ग्रनॉबल : आग्नेय फ्रान्समधील ईझेर विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६४,१०० (१९७१ अंदाज). हे ईझेर नदीवर मार्सेच्या ईशान्येस १८० किमी. असून क्यूलरो आणि नंतर ग्रेशीनापलस या नावांनी पूर्वी प्रसिद्ध होते. येथे जलविद्युत् उत्पादनकेंद्र असून विद्युत् उपकरणे, रसायने, कागद, सिमेंट, हातमोजे असे विविध उत्पादन होते. १९५९ मध्ये येथे अणुसंशोधन केंद्र स्थापन झाले आहे.
येथील दहाव्या शतकातील कॅथीड्रल, १३३९ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ, प्रबोधनकालीन डोफीनेचा राजवाडा–आता न्यायालय, कलासंग्रहालय व कादंबरीकार स्तँदालविषयक संग्रहालय पाहण्यासाठी हौशी प्रवाशी येतात. १९६८ साली येथे हिवाळी ऑलिंपिक क्रीडा सामने झाले.
ओक, द. ह.