती अन्न बारीक करण्याचे कार्य करते. काहींमध्ये तिच्या काही भागांत अन्न तात्पुरते साठवले जाते.
मानवी शरीरात अन्न वाहून नेण्याचे कार्य करणारी ही नलिका सु. २५ सेंमी. लांब असून तिचा व्यास १·२५ ते २·५० सेंमी. असतो. तिचा सुरुवातीचा व शेवटचा भाग मध्यरेषेच्या डाव्या बाजूस असतो. सुरुवातीचा भाग ग्रीवेत (मानेत), मधला वक्षात (छातीत) व शेवटचा (२·५० सेंमी.) उदरात असतो. निष्क्रियावस्थेत ग्रसिका संपूर्ण चपटी असते. पृष्ठवंशाला (पाठीच्या कण्याला) अग्रपश्च (पुढून पाठीमागील) पातळीत जसे बाक असतात तसेच अग्रपश्च बाक ग्रसिकेलाही असतात. दहाव्या वक्षीय कशेरुकाजवळ (मणक्याजवळ) मध्यपटलातील (छाती व पोटाच्या पोकळ्यांमधील पटलातील) ग्रसिकाछिद्रातून ती उदरात शिरते व जठरास मिळते. दोन्ही प्राणेशा तंत्रिका (मेंदूपासून निघणारी दहावी प्रमुख मज्जा) ग्रसिकेबरोबरच उदरात शिरतात. डावी तंत्रिका ग्रसिकेच्या अग्रभागी व उजवी पश्चभागी असते. ग्रसिका तीन ठिकाणी संकुचित झालेली असते. (१) सुरुवातीस मुद्रिका-उपास्थीजवळ (कंठाच्या खालच्या बाजूस असलेल्या अंगठीच्या आकाराच्या कुर्चेजवळ कृंतक म्हणजे वरच्या व खालच्या जबड्यातील पुढच्या प्रत्येकी चार पटाशीसारख्या दातांपासून १८ सेंमी. अंतरावर), (२) महारोहिणी चाप (महारोहिणीच्या मार्गावर खाली जाण्याच्या वेळचे वळण) तिच्या अग्रभागी येतो तेथे (कृंतक दातांपासून २८ सेंमी. अंतरावर) आणि (३) मध्यपटातील छिद्राजवळ (कृंतक दातांपासून ४३ सेंमी. अंतरावर). मान, वक्ष आणि उदर या तीन शरीर भागांतून ग्रसिका जात असल्यामुळे वर्णनाच्या सुलभतेकरिता तिचे तीन भाग पाडले आहेत. वक्षीय भागात श्वासनाल (मुख्य श्वासनलिका), उजवी फुप्फुस रोहिणी, परिहृदय (हृदयावरील आवरणातील) महारोहिणी चाप, डावे व उजवे परिफुप्फुस (फुप्फुसावरील आवरण), लशीका (ऊतकातून म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहातून रक्तात जाणारा रक्तद्रवासारखा पातळ पदार्थ वाहणारी) महावाहिनी या महत्वाच्या शरीर भागांशी ग्रसिका थोड्याफार प्रमाणात संलग्न असते.
रचना : ग्रसिका चार थरांची बनलेली असते. (१) बाह्य किंवा तंतुमय थर, (२) मांसल थर, (३) अधःश्लेष्म (बुळबुळीत पदार्थ स्रवणाऱ्या अस्तर त्वचेखालील थर) वा अवकाशी ऊतकमय (सैलसर रचना असलेल्या तंतूच्या जाळीने बनलेल्या संयोजी ऊतकाचा) थर. (४) अंतः स्तर किंवा श्लेष्मकलास्तर (बुळबुळीत पदार्थ स्रवणारा अस्तर त्वचेचा थर).
(१) तंतुमय थर : हा थर अवकाशी ऊतक आणि लवचिक तंतूंच्या सरमिसळीने बनलेला असतो.
(२) मांसल थर : दोन प्रकारचे स्नायू व त्यांची दोन तऱ्हेची मांडणी मिळून हा थर बनलेला असतो. ग्रसिकेच्या वरच्या २/३ भागाचे स्नायू रेखित (पट्ट्यांचे बनलेले) आणि खालच्या १/३ भागाचे अरेखित (पट्टे नसलेले) असतात वरचे इच्छानुवर्ती (इच्छेप्रमाणे हालचाल होणारे) तर खालचे अनिच्छानुवर्ती असतात. काही स्नायू उभे व लांब तर काही वर्तुळाकार असतात. त्यांच्या क्रमसंकोचामुळे (क्रमाक्रमाने पुढील भाग संकोच पावण्यामुळे) अन्न जठराकडे ढकलले जाते. ग्रसिकेच्या सुरुवातीस तसेच जठराजवळील भागातील स्नायुभाग परिसंकोची (वलयाकार व मधील भोक आकुंचनाने बंद करणारे) बनलेले असतात.
(३) अधःश्लेष्म : या थरामुळे मांसल थर आणि अंतःस्तर एकमेकांशी ढिल्या स्वरूपात जोडले गेलेले असतात. या थरात मोठ्या रक्तवाहिन्या, तंत्रिका आणि श्लेष्मग्रंथी (बुळबुळीत पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथी) असतात.
(४) अंतःस्तर : श्लेष्मकलेचा बनलेला हा थर वरच्या भागात लालसर रंगाचा व खालच्या भागात त्याहून फिक्कट रंगाचा असतो. निष्कियावस्थेत त्याच्या अनेक उभ्या घड्या पडलेल्या असतात. अन्न गिळताना ग्रसिका फुगते तेव्हा त्या उलगडतात.
कार्य : गिळण्याच्या क्रियेचा तिसरा टप्पा ग्रसिका पूर्ण करते [→ ग्रसनी]. ग्रसिकेच्या सुरुवातीस असलेला परिसंकोची स्नायुभाग गिळण्याची क्रिया सुरू होताच ०·२ ते ०·३ सेंकदात ढिला पडतो व त्या अवस्थेत सु. अर्धा ते एक सेकंद राहून संकोच पावतो. ग्रसिकेचा क्रमसंकोच ग्रसिकेच्या चार ते आठ सेंमी. लांब भागापुरता मर्यादित असतो. आणि त्याच्या तरंगांचा वेग दर सेकंदास दोन ते चार सेंमी. एवढाच असतो. क्रमसंकोच सुरू होण्यास अन्नाचे अस्तित्व असावेच लागते असे नाही . गिळण्याची क्रिया सुरू झाल्यानंतर १·५ ते २·५ सेकंदांत जठरागमी परिसंकोची स्नायुभाग ढिला पडतो व ग्रसिकेतून येणारे पदार्थ जाणीव न होता जठरात शिरतात. गिळण्याची क्रिया पुन्हा सुरू होईपर्यंत हा परिसंकोची स्नायुभाग संकोचावस्थेत राहतो. त्यामुळे जठरास, जठरातील अन्न किंवा जठरामधील हवा ग्रसिकेत परत येऊ शकत नाही.
विकार : ग्रसिकेच्या विकारात जन्मजात, बाह्य पदार्थ अडकणे, जंतुसंसर्ग इ. कारणे आढळतात.
जन्मजात ग्रसिका संकोच : ह्या विकारात श्वासनाल आणि ग्रसिका एकमेकांशी जोडलेल्या असतात. परिवर्धनीय (भ्रूणावस्थेतील वाढ होताना निर्माण झालेल्या) दोषामुळे हा विकार उद्भवतो. प्रत्येक स्तनपानानंतर लगेच उलटी होणे व तोंडातून एकसारखी लाळ वाहत राहणे मुख्य लक्षणे होत. जन्मानंतर पहिल्या अट्ठेचाळीस तासांत निदान होऊन शस्त्रक्रिया केल्यासच रोगी बचावण्याची शक्यता असते.
जन्मजात आखूड ग्रसिका : येथे ‘आखूड’ शब्द लांबीदर्शक वापरलेला नाही, तर अंतःस्तराची कमतरता सुचविण्याकरिता वापरलेला आहे. ग्रसिकेची श्लेष्मकला आणि जठराची श्लेष्मकला निरनिराळ्या कोशिकास्तरांच्या (पेशींच्या थरांच्या) बनलेल्या असतात. जेव्हा जठर श्लेष्मकला ग्रसिकेच्या खालच्या भागातील अंतःस्तराचा प्रमाणापेक्षा जास्त भाग व्यापते तेव्हा ‘आखूड ग्रसिका ’ म्हणतात. जठरातील पदार्थाच्या प्रत्यावर्तनामुळे (नेहमीच्या उलट बाजूकडे जाण्यामुळे) तेथे शोध (दाहयुक्त सूज) उत्पन्न होतो. त्या ठिकाणी पचनज व्रण (अम्लीय जाठररसाच्या क्रियेमुळे निर्माण होणारी जखम) होण्याची शक्यता असते.
बाह्य पदार्थ अडकणे : ग्रसिका ज्या तीन ठिकाणी संकुचित झालेली असते त्या ठिकाणी चुकून गिळलेला बाह्य पदार्थ (उदा., कृत्रिम दात, नाणे, पिना वगैरे) अडकण्याचा संभव असतो. तो पदार्थ क्ष-किरणांना अपारदर्शक असल्यास तपासणीत दिसू शकतो. ग्रसिका तपासणी उपकरणाने प्रत्यक्ष बघून तो वर काढणे किंवा जठरात ढकलणे शक्य असते.
ग्रसिका शोथ : मारक संक्रामण (जंतुसंसर्ग), भाजणे किंवा पोळणे यांमुळे होणारा शोथ तीव्र प्रकारचा असतो. सर्वसाधारणपणे ग्रसिकेच्या खालच्या भागात होणारा शोथ चिरकारी (दिर्घकालीन) असतो व जठरातील पदार्थाच्या प्रत्यावर्तनामुळे उद्भवतो. या विकारात अनेक वेळा मध्यपटलातील (छाती व पोट यांना विभागणाऱ्या पटलातील) ग्रसिका छिद्रातून जठराचा काही भाग वर वक्षात सरकलेला असतो. मध्यपटलातील अंतर्गळाचा (हार्नियाचा) हा एक प्रकार असतो.
ग्रसिका विपुटी : विपुटी म्हणजे पोकळ अवयवापासून तयार होणारा पिशवीसारखा भाग. या विकाराचे दोन प्रकार आहेत. (१) कर्षण (ओढल्यामुळे तयार होणारी) विपुटी व (२) प्रणोदक (ढकलण्याच्या क्रियेमुळे होणारी) विपुटी.
(१) कर्षण विपुटी : श्वासनाल जेथे विभागाला जातो तेथे बऱ्याच लशीका ग्रंथी असतात. या ग्रंथींच्या शोथामुळे (बहुधा गंडमाळा विकारात) तंतुमय ताण तयार होतात व ते ग्रसिका भित्ती एका बाजूस ओढतात. त्या ठिकाणी प्रथम लहान खळी पडते व ती वाढत जाऊन विपुटी तयार होते. विपुटी-बुध्न (तळ) वर आणि तिचे तोंड खाली असल्यामुळे अन्न तीत शिरत नाही. गिळण्यात अडथळा हे लक्षणही आढळत नाही. ही विपुटी अग्रभागी असते.
(२) प्रणोदक विपुटी : ही विपुटी बहुधा पश्चभागी असते, तसेच ग्रसिकेच्या खालच्या भागात उद्भवते. विपुटी-बुध्न खाली व तोंड वर असल्यामुळे अन्नाचा भाग शिरून ती वाढते. गिळताना अडथळा उत्पन्न होणे व उरोस्थीच्या (छातीच्या पुढील चपट्या हाडाच्या) मागे अस्वस्थता जाणवणे ही लक्षणे उद्भवतात.
बेरियम अशन (अन्नमार्गाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणारे बेरियम सल्फेटाचे मिश्रण) देऊन क्ष-किरण तपासणी करतात व शस्त्रक्रिया करून दोन्ही प्रकारच्या विपुटींवर इलाज करतात.
ग्रसिका नीला अपस्फीती : या विकारात ग्रसिका भित्तीतील नीलांची अपस्फीती (फुगून वाकड्या तिकड्या बनणे) आढळते. ग्रसिकेच्या खालच्या भागात प्रवेशिकानीला तंत्र (आतडी, प्लीहा, अग्निपिंड व पित्ताशय यांमधील अशुद्ध रक्त यकृतात नेणारी मुख्य नीला व तिच्या शाखा-उपशाखांचे जाळे) व सार्वदेहिक नीला तंत्र यांचे संमीलन (एकत्रित होणे) होते. प्रवेशिकानीला तंत्रात रक्तदाब वाढल्यास (उदा., यकृत सूत्रण रोगात) या संमीलनातील नीला फुगतात व त्यांमधून रक्तस्राव होतो. कधीकधी हा रक्तस्राव मारक ठरतो. रक्तमिश्रित किंवा नुसत्या रक्ताच्या उलट्या हे प्रमुख लक्षण असते. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे जरूर असते. हा विकार अकस्मात मृत्यूचे एक कारण असू शकते.
ग्रसिका अशिथिलता : (किंवा जठरागमी परिसंकोची स्नायुभागाचा दृढसंकोच म्हणजे लवचिकपणाचा गुणधर्म नसलेले आकुंचन). या विकारात मध्यपटलाजवळच्या ग्रसिकेचा भाग फुगीर बनतो. पिशवीसारख्या ह्या फुगवटीचे अरुंद तोंड मध्यपटलाकडे व रुंद तोंड वर असते. या रोगाची नक्की कारणे माहीत नसल्यामुळे वरील दोन्ही नावे या रोगास दिली जातात. गिळण्याच्या क्रियेत अडथळा उत्पन्न करणाऱ्या विकारांत कर्करोगाच्या खालोखाल या विकाराचाच क्रमांक लागतो. चाळीशीतील स्त्रियांत हा विकार अधिक आढळतो. रोगनिदानासाठी ग्रसिका तपासणी उपकरण आणि क्ष-किरण तपासणी उपयुक्त असते. अडथळ्यामुळे गिळलेले अन्नपदार्थ अडकून कित्येक तासांनंतरही ते उलटीतून बाहेर येतात. शरीरावश्यक पोषक पदार्थाच्या तुटवड्यामुळे दैनंदिन व्यवहार करणेही दुरापास्त बनते. शस्त्रक्रिया चिकित्सा उपयुक्त असते.
ग्रसिका कर्करोग : ग्रसिका ज्या तीन ठिकाणी संकुचित झालेली असते तेथे कर्करोग होण्याचा अधिक संभव असतो. ज्या ठिकाणी डावी श्वासनलिका ग्रसिकेवरून जाते तेथे ह्या विकाराचे प्रमाण अधिक असते. स्त्रियांपेक्षा पुरुषांत हा रोग ८० टक्के जास्त आढळतो. श्लेष्मकलेत प्रथम एक लहान गुठळी तयार होते व ती ग्रसिका सुषिरकात (पोकळीत) वाढू लागते. कधीकधी ग्रसिकाभित्तीत वर्तुळकार वाढ होऊन सबंध सुषिरकच संकुचित बनते. गिळण्यात अडथळा उत्पन्न होणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण असते. या विकाराचे निदान नेहमी उशीरा म्हणजे रोग आजूबाजूस पसरल्यानंतर होते. पुरुषांत कर्करोग ज्या शरीरभागांत होतो त्यांत ग्रसिकेचा चौथा क्रमांक लागतो. जपानी लोकांत या रोगाचे प्रमाण अधिक असते. बेरियम अशनानंतर क्ष-किरण तपासणी व ग्रसिका तपासणी उपकरणाने केलेली तपासणी निदानोपयोगी असतात. अगदी प्रथमावस्थेतील कर्करोगाच्या निदानास, ग्रसिका धुवून घेतलेल्या द्रवाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी फार उपयुक्त ठरते. रेडिओ चिकित्सा (क्ष-किरण व किरणोत्सर्गी म्हणजे कण अथवा किरण बाहेर टाकणारे पदार्थ यांच्या साहाय्याने करण्यात येणारी चिकित्सा) व शस्त्रक्रिया हे इलाज करतात.
संदर्भ :
1. Bailey, H. Love McNeil, A Short Practice of Surgery, London, 1912.
2. Hollinshead, W. H. Textbook of Anatomy, New York, 1962.
3. Wakeley, C. and Others, Eds., Rose and Carless, Manual of Surgery, London, 1960.
ढमढेरे, वा. रा.; भालेराव, य. त्र्यं.