ग्रंथालयशास्त्र : ग्रंथालयशास्त्र म्हणजेच ग्रंथपालनशास्त्र. ज्ञानसाधनेच्या संदर्भातील सर्व प्रकारच्या वाचकांच्या व संशोधकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन त्यांस उपयुक्त होणारे साहित्य व साधने मिळविणे, ती जतन करणे, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल अशा सर्व सोयी वाचकांना व संशोधकांना उपलब्ध करून देणे व या सर्वांसाठी कार्यक्षम यंत्रणा निर्माण करणे इ. गोष्टींचा विचार ग्रंथालयशास्त्रात केला जातो.
ग्रंथपालनशास्त्राच्या कक्षेत ग्रंथालयाचे तांत्रिक कार्य आणि ग्रंथालयीन संघटन व कार्यपद्धती इ. गोष्टींचा समावेश होतो. या प्रकारच्या कार्यामुळेच ग्रंथालयातील साहित्याची उपयुक्तता वाढविली जाते, प्रत्येक वाचकाला त्याचे साहित्य व प्रत्येक प्रकारच्या साहित्याला कोणता तरी वाचक किंवा संशोधक मिळवून दिला जातो, तसेच वाचकांचा आणि सेवकांचा वेळ वाचविता येतो.
ग्रंथपालनाच्या कार्यांची व्याप्ती आता ग्रंथालयाच्या चार भिंतींपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. ‘ग्रंथसंग्रह म्हणजेच ग्रंथालय व त्याची उपयुक्तता वाढविणारी यंत्रणा म्हणजेच ग्रंथपालन ’ ही व्याख्या आता बदलली गेली असून ग्रंथालयांना ज्ञानालय व ग्रंथपालनाला ज्ञानसंवर्धन शास्त्र असे म्हणणे क्रमप्राप्त झाले आहे.
ग्रंथपालनाचे तांत्रिक कार्य : ग्रंथपालनाच्या तांत्रिक कार्यात प्रामुख्याने वर्गीकरण (क्लासिफिकेशन) , तालिकीकरण (कॅटलॉगिंग). संदर्भसाह्य (रेफरन्स सर्व्हिस) आणि प्रलेखपोषण (डॉक्युमेंटेशन) या विषयांचा समावेश केला जातो.
वर्गीकरण : ग्रंथामध्ये ज्ञान सामावलेले असल्यामुळे एका अर्थाने ग्रंथवर्गीकरण म्हणजेच ज्ञानवर्गीकरण असेही समजले जाते. परंतु ग्रंथांच्या बाह्य स्वरूपामुळे व विषय प्रतिपादन करण्याच्या पद्धतीमुळे ग्रंथवर्गीकरणाला मर्यादा पडतात. ग्रंथवर्गीकरणामुळे एकाच विशिष्ट विषयावरील व तत्संबंधित अशा अन्य विषयांवरील साहित्य एकत्र आणणे शक्य होते. ग्रंथांची उपयुक्तता म्हणजेच संदर्भक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने वर्गीकरण हे अत्यंत उपयुक्त साधन समजले जाते व म्हणूनच वर्गीकरण हा ग्रंथपालनाचा पाया मानला जातो.
पुस्तकांचा रंग, आकार, भाषा, किंमत, लेखक, प्रकाशक, प्रकाशनस्थल, प्रकाशनकाल, दाखल अंक इ. वेगवेगळ्या निकषांनुसार पुस्तके एकत्र आणण्याची प्रथा अनेक वर्षे अस्तित्वात होती. मात्र ग्रंथांचे वर्गीकरण विषयानुसार व्हावे, या विचारास एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच मान्यता मिळाली.
संकीर्ण वर्ग, स्वरूप विभाग, स्वरूप प्रकार, चिन्हांकन व निर्देश ही ग्रंथवर्गीकरण पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विशिष्ट ग्रंथालयांतील साहित्याचे वर्गीकरण करण्यासाठी निर्माण केलेल्या विशिष्ट वर्गीकरण पद्धती सोडल्यास १८७६ पासून आजतागायत ग्रंथवर्गीकरणाच्या सामान्यतः आठ पद्धती अस्तित्वात आल्या, त्या अशा : (१) दशांश पद्धती, (२) विस्तारात्मक पद्धती, (३) लायब्ररी ऑफ काँग्रेसची पद्धती, (४) विषयनिष्ठ पद्धती, (५) सार्वत्रिक दशांश पद्धती, (६) द्विबिंदु पद्धती, (७) ग्रंथसूचीय पद्धती, (८) डॉ. रायडरची आंतरराष्ट्रीय पद्धती.
(१) दशांश (डेसिमल) वर्गीकरण : ⇨मेलव्हिल ड्यूई यांनी तयार केलेली पद्धती १८७६ मध्ये प्रसिद्ध झाली. संकीर्ण वर्ग जमेस धरून ड्यूईने ज्ञानाची विभागणी दहा मुख्य विषयांत केली आहे. सुलभ चिन्हांकन ही या पद्धतीमधील महत्त्वाची सोय असून त्या चिन्हांकनातील आकड्यांचा वापर दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात केलेला आहे. या पद्धतीची पहिली आवृत्ती १८७६ मध्ये प्रसिद्ध झाली असून अठरावी आवृत्ती १९७१ मध्ये चार खंडांत प्रसिद्ध झाली आहे. दशांश वर्गीकरण पद्धतीची पंधरावी संक्षिप्त आवृत्ती वैशिष्ट्यपूर्ण असून जगातील अनेक ग्रंथालये आजही या आवृत्तीचा वापर करीत असतात. दशांश वर्गीकरण पद्धतीचे अनेक भाषांमध्ये भाषांतरदेखील झालेले आहे. अमेरिकेतील अनेक सार्वजनिक ग्रंथालये व शैक्षणिक ग्रंथालये या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. या पद्धतीच्या नवीन नवीन आवृत्या अनुभवी तज्ञांच्या संपादक मंडळामार्फत तयार होत असतात आणि त्यांची उपयुक्तता टिकविण्याच्या दृष्टीने ज्या ग्रंथालयांत या पद्धतीचा स्वीकार केला जातो, अशा ग्रंथालयांकडून शिफारशी आणि अनुभव मागविले जातात.
(२) विस्तारात्मक (एक्स्पान्सिव्ह) वर्गीकरण : चार्ल्स एमी कटरची ही पद्धती प्रथम १८९१ मध्ये प्रसिद्ध झाली. प्रस्तुत वर्गीकरणात ज्ञानाची विभागणी २६ मुख्य विषयांत केलेली असून ते दर्शविण्यासाठी रोमन वर्णांचा उपयोग केला आहे. या पद्धतीचे चिन्हांकन संमिश्र असून त्यासाठी रोमन वर्ण व अरबी अंक यांचा उपयोग केला जातो. अनेक तज्ञांनी या वर्गीकरण पद्धतीची प्रशंसा केली असून त्यातील काही तत्त्वांचा उपयोग लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या वर्गीकरण पद्धतीत केलेला आहे. तात्त्विक दृष्ट्या प्रशंसनीय ठरलेल्या या पद्धतीचा उपयोग मात्र फारच थोड्या ग्रंथालयांत केला जातो.
(३) लायब्ररी ऑफ काँग्रेसचे वर्गीकरण : अमेरिकेत निर्माण झालेली ही तिसरी वर्गीकरण पद्धती. प्रचलित अशा इतर सर्वसाधारण ग्रंथवर्गीकरणांत आणि लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या वर्गीकरणात एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे हे वर्गीकरण ग्रंथालयांत असलेला ग्रंथसंग्रह व त्यासंबंधी वाचकांच्या गरजा ध्यानात घेऊन निर्माण झाले आहे. लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या ग्रंथालयांतील ग्रंथसंख्या जेव्हा दोन लाखांवर गेली, तेव्हा दशांश किंवा विस्तारात्मक या दोन्ही पद्धतींपैकी कोणतीही एक या ग्रंथालयांतील साहित्याचे वर्गीकरण करण्यास उपयुक्त ठरणार नाही, असे आढळून आले व त्यातून ही नविन पद्धती अस्तित्वात आली. लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या पद्धतीमधील ज्ञानवर्ग व इतर कोष्टके मात्र तज्ञांच्या साहाय्याने तयार होत असतात. तसेच या पद्धतीत ज्ञानाची विभागणी २१ मुख्य वर्गांत केली असून त्यासाठी आय्, ओ, डब्ल्यू, एक्स्, वाय् हे वर्ण सोडून इतर रोमन वर्णांची योजना केलेली आहे. प्रत्येक मुख्य वर्गातील विभाग व उपविभाग यांची कोष्टके स्वतंत्र पुस्तकात छापलेली आहेत व ते दर्शविण्यासाठी पूर्णांकांचा वापर केलेला आहे मुख्य वर्गातील विभाग व उपविभाग यांची मांडणी केवळ तात्त्विक, शास्त्रीय अथवा उत्क्रांतवादी तत्त्वावर केलेली नसून उपयुक्ततेच्या धोरणानुसारच सर्व कोष्टके तज्ञांच्या सल्ल्याने तयार केलेली आहेत. या पद्धतीचे चिन्हांकन मिश्र असून प्रत्येक विभागाची वर्गवारी १ ते ९,९९९ या उपविभागांत पूर्णांकांच्या रूपाने दर्शविली आहे. या पद्धतीचा उपयोग मर्यादित आहे. तसेच एका विशिष्ट ग्रंथालयात प्रत्यक्षपणे असलेल्या ग्रंथांच्या स्वरूपावरून ही वर्गीकरण पद्धती तयार केली असल्याने, अशा प्रकारचे ग्रंथ ज्या ग्रंथालयात असतील, त्याच ग्रंथालयात ही पद्धती उपयुक्त ठरते. अमेरिकेतील शेकडो ग्रंथालयांत ही पद्धती वापरली जाते. मात्र इतर देशांत तिचा वापर फारसा होत नाही.
(४) विषयनिष्ठ (सब्जेक्ट) वर्गीकरण : ब्रिटिश ग्रंथपाल जेम्स डफ ब्राऊन यांनी जॉन हेन्री क्विन यांच्या सहकार्याने क्विन-ब्राउन या नावाने ओळखली जाणारी वर्गीकरण पद्धती १८९४ मध्ये जगापुढे मांडली. या सुमारास अनेक नवनवीन ग्रंथालये स्थापन होत होती. त्यांच्या वर्गीकरणविषयक गरजा पुरविण्यास क्विन–ब्राउन पद्धत अपुरी पडू लागल्याने ब्राउनने संयोजनक्षम वर्गीकरण (ॲड्जस्टेबल क्लासिफिकेशन) पद्धती तयार केली. ही पद्धती तयार करण्याचे दुसरे एक कारण म्हणजे ड्यूईची दशांश पद्धती, अमेरिकेतील साहित्य व ग्रंथालये यांच्या गरजा जमेस धरून तयार केली असल्याने ब्रिटिश ग्रंथालयांना ती विशेष उपयोगी पडत नव्हती, हे होते. एका विशिष्ट विषयावरील पुस्तके निरनिराळ्या संदर्भात वेगवेगळ्या मुख्य वर्गाखाली वर्गीकृत करणे शक्य असले, तरी ती एकाच ठिकाणी ठेवणे जास्त उपयुक्त ठरते. या तत्त्वाचा पुरस्कार ब्राउनने आपल्या पद्धतीत मोठ्या जोरदारपणे केला आहे. यासाठी त्याने मॅटर, लाइफ, माइंड आणि रेकॉर्ड या चार प्रमुख ज्ञानकक्षांमध्ये २४ मुख्य वर्गांची विभागणी केली असून त्यासाठी रोमन वर्णांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत पद्धतीमधील संकीर्ण मुख्य वर्ग (जनरेलिया क्लास) हा वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. कारण त्यामध्ये शिक्षण, तर्कशास्त्र, गणित यांसारख्या विशिष्ट विषयांचा समावेश केलेला आढळतो. त्याचप्रमाणे या संयोजनक्षम वर्गीकरणाचे चिन्हांकन मिश्र स्वरूपाचे असून प्रथम रोमन वर्ण व त्यानंतर अरबी अंक असा त्यांचा क्रम आहे. या वर्गीकरण पद्धतीचा वापरही फारच थोड्या ग्रंथालयांत केला जातो.
(५) सार्वत्रिक दशांश (युनिव्हर्सल डेसिमल) वर्गीकरण : ब्रूसेल्स येथे १८९५ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दशांश वर्गीकरणात सुधारणा करून सार्वत्रिक दशांश वर्गीकरण पद्धती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला व त्याच्या आधारे दशांश वर्गीकरणाची जरूरीप्रमाणे वाढ अथवा त्यात फरक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पद्धतीतही संकीर्ण वर्ग धरून एकून दहा मुख्य वर्ग आहेत. तसेच या पद्धतीची सर्वसाधारण बैठक दशांश पद्धतीप्रमाणेच आहे, परंतु चिन्हांकांत बेरजेची गणितीचिन्हे किंवा अवतरणचिन्हे यांसारख्या चिन्हांचा वापर केलेला आहे. या पद्धतीच्या चिन्हांकनाचे दुसरे वैशिष्ट्य असे, की दशांश पद्धतीप्रमाणे किमान तीन अंक वापरण्याची अट यामध्ये नाही. सार्वत्रिक दशांश वर्गीकरण पद्धती ही एक प्रमाणभूत पद्धती असून तिचा वापर विशेषतः विशिष्ट प्रकारच्या ग्रंथालयांमधून केला जात आहे.
(६) द्विबिंदू (कोलन) वर्गीकरण : ⇨ डॉ. शियाळी रामामृत रंगनाथन् यांनी संयोजिलेली ही एक अभिनव वर्गीकरण पद्धती आहे. इतर पद्धतींप्रमाणे या पद्धतींत तयार वर्गांक वापरत नसून ते मेकॅनो (यांत्रिकी) पद्धतीप्रमाणे तयार करावे लागतात. द्विबिंदू वर्गीकरण विश्लेषण-संश्लेषण तत्त्वावर आधारलेले आहे. या पद्धतीत पैलू परिसूत्रांची योजना केलेली आहे. या पैलूसूत्रांच्या साहाय्याने प्रत्येक मुख्य विषयाचे विभाजन केले जाते व नंतर संबंधित पैलूखालील विभाग दर्शविणाऱ्या ज्या संज्ञा दिल्या आहेत, त्या विशिष्ट चिन्हांच्या द्वारे जोडल्या जातात. म्हणजेच वर्गांक बनविला जातो. या पद्धतीत सुरुवातीला पैलू संयोजनासाठी द्विबिंदू चिन्हांचा उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे या पद्धतीला द्विबिंदू वर्गीकरण हे नाव पडले. आता त्यात बदल करण्यात आला असून स्वल्पविराम, अर्धविराम इ. विरामचिन्हांचाही वापर करण्यात येत आहे. या पद्धतीत मुख्य वर्गांची संख्या कायम राहिलेली नसून ती प्रत्येक आवृतीत वाढत त्याहे. मात्र चिन्हांकन संमिश्र, स्मृतिसुलभ व विकसनशील आहे, त्यामुळे ग्रंथालयातील सर्व प्रकारच्या साहित्याचे स्थूल अथवा सूक्ष्म प्रकारे वर्गीकरण करणे शक्य होते. या वर्गीकरणात ग्रंथातील सर्व वर्ण्यविषय वा दृष्टिकोन वर्गाकात दाखविण्याची सोय आहे. तसेच प्रत्येक वर्गातील किंवा उपवर्गातील ग्रंथ हे कालसूचक ग्रंथांकाच्या योजनेमुळे कालानुक्रमाने कपाटांमध्ये मांडता येतात.
या पद्धतीत संज्ञांची कोष्टके तसेच प्रत्येक चिन्ह केव्हा, कुठे व कसे वापरावयाचे यासंबंधीही निश्चित नियम आहेत परंतु या पद्धतीच्या प्रत्येक नव्या आवृत्तीमध्ये चिन्हांकांत अनेक बदल अजूनही सुचविण्यात येत असल्यामुळे ती वापरण्यास अवघड वाटते. त्यामुळे या पद्धतीचा स्वीकार फार मोठ्या प्रमाणात केलेला आढळत नाही. या वर्गीकरणाच्या १९६० पर्यंत सहा आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
(७) ग्रंथसूचीय (बिब्लिओग्रॅफिक ) वर्गीकरण : हेन्री एव्हलीन ब्लिस यांच्या या पद्धतीचा आराखडा प्रथम १९१० मध्ये लायब्ररी वर्ल्ड या ग्रंथपालनविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला व त्याची संक्षिप्त आवृत्ती १९२५ मध्ये बाहेर पडली. १९४० ते १९५३ च्या दरम्यान त्याचे चार खंड प्रसिद्ध झाले. ही पद्धती पुढील चार सिद्धांतांवर आधारलेली आहे : (१) तज्ञांचे व वाचकांचे ग्रंथमांडणीसंबंधीचे मतैक्य. (२) विषयाचे कमी होत जाणारे व्यापकत्व. (३) संबंधित वर्गांचे सान्निध्य. (४) पर्यायी मांडणी. या वर्गीकरणात मुख्य वर्गांसाठी रोमन वर्णांचा वापर केला आहे. या पद्धतीचे चिन्हांकन संमिश्र असून स्मरणसुलभ आहे. यात सर्वसाधारण विभाग दर्शविण्यासाठीही चिन्हांचा वापर केला जातो. या पद्धतीचा निर्देश स्वतंत्र खंडात प्रसिद्ध झालेला आहे. तो विस्तृत असून त्यामध्ये ४५,००० नोंदींचा अंतर्भाव केलेला आहे. प्रस्तुत वर्गीकरण पद्धती अमेरिकन असली, तरी अमेरिकेतील फारच थोडी ग्रंथालये तिचा वापर करतात. काही राष्ट्रकुल देशांत व इतरत्रही ही पद्धती स्वीकारलेली आढळते.
(८) डॉ. रायडरचे आंतरराष्ट्रीय (रायडर्स इंटरनॅशनल) वर्गीकरण : विशेषतः सार्वजनिक, महाविद्यालयीन आणि शालेय ग्रंथालयांना उपयोगी पडावे या हेतूने डॉ. रायडर यांनी हे नवीन वर्गीकरण तयार केले आहे. या वर्गीकरणानुसार २६ मुख्य वर्ग, ६७६ उपवर्ग व १७,५७६ उप-उपवर्गांच्या आधारे सु. दहा लाख पुस्तकांचे सुलभतेने व सोईस्करपणाने वर्गीकरण करता येणे शक्य आहे, असा डॉ. रायडर यांचा दावा आहे. या पद्धतीची बैठक तर्कशुद्ध व शास्त्रशुद्ध नाही. या पद्धतीनुसार कोणताही विषय एक, दोन अथवा जास्तीत जास्त तीन चिन्हांमध्ये (वर्णांमध्ये) दर्शविता येतो.
ज्ञानाच्या क्षेत्रातील प्रचंड वाढीमुळे व परस्पर संबंधित विषयांच्या गुंतागुंतीमुळे वर्गीकरणाच्या क्षेत्रात अनेक समस्या निर्माण होत आहेत. तसेच परिगणनात्मक वर्गीकरणाची जागा विश्लेषणात्मक–संश्लेषणात्मक वर्गीकरण घेईल किंवा काय, असा संभव निर्माण होत आहे. वर्गीकरणासाठी कोणतीही सर्वसाधारण पद्धती व विशिष्ट उपयुक्त ठरेल किंवा काय, याबद्दल संशोधन चालू आहे. वर्गीकरणविषयक संशोधनकार्यात डॉ. एस्. आर्. रंगनाथन्, क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप, लंडन आणि बंगलोरचे डॉक्युमेंटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर इत्यादींनी मौलिक कार्य केले आहे.
तालिकीकरण : एकाद्या लेखकाने लिहिलेल्या वा एखाद्या विषयावर प्रकाशित झालेल्या किंवा एखाद्या विशिष्ट भूभागात प्रसिद्ध केलेल्या साहित्याची तयार केलेली यादी म्हणजे ग्रंथसूची (बिब्लिओग्रॅफी) होय. परंतु एखाद्या विशिष्ट ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याची यादी म्हणजे तालिका (कॅटलॉग) होय. तालिकेमध्ये लेखकाचे नाव, ग्रंथनाम, प्रकाशक, प्रकाशनकाल, प्रकाशनस्थल, आवृत्ती व पृष्ठे इ. तपशील दिलेला असतो. त्यामुळे तालिकेच्या द्वारे पुढील उद्दिष्टे साध्य होतात : (१) एखाद्या विशिष्ट लेखकाची ग्रंथालयात कोणकोणती पुस्तके आहेत ते दर्शविणे, (२) ग्रंथालयात निरनिराळ्या विषयांवर कोणती आणि किती पुस्तके आहेत हे दाखविणे, (३) प्रत्येक पुस्तकाचे बाह्यांगवर्णन करणे, (४) एखाद्या पुस्तकाचे कपाटामधील स्थान कोठे आहे हे सांगणे, (५) लेखकाच्या, पुस्तकाच्या अथवा विषयाच्या एका नावावरून दुसऱ्या नावाकडे संदर्भ दर्शविणे इत्यादी.
तालिकेचे जे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आहेत, त्यामध्ये कोश तालिका, शुद्ध वर्गीकृत तालिका वर्गीकृत तालिका व ग्रंथकार तालिका हे प्रमुख प्रकार आहेत. तथापि कोश तालिका व वर्गीकृत तालिका या दोन प्रकारांचाच वापर मोठ्या प्रमाणावर केलेला आढळतो. कोश तालिकेतील नोंदींचा क्रम शब्दकोशामधील वर्णक्रमाप्रमाणे असतो. सार्वजनिक ग्रंथालयांमधून कोश तालिकेचा अथवा ग्रंथकार तालिकेचा वापर केला जातो. वर्गीकृत तालिकेत कोश विभाग व विषय विभाग असे दोन भाग असतात. विद्यापीठ ग्रंथालये, विशिष्ट ग्रंथालये किंवा संशोधन संस्थांची ग्रंथालये यांमधून वर्गीकृत तालिका जास्त उपयोगी ठरते.
तालिका ज्या स्वरूपात ठेवली जाते, त्याच्या बाह्यांगावरून पुढीलप्रमाणे प्रकार आहेत : ग्रंथरूप (बुक फॉर्म), चिठ्ठीरूप (शीफ फॉर्म), पत्ररूप (कार्ड फॉर्म) व पट्टीरूप (स्ट्रीप्डेक्स फॉर्म). या चार प्रकारांपैकी पत्ररूप तालिकेचा स्वीकार ग्रंथालयांतून फार मोठ्या प्रमाणात केलेला आढळतो.
निश्चित नियमावलींच्या आधारे ग्रंथालयातील विविध प्रकारच्या साहित्याच्या नोंदी करणे म्हणजेच तालिकीकरण असल्यामुळे सर्वसाधारणपणे प्रत्येक पुस्तकासाठी एक प्रमुख नोंद व कमीत कमी दोन वा अधिक पूरक नोंदी केल्या जातात. प्रमुख नोंदींमध्ये पुस्तकासंबंधी तपशीलवार माहिती दिलेली असते व पूरक नोंदींमध्ये त्रोटक माहिती दिली जाते.
ग्रंथालयात येणाऱ्या विविध साहित्यप्रकारांची संख्या जमेस धरता ग्रंथालयाच्या व्यवहारात काही सहकारी योजनांचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते. परंतु तसे न करता एकाच पुस्तकाचे निरनिराळ्या ग्रंथालयांतून निरनिराळे तालिकीकरण केल्यास वेळेचा व पैशाचा अपव्यय होतो, शिवाय तालिकीकरणाच्या कामात सुसूत्रताही राहत नाही. यावर उपाय म्हणून सहकारी तालिकीकरण व केंद्रीभूत तालिकीकरण या उपक्रमांचा वापर होऊ लागला आहे. अशा योजनांद्वारे एखाद्या मध्यवर्ती तालिका केंद्राकडून पुस्तकांच्या नोंदी तयार केल्या जातात व मध्यवर्ती ग्रंथालयाच्या शाखांना व इतर ग्रंथालयांना त्या पुरविण्यात येतात. अमेरिकेमधील लायब्ररी ऑफ काँग्रेस व एच्. डब्ल्यू. विल्सन कंपनीतर्फे होत असलेले सहकारी तालिकीकरणाचे उपक्रम फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत.
जागेचा अभाव व आर्थिक मर्यादा यांमुळे जगात प्रसिद्ध झालेले प्रत्येक पुस्तक कोणत्याही एकाच ग्रंथालयाला विकत घेणे व ते जतन करणे शक्य नसते. त्यामुळे इतर ग्रथांलयांतील साहित्यावर अवलंबून रहावे लागते. आपल्या ग्रंथालयात उपलब्ध नसलेले साहित्य दुसऱ्या ग्रंथालयात आहे किंवा नाही हे कळण्यासाठी व असल्यास ते त्वरित आणविण्यासाठी संयुक्त (युनियन) तालिकेचा उपयोग केला जातो. संयुक्त तालिका स्थानिक, प्रांतीय वा राष्ट्रीय पातळीवरही असू शकते. वॉशिंग्टन येथील लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये उपलब्ध असलेली राष्ट्रीय स्वरूपाची संयुक्त तालिका जगप्रसिद्ध आहे.
तालिकीकरण अचूक व सुसूत्र केले जावे आणि त्यायोगे सर्व साहित्य लवकर उपलब्ध व्हावे, या हेतूने अनेक नियमावलींचा (कोड्स) वापर करण्यात येत आहे. त्यांपैकी काही प्रमुख नियमावली अशा : (१) ब्रिटिश म्यूझियम कोड, (२) प्रशियन इन्स्ट्रक्शन्स, (३) कटर्स रुल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग, (४) अँग्लो-अमेरिकन कोड, (५) ए. एल्. ए. रुल्स फॉर ऑथर अँड टायटल एंट्रीज, (६) अँग्लो-अमेरिकन कॅटलॉगिंग रुल्स, (७) क्लासिफाईड कॅटलॉग कोड विथ ॲडिशनल रुल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग कोड, (८) लायब्ररी ऑफ काँग्रेस रुल्स फॉर डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉगिंग, (९) व्हॅटिकन कोड, (१०) ए. एल्. रुल्स फॉर फाइलिंग कॅटलॉग कार्ड्स इत्यादी.
ग्रंथांच्या वैशिष्ट्यांमुळे व ग्रंथालयांच्या आणि वाचकांच्या गरजांनुसार तालिकेमधील नोंदींमध्ये पुस्तकांसंबंधी कमीजास्त तपशील दिला जातो. तपशिलाच्या स्वरूपानुसार सुलभ (सिंपल) तालिकीकरण, निवडक (सिलेक्टिव्ह) तालिकीकरण आणि वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) तालिकीकरण हे प्रकार रूढ झाले आहेत.
संदर्भसाह्य : जिज्ञासू वाचकांच्या किंवा संशोधकांच्या गरजांनुसार उपलब्ध असलेल्या साधनांच्या द्वारे हरएक प्रकारची माहिती व्यक्तिगत रीत्या तत्परतेने देण्याचे कार्य म्हणजे संदर्भसाह्य. अत्यंत क्षुल्लक माहितीपासून तो महत्त्वाच्या विषयांसंबंधी, घडामोडींविषयी वा संशोधनासंबंधी अद्ययावत माहिती वाचकाला पुरविणे इ. गोष्टी संदर्भसाह्याच्या कक्षेत येतात. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कधी व कोणत्या गावी झाला या माहितीप्रमाणेच खगोलशास्त्रावर संस्कृत भाषेत किती व कोणी कोणी ग्रंथ लिहिले आहेत किंवा जर्मन नागरिकाच्या राहणीमानात गेल्या दहा वर्षांत किती प्रगती झाली इ. प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे संदर्भसेवेच्या द्वारे तातडीने देणे आवश्यक असते.
ग्रंथालयाच्या स्वरूपानुसार संदर्भसाह्याच्या स्वरूपात कमीअधिक फरक असतो. त्यामुळे सार्वजनिक ग्रंथालयापासून अपेक्षित असलेले संदर्भसाह्य आणि विद्यापीठांच्या ग्रंथालयांपासून व विशिष्ट ग्रंथालयांपासून अपेक्षित असलेले संदर्भसाह्य यांत फरक असतो. केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर संदर्भसाह्य देणे शक्य होत नाही. अलीकडे विविध ज्ञानशाखांची आणि ते संगृहीत करणाऱ्या विविध साधनांची इतक्या प्रचंड स्वरूपात वाढ होत आहे, की एखादी व्यक्ती विद्वान, बहुश्रुत असली, तरी त्या व्यक्तीला सर्व काही स्मरणात ठेवणे केवळ अशक्य आहे आणि म्हणूनच संदर्भग्रंथाचा वापर सुरू झाला. एवढेच नव्हे, तर या संदर्भग्रंथांच्या संस्थेत आणि विविधतेतही प्रतिवर्षी भर पडत आहेच. व्यापक दृष्टिकोनातून विचार केल्यास अभ्यासासाठी अथवा संशोधनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही ग्रंथास संदर्भग्रंथ म्हणावे लागेल. परंतु ठराविक प्रकारच्या ग्रंथांनाच संदर्भग्रंथ म्हणण्यात येते. उदा., जो ग्रंथ पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत अभ्यासण्याची आवश्यकता नसते, परंतु जो त्यातील अचूक व विशिष्ट माहितीसाठी आणि विशिष्ट माहितीची नोंद पाहण्यासाठी वापरला जातो, तो संदर्भग्रंथ होय. ग्रंथसूची, ज्ञानकोश, शब्दकोश, चरित्रकोश, वार्षिके, दर्शनिका (गॅझेटिअर्स), विषयसूची इ. प्रकारची प्रकाशने संदर्भग्रंथ प्रकाराखाली येतात. कोणत्याही माहितीचा अद्ययावतपणा व अचूकपणा हा या संदर्भग्रंथांचा प्रधान गुण असतो. प्रमाणभूत संदर्भग्रंथांच्या संग्रहाशिवाय कोणत्याही ग्रंथालयाच्या संदर्भसेवेत कार्यक्षमता निर्माण करणे शक्य होत नसते.
संदर्भसाह्याचे दोन प्रकार रूढ आहेत. एक म्हणजे तात्कालिक (रेडी रेफरन्स) व दुसरा दीर्घकालीन (लाँग रेंज रेफरन्स). स्मरणशक्तीच्या, अनुभवाच्या अथवा संदर्भग्रंथांच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर अथवा हवी असलेली माहिती जेव्हा ताबडतोब दिली जाते, तेव्हा त्यास तात्कालिक संदर्भसाह्य म्हणतात, परंतु काही प्रश्नांचे स्वरूप असे असते, की त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रमाणभूत ग्रंथ,नियतकालिके वा इतर अनेक प्रकारचे साहित्य अभ्यासावे लागते. क्वचित प्रसंगी संबंधित विषयाच्या तज्ञाकडून आवश्यक ती माहितीही मिळवावी लागते आणि ती संकलित स्वरूपात संशोधकाला उपलब्ध करून द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेला अर्थातच वेळ लागतो आणि म्हणूनच त्यास दीर्घकालीन संदर्भसाह्य असे म्हणतात.
ग्रंथालयाचा कारभार, तांत्रिक व्यवहार इ. गोष्टी सांभाळून एकट्या ग्रंथपालाने संदर्भसाह्य देण्याची कल्पना व्यवहार्य नाही. म्हणूनच संदर्भसाह्य देण्यासाठी स्वतंत्र सेवकवर्ग नेमण्याची आवश्यकता भासते. ग्रंथालयात दररोज येणाऱ्या हरएक प्रकारच्या साहित्याची ओळख करून घेऊन व ते कोणाला उपयुक्त होईल याचा अनुभवाने अंदाज घेऊन संबंधित वाचकांना वा संशोधकांना तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संदर्भ–ग्रंथपालाची आहे. यासाठी त्याच्या अंगी बहुश्रुतता, सेवाभाव, मार्दव, कार्यतत्परता, वाचकांच्या गरजा अजमाविण्याची पात्रता, संदर्भग्रंथांचा परिचय इ. गुणांची आवश्यकता असते.
प्रलेखपोषण : एखाद्या संशोधकाला हवी असलेली नेमकी माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याचे कार्य प्रलेखपोषणाद्वारे होत असते. प्रलेखपोषण या शब्दाची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. तथापि त्याच्या प्रक्रियेत काय केले जाते याचे वर्णन करणे मात्र शक्य आहे.
प्रलेखपोषण म्हणजे एक प्रकारचे व्यापक अर्थाने केलेले ग्रंथपालनच. ग्रंथपालनाबरोबरच प्रलेखपोषण ही संज्ञाही वरचेवर वापरण्यात येते. ग्रंथपालनाशी संबंधित अशा काही महत्त्वाच्या प्रक्रियांशी ते निगडित आहे. तथापि ग्रंथपालनाच्या कार्याची विशेषतः ग्रंथांतर्गत साहित्यापुरतीच मर्यादित असते तर प्रलेखपोषणासाठी ग्रंथ, नियतकालिके, विविध प्रकारचे वृत्तांत, परिषदांचे अहवाल व सूक्ष्मविचार (मायक्रोथॉट) इ. ज्यामध्ये प्रसिद्ध होतात, असे साहित्य उपयोगात आणले जाते. सूक्ष्मविचार निर्देशित करण्यासाठी सूक्ष्मवर्गीकरण, सूक्ष्मतालिकीकरण व सूक्ष्म साधनांचा वापर करावा लागतो. सूक्ष्मवर्गीकरणासाठी सार्वत्रिक दशांश अथवा द्विबिंदू वर्गीकरणांचा वापर केला जातो, तर सूक्ष्मतालिकीकरणासाठी शृंखला सूचीचे तत्त्व मान्य होऊ लागले आहे. हजारो नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून हवी ती माहिती त्वरित मिळविण्याच्या दृष्टीने प्रलेखपोषणाच्या तंत्रात छिद्रित पत्र व संगणक यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. नियतकालिकांमधून व इतरत्र प्रसिद्ध होणाऱ्या असंख्य लेखांचा गोषवारा तयार करणे आणि तो प्रसिद्ध करणे, निरनिराळ्या भाषांमधून प्रसिद्ध झालेल्या साहित्याचे संकलन करून भाषांतर करणे, दुर्मिळ साहित्याचे चित्रीकरण करणे, विशिष्ट संदर्भाच्या अनेक प्रती काढून संशोधकांना त्या उपलब्ध करून देणे, विषयवार सूची तयार करणे इ. गोष्टी प्रलेखपोषणात मोडतात.
संशोधन ग्रंथालये, विशेष ग्रंथालये व विद्यापीठ ग्रंथालये यांचा अपवाद सोडल्यास बहुसंख्य ग्रंथालयांमधून आजही केवळ ग्रंथाचाच संग्रह व उपयोग केला जातो. त्यामुळे ग्रंथ हेच ज्ञानप्रसाराचे एकमेव साधन आहे, ही कल्पना आजही रूढ आहे. तथापि या परिस्थितीत हळूहळू बदल होत असून ग्रंथांव्यतिरिक्त नियतकालिके, पुस्तिका, सरकारी व संशोधन संस्थांची प्रकाशने, परिषदांचे वृतांत, टंकलिखीत साहित्य यांचाही वापर संशोधनकार्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. हा बदल जमेस धरून डॉ. एस्. आर्. रंगनाथन् यांनी असे सुचविले आहे, की ग्रंथपालनाच्या याच सूत्रांचा उल्लेख करताना बुक ऐवजी ‘डॉक्युमेंट’ हा शब्द वापरावा. प्रलेखपोषण हा ग्रंथपालनाचाच भाग असल्याने डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथपालनविषयक सूत्रांमध्ये काही मौलिक बदल सुचविले आहेत.
विषयाचे वैशिष्ट्य व व्याप्ती, तसेच विषय कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यासावयाचा आहे आणि कोणत्या दर्जाच्या संशोधकाचे संशोधन चालू आहे इ. सर्व गोष्टींचा परिणाम प्रलेखपोषणाच्या कार्यपद्धतीवर होत असतो. या कार्यपद्धतीच्या प्रारंभ जरी एकोणिसाव्या शतकात झाला असला, तरी प्रारंभी त्याचा उपयोग वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधनापुरताच होता. ब्रूसेल्स येथे १८९२ मध्ये पॉल ऑटलेट आणि हेन्री ल फाँतेन या दोघांमध्ये झालेल्या चर्चेमधून प्रलेखपोषण या नवीन ज्ञानशाखेचा उदय झाला. ऑटलेट आणि फाँतेन यांच्या प्रयत्नांमुळे इंटरनॅशनले द बिब्लिओग्रॅफ या संस्थेची स्थापना झाली आणि कालांतराने तिचे नामांतर फेडरेशन इंटरनॅशनल द डॉक्युमेंटेशन असे झाले.या दोघांच्या प्रयत्नांना विसाव्या शतकाच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आणि हे कार्य राष्ट्रीय पातळीवर चालविण्यासाठी योजनाही तयार होऊ लागल्या. परिणामतः विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युनेस्कोसारख्या संघटना प्रलेखपोषणाच्या कार्याबाबत विशेष आस्था दाखवू लागल्या.
दुसऱ्या महायुद्धानंतर हेग येथील आंतरराष्ट्रीय प्रलेखपोषण केंद्राच्या कार्यास वेग येऊन या संस्थेच्या घटनेतही बदल झाला. १९४५ नंतर अर्जेंटिना, ब्राझील, चीन, भारत, हंगेरी, जपान, मेक्सिको, नॉर्वे, पाकिस्तान, यूरग्वाय, रशिया, यूगोस्लाव्हिया इ. राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रलेखपोषणाची केंद्रे स्थापन झाली. भारतातही १९५२ मध्ये इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर (इन्सडॉक) स्थापन झाले. या कार्याची सर्वांगीण प्रगती कशी करता येईल याचा विचार करण्यासाठी वॉर्सा तेथे एक परिषद भरली होती. तेथे झालेल्या चर्चेच्या आधारे तयार झालेला आराखडा प्रसिद्ध आहे.
भारतातील प्रलेखपोषण कार्याचा प्रारंभ डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे झाला. त्यांनतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सतर्फे इंडियन सायन्स ॲब्स्ट्रॅक्ट्स हे पहिले नियतकालिक प्रसिद्ध होऊ लागले. सध्या भारतात इन्सडॉकतर्फे व इतर ग्रंथालयांमधून प्रलेखपोषणाचे कार्य चालू आहे. ग्रंथपालनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातही हा विषय शिकविला जातो. तसेच दिल्लीच्या इन्सडॉकतर्फे व बंगलोर येथील डॉक्युमेंटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरतर्फे हे शिक्षण दिले जाते.
ग्रंथालयीन संघटन व कार्यपद्धती : ग्रंथालयाच्या तांत्रिक घटकांप्रमाणेच ग्रंथालयीन संघटन व कार्यपद्धती हे घटकही अत्यंत महत्त्वाचे आहेत. यात ग्रंथालयाची वास्तू, अंतर्गत ग्रंथालयीन व्यवस्था आणि तदानुषंगिक बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो.
ग्रंथालयाची वास्तू : राष्ट्रीय, सार्वजनिक, शैक्षणिक, संशोधनपर व इतर विशिष्ट स्वरूपाची ग्रंथालये असतात. या निरनिराळ्या प्रकारच्या ग्रंथालयांमधील ग्रंथसंग्रह, वाचकवर्ग, कार्यपद्धती, ग्रंथालयीन सेवेचे उद्दिष्ट यांमध्येही फरक आढळून येतो. ग्रंथालयातील तालिकीकरण, वर्गीकरण, संदर्भसाह्य, प्रलेखपोषणे व इतर तांत्रिक गोष्टी इत्यादींबद्दल ज्याप्रमाणे अनुभवाने काही संकेत प्रस्थापित झाले आहेत, त्याचप्रमाणे ग्रंथालयाची इमारत व अंतर्गत रचना कशी असावी याबद्दलही काही मानके आता मान्य झाली आहेत. कोणत्याही ग्रंथालयाच्या इमारतीची व अंतर्भागाची बांधणी करताना ग्रंथपालाच्या शिफारशी जमेस धरणे आवश्यक असते. तसेच वाचकांच्या सोयीच्या दृष्टीने ग्रंथालयाची इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधली जावी हे तत्त्व आता सर्वमान्य झाले आहे. ग्रंथालयाची सतत वाढ होत असल्याने त्याची यापुढील वाढही जमेस धरून आणि केवळ शोभेऐवजी कार्यक्षमतेस प्राधान्य देऊन ग्रंथालयाची इमारत बांधणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. शांत वातावरण, भरपूर उजेड, मोकळी हवा इ. गोष्टींकडेही ग्रंथालयाची रचना करताना लक्ष द्यावे लागते. ग्रंथालयातील कपाटे, टेबले, खुर्च्या, ग्रंथ देवघेवीचा प्रतिकक्ष (काउंटर) आणि इतर सर्व प्रकारचे बैठे सामान आकर्षक, मजबूत व उपयुक्त असणे व त्याची निगा राखणे आवश्यक असते.
ग्रंथालयव्यवस्था : ग्रंथालयातील पुस्तकांची, वाचकांची तसेच निरनिराळ्या विभागांची ज्या प्रमाणात वाढ होत जाते, त्या प्रमाणात ग्रंथालयातील अंतर्गत कारभाराची कक्षा वाढत जाते. त्यामुळे ग्रंथांची देवघेव, वर्गीकरण, सूचिलेखन, संदर्भसाह्य इ. गोष्टींखेरीज ग्रंथालयाच्या दैनंदिन व्यवहारांतील अनेक गोष्टींकडेही ग्रंथपालाला लक्ष पुरवावे लागते. ग्रंथालयाच्या व्यवहारात अमुक एक गोष्ट कमी महत्त्वाची व दुसरी जास्त महत्त्वाची असे मानून चालत नाही.
वाचकांची गरज, अभिरुची व ग्रंथालयाच्या आर्थिक मर्यादा गृहीत धरून ग्रंथांची निवड करण्याचे महत्त्वाचे कार्य करावे लागते. ग्रंथनिवड करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत. उदा., प्रत्यक्ष पुस्तके वाचून, नियतकालिकांमधून अथवा इतरत्र आलेली परिक्षणे वाचून किंवा प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांच्याकडून आलेल्या याद्यांवरून पुस्तकांची निवड केली जाते.
खरेदी, देणगी वा विनिमय इ. रूपांनी ग्रंथालयात प्रतिवर्षी शेकडो पुस्तके येत असतात. अशा पुस्तकांची सर्वप्रथम दाखलपुस्तकांत नोंद केली जाते. या नोंदीत ग्रंथाचा लेखक, प्रकाशक, प्रकाशनस्थल, मूल्य आणि ते पुस्तक कोणत्या प्रकाराने आले आहे वगैरे तपशिलांची माहिती द्यावी लागते. ही दाखलनोंद पत्ररूपात अथवा पुस्तकाच्या स्वरूपात ठेवली जाते. ग्रंथालयातील साहित्य–जंत्रीच्या व शासकीय हिशेबतपासनीसांच्या दृष्टीने दाखलनोंदींना फार महत्त्व असते. नवीन आलेल्या प्रत्येक ज्ञानसाहित्याची नोंद ग्रंथालयात झाल्यानंतर त्यावर ग्रंथालयाचा शिक्का मारला जातो. बोधांक लिहिण्यासाठी पुस्तकावर वर्तुळाकार चिठ्ठी डकविली जाते व त्यानंतर त्या ग्रंथावर वर्गीकरण, तालिकीकरण इ. संस्कार केले जातात.
ग्रंथालयात आणि ग्रंथालयाच्या बाहेर पुस्तके वाचावयास देण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यांपैकी नेवार्क आणि ब्राउन या पद्धती प्रसिद्ध आहेत. ग्रंथ–देवघेवीच्या कार्यक्षम पद्धतीवर व त्यातील अचूकपणावर ग्रंथालयीन कारभाराची मदार असते. ज्या ग्रंथालयामधून ठराविक मुदतीत पुस्तके परत करण्याचे बंधन नसते, अशा ग्रंथालयात ग्रंथ देवघेवीच्या स्वतंत्र पद्धती रूढ आहेत. काही ग्रंथालयांमधून अनामत रक्कम घेऊन पुस्तके घरी वाचावयास दिली जातात.
ग्रंथालयातून किती पुस्तके गहाळ झाली, कोणाकडून कोणती पुस्तके येणे आहेत व पुस्तकांची अवस्था काय आहे इ. अजमावण्याच्या हेतूने बहुसंख्य ग्रंथालयांत प्रतिवर्षी किती पुस्तके घेतली जातात ती कोणकोणत्या विषयांवरील आहेत त्यांवर किती खर्च होतो ग्रंथालयात व ग्रंथालयाच्या बाहेर किती पुस्तके वाचावयास दिली जातात दररोज किती वाचक ग्रंथालयाचा फायदा घेतात एका दिवसात किती पुस्तकांची दाखलनोंद तालिकीकरण, वर्गीकरण होते. किती तालिकापत्रे लावली जातात किती वाचकांना, संशोधकांना संदर्भसाह्य दिले जाते किती नियतकालिके नोंदली जातात त्यांतील किती लेखांचा सारांश काढला जातो इ. विविध प्रकारची आकडेवारी ग्रंथालयात ठेवणे आवश्यक असते. पुढील वर्षातील अंदाजपत्रक तयार करण्यासाठी या नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारच्या आकडेवारीचा फार फायदा होतो.
ग्रंथालय समितीच्या बैठकीची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, चर्चेसाठी येणाऱ्या विषयांवरील टिपणे तयार करणे, बैठकीत झालेल्या चर्चेची टिपणे ठेवणे, सभेचा वृत्तांत तयार करणे, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, त्यासाठी करावा लागणारा पत्रव्यवहार करणे इ. गोष्टींचा ग्रंथालयीन कारभारात अंतर्भाव होतो. ठराविक वर्षात ग्रंथालयाच्या कारभारात किती प्रगती झाली, याची माहिती संबंधितांना मिळावी म्हणून वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालात वार्षिक खर्च, वाचकांच्या गरजा पुरविण्यासाठी अमलात आणलेल्या योजना, तांत्रिक कार्यातील सुधारणा, वाचकांची व नवीन घेतलेल्या साहित्याची आकडेवारी, देणगीदार व इतर उल्लेखनीय गोष्टी इत्यादींची माहिती दिली जाते.
ग्रंथालयाच्या वाढत्या कक्षा : ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था आहे. समाज्याच्या हितासाठी तिचे संवर्धन करणे आवश्यक असते. स्वाभाविकपणेच समाजातील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व तत्सम घटनांचा, आचारविचारांचा व आवडीनिवडींचा परिणाम ग्रंथालयांवर होत असतो. ज्या प्रमाणात वाचकांच्या गरजा वाढत अथवा बदलत जातात, निरनिराळे शोध लागतात आणि साधने उपलब्ध होतात त्या प्रमाणात ग्रंथपालनाच्या कक्षा वाढत जातात. ज्या साधनांच्या द्वारे ज्ञानाचा संग्रह व प्रसार केला जातो, त्यांमध्ये होणाऱ्या सुधारणांचा व वाढीचा ग्रंथपालनावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आजच्या ग्रंथालयात ग्रंथांव्यतिरिक्त हरएक प्रकारची ज्ञानसाधने संगृहीत करावी लागतात. परंतु ग्रंथ, नियतकालिके, पुस्तिका, नकाशे व इतर साहित्याची वाढ इतक्या प्रचंड प्रमाणात होत आहे, की ते कसे जतन करावयाचे व त्यांची उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करावयाची, हे प्रश्न दिवसेंदिवस ग्रंथालयांना भेडसावू लागले आहेत. ग्रंथालयाची इमारत कितीही अवाढव्य असली, तरी प्रचंड साहित्यनिर्मितीमुळे ती अपुरीच पडते. हा प्रश्न सोडविण्यासाठी अलीकडे सूक्ष्मपटांचा व ते वाचण्याच्या यंत्रांचा उपयोग होऊ लागला आहे.
जीवनाच्या विविध क्षेत्रांत ज्याप्रमाणे यांत्रिकीकरणाचा परिणाम होत आहे, त्याप्रमाणे ग्रंथपालन क्षेत्रातही यांत्रिकीकरणामुळे क्रांती घडून येत आहे. उदा., विजेच्या पाळण्यामधून एका दालनातून दुसऱ्या दालनात पुस्तके नेण्याची सोय, यंत्राद्वारे एकाच पुस्तकाच्या अनेक नोंदी करण्याची साधने, सूक्ष्मचित्रीकरणाची व ते वाचण्याची सोय, पुस्तके देवघेव करणारी विजेची यंत्रे, पुस्तकांचे कीटकांपासून रक्षण करण्यासाठी वापरण्यात येत असलेली उपकरणे, ग्रंथालयात ठराविक हवामान खेळविण्यासाठी वापरण्यात येणारी वातानुकूल यंत्रे आणि ग्रंथांच्या कण्यावर बोधांक लिहिण्यासाठी वापरलेली विजेची झरणी, धूळ काढण्यासाठी वापरण्यात येणारे विजेचे यंत्र इ. अनेक यांत्रिक साधनांचा ग्रंथालयात उपयोग केला जातो. संदर्भसाह्यासाठीही यंत्रांचा वापर करण्यात येतो. एके काळी महत्त्वाची वाटणारी पंचकार्डांची पद्धत आज मागे पडत असून त्यांची जागा संगणक घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढे ग्रंथपालन हे तंत्रज्ञांच्या हातात राहणार की ती यंत्रज्ञांची मक्तेदारी होणार, ही नवीन समस्या निर्माण झाली आहे.
एक काळ असा होता की ग्रंथालये आणि ग्रंथपालन यांच्या महत्त्वाच्या कार्याची समाजाला पुरेशी कल्पना नव्हती. आता परिस्थिती पूर्ण बदलली असून ग्रंथालयांच्या ग्रंथपालनाच्या उन्नतीसाठी स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. अभ्यासमंडळे, संशोधन संस्था, परिषदा, चर्चासत्रे यांच्यामुळे त्या प्रयत्नांस जोराची चालना मिळत आहे. लंडनचे क्लासिफिकेशन रिसर्च ग्रूप व बंगलोरचे डॉक्युमेंटेशन रिसर्च ट्रेनिंग सेंटर या दोन संस्था वर्गीकरण संशोधनाबाबत मौलिक कामगिरी बजावीत आहेत. वरील संस्थांव्यतिरिक्त विद्यापीठे, ग्रंथपालन संघटना यांद्वारे ग्रंथपालनविषयक संशोधन प्रगत होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रंथालयीन सहकाराच्या योजना आखल्या जात आहेत. त्यांना अनुसरून अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया व कॅनडा यांसारखी संपन्न राष्ट्रे ग्रंथरूपाने आर्थिक मदत देऊन अविकसित राष्ट्रांमधील ग्रंथालयांच्या प्रगतीसाठी हातभार लावीत आहेत.
सार्वजनिक ग्रंथालयाचा म्हणजे मुक्तद्वार ग्रंथालयाचा कारभार सुव्यवस्थितपणे व कार्यक्षमतेने चालावा, तसेच त्याची उपयुक्तताही वाढीला लागावी या दृष्टीने ग्रंथालयीन कायदा असणे आवश्यक आहे. इंग्लंडमध्ये १८५० पासून १९६४ पर्यंत अनेक ग्रंथालय-कायदे करण्यात आले. तसेच भारतात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या राज्यांमधूनही ग्रंथालय–कायदे झालेले आहेत आणि आता भारतातील सर्व राज्यांना लागू पडणारा एकसूत्री ग्रंथालय-कायदा जारी करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
साक्षरतेची सतत होणारी वाढ व ज्ञान मिळविण्याची आकांक्षा या दोन गोष्टींचा ग्रंथालयांच्या वाढीवर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे प्रसिद्ध झालेले सर्व साहित्य वाचकांना किंवा संशोधकांना कसे उपलब्ध करून द्यावयाचे, ही समस्या ग्रंथालयापुढे सतत उभी असते. दिवसेंदिवस पुस्तके, मासिके व इतर संशोधनात्मक साहित्य यांत इतक्या प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे, की ज्यांची वार्षिक अंदाजपत्रके काही कोटी रुपयांची आहेत, असा ग्रंथालयांनासुद्धा प्रसिद्ध झालेले प्रत्येक पुस्तक विकत घेणे अशक्य असते. ग्रंथसंग्रह इतक्या झपाट्याने वाढत जातो, की ग्रंथालयाची इमारत कितीही मोठी असली तरी ती अपुरी पडते. ग्रंथालयीन सहकार्याचा उदय याच परिस्थितीतून झालेला आहे. शेकडो वाचकांच्या वा संशोधकांच्या विविध प्रकारच्या गरजा पुरविण्यासाठी इतर ग्रंथालयांचे सहकार्य घेणे आज अपरिहार्य होऊन बसले आहे. पाश्चात्त्य देशांमधून ज्या काही ग्रंथालयीन सहकार्याच्या योजना यशस्वी झाल्या आहेत, त्यांमध्ये संयुक्त ग्रंथखरेदी, सहकार्य, तालिकीकरण, संयुक्त तालिका, सामायिक ग्रंथसंग्रह भांडारे, आंतरग्रंथालयीन देवघेव या बाबी महत्त्वाच्या व उल्लेखनीय आहेत.
संयुक्त ग्रंथखरेदीमुळे दुर्मिळ व मौल्यवान पुस्तकांची दुबार होणारी खरेदी टाळता येते. तसेच परदेशात प्रसिद्ध होणारे कोणतेही प्रकाशन आपल्या देशातील कोणत्या तरी ग्रंथालयामार्फत उपलब्ध करून देऊन वाचकांच्या वा संशोधकांच्या गरजा भागविणे शक्य होते. फार्मिंग्टन प्लॅन नावाची संयुक्त ग्रंथखरेदी योजना जगप्रसिद्ध आहे.
ग्रंथालयीन सहकाराचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथालयांत ठेवता न येणारे साहित्य सामाईकपणे जतन करण्याची योजना. ग्रंथालयीन जागेच्या समस्येला तोंड देण्यासाठी अमेरिकेत एक अभिनव पद्धत अंमलात आली आहे, ती म्हणजे ग्रंथालयात नित्याने न लागणारी पुस्तके एका मध्यवर्ती केंद्रात जतन करणे. मध्यवर्ती केंद्राचा खर्च सहभागी ग्रंथालये करतात. शिकागो येथील मिड् वेस्ट सेंटर ही संस्था अशाच प्रकारचे कार्य करीत असते. ग्रंथालयीन सहकाराच्या इतर योजनांत सामायिक तालिकीकरण योजना विशेष महत्त्वाची आहे.
ग्रंथांची आंतरग्रंथालयीन देवघेव अधिक परिणामकारक करण्यासाठी राष्ट्रीय स्वरूपाची नियमावली असणेही आवश्यक असते. अमेरिकन लायब्ररी असोसिएशनतर्फे व भारतातील इयास्लिक संघटनेतर्फे अशा प्रकारची नियमावली केली गेली आहे.
ग्रंथालयशास्त्राचे प्रशिक्षण : ग्रंथालयांच्या प्रगतीबरोबरच ग्रंथालयात चालणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यांची माहिती ग्रंथालयातील प्रत्येक सेवकाला असणे अवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने मेलव्हिल ड्यूई यांनी केलेल्या प्रयत्नास यश आले व १८८७ मध्ये अमेरिकेमधील कोलंबिया विद्यापीठात ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम सर्वप्रथम सुरू झाला. आता जगातील बहुतेक देशांत असे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत.
ग्रंथपालनाचा शिक्षणक्रम कसा असावा यासंबंधी इंग्लंडमधील लायब्ररी ॲडव्हायझरी कौन्सिलने विशेष शिफारशी केलेल्या आहेत. ग्रंथपालनाच्या प्रशिक्षणात सुसूत्रता व अद्ययावतपणा टिकविण्याच्या हेतूने निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये शासनातर्फे राष्ट्रीय पातळीवर नियोजन समित्याही नेमल्या जात आहेत. पाश्चात्त्य देशांमधील ग्रंथपालनाच्या बहुसंख्य अभ्यासक्रमांतून वर्गीकरण, तालिकीकरण, संदर्भसाह्य, ग्रंथालयीन व्यवस्था इ. विषयांबरोबरच साहित्याचा इतिहास, सांस्कृतिक इतिहास, परकीय भाषा इ. विषयांचाही अंतर्भाव केलेला आढळतो. अमेरिकेमधील अनेक विद्यापीठांमधून ग्रंथपालनाचे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. इंग्लंडमध्ये ग्रंथपालनाचे शिक्षण पत्रव्यवहाराद्वारेही घेता येते. ग्रंथपालनासंबंधी विपुल व दर्जेदार साहित्यनिर्मिती पाश्चात्त्य देशांमधून होत आहे. पाश्चात्त्य देशांमधील ग्रंथपालनाच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके आणि चर्चा यांना विशेष प्राधान्य दिले जाते. या विषयात संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळविण्यास योग्य त्या सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा पहिला प्रयत्न बडोदे संस्थानात झाला. आपल्या संस्थानात ग्रंथालयांची सुधारणा करण्याच्या हेतूने श्रीमंत सयाजीराव महाराज यांनी अमेरिकेहून डब्ल्यू. सी. बॉर्डन या तज्ञाला मुद्दाम बोलावून घेतले व त्याच्या सल्ल्यानुसार १९११ मध्ये बडोद्यास ग्रंथपालनाचे प्रशिक्षण देण्याची सोय केली. या संधीचा फायदा भारतातील कोणाही नागरिकाने घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. परंतु त्या काळात ग्रंथालये व ग्रंथपालन यांचे महत्त्व समाजाला पटलेले नसल्याने या नावीन्यपूर्ण उपक्रमास विशेष पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर ए. डिकन्स यांच्या प्रयत्नाने लाहोर येथे १९१५ मध्ये ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम सुरू झाला. त्यानंतर कलकत्त्याच्या इंपीरिअल लायब्ररीतर्फे १९३५ मध्ये व मद्रास विद्यापीठातर्फे १९३७ मध्ये ग्रंथपालनाचा पदवीपूर्व शिक्षणक्रम (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) सुरू झाला. स्वातंत्र्योत्तर काळात ग्रंथालयांचीही वाढ होत गेली व शेकडो ग्रंथपालांची जरूरी भासू लागली. त्यामुळे प्रशिक्षित ग्रंथपाल तयार करण्याची जबाबदारी भारतातील अनेक विद्यापीठांनी व व्यावसायिक संघटनांनी पतकरली. सध्या भारतात ग्रंथपालनाचे शिक्षण पदवीपूर्व व पदव्युत्तर अशा दोन स्तरांवर दिले जाते. पदवीपूर्व अर्थांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांत असून तो व्यावसायिक संघटना चालवितात. सु. पन्नास विद्यापीठांमधून पदव्युत्तर पातळीवर बी. लिब्. आणि एम्. लिब्. या दोन पदव्यांच्या संदर्भात अभ्यासक्रम आखलेला आहे. दिल्ली, बनारस, राजस्थान, कर्नाटक, म्हैसूर, पुणे इ. विद्यापीठांमधून या विषयासाठी स्वतंत्र विभागही स्थापन झाले आहेत. विद्यापीठांव्यतिरिक्त दिल्लीच्या इन्सडॉकतर्फे व बंगलोरच्या डी.आर्. टी. सी. तर्फेही ग्रंथपालनाचा एम्. लिब. चा विशेष अभ्यासक्रम चालविला जातो. या दोन्ही संस्थांतर्फे चालविलेल्या अभ्यासक्रमास मान्यता लाभली आहे.
ग्रंथपालनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम घेऊ इच्छिणारा विद्यार्थी केवळ पदवीधर असून भागत नाही. त्याच्या अंगी बहुश्रुतपणा, चौकसपणा, व्यवस्थापननैपुण्य, सांघिक वृत्ती, ज्ञानावरील श्रद्धा, सेवाभाव, व्यावसायिक निष्ठा इ. गुण असावे लागतात. पाश्चिमात्त्य देशांमधून ग्रंथपालनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केवळ परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होत नाही तर संभाषणचातुर्य, नेतृत्वाचे गुण, योजकता, निर्णय घेण्याची पात्रता, उत्स्फूर्तता, ज्ञानावरील श्रद्धा व ग्रंथांची आवड वगैरे गुणांना विशेष प्राधान्य देऊन केली जाते. भारतीय विद्यापीठांमधून ग्रंथपालनाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना वरील गुणवत्तेचाही विचार केला जावा, अशी शिफारस १९६६ मध्ये दिल्ली विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या चर्चासत्रात करण्यात आली. विद्यापीठांमधून ग्रंथपालन अभ्यासक्रमाचे माध्यम मात्र इंग्रजीच आहे.
अपवाद सोडल्यास सर्वच विद्यापीठांमधील ग्रंथपालन अभ्यासक्रमाचे नियोजन अभ्यासमंडळातर्फे केले जाते. नियोजित अभ्यासक्रमाची कालमर्यादा, परीक्षापद्धती, क्रमिक पुस्तके व निरनिराळ्या विषयांचा तपशील या संदर्भातील शिफारशी अभ्यासमंडळाद्वारे केल्या जातात. ग्रंथालयांचा इतिहास, ग्रंथालयीन संघटन व कारभार, संदर्भसाह्य, प्रलेखपोषण, वर्गीकरण व तालिकीकरण हे विषय सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातून शिकविले जात. मात्र काही अभ्यासक्रमांमधून व्यवस्था व संघटन या दोन विषयांचे एकत्रीकरण केलेले आढळते, तर काही विद्यापीठांमधून सर्वसामान्य ज्ञान हा एक स्वतंत्र विषय ठेवलेला आढळतो. प्रात्यक्षिकांवर विशेष भर दिला जावा, असा विचार व्यक्त होत असला, तरी प्रत्यक्षात तसे घडत नाही. वर्गीकरण (तात्त्विक) व तालिकीकरण (तात्त्विक) या दोन विषयांच्या संदर्भातील तपशील एकसारखा नाही. अभ्यासक्रम एका शैक्षणिक वर्षाचा असतो. वर्षाच्या अखेर सु. १,००० गुणांची लेखी, तोंडी व प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात परीक्षा घेतली जाते.
ग्रंथपालनाच्या प्रचलित अभ्यासक्रमासंबंधी दोन विचारप्रवाह रूढ आहेत. एक असा, की वर्गीकरण आणि तालिकीकरण या विषयांच्या तात्त्विक तपशिलांना अवास्तव प्राधान्य दिलेले आहे. त्याऐवजी प्रात्यक्षिकांवर अधिक भर द्यावा. दुसरा विचार असा, की सर्वसामान्य ज्ञान हा विषय शिकविण्याची जरूरी नाही. एक वर्षाची कालमर्यादा लक्षात घेता ग्रंथपालनाव्यतिरिक्त इतर विषय शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कितपत पेलतील, अशीही शंका व्यक्त केली जाते. वरील दोन्ही मतप्रणालींत तथ्य आहे आणि व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने त्यांत समन्वय साधणे इष्ट आहे.
भारतातील विद्यापीठांतून दिल्या जाणाऱ्या ग्रंथपालनाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप काय आहे व त्यात कोणते बदल घडवून आणणे शक्य आहे, तसेच सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात एकसूत्रता निर्माण करता येईल किंवा काय इ. गोष्टींचा विचार करण्यासाठी १९६१ मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे डॉ. एस्. आर्. रंगनाथन् यांच्या अध्यक्षतेखाली एक खास निरीक्षक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल १९६५ मध्ये प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये अनेक उपयुक्त सूचना केलेल्या आढळतात. वरील अहवालावर आणि भारतातील प्रचलित ग्रंथपालन अभ्यासक्रमाबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे व निरनिराळ्या विद्यापीठांतर्फेही अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यांमधून (१) ग्रंथपालनाच्या शिक्षणाची उद्दिष्टे, (२) ग्रंथपालनशास्त्राचे अध्यापक, (३) विद्यार्थ्यांची संख्या व शिक्षकांचे प्रमाण, (४) प्रवेश देण्यासंबंधीचे नियम, (५) अभ्यासक्रमाचा तपशील, (६) परीक्षापद्धती , (७) अधिकृत मान्यता इ. गोष्टींबद्दल वेळोवेळी चर्चा झाली आणि त्या संदर्भात शिफारशीही करण्यात आल्या. भारतातील अनेक विद्यापीठांमधून ग्रंथपालनाचे जे अभ्यासक्रम चालू आहेत, त्यांत सुसूत्रता निर्माण करण्याच्या दृष्टीने व त्यांचा दर्जा टिकविण्याच्या अखिल भारतीय पातळीवर एखादी संस्था निर्माण करणे आवश्यक झाले आहे.
ग्रंथपालनाचे शिक्षण मराठीतून देण्याचा उपक्रम पुणे ग्रंथालय संघाने १९४७ मध्ये सुरू केला. १९४९ पासून महाराष्ट्र ग्रंथालय संघाने (आता महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाने) हा उपक्रम आजपर्यंत सातत्याने चालू ठेवला आहे. मराठी भाषेतून चालविण्यात येणाऱ्या प्रशस्तिपत्रक अभ्यासक्रमाची सु. आठ आठवडे असते. प्रारंभी ह्या अभ्यासक्रमाची सोय पुण्यातच होती. आता मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद येथेही ही सोय आहे. सु. ५०० विद्यार्थी त्याचा फायदा घेत असतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शासनातर्फे परीक्षा घेतली जाते आणि यशस्वी विद्यार्थ्यांना सरकारतर्फे प्रशस्तिपत्रके दिली जातात. मराठी माध्यमातील अभ्यासक्रम अधिकाधिक उपयुक्त व्हावा या दृष्टीने आतापर्यंत वर्गीकरण, तालिकीकरण, कारभार आणि संदर्भसाह्य इ. विषयांवरील पुस्तके मराठीत प्रसिद्ध झाली आहेत.
ग्रंथपालन अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने विविध योजना आकार घेत आहेत. वेगवेगळ्या राष्ट्रांमधील ग्रंथालयशास्त्रांच्या शिक्षकांना एकत्र आणून त्यांना विशेष मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न युनेस्कोतर्फे चालू आहेत. १९६८ मध्ये युनेस्कोतर्फे डेन्मार्क येथे अशा शिक्षकांसाठी एक विशेष अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता.
अमेरिका, इंग्लंड व इतर पाश्चात्त्य देश यांमधून ग्रंथपालन व्यवसायाला आज विशिष्ट दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. डॉक्टर, वकील, न्यायाधीश, प्राध्यापक, प्रशासक, तंत्रज्ञ यांच्याइतकीच ग्रंथपालांची समाजाला जरूर आहे, याविषयी पाश्चात्त्य देशांत आता दुमत राहिलेले नाही. उलट ग्रंथपाल हा समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो.
आता भारतामध्येही ग्रंथसंग्रह व ग्रंथदेवघेवीची जागा म्हणजे ग्रंथालय आणि जी व्यक्ती पुस्तकाची देवघेव करते तो ग्रंथपाल, ही मामुली कल्पना मागे पडून या व्यवसायाचे महत्त्व व उपयुक्तता समाजाला पटू लागली आहे. एवढेच नव्हे, तर शैक्षणिक व संशोधन संस्था, शासकीय प्रयोगशाळा, माहिती केंद्रे इत्यादींतून ग्रंथालये आणि ग्रंथपालन यांचे महत्त्व व दर्जा हळूहळू वाढू लागला आहे. डॉ. राधाकृष्णन्, डॉ. कोठारी व सिंहा या भारत सरकारने नेमलेल्या समित्यांच्या अहवालात ग्रंथालय व ग्रंथपालनाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. शिक्षणाचा प्रसार, विद्यापीठ अनुदान आयोगाचा अनुकूल व उदार दृष्टिकोन डॉ. रंगनाथन् यांनी या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेले अविश्रांत परिश्रम, संशोधनाच्या वाढत्या कक्षा, प्रचंड स्वरूपात निर्माण होणारे साहित्य इ. गोष्टींमुळे ग्रंथपालन व्यवसायाचे महत्त्व भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात फार झपाट्याने वाढले आहे.
इतर व्यवसायांप्रमाणे ग्रंथपालन व्यवसायातही समस्या, संघर्ष, मर्यादा आहेत, परंतु सर्व अडचणी जमेस धरून स्वयंप्रेरणेने नवीन योजना हाती घेऊन त्या यशस्वी केल्यास या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढेल व समाजाला त्याची उपयुक्तता अधिक प्रमाणावर पटू लागेल.
पहा : ग्रंथ ग्रंथसंरक्षण ग्रंथालय ग्रंथालय-चळवळ.
संदर्भ : 1. Corbett, E. V. An Introduction to Librarianship, London,1963.
2. Foskett, D. J. Information Service in Libraries, London, 1962.
3. Gates, J. K. Introduction to Librarianship, New York, 1968.
4. Needham, C. D. Organizing Knowledge in Libraries, Liverpool, 1964.
5. Ranganathan, S. R. Documentation and Its Facets, New York, 1963.
6. Ranganathan, S. R. Library Administration, Bombay, 1960.
7. Ranganathan, S. R. Library Book Selection, Bombay, 1966.
8. Ranganathan, S. R. Prolegomena to Library Classification, Bombay, 1967.
9. Ranganathan, S. R. Reference Service, Bombay, 1961.
10. Saunders, W. L. The Provision and Use of Library and Documentation Services, Oxford, 1966.
11. Sayers, W. C. B. A Manual of Classification for Librarians and Bibliographers, Norwich, 1964.
12. Sengupta, B. Cataloguing : Its Theory and Practice, Calcutta, 1964.
13. Sharp, H. A. Cataloguing, Bombay, 1964.
हिंगवे, कृ. शं.
“